आश्चर्यकारक : जगावर कोरोनाचं सावट असताना `या’ दाम्पत्याला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
कोरोनाव्हायरस हा शब्द संपूर्ण जगाला माहीत झाला आहे. पण हा शब्द पृथ्वीवर एखाद्याला माहीतच नसेल, असं असेल का? यावर कुणी विश्वास ठेवेल का? पण हे खरं आहे
इंग्लंडमधील एका दांपत्याला कोरोना व्हायरस बद्दल काहीही माहिती नव्हतं.
या दाम्पत्याची ही कथा खूपच रंजक आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर मध्ये राहणारं हे जोडपं, एलेना मॅनिगेट्टी आणि रायन आस्बोर्न. या दोघांचं एकदा तरी या संपूर्ण जगाची सफर करायचं स्वप्न होतं.
म्हणून त्यांनी २०१७ मध्ये असं ठरवलं की, आता सफरीवर निघूयात. त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी कमवायला सुरुवात केली. नंतर नोकरीही सोडली एक बोट खरेदी केली आणि सफरीवर निघाले.
सफरीवर निघताना त्यांनी घरच्यांनाही सांगून ठेवलं की, आमच्याशी संपर्कात राहा मात्र आम्हाला कोणतीही वाईट बातमी सांगू नका.
अटलांटिक समुद्रातील कॅनरी बेटावरून त्यांचा प्रवास सुरू झाला.
गेल्या महिन्यात मार्च मध्ये ते कॅरेबियन बेटांवर आले, तेव्हा कुठे त्यांना कोरोना विषयी माहिती झाली आणि संपूर्ण जगावर त्याचा किती प्रभाव पडला आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
जेव्हा ते सफरीवर निघाले त्यावेळेस चीनमध्ये एक व्हायरस आला आहे याची त्यांना थोडीफार माहिती होती. परंतु त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यात चीनमध्येच याचा खूप प्रभाव दिसून येत होता.
त्यांना वाटलं की, आपण फिरून येऊ, तोपर्यंत याचा जगावर काही परिणाम होणार नाही, हे सगळं संपून जाईल. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाव्हायरसला जागतिक महामारी जाहीर केलेलं नव्हतं.
२८ फेब्रुवारीला त्यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली. त्यावेळेस covid-19 याविषयी त्यांना थोडीशीच माहिती झाली होती. त्यावेळेस चीनपुरता हा व्हायरस मर्यादित राहील असं त्यांना वाटलं.
त्यानंतर पंचवीस दिवस त्यांना कोणताही इंटरनेट एक्सेस नव्हता. पंचवीस दिवसानंतर, २५ मार्चला ते कॅरेबियन बेटावर बेक्विया या ठिकाणी पोहोचले. त्याने त्यांचे मोबाईल फोन ऑन केले.
तोपर्यंत त्यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नव्हता.
तिकडे आल्यावर त्याने थोडासा डेटा खरेदी केला आणि बाहेर काय घडते याची थोडी माहिती घेतली. एलेना म्हणते की,
‘रायनने बातमी वाचायला सुरुवात केली, आणि आम्हाला हे खरंच वाटत नव्हतं की एका व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस पसरला असून त्यामुळे किती नुकसान झालंय हे पाहूनच माझ्यातरी तोंडाचा ‘आ’ वासला. हे समजायलाच आम्हाला कितीतरी वेळ गेला.’
रायन याविषयी बोलताना म्हणतो की, ‘तुम्ही आजारी पडलात आणि कोमामध्ये गेलात आणि बरे होऊन काही दिवसांनी कोमातून बाहेर याल.
आणि बाहेरच्या जगाशी तुमचा संपर्क येईल तेव्हा हे जग पूर्वीसारखं नाही हे समजल्यावर कसं वाटेल, त्या क्षणी आम्हाला तसं वाटत होतं.’
एलेना आणि रायन हे दोघेही वयाने तिशी पर्यंतचे आहेत. समुद्रसफारीचं त्यांचं स्वप्न होतं. परंतु मँचेस्टर मध्ये ते स्वतःचे घर घेऊ शकत नव्हते, तितके पैसे त्यांच्याकडे नव्हते.
तरीदेखील कमी बजेटमध्ये समुद्र सफर करता येते का यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कॉपी रायटिंग आणि ग्राफिक डिझाइनचे फ्रीलान्सिंग ते करतात. गेली अनेक दिवस ते बोटीवरच राहतात.
त्यांचं एक यूट्यूब चैनल असून त्यातून ते बोटीवर कसं राहतात, आणि कमी खर्चात समुद्रसफर कशी करायची याची माहिती देतात.
अटलांटिक समुद्रातून प्रवास करणे हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग होते. त्यासाठी त्यांनी खूप तयारी केली होती. क्रॉसिंग करताना त्यांच्याकडे एक सॅटॅलाइट डिवाइस होते.
ज्याद्वारे ते आपल्या कुटुंबियांशी संपर्क करू शकणार होते. ज्यामध्ये फक्त १६० अक्षरं वापरता येणार होती. म्हणूनच त्यांनी आपल्या कुटुंबियांना कुठलीही वाईट बातमी सांगू नका, असं सांगितलं होतं.
कारण एक तर समुद्रात तुमची बोट असेल आणि त्याच वेळेस तुम्हाला वाईट बातमी कळाली तर तुम्ही किंचाळण्याशिवाय, रडण्या -ओरडण्याशिवाय काही करू शकत नाही.
ते कॅरेबियन बेटाजवळ आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, बेट जवळजवळ बंद केलेलं आहे. त्यांना वाटलं की एखाद्या टूरिस्टमुळे तिथल्या स्थानिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली असावी.
त्यांनी त्यांच्या काही बेटावरील मित्रांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांना कोरोनाच्या गंभीरतेचं स्वरूप समजायला लागलं.
एलेना ही इटलीतील लोंबर्डी या गावातली असून जिथे कोरोना व्हायरसचा संसर्ग खूप जास्त होता. अनेक लोकांना कोरोनाची लागण तिकडे झालेली होती आणि अनेक मृत्यू देखील झालेले होते.
तिथल्या बातम्या त्यांनी इंटरनेटवर वाचल्या आणि एकदम त्यांना भीती वाटायला लागली.
त्यांनी त्या बद्दलच्या अधिक बातम्या शोधायला सुरुवात केली. रायनला एक दहा दिवसांपूर्वीच जुनं आर्टिकल न्यूयॉर्क टाइम्समध्ये वाचायला मिळालं, ज्यामध्ये एलेनाच्या गावाची माहिती होती.
तिकडे कोरोनाने किती हाहाकार माजला आहे हे सगळं त्यांना वाचायला मिळालं. एलेना ने घाबरून आपल्या घरी फोन केला. फोनवर तिचे वडील होते ते म्हणाले,
‘तुला कळलं का? पण काळजी करू नकोस आम्ही सुरक्षित आहोत.’
एलेना म्हणते की, त्या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की लोक मरत आहेत परंतु त्यांच्यासाठी शवपेटी देखील उपलब्ध नाहीत. कारण शवपेटीपेक्षा मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
त्यांना दफन करण्यासाठी देखील जागा शिल्लक नाही. हे खरोखरच आमच्यासाठी धक्कादायक होतं. माझ्या घरचे सुरक्षित होते मात्र ज्यांना मी लहानपणापासून ओळखत होते त्यातील बरेचजण मृत पावले होते.
सेंट विन्सेंट मध्ये ते त्यांच्या एका फ्रेंडकडे उतरणार होते. त्यासाठी त्यांनी दहा तास आधी त्यांच्या फ्रेंड ला फोन केला. परंतु त्या फ्रेंडनी त्यांना सांगितलं की इकडे सध्या सगळीकडे लॉक डाऊन असल्यामुळे सगळीकडची बेटं बंद आहेत.
अशी परिस्थिती उद्भवली होती की त्यांच्यासाठी आता कुठेही जाणं शक्य नव्हतं. शिवाय इलेनाला तर प्रवेश पण देणार नाहीत, कारण ती इटालियन नागरिक आहे.
कुठल्याही इटलीतील व्यक्तीला तिकडे प्रवेश बंदी करण्यात आली होती. एलेना आणि रायन म्हणतात की, गेले कित्येक महिने आम्ही इटलीला गेलोही नव्हतो. पण याचं प्रूफ देणं गरजेचं होतं.
सुदैवाने रायनने आमच्या बोटीची जीपीएस ट्रेकिंग हिस्टरी ठेवली होती. त्यामुळे आम्हाला सध्या इथे उतरायला तरी मिळायला आहे.
शिवाय २५ दिवस ते बोटीवर दोघेच होते त्यामुळे इतर लोकांचा कुठलाही संपर्क नव्हता म्हणून त्यांना त्या बेटावर प्रवेश मिळाला.
सध्या ते परतीच्या मार्गावर असले तरी प्रत्येक दिवसाला नवं आव्हान त्यांना सोसावं लागत आहे.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.