आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
उन्हाळा येतो तसा सगळ्यांना वेध लागतात आंबे खाण्याचे. त्यातही हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा. हापूस आंबा न आवडणारा माणूस कोणी नसेलच.
भारतात त्यातही महाराष्ट्रात आणि कोकणात हापूस आंबा पिकवला जातो. केशरी रंगाचा, चवीला एकदम गोड असा आंबा खरेतर उन्हाळा सुसह्य करतो.
उन्हामुळे काहिली होत असताना आमरस जेवणात असेल तर त्यासारखं सुख नसतं. महाराष्ट्रातला आपल्या कोकणातला असल्यामुळे तो आपल्याला अधिकच जवळचा वाटतो.
पुराणांमध्ये ही आंब्याचा उल्लेख आढळून येतो. आहे की नाही गंमत!!
अनेक उपनिषदांमध्ये,मौर्यकालीन लिखाणात, मुघल काळात आंब्याचे उल्लेख आढळून येतात. परंतु यावर फारसा अभ्यास झालेला नसल्यामुळे त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळत नाही.
नंतर उल्लेख येतो तो पोर्तुगीजांचा. पोर्तुगीजांनी गोवा ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांनी भारतामध्ये पोर्तुगीजांच राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
पोर्तुगीज व्हाईसरॉय ‘अल्फान्सो दी अल्बुकर्क’ याच्या या नावावर सध्याचा हापुस आंबा, अल्फान्सो मॅंगो ओळखला जातो. त्याचे बोटॅनिकल नाव मॅग्नेफेरा इंडिका असं आहे.
पोर्तुगीजांच्या अखत्यारीत असलेल्या रत्नागिरी आणि कारवारमध्ये हापूस आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आणि आज हापुस संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
परंतु भारतात आंबा हा आधीपासूनच अस्तित्वात आहे. संस्कृत मध्ये त्याला आम्र, हिंदीमध्ये आम, कन्नड मध्ये माउ तर तमिळमध्ये मंगा असं म्हटलं जातं.
पोर्तुगीज केरळ मार्गे भारतात यायचे त्यांनीच या मंगाच मँगो केलं आणि आज हाच शब्द आंब्यासाठी वापरला जातो. आंबा हे भारत, पाकिस्तान, फिलिपिन्स, आणि बांगलादेशचे राष्ट्रीय फळ आहे.
उष्णकटिबंधीय प्रदेशात आंबा पिकवला जातो. आंब्याचे झाड साठ फूट उंच वाढते. झाड लावल्यापासून चार ते सहा वर्षात त्याला फळे यायला सुरुवात होते.
फळ पिकण्यास तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. मार्च ते मे दरम्यान पिकलेले आंबे काढले जातात. भारत हा सगळ्यात मोठा आंबा उत्पादक देश आहे. परदेशातही हापूस आंब्याची निर्यात केली जाते.
आता पुराणांमध्ये आंब्याचे उल्लेख कुठे कुठे आहेत? तर भागवत पुराणात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे म्हटले आहे. वेदांमध्ये आंब्याला अमृतफळ असे म्हटले आहे.
हिंदू आणि बौद्ध धर्मात आंब्याच्या झाडाला पवित्र मानलेवजाते. एकदा गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते म्हणून बुद्ध धर्मात आंब्याला पवित्र झाडं मानले जाते.
बौद्ध धर्मात आंब्याची आणि गौतम बुद्धांची एक गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे एकदा गौतम बुद्धांनी एक आंबा खाल्ला. त्यानंतर त्यांनी ती आंब्याची कोय आपल्या आवडत्या शिष्याला, आनंदला एका विशिष्ट ठिकाणी पेरण्यासाठी सांगितली.
आनंदने ती त्या ठिकाणी पेरली. बुद्धांनी त्यावर हात धुतला तर अचानक त्याठिकाणी आंब्याचे झाड उगवले. आणि त्याला एकदम ताजी फुले आणि फळे आली.
म्हणून आंब्याच्या झाडाला बुद्ध धर्मात पवित्र मानले जाते.
पुराणातील अजुन एक गमतीदार कथा या आंब्याच्या झाडाभोवती गुंफलेली आहे. त्या कथेनुसार सुर्यादेवाची मुलगी एका दुष्ट जादुई शक्तिखाली होती.
त्यापासून वाचण्यासाठी ती एका तलावात पडते आणि कमळ बनते. तिकडून एक राजा जात असतो, तो त्या कमळाला पाहतो आणि त्याला वाटतं की ते कमळ त्याला हवं आहे.
तो ते तोडणार इतक्यात ती शक्ती कार्यरत होते आणि त्या कमळाला जाळून भस्म करते. ते भस्म जिकडे पडतं तिथून एक आंब्याच झाडं उगवतं. त्या झाडाला पाने, फुले आणि फळं लागतात.
आता राजाला वाटतं, की हे फळ आपलंच आहे. ते फळ पिकतं आणि खाली पडतं आणि त्यातून सूर्यदेवाची मुलगी बाहेर येते. राजा तिला पाहतो तेव्हा त्याला आठवतं की गेल्या जन्मात ही त्याची बायको असते.
अगदी शंकर पार्वती यांच्या कथेत देखील आंब्याच्या झाडाचं महत्व आहे. पार्वतीबरोबर विवाह करण्यापूर्वी शंकर आंब्याच्या झाडाखाली बसले.
नंतर ललिता देवीच्या कृपेने त्यांचं पार्वतीशी विवाह होतो, आणि ते कैलासावर जातात. तर असा हा आंब्याच्या झाडाचा उल्लेख पुरणाकथांमध्ये आढळतो.
आंब्याचे आयुर्वेदिक उपयोग:
आयुर्वेदानुसार आंबा हा वात, पित्त, आणि कफ या त्रिदोषांवर उपयुक्त आहे. आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. कच्ची कैरी शरीराला थंडावा देते.
पण आयुर्वेदात कैरी नुसती खाणं चांगलं मानत नाहीत. ती नुसती खाल्ली तर पित्त वाढू शकते, त्यासाठी तिची चटणी खाणे योग्य, त्यामुळे पचन चांगले होते.
आंब्यामध्ये अनेक पोषणमूल्य असून त्यातल्या व्हिटॅमिन, मिनरल, चोथा यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते.
आंबा खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होते, तर चोथ्यामुळे शरीराची शुद्धता होते, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकले जाते.
त्यातल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम मुळे हृदयविकार आणि ताणावर उपयोग होतो. ब्लडप्रेशर कंट्रोल मध्ये राहते.
तसेच शरीराच्या हृदयाचे ठोके देखील नीट पडतात. व्हिटॅमिन b6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुळे इन्फेक्शन कमी होतं. तसंच हृदयविकारावर मात करता येते.
आंब्यामध्ये असणाऱ्या आयर्न आणि कॉपर मुळे अनेमिया कमी होण्यास मदत होते.
आंब्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मुळे डोळ्यांची क्षमता वाढेते, दृष्टी चांगली होण्यास मदत होते.
आंब्यामधील व्हिटॅमिन ई मुळे शरीराची कांती तेजस्वी होते.
आंब्याच्या झाडाची पाने देखील उपयुक्त आहेत
आंब्याच्या झाडाची पाने वाळवून पावडर केली आणि ती विशिष्ट मात्रेत घेतली तर सर्वांसाठी फार उपयुक्त ठरू शकते.
केस वाढणयासाठी देखील त्यांचा उपयोग होईल. डायबिटीस, तणाव या सगळ्यांवर त्याचा चांगला उपयोग होतो.
जुलाब, ताप अस्थमा, कफ, सर्दी या सगळ्यांवर आंब्याच्या पानांचा वापर करून काढा घेतल्यास उपयोगी पडतो.
आंब्याची साल
आंब्याच्या सालीत देखील अनेक औषधी गुणधर्म आहेत. संधिवात, अल्सर, अतिसार, सर्दी यावर सालीचा वापर केला जातो.
अगदी स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये जर अती रक्तस्त्राव होत असेल तर, आंब्याच्या सालीचा रस घेतला जातो. खरुज कमी करण्यासाठी देखील याचा वापर होतो.
ताप आल्यास हातापायांच्या तळव्याला आंब्याच्या सालीची पेस्ट लावल्यास ताप उतरू शकतो.
आंब्याच्या कोयीचे गुणधर्म
आंब्यामधील कोय देखील गुणधर्मी आहे. मूळव्याधीवर या आंब्याच्या बियाची पावडर करुन पाण्याबरोबर घेतल्यास उपयोग होतो.
सावलीत वाळवलेल्या आंब्याच्या कोयीच्या पावडारीचा उपयोग गर्भनिरोधक म्हणूनदेखील करतात.
कैरीचे उपयोग
कैरी भाजून घेऊन तिचा रस घेतल्यास ब्राँकायटीस मध्ये त्याचा उपयोग होतो. मीठ लावून कैरी खाल्ल्यास उन्हाळ्यात तहान कमी लागते. उष्माघातापासून बचाव होतो.
आंब्याची फुले
अतिसारामधे ताज्या फुलांच्या रसाचा वापर होतो. मूत्रपिंडाच्या विकरावरही याचा वापर केला जातो.
याशिवाय हिंदू धर्मात आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे.
कुठल्याही पूजेसाठी आंब्याची पाने वापरली जातात. घरच्या प्रवेशद्वारावर त्याचे तोरण बांधले जाते. पुजेच्यावेळेस कलशामध्ये आंब्याची पाने ठेवून पूजा केली जाते.
काही समाजात विवाहापूर्वी आंब्याच्या झाडाला फेरी मारली जाते. त्यानंतरच पतिपत्नी विवाहबद्ध होतात.
आंब्याच्या झाडाची लाकडे पवित्र मानली जातात. होमहावनामध्ये ती वापरली जातात.
चंद्राची पूजा देखील आंब्याच्या फुलांनी करतात. याशिवाय सरस्वतीच्या पूजेत देखील आंब्याची फुले वापरली जातात.
अगदी माणसाच्या अंतिम संस्काराच्या विधीमध्ये देखील याच्या लाकडांचा यांचा वापर होतो.
तर असा हा आंबा, बहुगुणी. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग हा मनुष्यप्राणी करतो. अगदी पुराणकाळापासून याचे औषधी गुणधर्म माणसाला माहीत आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.