Site icon InMarathi

रक्तरंजित पण स्फूर्तिदायक अशी महाराष्ट्र आणि गुजरात दिनाची पार्श्वभूमी वाचायलाच हवी

http://atranginikhil.blogspot.com/

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंगल देशा, पवित्र देशा,महाराष्ट्र देशा।

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।

नाजूक देशा,कोमल देशा,फुलांच्याही देशा।।

महाराष्ट्राचं असं वर्णन गोविंदाग्रजांनी उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलेलं आहे. त्यांनी जेव्हा हे वर्णन केलं तेव्हा खरं तर महाराष्ट्र असं वेगळं राज्य म्हणून अस्तित्वात नव्हतं.

त्यावेळेस आताच्या महाराष्ट्राला मुंबई राज्य असं म्हटलं जायचं. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास काय आहे?

एक मे हा दिवस महाराष्ट्रात, ‘महाराष्ट्र दिन ‘ म्हणून साजरा केला जातो, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याच बरोबर हा दिवस गुजरात मध्ये देखील, ‘गुजरात दिन’ म्हणून साजरा केला जातो.

 

 

याचं कारण म्हणजे या दोन राज्यांची निर्मिती १ मे १९६० या दिवशी झाली. ही दोन्ही राज्ये निर्माण होण्यामागे मोठा इतिहास आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० मध्ये भारतात गणतंत्रराज्य अस्तित्वात आलं. आणि भाषावार प्रांतरचनेनुसार अनेक राज्यांची निर्मिती करण्यात आली.

परंतु महाराष्ट्र, गुजरात, गोवा हे मात्र एकच प्रदेश मानले जायचे ते म्हणजे मुंबई राज्य.

म्हणून महाराष्ट्रात मराठी आणि कोकणी भाषेनुसार महाराष्ट्र हवा होता.तसाच तो गुजरात मधील लोकांना गुजरात हवा होता. गुजराती भाषिक प्रांत.

त्याच वेळेस गुजरात मध्ये देखील त्यावेळेस महागुजरात आंदोलन सुरू झालं होतं ज्यानुसार मुंबईला गुजरात मध्ये सामील करून घेण्याची मागणी होती.

भाषावार प्रांतरचना ही संकल्पना मुळात होती ती लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची. कारण भारतात अनेक भाषा बोलल्या जातात तर, त्या लोकांचं एक राज्य असेल तर तिथला कारभार करायला ते सोपं पडेल, इतका साधा विचार त्यामागे होता.

 

हे ही वाचा – महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!

इंग्रजांना त्यांच्यानंतर कारभार कसा चालेल याच्याशी काही देणंघेणं नव्हतं, ते फक्त भारत स्वतंत्र करून गेले.

भारत स्वतंत्र होणार हे तर १९४५ नंतर स्वच्छ दिसत होतं. पण स्वतंत्र करताना भारताच्या राज्यातली राज्यांची रचना कशी असावी याबद्दल भारतातले अनेक राजकीय नेते विचार करू लागले.

१९३८ साली महाराष्ट्रातले नेते श्री पटवर्धन आणि श्री माडखोलकर यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली. ज्यामध्ये मुंबई-कोकण, गोवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यांचा समावेश असावा असं सांगितलं.

परंतु ही संकल्पना पंडित नेहरूंना मान्य नव्हती त्यांच्या मते मुंबई हे बहुभाषिक शहर असल्यामुळे त्याचा समावेश महाराष्ट्रात करायला त्यांचा विरोध होता.

त्यांना मुंबई हेच द्विभाषिक राज्य करायचे होते. मराठी न बोलणाऱ्या लोकांनी नेहरूंच्या या विधानाला लगेचच पाठिंबा दिला. तरीही त्यानंतर मराठी माणसांनी महाराष्ट्र राज्याची मागणी लावून धरली आणि आंदोलनाला सुरुवात झाली.

 

 

१९४६ मध्ये माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली, आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याची मागणी लावून धरली. त्याच वेळेस डदर कमिशनने मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र ही तीन वेगळी राज्य करावीत असं सुचवलं.

त्या कमिशनच्या म्हणण्यानुसार मुंबई हे बहुभाषिक शहर आहे त्यामुळे मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा असं सांगितलं.

पंडित नेहरूंनी त्यांच्या या विधानाला लगेचच पाठिंबा दिला. पंडित नेहरूंनी लगेच मुंबई, गुजरात आणि विदर्भ अशी तीन राज्य निर्माण होतील असं सांगितलं.

अर्थातच त्यांच्या या विधानाला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध करण्यात आला. महाराष्ट्रातील जनता त्यावेळेस नेहरूंच्या या वक्तव्यावर नाखुष झाली आणि तिथूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आरंभ झाला.

त्याकाळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने चांगलाच जोर पकडला होता. अनेक नामवंत लोक या चळवळीशी जोडले गेले.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख, स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांनी याविषयी रान उठवलं.

स.का. पाटील,मोरारजीभाई देसाई या लोकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रचंड विरोध केला. ही चळवळ संपवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांना काही बधली नाही.

 

 

त्यावेळच्या काँग्रेसचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोध होता. म्हणूनच महाराष्ट्रात तेव्हा काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण होत होतं. आचार्य अत्रे यांच्या, ‘मराठा’ या वृत्तपत्रातून नेहरूंची अक्षरशः खिल्ली उडवली गेली.

नेहरुंना पाठिंबा देणाऱ्या स.का.पाटील, यशवंतराव चव्हाण, मुरारजीभाई देसाई यांचा मराठा मधून यथेच्छ समाचार घेतला जायचा.

असंच एक आंदोलन २१ नोव्हेंबर १९५५ या दिवशी मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे सुरू झाले. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते.

मुंबईतील मराठी लोक त्यामुळे चिडले. ठीकठिकाणी छोट्या छोट्या सभा घेऊन सगळेच फ्लोरा फाउंटन कडे आले. बरेच मराठी कामगार त्यात सामील झाले होते.

एक प्रचंड विराट मोर्चा त्यावेळेस सरकारच्या या धोरणाचा निषेध करत होता. हे आंदोलन गांधीजींच्या सत्याग्रहाप्रमाणे होते. सगळे लोक निशस्त्र होते.

हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी आधी तिकडे लाठीचार्ज केला. तरीदेखील लोक बधत नाहीत हे पाहून त्यावेळेस मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री मोरारजीभाई देसाई यांनी लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.

 

हे ही वाचा – “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” : प्रत्येक नागरिकाने वाचावीच अशी महाराष्ट्राची जन्मकथा

ज्यामध्ये १०५ लोक हुतात्मा झाले. सरकारच्या या कृत्यावर महाराष्ट्रातील जनता प्रचंड चिडली आणि ठिकठिकाणी आंदोलने, सत्याग्रह सुरू झाले. त्यानंतरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या चळवळीने देखील जोर धरला.

या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये बिगर काँग्रेसी लोक होते.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही अधिक गाजली, कारण त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी मुंबईतील आंदोलनातील लोकांवर झालेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीने चांगलाच जोर धरला.

लोकांच्या मनात पंडित नेहरू मेहरून नेहरूंबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली होती. महाराष्ट्रात त्यावेळेस जागोजागी सत्याग्रह करण्यात यायचे. पंडित नेहरूंना महाराष्ट्रात येणं मुश्किल झालं.

पंडित नेहरू आले तरी त्यांचा विरोध केला जायचा काळे झेंडे दाखवून निषेध केला जायचा. १९५७ मध्ये प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंडित नेहरू आले होते, मात्र तिथे त्यांना रस्त्यारस्त्यावर विरोध करण्यात आला.

 

 

या सगळ्या आंदोलनांचा दबाव नेहरूंवर येत होता. शेवटी १९५९ झाली ऑल इंडिया वर्किंग काँग्रेस कमिटीने द्विभाषिक राज्याच्या मुद्द्यावर महत्त्वाच्या नेत्यांचे मत पाहून अहवाल देण्याचे अधिकार इंदिरा गांधींना दिले.

त्याच वेळेस गुजरात मध्ये देखील महागुजरात आंदोलन सुरू झालं होतं ज्यानुसार मुंबईला गुजरात मध्ये सामील करून घेण्याची मागणी होती. मुंबईच्या द्विभाषिक राज्याला त्यांचाही विरोध होता.

पंडित नेहरू तसे लोकशाहीचे तत्व मानणारे असल्यामुळे त्यांना मराठी लोकांच्या भावनांचा विचार करणे भाग पडले. यशवंतराव चव्हाणांनी देखील द्विभाषिक राज्य होणार नाही असं त्यांना सांगितलं.

यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये काँग्रेस कमकुवत होईल याची कल्पना यशवंतराव चव्हाणांनी नेहरूंना दिली. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, पंडित राजेंद्र प्रसाद इत्यादींनी नेहरूंवर नैतिक दबाव आणला.

शेवटी ४ डिसेंबर १९५९ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये भाषावार प्रांतरचनेनुसार करण्यात यावी अशी शिफारस काँग्रेस वर्किंग कमिटीच्या समितीने केली.

१९६० मध्ये संसदेत, ‘ मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक ‘ संमत करण्यात आले. आणि त्यानुसार १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती करण्यात आली.

मराठी लोकांच्या आंदोलनाला यश आलं, मुंबई महाराष्ट्रात आली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

 

 

आता एक मे महाराष्ट्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

त्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्क, दादर येथे पोलिसांची परेड काढली जाते. त्याला महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री उपस्थित असतात. त्यावेळेस १०५ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते.

पोलिसांबरोबरच, होमगार्ड, मुंबई पोलीस, ट्राफिक पोलीस, बीएमसी फोर्स सहभागी होतात.

महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन दाखवणारे कार्यक्रम यावेळेस सादर केले जातात. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यात देखील झेंडावंदन चे कार्यक्रम केले जातात.

 

 

खेळाडू, पोलीस ऑफिसर्स, डॉक्टर्स याशिवाय विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. महाराष्ट्र सरकारतर्फे एखादी नवीन योजना चालू करायची असेल तर ती एक मे पासून सुरु केली जाते.

त्यादिवशी महत्त्वाची सरकारी कार्यालय, ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस बंद ठेवली जातात. मात्र प्रत्येक ठिकाणी झेंडावंदन केलं जातं.

गुजरात मध्ये सादर होणारे कार्यक्रम:

साबरमती वॉटरफॉल अहमदाबाद येथे परेड घेण्यात येते. संपूर्ण गुजरात मध्ये हा दिवस साजरा केला जातो. अनेक सरकारी कार्यक्रम त्यादिवशी साजरे होतात.

भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून त्यादिवशी महाराष्ट्रातील जनतेला आणि गुजरातमधील जनतेला महाराष्ट्र आणि गुजरात दिवसांच्या शुभेच्छा दिल्या जातात.

महाराष्ट्र आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छा!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version