आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : सौरभ गणपत्ये
===
या माणसाच्या जाण्याने आज जे खरोखरंच काहीतरी गमावल्याचा भास सगळ्यांना होतोय, ती म्हणजे केवळ त्या माणसाचा अभिनेता म्हणून ग्रेटनेस नसून समाज आणि त्यातही विशेषतः हिंदी सिनेमाप्रेमी म्हणून आपण किती मोठ्या प्रमाणावर परिपक्व झालोय याची एक मोठी साक्ष आहे.
आणि ती परिपक्वता येण्यासाठी जे कोणी मोजके अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते झटले त्यात इरफान खानचा नंबर फार वरचा लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे इरफान खान हा माणूस ‘स्टार’ होणं हीच भारतीय सिनेमा जगत मानसिक दृष्ट्या वयाने मोठं झाल्याचं लक्षण होतं.
‘स्टार’ म्हणजे ज्याच्या नावावर सिनेमे पाहायला लोक येतील असा अभिनेता. त्या पदावर ऐसपैस पोहोचण्यासारखं रूढ अर्थाने इरफानकडे काय होतं?
चार गुंडांना लोळवू शकेल अशी त्याच्याकडे शरीरयष्टी नव्हती. गालावरच्या खळ्या दाखवून नायिकेला आपल्या मोहात पाडू शकेल अशी चेहरेपट्टी नव्हती.
निव्वळ हेच नाही म्हटल्यावर नाचता वगैरे येतं का? हे प्रश्नच दूर राहतात.
वर ही फिल्म इंडस्ट्री इतकी भयानक ‘आपला तो बाब्या’ प्रकारची आहे, की शाहरुख खानच्या तिसऱ्या मुलाचंही पदार्पण ठरवून मोकळे झाले असतील.
म्हणजे ज्यांना शून्य रूप रंग आहे, नाचता येण्याची आणि अभिनयाची बोंब आहे, पण ज्यांना आधीच्या पिढीकडून इतिहास आहे त्यांना वर्षानुवर्षे एखादी जीवनदायी योजना असल्यासारखे इकडे ठेवून घेतात!
आणि त्याच वेळी उत्तम अभिनेते घरची वाट पकडतात. अश्या या इंडस्ट्रीत इरफान खान मोठा होणं हीच गोष्ट सुरेख.
जुन्या मालिकांचं दर्शन आता शक्य असल्याने एखाद्या ‘भारत एक खोज’च्या एखाद दोन भागात तो होता हे कळतं.
एरवी ‘चंद्रकांता’ मध्ये त्याने केलेली भूमिका आठवणी राहते. पण त्याचवेळी ‘द ग्रेट मराठा’ मध्ये त्याने नजीब-उद-दौला साकारला होता तो अधिक जिवंत होता.
त्यानंतर त्याने जय हनुमानमध्ये वाल्मिकी ऋषी साकारला होता. पण नजीब उद्दौला आणि वाल्मिकी ऋषी यांचा अभिनेता एकच आहे हे कळल्यावर वाल्मिकी पाहून हसू आलं होतं.
त्याची कारणं ही विशेष होती. त्याचे डोळे फार वेगळे होते.
कसूरमध्ये त्याने जवळपास माठ लिसा रे समोर वकील साकारला होता.
संपूर्ण सिनेमा आफताब शिवदासानीला ‘बेकसूर’ मानणारे दर्शक याचा ‘विरस’ झालेला चेहरा पाहून आनंदी होत होते.
फुटपाथ, मकबूल आणि आन-मेन ऍट वर्क या तिघांमध्ये तो काळ्या भूमिकांमध्ये होता. मकबूल सारख्या सिनेमात तो अप्रतिम होता यात काहीच विशेष नव्हतं.
पण या सर्व सिनेमांमध्ये आणि नजीबसारख्या भूमिकेत त्याच्यात असलेला एक घृणास्पद खलनायक त्याने बाहेर काढला होता.
त्याचे सुजरे डोळे त्याची नजर खराब असल्याचं दाखवत. ‘घात’ मध्ये पोलीस ऑफिसर असणाऱ्या ओम पुरीच्या देखण्या बायकोला नादाला लावणारा त्याचा खलनायक (मामू) अक्षरशः घाणेरडा होता.
‘आन’ मध्ये तो त्याच्या धाकट्या भावाला “बाकी काय वाट्टेल ते कर पण ते डॉटेड का काय म्हणतात ते घालतोस ना” असं अगदी ‘हात धूतोस ना’ इतक्या सहज विचारतो,
तो पाहून त्याची आणि राहुल देव दोघांची किळस आली होती. इतकी की अक्षय राहुल देवला (येडा) उंचावरून फेकून देतो ते पाहून आजही (थोडं जास्तच) बरं वाटतं.
पण या सिनेमाच्या शेवटी एक गोष्ट लक्षात अली होती की इरफानला कॉमेडीचा उत्तम सेन्स आहे.
ज्याप्रकारे आपला पोपट केला गेलाय हे केल्याचं त्याला समजतं आणि त्यावर तो रिऍक्ट होतो, तोपर्यंत सिनेमात केलेल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी तो तेवढ्यापुरता विसरायला लावतो आणि त्याची मजा येते.
‘चरस’ हा त्याचं भल्या माणसाचं काम असणारा पहिला मोठा सिनेमा असावा.
त्याच्यावर जीवघेणेपणाने गोळी चालवलेला एक अतिरेकी तो शिताफीने पकडतो, आणि हा अतिरेकी स्वतःला एक परदेशी पाहुणा सांगून सुटतो आणि चक्क तशी एक पत्रकार परिषद घेतो.
—
- …तर ठाकरे सिनेमात नवाझुद्दीनऐवजी ‘हा’ स्टार बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसला असता!
- भारतीय सेलिब्रिटीज ‘कॅन्सरवर’ उपचार घ्यायला परदेशीच का जातात? जाणून घेऊया!
—
त्यानंतर इरफानने जो भर समारंभात पोलिसांच्या वर्दीत तमाशा करायचा प्रसंग केलाय तो हलवून टाकतो.
आपला राग, दुःख आणि हतबलता तो ज्या पद्धतीने व्यक्त करतो ते अंगावर काटा आणणारं होतं. त्यादरम्यान त्याने इतर सिनेमेही सुंदर केले यात वाद नाही. पण त्यात तो मध्यवर्ती भूमिकेत नव्हता. म्हणजे चांगला म्हणून सिनेमा पाहायला जाऊ तर त्यात इरफान असायचा आणि तो त्यात नेहमीप्रमाणे चांगला असायचा.
त्यात त्याला विनोदाची जाण असणं पक्कं झालं.
त्याचा खराखुरा नायक म्हणून पहिला सिनेमा म्हणजे ‘बिल्लू’. हा सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमाने मोठं झाल्याचं लक्षण.
याचं कारण म्हणजे, सामान्य चेहऱ्याचा, सामान्य देहाचा, आणि अगदी फाटक्या अवस्थेतला नायक आणि तरीही सिनेमा व्यावसायिक. या सिनेमात शाहरुख खान होता. पण तो थोड्या अधिक मोठ्या पाहुण्या भूमिकेत होता.
कृष्ण सुदामा ही सिनेमाची मध्यवर्ती कल्पना. संपूर्ण सिनेमा सामन्यांना हे समजत नाही की नेमकी याची त्या सुपरस्टार साहिर खानशी ओळख आहे की नाही.
शेवटी जेंव्हा साहिर खान याचं नाव घेतो तेंव्हा याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आणि त्याच पावसाळी हवेत तो फक्त आपल्या भोवती आनंद घेऊन घरी जातो.
तोपर्यंत त्याला वाट्टेल तशी बोलणारी त्याची बायको आता त्याच्याबद्दल जगभरचा आदर बाळगून आहे. मुलं घरी येतात, आणि प्रेक्षकांच्याच मनातली गोष्ट सांगतात, “रोना आ रहा था”.
त्यांच्या पाठोपाठ जेंव्हा अतिशय देखणा शाहरुख खान घरी येतो आणि “मेरे मन का भावभ्रम था, शरम थी, माफ कर दे यार” म्हणून इरफान त्याला मिठी मारतो.
आनंद, हसू आणि त्यातून आलेलं रडणं इरफानने जय पद्धतीने रंगवलंय त्याला तोड नाही.
साक्षात शाहरुख खान ज्या सिनेमात आहे त्याचा नायक इरफान असणं ही गोष्ट मोठी होती. या सिनेमाने खराखुरा स्टार इंडस्ट्रीला दिला त्याबद्दल प्रियदर्शन, गौरी आणि शाहरुख खान यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.
याआधी ‘अंदाज’ सिनेमात शम्मी कपूर मुख्य भूमिकेत असूनही वीस मिनिटे काम असणाऱ्या सुपरस्टार राजेश खन्नाचं पोस्टर शम्मीएवढंच दाखवावं लागलं होतं.
‘बिल्लू’च्या बाबतीत त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती होती. पण लोकांना हा सिनेमा आजही आवडतो.
या सिनेमापासून ‘हिरो म्हणजे हिरोईन आणि तिच्याबरोबर गाणी असणारा’ अशी धारणा संपली.
एक काळ असा असे की वयाने मोठे अभिनेते चरित्र अभिनेते होत. चरित्र अभिनेते म्हणजेच वयाने मोठे अभिनेते, अशीच धारणा आजही आहे. पण कॅरॅक्टर रोल याचा खराखुरा अर्थ म्हणजे चरित्र अभिनेता नाही. कॅरेक्टर म्हणजे जसं चारित्र्य तसं सिनेमा नाटकात कॅरेक्टर म्हणजे ‘पात्र’.
म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्टचं काम काय तर पात्र म्हणून सिनेमातली जागा भरून काढणं. पण त्याची दुसरी बाजू अशी की त्या सिनेमात त्यांच्या भूमिकेला कात्री लागली तरी सिनेमाला काह फरक पडत नसे.
हे अर्थातच त्या अभिनेत्यासाठी लाजिरवाणं. वयाने मोठ्या अभिनेत्यांना नायकाचे रोल मिळणं थांबलं की त्यांचे ‘कॅरेक्टर आर्टिस्ट’ होत.
इरफान, केके मेनन, बोमन इराणी यांनी हे खोडून काढलं. हे तिघे तर नायकाला तोडीस तोड.
इरफान तर अक्षरशः ‘गुंडे’ सिनेमाचा रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर बरोबरचा हिरो आहे. किंवा ‘न्यूयॉर्क’मध्ये जॉन अब्राहम आणि निल नितीन मुकेशच्या बरोबरीचा तो आहे.
पूर्वीचे त्याचे ते वासनेने भरलेले डोळे (घात) , खुनशी भाव, आणि घाणेरडा वावर आता पूर्णपणे वेगळा वाटू लागला एवढा तो चांगला अभिनेता होता.
पानसिंग तोमरचा तो खराखुरा नायक होता तर ‘डी डे’ मध्ये तो आणि ऋषीच आठवतायत. एकाच वर्षी तो पिकू आणि तलवार करू शकत होता.
तलवारमधला त्याचा पोलिसांच्या पॅनेलला केस समजावून सांगतानाचा प्रसंग (धर्मप्रसारक अवस्था) बघत राहावा.
मदारी, करीब करीब सिंगल, हिंदी मिडीयम हे सिनेमे येणं आणि ते चालणं म्हणजे तो मोठा स्टार झाल्याचे लक्षण. लोकांमध्ये त्याची क्रेझ निर्माण झाली होती.
म्हणजे हा आहे म्हटल्यावर काहीतरी फीस्ट बघायला जावं आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळावं असं होऊ लागलं.
वयाने मोठ्या असणाऱ्या आणि सिनेमातही वयाने मोठीच कामं करणाऱ्या इरफानच्या नावावर कॉलेजातली मुलं गर्दी करू लागली. वाट्टेल त्या कामात तो शोभला.
आता आपण वयस्कर झालो म्हणून देखण्या निम्रत कौरला भेटायला नकार देणारा आणि तरुण नवाझुद्दीनसाठी आपली ऑफिसमधली जागा खाली करणारा इरफान,
त्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या पिकूमध्ये देखण्या दीपिकावर फिदा असणाऱ्या भूमिकेत शोभत होता.
ब्लॅकमेल हा त्याचा आणखीन एक भन्नाट सिनेमा. कीर्ती कुल्हारी सारखी बॉम्बगोळ्यासारखी स्फोटक अभिनेत्री त्याची बायको होती.
सिनेमागणिक हा अभिनेता तरुण होऊ लागला होता. आणि ती आजारपणाची बातमी आली. न्यूरोएंडोक्राइन म्हणजे आतड्याच्या भागात असणाऱ्या टिश्यूचा आजार त्याला होता.
तो समजला तेंव्हाच खूप उशीर झाला होता. त्यानंतर काही महिन्यांनी तो एका जाहिरातीत दिसला तेंव्हा त्याचा आवाज उसना घेतलेला पाहूनच धस्स झालं. मध्यंतरीच्या काळात तो एअरपोर्टवर चेहरा झाकून आला तेंव्हाच त्याची सोबत कितपत राहील याची शंका यायला लागली होती.
चाफ्याच्या फुलाला रंग यायला लागला होता पण त्याने मोहरायच्या आधीच पूर्ण गळती झाली.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.