Site icon InMarathi

महाभारतातील यक्ष- युधिष्ठिराच्या “या” संवादात मानवी जीवनाचं सार सामावलंय, एकदा तरी वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोरोनामुळे भारतात लॉक डाउन सुरू झाला आणि दूरदर्शनवर आपल्या जुन्या गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिका सुरू झाल्या.

रामायण म्हणजे एक आदर्शवत जीवन जगण्यासाठी मूल्यांची जपणूक कशी करावी याचा आदर्श वस्तूपाठ ज्यात आहे, ते सांगणारी मालिका. तर महाभारत म्हणजे मानवी स्वभावाचं अस्सल दर्शन!!

त्यात आजही तसूभरही फरक पडला आहे असं वाटत नाही. त्यासाठीच आजही कुठल्याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला महाभारताच्या कुठल्यातरी कथेत मिळून जातात.

सध्याही लॉक डाऊन सुरू असल्याने सुरुवातीचे त्याचं कौतुक आता संपल आहे, अजून किती काळ घरात काढायचा? किंवा लॉक डाऊन संपल्यानंतर देखील सगळे व्यवहार कसे करायचे असा यक्षप्रश्न सध्या लोकांसमोर पडला आहे.

 

nikkie asian review

 

आता हा ‘ यक्षप्रश्‍न’ हा शब्दप्रयोग आला कुठून? तर त्याचे उत्तरही महाभारतातच आहे. महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिर यांच्यात एक प्रश्नोत्तरांचा प्रसंग येऊन गेलेला आहे.

त्यामध्ये आपल्याही अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत.

हा प्रसंग घडतो तो पांडवांना मिळालेल्या वनवासानंतर. द्युतामध्ये युधिष्ठिर आपलं राज्य गमावतो आणि आपल्या भावांबरोबर आणि पत्नी द्रौपदीबरोबर वनवासाला येतो.

पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार असतो.

बरेच दिवस वनात राहिल्यानंतर आता त्यांचा वनवासाचा काळ संपत आलेला असतो. त्यावेळेस पांडव रानावनात असेच फिरत असताना त्यांना तहान लागते.

हे ही वाचा –

===

 

daily.bhaskar.com

 

युधिष्ठिर पहिल्यांदा नकुल सहदेव यांना म्हणतो की, ‘जवळच कुठे पिण्यासाठी पाणी मिळतं का बघा आणि प्यायला पाणी घेऊन या.’

युधिष्ठिराचे सगळे लहान भाऊ मोठ्या भावाचे आज्ञा पाळणारे असल्यामुळे नकुल-सहदेव लगेच पाण्याच्या शोधार्थ निघतात.

बराचवेळ झाला तरी ते दोघे परत येत नाहीत. मग युधिष्ठिर अर्जुनाला म्हणतो की बघ काय झालं आहे? अर्जुन जातो तो ही येत नाही. शेवटी युधिष्ठिर भीमाला तिकडे पाठवतो आणि अजून सगळे का येत नाहीयेत हे बघायला सांगतो.

भीमही तिकडे जातो आणि बराच वेळ झाला तरी तो ही येत नाही. शेवटी मग युधिष्ठिर स्वतः तिकडे जायला निघतो. शोधत शोधत तो एका तलावापाशी येतो तर तिथे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे मृत्यू पावलेले दिसतात.

युधिष्ठिर ते दृश्य पाहतो आणि ते पाणी देऊन आपल्या भावांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करायला बघतो. तितक्यात त्याला एक आवाज येतो की,

“जर तुला पाणी हवं असेल तर आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. तरच तू पाणी पिऊ शकशील, नाही तर तुझीही अवस्था तुझ्या भावांसारखीच होईल. कारण त्यांनी माझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला नकार दिला.”

युधिष्ठिर म्हणतो, “मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन, पण तुम्ही कोण आहात?” यक्ष म्हणतो की, “मी एक यक्ष आहे आणि या तलावात राहतो. इथलं पाणी पिण्याआधी माझ्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचं असतं”.

युधिष्ठिर त्याला हात जोडून म्हणतो की, “तुम्ही प्रश्न विचारा, मी मला शक्य होईल ती उत्तर देईन.”

 

पुराण.com

 

कुठल्यातरी एखाद्या गोष्टीचं रक्षण करतात त्यांना यक्ष म्हणतात. मनुष्यांना ते फार त्रास देत नाहीत. पुराणातले अनेक यक्ष तसे चांगले आहेत.

सगळ्यांना माहीत असलेल्या आणखीन एका यक्षाचे नाव म्हणजे कुबेर. ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे असं समजलं जातं.

असाच हा एक यक्ष, जो तलावाचे रक्षण करतोय. त्याच्या प्रश्नांची उत्तर दिल्याखेरीज कुणीही त्या तलावातील पाणी पिऊ शकत नाही; परंतु इतर पांडवांनी उत्तर देण्याला नकार दिला आणि स्वतःचा जीव गमावला.

परंतु युधिष्ठीर मात्र उत्तर देण्यासाठी तयार झाला. दोघांची मग प्रश्नोत्तरे चालू होतात यक्षाने युधिष्ठिराला वीस प्रश्न विचारले. ते कोणते हे आता आपण पाहू…

हे ही वाचा –

===

 

 

१.

यक्ष: पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय आहे आणि आकाशा पेक्षा काय उंच आहे?

युधिष्ठिर: आपली माता पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि पिता आकाशा पेक्षा उंच आहे.

२.

यक्ष: हवेपेक्षा जास्त वेग कोणाचा आहे? पेंढ्यातल्या काड्यांपेक्षा काय जास्त आहे?

युधिष्ठिर : मन हवेपेक्षा जास्त वेगाने धावते तर पेंढ्यातल्या काड्यांपेक्षा चिंता जास्त संख्येने असतात आणि त्या माणसाला जास्त सतावतात.

3.

यक्ष: रोगी माणसाचा मित्र कोण आणि मृत्यू समीप आलेल्या माणसाचा मित्र कोण?

युधिष्ठिर: रोगी माणसाचा मित्र हा त्याचा वैद्य असतो तर मृत्यू समीप असलेल्या माणसाचा मित्र दान असतो. मृत्यूसमयी माणसाने दान दिले पाहिजे, म्हणजे समाधानाने प्राणत्याग करता येतो.

४.

यक्ष: यश कुठे असतो आणि सुख कुठे असतं?

युधिष्ठिर: यशाचे मुख्य ठिकाण दान आहे तर सुखाचे मुख्य ठिकाण माणसाचं शील आहे.

५.

यक्ष: यशस्वी पुरुषाचे गुण कोणते? मनुष्याला कशाने समाधान मिळते?

युधिष्ठिर: कार्यकुशलता, कोणतही काम करण्याचा हातखंडा हे यशस्वी पुरुषाचे गुण आहेत, तर दान दिल्याने मनुष्याला समाधान मिळते.

६.

यक्ष: मनुष्याला मिळालेला सर्वोत्तम लाभ कोणता? आणि सर्वोत्तम सुख कोणते?

युधिष्ठिर: निरोगी शरीर हा मनुष्याला मिळालेला सर्वोत्तम लाभ आहे तर कुठल्याही स्थितीत आनंद मानायची क्षमता हे सर्वोत्तम सुख आहे.

७.

यक्ष: दुनियेतला सर्वोत्कृष्ट धर्म कोणता आणि कोणाला वश केल्याने मनुष्याला दुःख होत नाही?

युधिष्ठिर: दया हा दुनियेतला सर्वोत्कृष्ट धर्म आहे तर स्वतःच्याच मनाला वश केल्याने मनुष्याला दुःख होत नाही.

८.

यक्ष: कुठल्या गोष्टीचा त्याग केल्याने मनुष्य दुसर्यांना प्रिय होतो? आणि कशाचा त्याग केल्याने मनुष्याला दुःख होत नाही?

युधिष्ठिर:अहंकाराचा त्याग केल्याने मनुष्य दुसर्यांना प्रिय होतो तर क्रोधाचा त्याग केल्याने मनुष्याला दुःख होत नाही.

९.

यक्ष: कुठल्या गोष्टीचा त्याग केल्याने मनुष्य श्रीमंत होतो? कुठल्या गोष्टीचा त्याग केल्याने मनुष्य सुखी होतो?

युधिष्ठिर: कामवासनेचा त्याग केल्याने मनुष्य श्रीमंत होतो तर लालच सोडल्याने मनुष्य सुखी होतो.

१०.

यक्ष: मनुष्य मित्रांचा त्याग का करतो? कोणाबरोबर केलेले मित्रत्व कधीच संपत नाही?

युधिष्ठिर: लालची पणामुळे मनुष्य मित्रांचा त्या करतो तर खऱ्या लोकांबरोबरच मित्रत्व कधीच संपत नाही.

११.

यक्ष: दिशा काय आहे? जो जास्त मित्र बनवतो त्याला काय लाभ होतो?

युधिष्ठिर: सत्पुरुष हे दिशा असतात. जो जास्त मित्र बनवतो तो मनुष्य सुखी होतो.

१२.

यक्ष: सर्वोत्तम दया कोणती? सरळपणा म्हणजे काय?

युधिष्ठिर: सर्वांसाठी सुखाची मागणी करणे याला सर्वोत्तम दया म्हणतात तर सुखात आणि दुःखात देखील ज्याचं मन सारखाच विचार करते त्याला सरळपणा म्हणतात.

१३.

यक्ष: माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? सगळ्यात मोठा आजार कोणता?

युधिष्ठिर: मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू हा त्याचा क्रोध. क्रोधावर विजय मिळवणं माणसाला अवघड जातं. तर कुठल्याही गोष्टीचा मोह, लालच हा माणसाचा सगळ्यात मोठा आजार आहे.

१४.

यक्ष: कोणाला साधू म्हणावे? तर कोणाला असाधू म्हणावे?

युधिष्ठिर: जो दुनियेतल्या सगळ्या प्राणिमात्रांचे हित चिंततो त्याला साधू म्हणावे तर निर्दय माणसालाच असाधू म्हणावे.

१५.

यक्ष: धैर्य कशाला म्हणावे? परम स्नान कशाला म्हणावे?

युधिष्ठिर: इंद्रियांवर अंकुश ठेवण्याला धैर्य म्हणावे तर मनातील वाईट विचार काढून मन साफ करण्याला परम स्नान म्हणावे.

१६.

यक्ष: अभिमान कशाला म्हणावा? कोणती गोष्ट सगळ्यात दैवी समजली जाते?

युधिष्ठिर: धर्माचा ध्वज घेणाऱ्याला अभिमानी म्हटलं जातं तर दान केल्यानंतर जे पुण्य लाभतं तीच दैवी गोष्ट.

१७.

यक्ष: सगळ्यांशी गोड बोलणाऱ्या व्यक्तीला काय मिळतं? सारासार विचार करून काम करणाऱ्याला काय मिळतं?

युधिष्ठिर: सगळ्यांशी गोड बोलणारा मनुष्य हा सगळ्यांनाच प्रिय असतो. सारासार विचार करून काम करणाऱ्या माणसाला यश मिळतं.

१८.

यक्ष: कोण सुखी आहे?

युधिष्ठिर: ज्या व्यक्तीवर कोणतंही कर्ज नाही, जो दुसऱ्या मुलुखात नाही आपल्याच देशात, गावात आहे, जो मनुष्य पाच-सहा दिवस घरात राहून देखील स्वतःची भाजी भाकरी खाऊ शकतो व आपलं पोट भरू शकतो तो मनुष्य सुखी आहे.

१९.

यक्ष: काय आश्चर्य आहे?

युधिष्ठिर: दररोज कितीतरी प्राणी यमसदनी जातात, हे माहित असून देखील तरीही जे जिवंत असतात ते मात्र दररोज जगण्याची इच्छा ठेवतात यापेक्षा आश्चर्य काय असेल!!

२०.

यक्ष: सगळ्यात धनी कोण आहे?

युधिष्ठिर: जो मनुष्य सुखदुःख, प्रिय अप्रिय, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या सगळ्यात एकसमान वर्तन ठेवतो तोच माणूस सगळ्यात श्रीमंत समजला जातो.

अशाप्रकारे युधिष्ठिराने यक्षाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. ज्यामुळे यक्ष प्रसन्न झाला आणि त्याने इतर पांडवांना जिवंत केले.

तसेच यक्षाने सर्व पांडवांना अज्ञातवासाच्या काळात ते कोणालाही ओळखू येणार नाहीत असा आशीर्वाद देखील दिला. महाभारतात ही प्रश्नोत्तरे प्रसिद्ध आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version