' पुस्तक परीक्षण : अन्यायाविरुद्ध ‘ब्र’ न उच्चारू शकणाऱ्या सर्वांसाठी… – InMarathi

पुस्तक परीक्षण : अन्यायाविरुद्ध ‘ब्र’ न उच्चारू शकणाऱ्या सर्वांसाठी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : प्रसाद पवार

===

कविता महाजनांचे जाणे तसे अकस्मात होते पण त्यांचं लेखन मात्र मनात खोलवर रुतलंय. कुतूहलापोटी त्यांचं ‘ब्र’ वाचलं. पण अंगावर आलेला काटा काही अजून जात नाही. म्हणूनच त्यांच्या ‘ब्र’ चा पुस्तक परिचय.

 

br inmarathi

 

कथेची सूत्रधार ही एक सामाजिक कार्यकर्ती.  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या आदिवासीबायकांना खरेच प्रतिनिधित्व मिळते का? की केवळ रबरी शिक्यापुरते त्यांचे अस्तित्व मर्यादित असते? ह्या एका मुद्द्याभोवती ‘ब्र’ साकारली आहे.

पण लेखिकेचे लिखाण याबरोबरीनेच स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित इतर अनेकमुद्द्यांना स्पर्श करून जाते आणि आपल्या चाकोरीबद्ध विचारपद्धतीला छेद देते.

७३व्या आणि ७४व्याघटनादुरुस्तीनंतर खरोखरच स्थानिक स्वराज्य संस्थांची परिस्थती काय? त्यातच प्रामुख्याने आदिवासी भागातले चित्र नेमके कसे? शहरातल्या पुरुषी मानसिकता आणि आदिवासी पाड्यांतील परिस्थिती यांतील भेदाभेद आणि साम्य काय? तथाकथित स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवा म्हणजे बाजारीकरण आणि व्यवसाय यातील साम्य, यासारखे अनेक गंभीर विषय लेखिकेने हाताळले आहेत.

मुळात आजही ग्रामीण भागात केवळ राखीव जागा आहेत म्हणून महिला प्रतिनिधी निवडून येतात आणि त्यांच्या नावाखाली त्यांचे नवरेच सर्व कारभार सांभाळत असतात अशी एक सर्वसाधारण समजूत शहरी मेंदूची झाली आहे.

ही सत्यपरिस्थिती जरी नाकारता येत नसली तरी सर्वत्र फक्त अंधःकारचं पसरला आहे असे मात्र नाही.

रबरी शिक्यांपुरत्या राहिलेल्या महिला सरपंचांची व्यथा मांडण्याबरोबरच ज्यांनी पदर खोचून पुरुषी वर्चस्वाला पुरून उरत, विरोधकांची तोंड बंद करत आणि विशेष म्हणजे शिक्षणात कमजोर असूनंही राजकारणातले छक्केपंजेसमजून घेत आपल्या भागाचा विकास केला अशाही महिलांच्या कहाण्या लेखिकेने आवर्जून मांडल्या आहेत.

 

chhavi rajwat inmarathi
फोटो : प्रातिनिधिक

 

आदिवासी भागात काम करत असताना अनेक संस्थांच्या संपर्कात कथेतील सूत्रधार येते आणि सामाजिक कामाच्यानावाखाली चाललेल्या भोंगळ कारभाराची, बाजारीकरणाची पोलखोलही ती करते हे विशेष.

अगदी स्वतःची संस्थासुद्धा ती अपवाद म्हणून बाजूला सोडत नाही. अर्थात सगळ्याच सामाजिक संस्था तशा नाहीत त्याला अपवाद सुद्धाआहेत पण सारं काही आलबेल असण्यासारखी परिस्थती मात्र अजून नाही.

अर्थात सूत्रधार हे सगळं मांडत असताना वैयक्तिक आयुष्यात सुद्धा समस्यांनी ग्रासलेली आहे आणि त्यावरही मात करत सामाजिक कामात आपले मनगुंतवून घेत आहे.

राखीव जागांवर निवडून आलेल्या महिला ह्या आपल्या नवऱ्याच्या हातातले बाहुल्या असतात हे मांडताना, स्वतः मात्र घटस्फोट दिलेल्या नवऱ्याच्या जाचाला, त्याच्या परस्त्रीसोबतच्या संबंधांना, मुलापासून दुरावलेपणाच्या आणि विशेष म्हणजे घटस्फोट होऊनही स्त्री म्हणजे आपलीच जहागीर असे समजून चालणाऱ्या नवऱ्याच्या उद्दामपणाला मात्र कथेतील सूत्रधार फार कशोशीने तोंड देत होती.

यातून हेच दिसते की, ग्रामीण किंवाआदिवासी म्हणून मागास असलेल्या भागांची ही समस्या नाही तर बुरसटलेल्या आणि वर्चस्ववादाच्या नशेत धुंद झालेल्या पुरुषी मानसिकतेत ह्या समस्येचे मूळ आहे आणि त्यावर सूत्रधाराच्या कृतीतून लेखिकेने ताशेरे ओढले आहेत.

आदिवासी बहुल भागात अनेक स्वयंसेवी संस्था आज कार्यरत आहेत. काहींचे काम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे; पण शहरी परिभाषेत आदिवासींचे जीवन मापणे, कायदेशीर चौकटीत आदिवासी परंपरांना डावलून उगाच न्याय मिळवून दिल्याचा आव आणणे हे किती बेगडी आणि भंपक आहे ही नवीन बाजूसुद्धा लेखिका उलगडते आणि तेच‘ब्र’चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

प्रत्येक गप्प बसणारी स्त्री ही नेहमीच पुरुषी जाचाला घाबरून गप्प नसते तर ती कित्येक वेळा स्वतःहूनच कच खाते आणि मागे राहते.

त्यामुळे दरवेळी पुरुषांना दोष दिला की स्त्रीवाद संपला असे नाही तर दोघांच्या समन्वयाने आणिएकमेकांना दिलेल्या समान वागणुकीतूनही विकास साधता येतो हे देखील लेखिका नमूद करायला विसरत नाही.

सरतेशेवटी सामाजिक जीवनाची भयाण बाजू आणि भीषण वास्तव पाहिल्यानंतर येणारी निराशा आणि अस्वस्थता यातून सूत्रधार सुद्धा चुकलेली नाही,  पण रडत आणि कुडत बसण्यापेक्षा आपली वाट आपणच शोधली तर बिचाऱ्या म्हणून गणल्या जाण्यापेक्षा ताठ मानेन जगणे सुद्धा शक्य आहे हे लेखिका सांगायला विसरत नाही.

त्यामुळे शीर्षक ‘ब्र’ हे जरी वास्तवदर्शी असले तरी हेच ‘ब्र‘ वास्तवाला तोंड देण्याची दिशासुद्धा दाखवते.

पण एक मात्र खरं. ‘ब्र’ वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

काटा अस्थिरतेचा, काटा सामाजिक जाणिवेचा आणि काटा अजूनही अस्तित्वात असलेल्या विषमतेचा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?