सावधान : पुन्हा उफाळून येणारा कॅन्सर ठरतोय धोक्याचा…! हताश न होता “असा” करा सामना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नुकतंच ऋषी कपूर आणि ईरफान खान या दोन गुणी अभिनेत्यांचं निधन झालं आणि लोक हळहळले. गेले कित्येक महीने त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.
कर्करोग उलटला की रुग्ण आणखी चिडचिडा होतो आणि अजून घाबरतो. अशावेळी कर्करोग डिटेक्ट झाल्यावर घेत असतानाच्या उपचाराच्या वेळची मनस्थिती आठवून त्या अनुभवांतूनच काही धडे घेऊन त्याला सामोरं जावं लागेल.
आधीच माणूस कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर हाय खातो. आता बऱ्याचशा कॅन्सरला पूर्ण बरी करणारी औषधं निघालीत तरीही माणूस या आजाराला अजूनही घाबरूनच असतो.
तरीही बऱ्याचदा बरा झालेला कॅन्सर पुन्हा उलटतो. पुन्हा त्याची लक्षणे दिसू लागतात. अशावेळी साहजिकच रुग्ण पुन्हा हतबल होतो, हाय खातो, घाबरतो.
पुन्हा तेच महागडे, वेदनादायी उपचार करून घ्यावे लागतील या विचाराने निराश होतो.अर्थात हे साहजिकच आहे.
काहीजणांचं म्हणणं आहे, की दुसऱ्यांदा पुन्हा उद्भवलेला कॅन्सर माणसाला पहिल्यापेक्षा अधिक तणावयुक्त असतो.
कँन्सर उलटणे म्हणजे काय?
रुग्णाला झालेला कॅन्सर उपचारानंतर पूर्ण बरा झाला असे वाटत असतानाच त्याची काही लक्षणे पुन्हा दिसू लागतात. तेव्हा ती त्या रोगाची एक प्रकारे पुनरावृत्ती असते.
सर्वतोपरी उपचार घेऊनही कर्करोगाच्या काही पेशी राहून गेल्याने असे घडते. यालाच कॅन्सरचा आजार उलटणे असे म्हणतात.
या पेशी पूर्वी जिथे कॅन्सरचा प्रादुर्भाव झालेला होता, त्याच ठिकाणी पुन्हा दिसू लागतात. किंवा त्या शरीराच्या इतर भागातही दिसू शकतात.
कॅन्सरच्या या पेशी काही काळासाठी सुप्तावस्थेत राहू शकतात. त्यामुळे त्या शरीरात राहून गेल्याची माहिती होत नाही. परंतु जेव्हा त्या जागृत होऊन वाढीस लागतात तेव्हा परिणामी कर्करोग पुन्हा दिसू लागतो.
कर्करोगाची पुनरावृत्ती म्हणजे काही काळानंतर त्याच कर्करोगाचे पुन्हा निदान होणे, किंवा शरीरात वाढ होणे होय.
क्वचित प्रसंगी नवीन कर्करोगाचेही निदान होते, जे रुग्णाला पहिल्यांदा झालेल्या कर्करोगाशी काहीही संबंधित नसते. याला दुसरा प्राथमिक कर्करोग म्हणून संबोधले जाते.
कर्करोग पुन्हा कोठे होतो?
एकदा बरा झालेला कर्करोग पुन्हा नव्याने उद्भवतो, तेव्हा तो पूर्वीच्याच ठिकाणी पुन्हा येऊ शकतो किंवा तो रुग्णाच्या शरीराच्या इतर भागातही स्थलांतर करू शकतो.
ही पुनरावृत्ती तीन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे.
स्थानिक पुनरावृत्ती –
याचा अर्थ असा की कर्करोग त्याच ठिकाणी पुन्हा दिसतो ज्या ठिकाणी तो प्रथम सापडला होता, किंवा त्या ठिकाणच्या जवळपास पुन्हा उदभवतो. याचा अर्थ तो शरिराच्या इतर भागात पसरलेला नाही.
प्रादेशिक पुनरावृत्ती –
मूळ कर्करोगाच्या अवतीभवतीच्या भागात कर्करोगाच्या पेशींची पुनरावृत्ती दिसून येते तेव्हा त्याला प्रादेशिक पुनरावृत्ती म्हणतात.
दूरची पुनरावृत्ती –
मूळ कर्करोग जेथे सापडला किंवा जेथे वाढला, त्यापेक्षा शरीराच्या लांबच्या भागात तो सापडला तर तो पसरला आहे असे समजून त्याला दूरची पुनरावृत्ती म्हणता येईल.
कर्करोगाची पुनरावृत्ती किंवा पुन्हा होणारा प्रादुर्भाव शरीराच्या कुठल्या भागात होईल हे बऱ्याचदा कॅन्सरच्या प्रकारावरही अवलंबून असते. काही कॅन्सर हे विशिष्ट भागातच वारंवार उद्भवताना दिसतात.
परत उलटलेल्या कर्करोगाचे निदान कसे केले जाते?
उलटलेल्या कॅन्सरचे निदानही प्रथम उद्भवलेल्या कर्करोगाप्रमाणेच केले जाते. रुग्णाला जाणवणारी लक्षणे आणि चिन्हे यावरून डॉक्टर पुन्हा काही चाचण्या, तपासण्या करतात. त्यावरून तो कर्करोगाचा पुन्हा प्रसार तर नाही ना याचे निदान केले जाते.
बहुतेक वेळा प्रथम कर्करोगाच्या उपचाराच्या वेळीच डॉक्टर जेव्हा कर्करोग बरा होतो तेव्हा रुग्णाला या बाबतीत सावध करतात. आणि त्याप्रमाणे दक्षता घ्यायला सांगतात.
सतर्क राहून पुन्हा कर्करोग उद्भवला तर कोणती चिन्हे अथवा लक्षणे दिसतील याची कल्पना देऊन ठेवतात.
मूळ कर्करोगाच्या तपासण्या आणि त्याच्या पुनरावृत्तीच्या तपासण्या बऱ्याचदा भिन्न असतात.दोघांची उद्दीष्टे वेगळी असतात.
मूळ बऱ्या झालेल्या कर्करोगाच्या ठिकाणीच जर त्याची पुनरावृत्ती असेल, तर ती बरी होण्याची शक्यता अधिक असते. मात्र जर त्या कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर ठिकाणी आढळल्या तर त्या बऱ्या होण्याची शक्यता कमी असते.
कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ते परस्परभिन्न आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे आणि तो पुन्हा नेमका कोणत्या ठिकाणी उद्भवतोय, यावरून उपचारांची आणि बरे होण्याची दिशा नक्की होते.
त्यासाठी रुग्णाने आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहायला हवे. एकदा बरे झालेल्या कर्करोगाच्या बाबतीतही सतर्क राहून नियमित तपासणी करून घेत राहायला हवे.
पुन्हा उद्भवलेला कर्करोग बरा होऊ शकतो का?
स्थानिक आणि प्रादेशिक पुनरावृत्तीत बऱ्याच केसेसमध्ये काही कर्करोगाचे प्रकार बरे होऊ शकतात. जरी ते पूर्णपणे बरे होणारे नसले, तरी अनेकदा त्याची वाढ रोखून रुग्णाला आयुष्य बहाल करू शकतात.
कर्करोगाची वाढ रोखणे औषधोपचाराने शक्य होते. रुग्णाला होणाऱ्या वेदना आणि इतर लक्षणांपासून त्याला मुक्त करता येते. आणि त्या रुग्णाला चांगले आयुष्य जगता येऊ शकते.
कर्करोगाच्या प्रथम निदानानंतर आपण कोणत्या प्रकारचे उपचार घेता आणि त्यातून नेमका कोणता परिणाम आपल्याला अपेक्षित आहे, कोणते साईड इफेक्ट्स आपण पचवू शकतो त्यावर पुढील उपचार अवलंबून असतात.
आपले शरीर उपचारांना कोणत्या प्रकारे प्रतिसाद देते त्यावर देखील आपले डॉक्टर पुढील उपचार करताना विचार करतात.
कर्करोगाच्या रुग्णाला प्रायोगिक चाचण्यांमध्ये देखील सहभागी होता येते. जर त्यांची नवीन उपचारांना सामोरं जाण्याची तयारी असेल, तर अशा प्रयोगात्मक औषधांचाही त्याला लाभ मिळू शकतो.
त्याविषयी रुग्णाने आपल्या डॉक्टरांशी बोलायला हवे आणि अशा चाचण्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.
कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा सामना कसा करावा?
कर्करोगाच्या पुनरावृत्तीत त्याच भावना रुग्णाला पुन्हा घेरून घेतात, ज्या त्याला प्रथम निदानाच्यावेळी आल्या होत्या. अशा भावनांमध्ये सामान्यतः पुढील भावना समाविष्ट असतात –
त्रास – जेव्हा प्रथम निदानानंतर उपचार घेऊन रुग्णाचा कर्करोग बरा होतो, त्यानंतर तो रुग्ण पुन्हा निश्चिंत होऊन जीवनाला सामोरं जाऊ लागतो. मधल्या काळात तो कर्करोगाला विसरलायला लागलेला असतो.
आता आपण पूर्ण बरे झालो आहोत असे वाटतानाच कर्करोगाची पुनरावृत्ती ही त्या रुग्णासाठी धक्कादायक असते, आणि प्रथम निदानाच्यावेळी त्याला धक्का बसतो त्यापेक्षाही अधिक धक्का बसू शकतो.
अशावेळी कधीकधी आपण आधी उपचार नीट घेतले नाही का? आपण नीट पथ्यपाणी सांभाळले नाही का? काळजी घेतली नाही का? अशी चिंता रुग्णाला सतावते.
परंतु असं मागं पाहून काळजी करण्यापेक्षा सद्य परिस्थितीवर मात कशी करता येईल यावर विचार करून उपचार घेण्याची आवश्यकता अधिक असते.
राग – कर्करोगाची पुनरावृत्ती रुग्णाला चीडचीडं करते. त्याला राग येतो. आपल्यालाच असं का व्हावं या भावनेने तो वैतागतो. हे साहजिकही आहे.
कधी कधी आपल्या डॉक्टरांनी आपल्यावर पहिल्यांदा नीट उपचार केले नाहीत असंही रुग्णाला वाटू शकतं आणि त्याला डॉक्टरांचा राग येऊ शकतो.
इतके दिवस सगळे त्रास सहन करून जेमतेम बरे झालो आणि पुन्हा नव्याने त्याच उपचारांना सामोरं जावं लागणार या विचाराने रुग्ण क्रोधित होतो.
अशावेळी डॉक्टरांनी तेव्हा उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे योग्यच उपचारांची निवड आपल्यासाठी केली होती असे आपल्या मनाला समजवायला हवे.
अशावेळी दुसऱ्या तज्ज्ञ डॉकटरांचा सल्लाही उपयोगी होऊ शकतो. त्यामुळे आपण यावेळी तरी नेमकी कोणती उपचारपद्धती स्वीकारायला हवी याविषयी आपल्याला पर्याय मिळू शकतो.
थकवा, कंटाळा, हताशा –
आता आपण पुन्हा या उपचारांचा सामना करु शकणार नाही याची भीती वाटणे, उपचारांच्या दुष्परिणामांचा धसका घेणे, आपले नातेवाईक, जवळचे मित्रमैत्रिणी यांना पुन्हा आपल्याला काय झालेय ते सांगणे या सगळ्यांचे रुग्णांवर फार मोठे दडपण येते.
अशावेळी रुग्णाने आपल्याला प्रथम निदान झाले तेव्हा त्याला सक्षमपणे सामोरं गेलो होतो त्याची आठवण ठेवून स्वतःच्या मनाची तयारी करावी.
अर्थात या सर्व भावना नैसर्गिक आहेत. साहजिक आहेत. त्यामुळे आपण प्रथम निदानाच्यावेळी जी पद्धत वापरली या सगळ्यासा सामोरं जाण्याची, तीच पद्धत रुग्णाने पुनरावृत्तीच्या वेळीही वापरायला हवी.
आपले कुटुंब, आपले जवळचे मित्र, किंवा आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी सहकार्याने आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढील उपचारांना सामोरं जायला हवं.
पुनरावृत्तीच्या वेळी रुग्णाला इतर मदतीचे फायदेही मिळू शकतात. त्यासाठी त्यांनी पुढील गोष्टींवर अवलंबून राहायला हवे. उदा. –
एकदा अनुभव घेतला असल्याने या बाबतीत आपल्याला बरीच माहिती आहे. आधीची माहिती आणि आता आपल्याला मिळणारी माहिती पडताळून पाहता येते.
पहिल्या उपचारांत काय त्रास झाला, काय चुका झाल्या याचा विचार करून नवीन उपचारांची निवड करता येते. त्यात कोणते दुष्परिणाम होऊ शकतील याची माहिती घेता येते.
आपण एकदा यातून गेलो आहोत. उपचारांची माहिती झालेली आहे. डॉक्टर आणि हॉस्पिटलचा इतर स्टाफ, त्यांची कार्यपद्धती इत्यादींचा अनुभव घेतलेला असतो.
याचा सकारात्मक वापर किंवा यावर सकारात्मक विचार रुग्णाने केला तर त्याला याही उपचारांना सकारात्मकतेने सामोरं जाऊन त्यातूनही पहिल्याप्रमाणे बरे होऊन बाहेर येण्याच्या शक्यता वाढतात.
आपण यातून एकदा गेलोय. तेव्हाच्या अनुभवावरून यावेळचे निर्णय घेता येतात. आपल्यासोबत कोणाला ठेवायचं कोणाला नाही याचे निर्णय घेता येतात. कुणाला सांगायचे कुणाला नाही हे रुग्णाला ठरवता येते.
आधीच्या अनुभवांच्या आधारावर सकारात्मक राहून त्या अनुभवांचा फायदा घेता येऊ शकतो. आपल्या उपचारांच्या बाबतीत नव्याने काही निर्णय घेता येऊ शकतात.
आपल्या डॉक्टरांशी खुलेपणाने, स्पष्ट बोला. त्यांच्याशी जितकं मोकळेपणाने बोलाल तितकी तुम्हाला तुमच्या परिस्थीतीबद्दल माहिती मिळेल. त्यामुळे उपचारपद्धतीबाबत तुम्ही निर्णय घेऊ शकाल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक राहणं. प्रथम निदानानंतर उपचाराने आपण बरे झालो होतो, आताही उपचार घेऊन बरे होऊ अशी सकारात्मकता ठेवा.
अनेक रुग्ण पुनरावृत्तीतूनही चांगले होऊन पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे जगत आहेत. त्यांचे उदाहरण डोळ्यांसमोर असू द्या.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.