उत्तर कोरिया आणि राजकीय अस्थिरता..!! वाचा, उत्तर कोरियाचा रक्तरंजित इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : स्वप्निल श्रोत्री
===
गेल्या काही दिवसांपासून कोरोना संबंधित बातम्यांचे वृत्तांकन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांचे लक्ष अचानक उत्तर कोरियावर केंद्रित झाले, ते उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या प्रकृती संदर्भात आलेल्या एका वृत्तामुळे.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, किम जोंग उन यांची प्रकृती अत्यवस्थ असून ते कोमात गेले असल्याची शक्यता वर्तवली तर दुसऱ्या वृत्तसंस्थेने ते ब्रेनडेड झाले असल्याचे जाहीर केले.
याशिवाय इतर अनेक वृत्तसंस्थांनी आपापल्या परीने अंदाज लावले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी किम त्यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता, “जर ह्या बातम्या खऱ्या असतील तर ते लवकरात लवकर बरे व्हावेत.” अशी प्रतिक्रिया दिली.
तर दक्षिण कोरियाच्या अधिकृत सूत्रांनी ह्या वृत्ताचे खंडन केले.
उत्तर कोरिया हे राष्ट्र स्थापनेपासून किम आणि त्यांच्या परिवाराच्या आदेशावर चालत आलेले आहे. लोकशाही नागरी हक्क, स्वातंत्र्य अशा शब्दांना तेथे जागा नाही.
त्यामुळेच उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रकृतीला आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये उलट सूलट चर्चा होत असताना उत्तर कोरियामधून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
उत्तराधिकारी कोण?
किम यांची प्रकृती जर खरेच अत्यवस्थ असेल तर अशा वेळी किम यांचा उत्तराधिकारी कोण ? हा प्रश्न सुद्धा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
साहजिकच जेव्हा एखाद्या देशाचा सर्वोच्च नेता अत्यावस्थ स्थितीत असतो तेव्हा त्या देशाचा कारभार चालविण्यासाठी त्याचा उत्तराधिकारी असणे गरजेचे आहे.
सध्याच्या परिस्थितीत किम यांच्या उत्तराधिकारी म्हणून किम ह्यांच्या धाकट्या भगिनी किम यो जोंग ह्यांच्याकडे पाहिले जात असून त्या किम यांच्या नंतरच्या उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्या आहेत.
आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार?
माध्यमांमध्ये येणारे वृत्तानुसार जर किम यांची प्रकृती खरचं अत्यावस्थ असेल तर ह्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि कोरियन द्वीपकल्पातील राजकारणावर काही परिणाम होईल का?
तर ह्याचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे.
जगातील अनेक राष्ट्रे उत्तर कोरियाला तर देशच मानत नाहीत. उत्तर कोरिया हा चीनचे तत्कालीन अध्यक्ष माओ – स्ते – तुंग ह्यांच्या मदतीने कम्युनिस्ट वर्कर्स पक्षाने बळकावलेला प्रदेश असून तो किम परिवाराच्या अधिपत्याखाली आहे अशी अनेक राष्ट्रांची भावना आहे.
फायनान्स ऐक्शन टास्क फोर्स ने उत्तर कोरियाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यामुळे तेथे कोणतीही आंतरराष्ट्रीय गुंतवणूक येत नाही. (अपवाद फक्त चीनचा ) चीन सोडला तर इतर कोणत्याही राष्ट्राशी उत्तर कोरियाचे विशेष असे मैत्री संबंध नाहीत.
त्यामुळेच संपूर्ण जगात नोवल कोरोना विषाणूने थैमान घातले असताना उत्तर कोरिया अजून कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
रक्तरंजित इतिहासाची पार्श्वभूमी
जपान बद्दल मनात असलेल्या तिरस्कार, दक्षिण कोरिया बद्दल असलेली नाराजी आणि अमेरिका व तीच्या मित्रराष्टांबद्दल मनात असलेला तीव्र संताप उत्तर कोरियाला अण्वस्रांपर्यंत घेऊन गेला.
परंतु, हे काही एका रात्रीत घडलेले नाही. ह्याची बीजे सन १९३९ ते सन १९४५ मध्ये घडलेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये दडली आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्वेकडची लष्करी महासत्ता असलेल्या जपानने एकेक राष्ट्र पादक्रांत करीत कोरियन द्विपकल्पावर आपले वर्चस्व जमविले.
आपल्या सत्ताकाळात जपानी सैनिकांनी तेथील स्थानिक नागरिकांवर अत्याचार उच्छाद मांडला होता. काळ बदलला, पिढ्या बदलल्या. मात्र, ह्याची सल आजही कोरियन नागरिकांच्या मनात घर करून आहे.
विशेष करून उत्तर कोरियातील नागरिकांच्या मनात.
आज परिस्थिती बदलली आहे. उत्तर कोरिया साम्यवादी राष्ट्रांच्या मदतीने एक लष्करी ताकद बनला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक अण्वस्त्रधारी देश झाला आहे.
त्यामुळे जपानला आपण आपल्या पायाच्या टाचेखाली सहज आणू शकतो हा उत्तर कोरियातील सत्ताधाऱ्यांचा विश्वास आहे.
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अण्वस्त्रे टाकून जपानला शरणागती घेण्यास भाग पाडले. जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करल्यानंतरही कोरियन द्विपकल्पावर जपानी सैनिक राज्य करीत होते.
त्यामुळे त्यांना हुसकावण्यासाठी अमेरिका राष्ट्रातील अमेरिका व रशिया ह्या दोस्त राष्ट्र गटातील विजयी राष्ट्रांनी संयुक्त मोहीम आखली आणि त्यानुसार कोरियन द्विपकल्पाच्या उत्तरेतून रशिया आणि दक्षिणेत अमेरिका एकाचवेळी जपानी सैन्यावर हल्ला करतील असे ठरले.
ठरल्यानुसार अल्पावधीतच दोस्त राष्ट्रांनी जपानी सैन्याला कोरियन द्विपकल्पातून हूसकावून लावण्यात यश मिळविले.
संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने कोरियन द्विपकल्पात ‘कोरिया नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे व काही काळाने तेथून आपापले सैन्य माघारी घ्यायचे असे ठरविण्यात आले.
नव्या राष्ट्राची निर्मिती साम्यवादी विचारसरणीवर करायची की भांडवलवादी विचारसरणीवर करायची ह्यावरून अमेरिका व रशिया ह्यांच्या वाद निर्माण झाले.
रशिया साम्यवादी विचारांचा समर्थक होता तर अमेरिका भांडवलवादी विचारांची समर्थक होती. शेवटी रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागावर एक व अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागावर एक अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करण्याचे ठरले.
ती आज अनुक्रमे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया ह्या नावाने ओळखली जातात.
रशियाचे तत्कालीन अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन ह्यांच्या मदतीने साम्यवादी विचारांचे व रेड आर्मी कडून दुसरे महायुद्ध लढलेले किम इल सुंग हे उत्तर कोरियाचे पहिले राष्ट्रप्रमुख झाले.
स्टॅलिनच्या मदतीने मिळालेल्या लष्करी बळामुळे उत्तर कोरियाने अत्यंत आक्रमकपणे दक्षिण कोरियावर दि. २५ जून १९५० रोजी चढाई करीत पुढील दिवसातच दक्षिण कोरियाचे सिऊल हे शहर काबीज केले.
दक्षिण कोरियाची मोठ्या प्रमाणावर होणारी पीछेहाट व रशियाशी असलेले वाद ह्यामुळे अमेरिकेने ब्रिटन व फ्रान्स यांच्यासह नाटोच्या १६ सदस्य राष्ट्रांच्या मदतीने दक्षिणेतून उत्तर कोरियावर आक्रमण केले.
आता परिस्थिती उलट झाली. उत्तर कोरियाची पिछेहाट सुरू झाली. अमेरिकेसह नाटो सैन्य उत्तर कोरिया लागून असलेल्या चीनचा सीमेपर्यंत येऊन धडकले.
अमेरिका आता चीनवर हल्ला करेल ह्या भीतीने चीनचे तत्कालीन अध्यक्ष माओ स्ते तुंग ह्यांनी दि. २५ नोव्हेंबर १९५० रोजी ३ लाख चीनी सैनिक मोठ्या लष्करी बळासह उत्तर कोरियाच्या मदतीला पाठविले.
चिनी सैन्याने आपल्या आक्रमक कारवाईत नाटो सैन्याला उत्तर कोरियातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. परंतु, परिस्थिती काही शांत होत नव्हती.
शेवटी संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने ३८ अक्षांशावर चीनी व नाटो सैन्याने युद्धबंदी जाहीर केली व तीच आज उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया दोन स्वतंत्र राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय सीमा ठरली.
आजच्या घडीला लष्करी बळाचा विचार केला तर उत्तर कोरिया जपान व दक्षिण कोरिया यांच्यापेक्षा अनेक बाजूंनी बलाढ्य किम जोंग उन पासून ह्या दोन्ही राष्ट्रांचे रक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेने जरी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेली अमेरिका आपले बाजूला लागून असलेल्या उत्तर कोरिया पासून आपले रक्षण कसे करणार हा जपान आणि दक्षिण कोरिया पडलेला रास्त प्रश्न आहे.
त्यामुळे गेल्या दोन वर्षात ह्या राष्ट्रांनी उत्तर कोरियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अफवा उठत असल्या तरीही जोपर्यंत किम परिवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून निवेदन येत नाही, तोपर्यंत कोणताही अंदाज बांधणे शक्य होणार नाही.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.