आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपला संपूर्ण देश कोरोना मुळे टाळेबंदीत अडकला होता. जवळपास ७० ते ८० टक्के जगात अशीच परिस्थिती आहे.
काही दिवसांपुर्वीपासून अनलॉकला सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा प्रसार कमी होत नाहीये, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन भोगावं लागणार का ही भिती कायम आहे.
कोरोनाची लागण होऊन प्रसार होऊ नये यासाठी घरीच सुरक्षित राहणं हा एकमात्र उपाय आहे. शेवटी ‘जान हैं तो जहान है’!
आपल्या देशात बहुतेक उद्योग- धंदे ठप्प आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णतः बंद आहे.
४ मे पासून देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या जिल्ह्यात उद्योग – धंदे सुरू करण्यात आले आहेत, परंतु बहुतेक मजूर गावी गेल्याने तिथेही किती प्रमाणात उत्पादन होऊ शकेल याविषयी शंकाच आहे.
बाकी सर्व प्रमुख शहरांत अजून ही टाळेबंदी सुरूच आहे. महसुलाचे स्रोत बंद असल्याने काही राज्य सरकरांकडे ,आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न देण्याची नामुष्की ओढवली आहे.
नवीन सरकारी नोकर भरती थांबवण्यात आलीये. सरकारी क्षेत्रात ही परिस्थिती आहे अन खासगी क्षेत्रात तर अजूनच भयंकर हाल!
National Sample Survey द्वारा असं निरीक्षण आहे की, टाळेबंदी मुळे १ करोड ३४ लाख लोक प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पणे रोजगार संकटात आहेत.
कोरोना चे संकट येण्यापूर्वी जर भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर, देशात किमान १ करोड रोजगारांची आवश्यकता होती. पण आता कोरोनानंतर रोजगार वाढण्यापेक्षा आहे ते रोजगार मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचा सगळ्यात मोठा आघात भविष्यात ज्या अत्यावश्यक क्षेत्रात गुंतवणूक करणं गरजेचं होतं त्यावर नक्कीच होणारे, जसं की शिक्षण, आरोग्य, कौशल्य निर्मिती, पायाभूत सुविधा.
परिणामी आपण कोरोना पूर्वी आर्थिक दृष्टया ज्या स्थानावर होतो त्यापेक्षा कितीतरी मागे ढकलले जाऊ अशी भीती व्यक्त होते आहे. उमद्या तरुणाईवर या बेकारीचा विपरीत परिणाम होऊन निराशा, गुन्हेगारीत वाढ होऊ शकते.
टाळेबंदीचा त्वरित परिणाम जो झालाय तो छोटे व्यावसायिक, कंत्राटी कामगार किंवा असे श्रमिक ज्यांच्या कामात कुठलाही कायदेशीर करार नसतो- म्हणजे ज्यांचे वेतन ठरलेले नसते त्यांच्यावर.
आपल्या देशात सुमारे ५० लाख या प्रकारचे कामगार आहेत ज्यांच्या कामाचा कालावधी एका वर्षापेक्षा कमी आहे.
एका खासगी नोकरी शोधणाऱ्या वेब पोर्टल च्या नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतीय उद्योजकांनी ‘कॉस्ट कटिंग’ च्या नावाखाली पगार कमी करायला सुरुवात केली आहेच, परंतु यातील बऱ्याच कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुद्धा तात्पुरती स्थगित केली आहे.
रोजगार कपातीचा फटका हा खालील क्षेत्रांना सर्वाधिक बसण्याची शक्यता आहे.
पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र
कोरोना मुळे सगळ्यात वाईट फटका कोणत्या क्षेत्राला बसला असेल तर तो पर्यटन क्षेत्राला! फेब्रुवारी पासूनच बऱ्याच देशांनी त्यांच्या नागरिकांना पर्यटना साठी देशांतर करण्यास निर्बंध लावायला सुरवात केली होती.
देशांतर्गत पर्यटन सुद्धा पूर्ण ठप्प आहे. हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत. आपल्या देशात या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या ४० लाखाच्या आसपास आहे.
सी-टू संस्थेच्या इशाऱ्यानुसार जर ऑक्टोबर पर्यंत आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली नाही तर यातल्या निम्म्या म्हणजे २० लाख लोकांच्या नोकरीवर गदा येण्याची दाट शक्यता आहे.
अनेक रेस्टॉरंट बंद आहेत पण जी चालू आहेत त्यांनी सुद्धा व्यवसाय ३५% घसरल्याचं सांगितलंय.
कोरोना मुळे रेस्टॉरंट चे तसेच डिलिव्हरी कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी होणार खर्च. उदा. मास्क, सॅनेटायजर. भाज्या आणि इतर वस्तू बाहेरून आणल्यावर त्यांच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी येणारा खर्च खूप आहे.
या सगळ्या वाढीव खर्चाने रेस्टॉरंट मालकांची अवस्था ‘चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला’ सारखी झालीये.
उत्पादन क्षेत्र
अन्न उत्पादन ते इलेक्ट्रॉनिक, सिमेंट, सिरॅमिक सारख्या क्षेत्रात उत्पादनाशी निगडित एकूण ९० लाख नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टाळेबंदी ने उत्पादन क्षेत्र गोठवून टाकल्यात जमा आहे. गेल्या महिनाभरात उत्पादन नीचांकी स्तरावर पोचलंय.
आपल्या देशात मोबाईल संचाची निर्मिती करणारी एका कंपनी च्या अहवालानुसार, त्यांना उत्पादन बंद असण्याचा सुमारे ₹१५००० करोड चा तोटा होऊ शकतो.
या कंपन्यांचा कोरोना पूर्वी, दररोजचा महसूल ५००-७०० करोड असायचा.महिनाभर चाललेल्या टाळेबंदीने त्यांचं एकूण नुकसान १५०००- २०००० करोड रुपयांपर्यंत नेलं आहे.
वॉल स्ट्रीट जर्नल मधल्या एका बातमीनुसार ,अँपल सुद्धा भारतात बनवणाऱ्या iphone-11 चं उत्पादन या वर्षासाठी कमी प्रमाणात करण्याचा विचार करत आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्र
ऑटोमोबाईल क्षेत्र मागच्या काही वर्षांपासून वाढणारा उत्पादन खर्च आणि वाहनांची कमी होणारी किंमत असा दुहेरी मारा सोसत होतं. भारतात या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण होण्याचा वेग बराच कमी झाला होता.
त्यातच कोरोनाचा टाळेबंदी ने परिस्थिती अजूनच वाईट केलीये. संपूर्ण एप्रिल महिन्यात देशात एक सुद्धा कार विकली गेली नाही!
वाहन क्षेत्रातल्या टाळेबंदीने लाखो रोजगार जसे की डीलरशिप पासून ते कारखान्यात वाहनांची जुळणी करणाऱ्या कामगारांच्या नौकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
या क्षेत्राला सुद्धा टाळेबंदीच्या पहिल्या ३ आठवड्यात सुमारे ₹१३००० करोड चा तोटा झाल्याची बातमी आहे. याचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
हवाई क्षेत्र
हवाई विमान क्षेत्रात बहुतांशी जॉब्स हे कंत्राटी पद्धतीचे असतात.आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. कोरोनाचा प्रत्यक्ष सर्वात वाईट परिणाम याच क्षेत्रावर झालाय.
सुमारे ६ लाख कंत्राटी कर्मचारी जे विमानतळावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कामं करतात त्यांचा रोजगार धोक्यात आहे.
जरी टाळेबंदी उठली आणि विमान वाहतूक सुरू झाली तरी कोरोना च्या भीतीने किती लवकर वाहतूक संख्या पूर्ववत होईल याची काहीच निश्चिती नाही.
वस्त्रोद्योग
भारतात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोना महामारी मुळे जागतिक पुरवठा साखळी खंडित झाली आहे.
भारतीय वस्त्रोद्योगचा अर्ध्या पेक्षा जास्त महसूल हा कपड्यांच्या निर्याती मधून मिळतो! सर्वाधिक कपडे युरोप ला निर्यात केले जातात.
भारतीय वाणिज्य मंत्रालायच्या अहवालानुसार सन २०१८-१९ मधे भारताने ₹ १ ट्रीलियन किमतीचे कपडे निर्यात केले होते!
परंतु सध्या देशात आणि जगात सुद्धा कपड्यांची दुकाने, मॉल्स बंद आहेत. आहे तो माल विकला न गेल्याने नवीन ऑर्डर येण्याचं जवळपास थांबलय.
त्यातच युरोप ला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचं सर्वाधिक संक्रमित क्षेत्र घोषित केल्याने तिथून लवकर मागणी येण्याची शक्यता अत्यंत कमी!
भारतीय कापड संघटनेने केंद्र सरकार कडे मदतीची विनंती केली आहे. या मदतीने वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असणारे इतर उद्योग जसे की, हँडलूम, पॉवर लूम, स्पिनिंग क्षेत्रातल्या लाखो लोकांच्या नौकऱ्या वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे.
कोरोना टाळेबंदी ने बहुतांश चित्र जरी नकारात्मक असलं तरी काही मोजक्या उद्योग- व्यवसायांना भरगोस नफा सुद्धा झाला आहे.
टेलिकॉम क्षेत्र
देशात बहुतेक कार्यालय जरी बंद असली तरी बरेच कर्मचारी जसे की IT engineers ,clerks, aacountants घरून काम करत आहेत.
त्यामुळे इंटरनेट डेटा वापरण्यात एकदम १५% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. जिओ च्या प्रवेशाने गडबडलेल्या टेलिकॉम क्षेत्राला नाव-संजीवनी मिळाली आहे.
औषध निर्माण क्षेत्र
कोरोना च्या लक्षणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीची औषधे भारतात मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. या औषधांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मागणी सुद्धा आहे.
या शिवाय सॅनेटायजर, मास्क चं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे.जीवनावश्यक क्षेत्राची सध्या प्रचंड चलती आहे.
टाळेबंदी नंतर सगळ्यांनाच आर्थिक आघाडीवर च्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. एकंदर पाहता सध्याची परिस्थिती अपवादात्मक म्हटली पाहिजे.
या सर्वात भारतात केवळ एकच व्ययसाय चालू आहे आणि तो म्हणजे शेती व्ययसाय! कोरोनाच्या टाळेबंदीत सुद्धा शिवारं हिरवं ठेवण्याचं कामं काही चुकलं नाही.
भारतात पूर्वी पासून सांगतात की :
उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.
कदाचित भविष्यात आपल्या सर्वांनाच या सूत्राचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.