आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – निखिल वाळिंबे
===
भारताला लाभलेलं अलौकिक सौंदर्य म्हणजे “हिमालय पर्वतरांगा”. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरं बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात. हिमालयाच्या सुंदरतेसोबतंच अनेकांना आकर्षण असतं ते म्हणजे इथे भटकत असलेल्या साधू- संतांचं.
रोजच्या कंटाळवाण्या आयुष्याचा कंटाळा आला की आपणही मस्करीत म्हणतो, “एके दिवशी मी हिमालयात जाऊन संन्यास घेणारे.” यातला मस्करीचा भाग सोडला तरी अनेक महात्मे हिमालयात संन्यास घेण्यासाठी जातात.
आपणही फिरायला गेलो की तिथल्या एखाद्या साधूशी भेट व्हावी अशी आपली इच्छा असते, पण असं घडत मात्र नाही.
याबाबतच निखिल वाळिंबे यांनी लिहिलेला हा लेख:
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
काही वर्षांपूर्वी हिमालयात फिरत होतो. एका ठिकाणी एक साधू बाबा भेटले. उत्तरेकडे साधुसंतांना महात्मा किंवा बाबाजी याच नावाने संबोधतात.
नमस्कार करून बसलो. बाबाजींनी, इकडे कसा आलास वगैरे चौकशी केली. चहा दिला.
–
हे ही वाचा – ज्ञानगंज : मृत्यूवर विजय मिळवणाऱ्यांची हिमालयातील रहस्यमय भूमी!
–
त्यादरम्यान बाबाजींना काही प्रश्न विचारले. त्यांनीही बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या. असाच एक प्रश्न विचारला – हिमालयात एकापेक्षा एक श्रेष्ठ महात्मे आहेत असे ऐकले, वाचले आहे. मग ते आम्हाला का दिसत नाहीत?
यावर बाबाजींनी मलाच काही प्रश्न विचारले.
साखर किती रुपये किलो आहे?
२५/३० रुपये असेल.
कुठे मिळते?
कोणत्याही किराणा दुकानात.
दुकान तुझ्या घरापासून किती लांब आहे?
घरातून खाली उतरलो की एक बिल्डिंग पलीकडे.
आणि सोन्याचा भाव काय आहे?
असेल काहीतरी दहा-पंधरा हजार. नक्की माहिती नाही.
हा तोळ्याचा भाव आहे का किलोचा?
तोळ्याचा असेल. किलोनी कोण सोने घेईल.
बरोबर. आणि सोनं कोणत्या दुकानात मिळतं?
सराफाच्या …
आणि ते दुकान तुझ्या घरापासून किती लांब आहे?
अर्धा-एक किलोमीटर …
पुण्याच्या प्रत्येक गल्लीत सराफ दुकान आहे का?
नाहीच. लक्ष्मी रोडवर अनेक दुकानं आहेत. बाकी भागांतही, काही दुकानं असतील.
म्हणजे तुला सोनं घ्यायचं असेल तर जास्त अंतर चालावे लागेल. बरोबर ना?
हो.
आणि किंमतही जास्त मोजावी लागेल.
हो.
बरं कस्तुरीचा भाव काय आहे?
नाही माहित.
बघितली आहेस ना?
नाही.
कुठे मिळते ते तरी माहिती आहे का?
नाही.
पंचवीस रुपये किलोची साखर तुझ्या घराशेजारी मिळते. दहा हजार रुपयांचे सोने, थोडं जास्त अंतर जावं लागलं तरी मिळण्याची खात्री आहे. कारण दुकान माहिती आहे आणि तुझ्याकडे पैसे पण आहेत.
पण कस्तुरी मिळवण्यासाठी मात्र तुला कस्तुरी शोधत जावं लागेल. कुठल्या दिशेला गेल्यावर मिळेल, किती दिवस लागतील याची काहीही खात्री नाही.
आणि समजा असे ठिकाण तुला सापडलं तर ती व्यक्ती सांगेल तितकी किंमत द्यावी लागेल. ती देण्याची तयारी आणि क्षमता असेल तरच कस्तुरी मिळेल.
तू ज्या महात्म्यांसंबंधी बोललास ते त्या कस्तुरी सारखेच आहेत.
–
हे ही वाचा – हिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…
–
तुम्हाला पोट भरल्यावर, बडीशेप खात-खात सत्संग हवा असतो. साखरेप्रमाणे तो टीव्हीचं बटन दाबलं की तुम्हाला मिळतो. बहुतेकजण त्यातच खुश होतात.
काहीजण, सोनं घेणाऱ्यांसारखे असतात. थोडा अधिक प्रयत्न करतात आणि अधिक किंमतही मोजतात. समाजामध्ये अशांची प्रतिष्ठा स्वभाविकच वाढते.
पण तुमच्यापैकी किती जणांना खरंच कस्तुरी मिळवायची आहे? अशा साधुसंतांचं, महात्म्यांचं दर्शन व्हायचं असेल तर तितका शोधही घेतला पाहिजे.
आणि ते भेटल्यानंतर ते सांगतील ती किंमतही मोजली पाहिजे. खरंच तुमची तयारी आहे का?
अशी किंमत मोजण्याची तयारी नाही आणि घरबसल्या ती वस्तू मिळतही नाही. मग टीव्हीवर दिसणारे म्हणजेच समस्त साधू समाज असा अर्थ घेऊन बरेच जण सगळ्या साधू समाजावर टीका करतात.
बरं इथं इतक्या लांब हिमालयात आले तरी जिथंपर्यंत गाडी जाते त्याच्यापेक्षा पुढे दोन तीनशे मीटर चालत तुम्ही जाणार. आणि तुमच्या अपेक्षा काय तर या महात्म्यांनी तुमच्या समोर येऊन तुम्हाला दर्शन द्यावे?
तुम्हाला भेटण्यातच वेळ घालवायचा असता तर घर संसार सोडून ते इथे हिमालयात कशाला आले असते? सर्वसंगपरित्याग कशाला केला असता?
तुला जर खरंच अशा महात्म्यांना भेटायचे असेल तर इथं सहा महिने रहा. जिथं गाडी रस्ता संपतो, तिथून पुढं पंधरा वीस किलोमीटर पहाडात जा. ते राहतात तिथं रहा. ते खातात ते खा. आणि मग बघ.
नाहीतर हे सगळं विसर आणि घरी जा. साखर खात बस.
पर इतना ध्यान में रखो. तुम्हारे ना मिलने से साधू का जीवन रुकने वाला नही हैं. हां, तुम्हारे मिलने से ही शायद बाधा अा जाए. पर साधू के ना मिलने से तुम्हारा क्या होगा ये सोचो.
===
हे ही वाचा – हिमालयातील या गावाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील! वाचा
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.