वयाच्या ५व्या वर्षीच सैन्यातल्या जनरलचा पोशाख, वाचा सत्ताधुंद नेत्याचा प्रवास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ही कहाणी आहे उत्तर कोरियाचा अध्यक्ष अध्यक्षाची. किम जोंगला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच हुकुमशहा बनण्याचं बाळकडू मिळत गेलं होतं.
पाचव्या वर्षीच त्याला सैन्यातल्या जनरलचा पोशाख चढवण्यात आला होता आणि सैन्यातले खरे जनरल त्याला झुकून सलाम करत होते. त्याचा आशीर्वाद घेत होते.
सातव्या वर्षी त्याने कार चालवायला घेतली. त्याला कार चालवता यावी म्हणून जगातल्या महागड्या गाड्यांमध्ये बदल करून घेण्यात आले. अकराव्या वर्षी त्याला स्वसंरक्षणार्थ हातात कोल्ट पॉइंट ४५ पिस्तोल देण्यात आली.
–
हे ही वाचा – उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची ताकद आणि धास्तावलेलं जग
–
त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आले. परंतु तिथे तो गुप्त नावाने राहिला. त्याच्यासोबत खोटे आईवडील तिथे राहिले. कुणालाही कळू नये तो कोण आहे याची पुरेपुर खबरदारी घेण्यात आली.
या रहस्याची उत्तर कोरीयाला सवयच आहे. त्यांच्या देशातल्या कोणत्याच बातम्या बाहेर येत नाहीत.
असा हा मुलगा पुढे जाऊन उत्तर कोरीयाचा सर्वेसर्वा बनला. त्याने आपलं सगळं लक्ष अण्वस्त्रे बनवण्याकडे लावलं. अण्वस्त्रांच्या जोरावर तो सगळ्या जगाला आणि विशेषतः अमेरिकेला धमकावू लागला.
१९४५ च्या सुमारास महायुद्ध संपलं आणि देश दोन विचारसरण्यांमध्ये वाटला गेला. एक भांडवलवादी अमेरिकेच्या बाजूने आणि दुसरा कम्युनिस्ट विचारधारेचा रशिया आणि त्याच्याबाजूचे देश.
या दोघांच्यामधील तेढ परीणत झाली ती जपान आणि चीनच्या मधे असलेल्या कोरीयन बेटांवर. त्याचे दोन तुकडे झाले होते. एक द. कोरिया आणि दुसरा उत्तर कोरीया. हे दोन स्वतंत्र देश झाले.
द. कोरीया अमेरिकेच्या बाजूने भांडवलवादी देश झाला तर उत्तर कोरीयामध्ये हुकुमशाही जन्माला आली. हा हुकुमशाहा होता किम इल संग.
त्यानं तेव्हाच्या कोरीयाचं नेतृत्व केलं. हा माणूस आधी चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखाली गोरीला युद्धात सहभागी झालेला होता. उत्तर कोरीयावर रशियाचा प्रभाव होता.
किमची आई –
या किमने उत्तर कोरीयाच्या नव्या जडणघडणीमध्ये बराच सहभाग दिला. मात्र त्यानं आपल्या घराण्याचा राजवंश बनवला आणि आपल्या वारसांनाच देशाचा अध्यक्ष बनवण्याची पंरपरा चालू केली.
त्यामुळे उत्तर कोरीयाचे पुढचे सगळे प्रमुख हे त्या किम घराण्याचेच होते. पैकी या किमच्या नातवाला २०११ मध्ये उ. कोरीयाची सत्ता मिळाली. किम जोंग उनला. तेव्हा तो २७ वर्षांचा होता.
त्याची आई जपानी होती. आणि या त्याच्या आईचं आणि त्याच्या आजोबांचं म्हणजेच प्रथम किमचं पटत नसे. किमला आपली ही सून जपानी असल्यामुळे तिच्याबद्दल राग होता.
आपल्या आई आणि आजोबांमध्ये दुरावा असण्याचं कारण आपला काका ‘जांग सोंग थाएक’ आहे असं किमला वाटत होतं. त्यामुळेच की काय सत्ता हातात येताच आधी त्याने आपल्या काकाला संपवलं.
या काकावर देशद्रोहाचा आरोप लावला आणि अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली. त्याला जाहीरपणे मशीनगनच्या गोळ्या घालून संपवलं. नंतर अशीही वदंता होती की त्याने या काकाचा मृतदेह कुत्र्यांना खायला घातला.
यातलं खरं-खोटं कुणालाच ठाऊक नाही. परंतु किम जोंगचा स्वभाव बघता ते खरं असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मध्यंतरी बातमी होती, की किम खूप आजारी आहे. तो इतका आजारी आहे की कदाचित त्याच्या जगण्याचीही शक्यता नाही अशी ती बातमी होती. कदाचित तो मेलाही असेल, अशी चर्चा सुद्धा झाली.
द. कोरीयातील एक वृत्तपत्र ‘डेली एनके’ने त्याच्या हृदयाच्या ऑपरेशनचीही बातमी दिली होती. त्यानंतरच बहुधा त्याची तब्येत खालावत गेली असल्याची शक्यता आहे.
या बातमीची चर्चा सगळीकडे झाली, तेव्हा पत्रकारांनी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांनाही याबाबत विचारले असता, त्यांनी आपल्या कानावर हात ठेवले.
या बातमीबद्दल आपल्याला काही ठाऊक नसल्याचे सांगतानाच ते म्हणाले, की किम बरा व्हावा अशा मी शुभेच्छा देतो.
ट्रम्प खरंच बोलले
किम आहे की गेला हे अमेरिकन हेर खात्यालाही कळू नये इतका कडेकोट बंदोबस्त उ. कोरीयात केला गेला होता. खरंतर तेवढा बंदोबस्त नेहमीच असतो. त्यामुळे ट्रम्प जे बोलले होते ते खरंच बोलले होते यात शंका नाही.
२०११ मध्ये जेव्हा आताच्या किमच्या बाबांचा मृत्यू झाला तेव्हाही दोन दिवसांपर्यंत बाहेरच्या जगाला त्याचा पत्ता नव्हता. दोन दिवसानंतर जगाला कळलं, तेही स्वतः कोरियाने जाहीरपणे सांगितलं तेव्हाच!
सीआयएसाठी नॉर्थ कोरीया हे ‘हार्डेस्ट ऑफ द हार्ड’ आहे
उत्तर कोरीयातून कोणतीही बातमी काढणे फार अवघड आहे. कारण या देशाने आपल्या सीमा सीलबंद केल्या आहेत. तिथल्या सरकारजवळ हेरांचे जाळे आहे.
तिथल्या लोकांना बाहेर बातम्या पोचवणं किंवा बाहेरच्या देशांशी संपर्क साधणं फारच अवघड आहे. त्यातूनही काही करताना पकडले गेलो तर सरळ मारून टाकणार.
सर्वात महत्त्वाचा हेर म्हणजे स्वतः किम. त्याचं अंतर्गत जाळं लहान आणि मजबूत आहे. त्यातून बाहेर कोणतीच गोष्ट जाऊ शकत नाही. फक्त किमला जितक्या गोष्टी बाहेर सांगायच्या असतील तितक्याच जाऊ शकतात.
त्या व्यतिरिक्त एक शब्दही बाहेर जात नाही. असं असूनही किम, त्याचे कुटुंब आणि उत्तर कोरियासंदर्भात काही बातम्या बाहेर येतातच. त्या उत्तर कोरीयातून पळून आलेल्या लोकांकडूनच कळतात.
ते कधीही परत आपल्या देशांत जाणार नसतात.
किमचं कुटुंब
याच बातम्यांच्या आधारावर सांगता येतं, की किमला सख्खे दोन भाऊ आणि एक बहीण आहे. शिवाय सावत्र तीन भाऊ व बहीण. त्यापैकी सावत्र भाऊ किम जोंग नाम याला किमने मारून टाकल्याची वदंता आहे.
या किम जोंग नामला बाहेरील जग प्रिय होतं. त्याला संगीताची आवड होती. त्याचा सावत्र भाऊ किम आणि बाबा किम यांना त्याच्या या गोष्टी आवडत नसत.
२०१७ मध्ये मलेशियाच्या एअरपोर्टवर हा किम जोंग नाम मृतावस्थेत सापडला होता. त्याची नर्व-एजंट नावाच्या अतिविषारी रसायनाने मृत्यू झाला होता.
किम जोंग उन नंतर कोण?
आता किमला सख्खे आणि सावत्र मिळून चार बहिण भाऊ उरलेत. किमचे आपल्या सख्या बहिण-भावांशी चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. त्यापैकी भावाला राजकारणात रस नाही.
पण लहान बहीण यो जोंग ही मात्र अनेक प्रसंगात किमच्या सोबत दिसते. उत्तर कोरीयात किम नंतर सर्वात अधिक वर्चस्व आहे ते या यो जोंगचं. ती कधी सौम्य राजकारण करते तर कधी जगाला उत्तर कोरीयाच्या खास ढंगात धमकावत असते.
जाणकारांचं म्हणणं आहे, की जर किमचा मृत्यू झाला असता, तर यो जोंग सत्तेवर आली असती. निदान किमची तीन मुलं मोठी होईपर्यंत तरी!
किमचं बालपण
असं म्हणतात, की किमच्या बाबांना आपल्या सहा मुलांमध्ये फक्त किमच आपला वारसा सांभाळेल असे गुण त्याच्यात दिसत होते. त्यामुळे किमला लहानपणापासूनच सत्तेच्या दिशेने तयार करण्याकडे त्यांचा कल होता.
त्याला लहानपणीच सैन्यातील जनरलचा पोशाख घातला गेला होता. आणि सैन्याचे खरे जनरल त्याला सॅल्यूट करत होते. किमला लहानपणापासून महागड्या गाड्यांचा शौक होता.
–
हे ही वाचा – जोक-वर बंदी ते पॉर्न साठी मृत्यूदंड, उत्तर कोरियाचे १४ विचित्र कायदे!
–
सातव्या वर्षीच तो गाडी चालवायला शिकला. त्याला गाडी चालवता यावी म्हणून महागड्या गाड्यांची रचना बदलण्यात येत असे.
परदेशी शिक्षण
१९९४ ते १९९८ या काळात उत्तर कोरीयात भयंकर दुष्काळ पडला होता. असं म्हणतात की, या काळात कोरियात २० ते ३० लाख लोक मेले. पण किमला त्याची झळ बसली नव्हती.
कारण या काळात किम परदेशात, स्विट्झर्लॅंडला शिकायला होता. तिथे तो खोट्या नावाने राहत असे आणि त्याचे खोटे आईबाप त्याच्यासोबत राहात.
उत्तर कोरीयातील शासकांची ही रीतच होती. आपल्याबद्दल कोणाला माहिती होऊ न देण्याची. तिथे किमची लाईफस्टाईल बरीच आलीशान होती. त्याला अभ्यासात फार रस नव्हता.
इंग्रजी सिनेमे पाहायाला त्याला आवडायचं. फुटबॉल आणि बास्केट बॉल हे खेळही त्याला प्रिय होते. तो मायकेल जॉर्डनचा फॅन होता.
डिसेंबर २०११ मध्ये त्याला आपल्या वडिलांचा वारसदार म्हणून घोषित केलं गेलं.
तसं तर २०१० मध्ये त्याचे वडील जिवंत असतानाच त्याला त्यांचा वारसदार म्हणून जाहीर केलं गेलं होतं. डिसेंबर २०११ मध्ये सत्तेवरचे किम वारल्यावर २७ वर्षांचा किम जोंग उन उत्तर कोरीयाचा अधिकारी झाला.
किम, द रूलर
किमला आपल्या आजोबा आणि बाबांपेक्षा वेगळं बालपण लाभलं होतं. त्याने बाहेरचं जग पाहिलं होतं. तिथल्या रीती रिवाजांशी तो परीचित होता.
त्यामुळे खूप लोकांना वाटलं होतं की, त्याच्या काळात तरी उत्तर कोरीया थोडं ओपन होईल. काही बाबतीत हे झालंही. उदा. किम आपल्या बाबांच्या आणि आजोबांच्या तुलनेत लोकांसमोर अधिक प्रमाणात येतो.
सल्लामसल्लत करण्याकडे त्याचा थोडा कल असतो. म्हणूनच तो ट्रम्पच्या भेटीसाठी सिंगापूर आणि व्हिएतनामला गेला. तरी देखील किमचा उत्तर कोरीया अनेक बाबतीत अजून तसाच आहे, जसा तो त्याच्या आजोबा आणि बाबांच्या काळात होता.
उलट किमने आपल्या देशाला ब्लॅकमेलर बनवून ठेवलंय अण्वस्त्रांच्या साहाय्याने. आपल्या न्यूक्लियर शक्तीच्या जोरावर किम अख्ख्या जगाला धमकावत असतो.
किमला लावण्यात आलेली विशेषणे
पाश्चिमात्य पत्रकार त्याला कधी ‘मॅडमॅन’ म्हणतात. तर कधी त्याला ‘पिग बॉय’ म्हणतात. त्याचं तोंड डुकरासारखं दाखवणारे अनेक कार्टून्स काढून इतर देशांतले लोक आपला उत्तर कोरीयावरचा राग काढत असतात.
न्यू यॉर्कर मॅगझीनच्या जानेवारी २०१६ च्या अंकात त्याचा मुखपृष्ठावर फोटो छापला होता. त्यात एक गोलमटोल मुलगा न्युक्लियर खेळण्यांशी खेळत बसलाय असे चित्र रंगवण्यात आले होते.
किम हा एक विक्षिप्त स्वभावाचा माणूस आहे. तो तापट आहे. रागीट आहे. त्याला सगळं जग आपला शत्रू वाटतो अशा एखाद्या स्किझोफ्रेनिक रुग्णासारखा त्याचा स्वभाव आहे.
कुणी त्याच्यावर जराशीही टिका केली तरी त्या व्यक्तिला तो संपवून टाकतो. पण म्हणून जग त्याच्यावर टिका करायचं थोडंच थांबणार आहे? उत्तर कोरीयावर आर्थिक बहिष्कार टाकून त्याला नमवलं जाऊ शकतं का? बहुधा नाही.
कारण त्याच्याजवळ अण्वस्त्रं आहेत. त्याचा चुकीचा वापर झाला तर सगळ्या जगाला त्यात धोका आहे. त्यामुळे सध्या तरी त्याच्याशी संवाद साधत राहणं हाच एकमेव उपाय आहे.
हुकुमशहांची दादागिरी दोन गोष्टींवर चालते – सत्ता आणि सक्ती
सीआयएच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे २०११ ते २०१६ दरम्यान किमने जवळपास २४० लोकांना मृत्युदंड फर्मावला आहे. यात काही लोकांना तर विनाकारणच सजा देण्यात आलेली आहे.
उदा. कुणी त्याच्या कौतुकात हळू आवाजात टाळ्या वाजवल्या एवढ्या कारणानेही त्याने लोकांना मृत्युची सजा फर्मावली आहे. तर काहींना केवळ सभेत त्यांना डुलकी लागली या कारणाने मारून टाकलेले आहे.
युवल नोआ हरीरी नावाच्या एका प्रसिद्ध लेखकाने लिहिलंय की जर नागरिकांच्या मनातल्या गोष्टी कळण्याची व्यवस्था असती, तर उत्तर कोरीयात भुकंप आला असता.
कारण मनातल्या मनात कोणी किमला शिव्या देतंय, कोणी नाईलाजानं त्याच्या सन्मानात टाळ्या वाजवतंय हे सगळं किमला कळलं असतं. आणि त्याने याची प्रत्येकाला सजा दिली असती.
===
हे ही वाचा – ‘ह्या’ शस्त्रांच्या जोरावर उत्तर कोरिया कोणत्याही बलाढ्य देशाला देऊ शकतो आव्हान!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.