सध्या आंबा रोज खाताय; पण फळांच्या राजाच्या या गोष्टी तुमच्या ध्यानीमनीही नसतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या तब्येतीसाठी फळांचे सेवन खूपच लाभदायक असते.
आयुर्वेद, आपले डॉक्टर्स आपल्याला फळे नेहेमी सेवन करावीत असे सांगतात. आपल्याकडे काही काही फळे १२ महिने असतात, जसे पपई, केळी, मोसंबी अननस इत्यादी.
हल्ली सफरचंद देखील वर्षभर मिळतात. काही काही फळे मोसमी (seasonal) असतात जसे – द्राक्षे, स्ट्रॉबेरी, कलिंगड, संत्री इत्यादी.

फळे म्हंटली की आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळे पदार्थ येतात…. जसे आइसक्रीम, फ्रुट सॅलड, जॅम, फ्रुट ज्युस इत्यादी.
काही काही फळे पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी वापरतात जसे बिर्याणी किंवा पुलाव किंवा मसाले भाताची लज्जत अननसामुळे वाढते.
कोणत्याही स्वरूपात खा पण फळे पोटात गेलीच पाहिजेत असा सल्ला डॉक्टर्स नेहेमीच देतात. सुदृढ, निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन करणे अत्यावश्यक असते.
आज आपण अशाच एका फळाची माहिती घेणार आहोत. शरीराला फायदेकारक, उपयुक्त आणि फक्त उन्हाळ्यात मिळणारे हे फळ न आवडणारा माणूस विरळाच!
सर्वांना प्रिय, फळांचा राजा म्हणून मिरवणारे हे फळ म्हणजेच आंबा! भारताचे राष्ट्रीय फळ असणारा हा आंबा सगळ्यांनाच आवडतो!

उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघण्याचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे आंबा. जेवणात आंबा असला तर बाकीचं काही नसलं तरी चालतं फक्त पोळी किंवा पुरी बास!
भाजी, भात, लोणचं, कोशिंबिर काही काही नको.
बरं! ह्यात पण प्रकार, फोडी करुन खा, मऊ करून त्याचा रस काढून खा किंवा तसाच सोलून खा! कसाही खाल्ला तरी ह्याची गोडी आणि चव न्यारीच लागते!
मग येतात बाकीचे प्रकार! जसे लोणचे, चटणी, आंबा पोळी, जॅम, साखरांबा, गुळांबा, कुल्फी, आइसक्रिम, ज्युस किंवा मॅंगो मिल्कशेक!

कोणत्याही प्रकारे आंबा हा हवाहवासाच वाटतो. म्हणूनच ह्याला फळांचा राजा म्हणतात. अजूनही अनेक कारणे आहेत ह्याला “राजा” म्हणण्याची!
चला तर मग! या लेखातून अधिक माहिती जाणून घेऊया ह्या फळांच्या राजाबद्दल!
१. आंबा हे फळ जवळ जवळ ४००० ते ५००० वर्षे जुने असल्याचे म्हंटले जाते. आंब्याचे उत्पादन सर्वात आधी भारतात घेतले गेले. म्हणजेच आंबा भारतात सर्वप्रथम पिकवला गेला असे तज्ञांचे, शास्त्रज्ञांचे मत आहे.
२. जगभरात आंब्याचे ५०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. कैरीमध्ये विटॅमिन सी असते तर पिकलेल्या फळात म्हणजेच आंब्यात विटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते.
आणि तज्ञांचे, डॉक्टरांचे असे मत आहे की आंबा सीजनल असला तरी त्याच्या सेवनाने हे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी ह्यांचा परिणाम, ह्यांची उर्जा वर्षभर टिकून राहते.
अ जीवनसत्त्व जंतुनाशक आहे तर क जीवनसत्त्व त्वचारोग दूर करणारा आहे. म्हणजेच आंबा खाल्ल्यामुळे त्वचा कांतियुक्त होते, चेहेरा तजेलदार होतो, चेहेर्यावर टवटवी येते.

३. आंबा हे केवळ भारतातेच राष्ट्रीय फळ नाही तर पाकिस्तान आणि फिलिपाईन्स ह्या देशांचे देखील राष्ट्रीय फळ आहे.
४. एका सर्वेक्षणाच्या अहवालात असे नमूद केले आहे की इतर कोणत्याही फळापेक्षा आंबा ह्या फळाचे सेवन सर्वाधिक केले जाते. आणि हे सर्वेक्षणा जगभरातले आहे,
म्हणजेच आंबा सर्व जगभरात सर्वधिक सेवन केले जाणारे फळ आहे.
५. भारतात सर्वाधिक जुने आंब्याचे झाड खान्देशात आहे. हे सुमारे ३०० वर्षे जुने आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे झाड अजूनही फळे देते.
६. आंब्याच्या डहाळ्या (पाने) अनेक धार्मिक विधिंसाठी वापरतात. आंब्याचे झाड वर्षभर हिरवेगार असते.
तसेच आपले आयुष्य देखील बहरावे असा त्यामागे हेतू असला तरीही शास्त्रीय कारण वेगळे आहे त्यामागचे!
आपल्या कडे जी पाने, फुले, फळे देवाला अर्पण करतात ती सगळी आपल्या तब्येतीसाठी उपयुक्त असतात. जसे – दुर्वा आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
बेलपत्रे ताप, सर्दी ह्यांसारख्या विकारांसाठी औषधी असतात.
त्याचप्रमाणे आंब्याची कोवळी पाने चावल्याने म्हण्जेच त्या रसाने खोकला कमी होतो, हिरड्यांचा पायोरिया कमी होतो आणि आवाजाची गुणवत्ता देखील सुधारण्यास मदत होते.

७. आंब्याचा मोहोर थंड असतो. त्याने रूची उत्पन्न होते. अतिसार, कफ पित्त असे दोष दूर होतात आंब्याच्या मोहोरामुळे. म्हणचे पाने आणि फळांबरोबरच आंब्याचा मोहोर देखील लाभदायक असतो.
एव्हढेच नाही तर ह्याचा चीक पायांच्या भेगांसाठी उपयुक्त आहे.
८. कैरी देखील बहुगुणकारी असते. कैरीमध्ये आम्लता आणि क्षार असतात जे डिहायड्रेशन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
डिहायड्रेशन झाल्यास किंवा होऊ नये म्हणून कैरीचे पन्हे हा खूपच फायदेशीर उपाय आहे. कैरीचा उपयोग घामोळं आल्यास देखील करतात.
घामोळं आले असल्यास कैरीच गर तिथे लावतात जेणेकरून ते कमी होते किंवा नाहिसे होते.
९. जगातील आंबा उत्पादनापैकी ५६% आंबा फक्त भारतात पिकवला जातो. त्यापैकी हापूस, पायरी, तोतापुरी, नीलम, केशर, दशेरी, मलगोवा इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत.
संपूर्ण भारतात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. पण समुद्र किनारपट्टीची जमीन आणि हवा आंब्यासाठी उत्कृष्ट मानली जाते.
१०. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. अती तेथे माती! आंब्याचेही तसेच आहे. आंबा उश्ण असल्याने त्याचे अती सेवन त्रासदायक ठरते.
जुलाब लागणे, गळू होणे ह्यासाखे विकार आंब्याच्या अती सेवनाने होऊ शकतात.
आयुर्वेदात आंबा आणि दूध ह्यांना परस्पर विरोधी अन्न मानले आहे त्यामुळे त्याचे एकत्र सेवन करू नये असे सांगितले आहे.
कैरीच्या अती सेवनाने पोटाचे विकार उद्भवतात, तसेच, घसा दुखतो, खवखवतो. कैरी खाऊन लगेच पाणी प्यायले तर सर्दी, खोकला ह्यांसारखे विकार होतात.
असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा आंबा सीजनल असला तरी त्याचे सेवन आपल्या शरीरासाठी वर्षभर लाभ देणारे असते.

आणि केवळ आंबाच नव्हे तर आंब्याची पाने, कैरी, मोहोर हे देखील आपल्याला लाभदायक असतात.
असा हा फळांचा राजा सर्वांनाच हवाहवासा वाटतो आणि लहान-मोठे सगळेचण त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात. आंबा हे उन्हाळा सुसह्य होण्यामागचे मुख्य कारण आहे.
त्यामुळे डाएट वगैरे बाजूला ठेवून आंब्याचे मनसोक्त (अती नव्हे) सेवन करावे असा सल्ला डॉक्टर्स देतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.