आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण सध्या घरात बंदिस्त आहोत.
परंतु 24 तास घरात बसणंच अवघड आहे, तरीदेखील सध्या हे आवश्यक आहे. त्यातूनही आपल्याला काहीही महत्वाची कामं येऊ शकतात.
उदाहरणार्थ बँक, ऑफिस किंवा घरात राहणाऱ्या गृहिणींना देखील भाजी आणणे, सामान आणणे या गोष्टी कराव्याच लागतात.
त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी घराच्या बाहेर जाण्याची आवश्यकता पडतेच.
परंतु बाहेर गेलो आणि कोरोना होण्याची भीती जास्तच असते, त्यामुळे बाहेर जाणं देखील नको वाटतं.
अशावेळेस आपण जर विशेष काळजी घेतली तर कुठलाही त्रास न होता आपण बाहेर जाऊ शकतो आणि कोरोनाचं संक्रमण होण्यापासून रोखू शकतो.
घरात बनवलेले मास्क आणि सोशल डिस्टनसिंग जर सांभाळलं आणि चेहर्यावर हात नाही नेला तर अवघड काही अवघड नाही.
आता लॉकडाऊन आहे म्हणून आणि थोड्या दिवसांनी जर लॉक डाऊन शिथील झाला तरीदेखील बाहेर जाताना काळजी ही घ्यावीच लागणार आहे.
त्यासाठीच काही उपयुक्त टिप्स आता आपण पाहूयात.
मास्कचा वापर करा
बाहेर जर पडायचं असेल तर सध्या मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे.
कारण दुकानांमध्ये, मॉल्समध्ये, बँकांमध्ये, ऑफिसमध्ये आपण बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतो. अशा वेळेस तोंडावर मास्क असेल तर तो उपयोगी येईल.
अगदी N95 मास्क नाही मिळाला तरी घरामध्ये असलेल्या सुती कापडापासून देखील मास्क तयार करता येतो ज्यामुळे आपलं नाक तोंड आणि चेहरा झाकता येतो. अशा मास्कचा वापर प्रत्येकाने बाहेर पडताना केलाच पाहिजे.
अंतर पाळा
बाहेर गेल्यानंतर कधीही गर्दीच्या ठिकाणी मिसळू नका.
दोन व्यक्तींमधले अंतर हे किमान सहा फूट असेल याची काळजी घ्या.
शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळा.
नको असलेल्या खरेदीसाठी बाहेर पडू नका
कोरोनाला सर्वाधिक कारणीभुत ठरणारी बाब म्हणजे शहरातील गर्दी.
सध्या सगळ्यांनाच कंपल्सरी घरात बसावं लागत आहे, याचा कंटाळा येतोय हे खरंय, तरीही आपणच ही बंधन आपल्यावर घालणं गरजेचे आहे.
कारण बाहेर जाणं, लोकांमध्ये मिसळणे यामुळे आपण होऊन कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखे आहे.
म्हणून पूर्वीप्रमाणे शॉपिंग साठी बाहेर जायची गरज आता नाही. शक्यतो टाळाच. कारण बाजारात देखील कोणत्या प्रकारचे लोक येतील समजत नाही.
बटन दाबणं, दार उघडणं यासाठी हातांच्या कोपर्यांचा उपयोग करा
कोरोनाचा विषाणू हा कुठेही एखाद्या पृष्ठभागावर बरेच काळ जिवंत राहतो. म्हणून बाहेर गेल्यानंतर लिफ्टमध्ये जाताना किंवा ऑफिसमध्ये जाताना आपण बऱ्याचदा हातांचा आणि हाताच्या बोटांचा वापर करतो.
आता मात्र असं करणं रिस्की आहे. कारण आपला हात काहीतरी कारणाने अगदी आपल्या नकळत देखील चेहर्याकडे जातच असतो.
यासाठी आपण लिफ्टचे बटन दाबताना आपल्या हाताच्या कोपर्याचा किंवा एखादं झाकण असलेले पेन ज्यामध्ये रिफिल काढून त्यात सॅनिटायझर भरून लिफ्टचे बटन दाबण्यासाठी त्याचा वापर करावा.
म्हणजे शरीराचा कुठलाही भाग लिफ्टच्या बटनसाठी वापरला जाणार नाही. त्याच पेनाचा आपण ऑफिसमधील इलेक्ट्रिक बटणे लावण्यासाठी देखील वापर करू शकतो.
परंतु वॉशरूम वापरताना मात्र त्याचे दार उघडण्यासाठी आपण शक्यतो हाताचे कोपर किंवा खांदा वापरून दार उघडायचं व बंद करायचं. असं केल्याने बाहेरच्या वस्तूंना सरळ स्पर्श न करताही आपल्याला ही काळजी घेता येईल.
मोबाईल फोन आणि पर्सची काळजी घ्या
बाहेर गेल्यानंतर मोबाईलवर बोलून झालं तर मोबाईल लगेच खिशात किंवा तुमच्या जवळील पर्समध्ये ठेवा.
बाहेर इतर ठिकाणी कुठेही खाली ठेवू नका आणि जरी बोलून झाल्यावर मोबाईल वाईप्सने पुसून घ्या.
बाहेर जाताना असे ओले वाईप्स जवळ ठेवा. जेणेकरून मोबाईल आणि तुमची पर्स त्याने पुसता येईल.
तुमच्या पर्समध्ये सॅनिटायझरची छोटी बॉटल ठेवा, बाहेरच्या कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर हाताला सॅनिटायझर लावून घ्या. मुळात घरातून निघतानाच हात स्वच्छ धूऊन निघा.
वस्तू हाताळताना काळजी घ्या
आपण चेहर्यावर मास्क लावतोय आणि बाहेर जातोय. पण जर काही खरेदी करायची असेल तर हातामध्ये ग्लोवज असतील तर ते जास्त चांगलं.
कारण समजा, तुम्ही बाहेर भाजी घेण्यासाठी गेला आहात. आता भाजी घेताना पूर्वीप्रमाणे प्रत्येक भाजीला हात लावून घेणे आता टाळलेलं बरं. त्यातही जर तुमच्या हातात ग्लोव्हज असतील तर तुम्ही अशा भाज्या हातात घेऊन सिलेक्ट करू शकता.
असं केल्यामुळे तुमच्या नंतर जे कोण भाजी घेणारे असतील त्यांनाही थोडासा कम्फर्ट फील होईल. तुमची ही कृती इतरांनाही प्रेरणादायी ठरेल.
तुमच्या घरामध्ये हँडवॉश, सॅनिटायझर, वाईप्स किती आहेत ते बघून गरज असल्यास एकाच फेरीत सगळ्या गोष्टी घ्याव्यात. म्हणजे चारदा बाहेर जावे लागू नये.
कॅश हाताळणे टाळा
शक्यतो एकमेकांना द्यायच्या कुठल्याही गोष्टी सध्या करू नका.
खरेदी झाल्यानंतर बिल देताना ऑनलाइन पेमेंटचा पर्याय वापरा.
Gpay, UPI ॲप असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. कॅश देणे-घेणे करू नये.
घरात सामान आणल्यानंतर काय करावं
बाहेर जाऊन, तुम्ही तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी घेतल्यात आणि घरी आलात की लगेच पहिल्यांदा हात 20 सेकंदांपेक्षा जास्त हँडवॉश लावून धुवावेत.
लगेच कपडे बदलावेत आणि धुवायला टाकावेत.
आणलेलं सामान ठेवण्यासाठी वेगळी जागा करावी. आणि ज्या गोष्टी उघड्यावर राहतील आशा म्हणजे धान्य, साबण अशा एका ठिकाणी ठेवून द्याव्यात, त्यांना दोन दिवस हातही लावू नये.
फक्त फळं आणि भाज्या लगेच पाण्यात खाण्याचा सोडा घालून धुऊन घ्याव्यात.
अगदी दुधाच्या पिशव्या, दह्याचे डबे देखील धुऊन घ्याव्यात.
प्रवास करताना घ्यायची काळजी
सध्यातरी कुठलीही वाहतूक व्यवस्था सुरू नसून कुठेही जाणे सध्या अशक्य आहे. तरीही काही दिवसांनी लॉक डाऊन शिथिल झाल्यावर प्रवास करावा लागू शकतो अशा वेळेस चेहऱ्यावरचा मास्क आणि इतर व्यक्तींमधील अंतरही कायम ठेवावं लागेल.
जवळ सॅनिटाइझर बाळगावे.
प्रवासात जे काही खाण्यासाठी लागणार आहे ते पूर्ण उकडून शिजलेले अन्न खावे आणि स्वतःची काळजी घ्यावी.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.