Site icon InMarathi

राजकारण्यांवरील टीका ते विमानातील हमरीतुमरी: अर्णब आणि वाद न तुटणारं समीकरण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘नेशन वांट्स टू नो!’ म्हणत आपल्या प्राईम टाईमची सुरवात करणारा अर्णब गोस्वामी कोणाला माहीत नाही?

आपल्या चढ्या आवाजात प्रश्न विचारण्याच्या स्टाईलमूळे काहींना अर्णब नाही पटत. त्यामुळे वाद प्रतिवाद हे होतच असतात.

मागील काही महिन्यांपासून हा कर्कश्य आवाज नकोसा वाटत असल्याचं अनेकांकडून सांगितलं जातंय.

मग ते सुशांत सिंग राजपुत आत्महत्या केस असो वा ब़ॉलिवुडमधील ड्रग्सचे जाळे… प्रकरण कोणतंही असलं तरी अर्णब गोस्वामी हे नावं मात्र कायम आहे.

कधी राजकारण्यांशी वाद, कधी बॉलिवुडकरांशी वैर तर आता माध्यमातील अंतर्गत युद्ध… अर्णबच्या वादांची यादी न संपणारी आहे, त्याचीच प्रचिती सध्या भारतीयांना येत आहे.

अर्थात वादांची ही प्रथा नवी नाही. त्यासाठी वादांच्या याा इतिहासाकडे नजर टाकूयात.

गो इंडिगो एयरलाईन्समधून प्रवास करताना कुणाल कामराने केलेल्या प्रश्नाकडे, नेहमी आक्रमक भूमिकेत असणाऱ्या अर्णबने दुर्लक्ष करत जवळपास सगळ्यांना धक्का दिला होता.

प्रवासात मर्यादा न राखल्यामुळे कुणाला कामरा वर इंडिगोने कारवाई केली होती. सोबत अजून काही एयरलाईन्सने सुद्धा. अर्णब पुनः एकदा नव्या कारणाने प्रकाश झोतात आला होता.

 

 

काही महिन्यांपुर्वी पालघरमध्ये दोन महंत आणि त्यांच्या वाहन चालकांची हत्या झाली. कोणत्याही न्यूज चॅनेलवर तो विषय जास्त चर्चेत आला नाही.

पण आपल्या प्राईम टाईममध्ये विषय चर्चेला आणत अर्णबने काँग्रेस पक्षाध्यक्ष यांना त्यात सामील केलं. आणि नव्या वादाला तोंड फुटलं.

काहींना ते पटलं काहींनी त्याला याबाबत अटक करावी म्हणून वक्तव्य केलं. हा शो टेलिकास्ट होऊन त्यामुळे निर्माण झालेलं वादळ शांत होत नाही तोपर्यंत त्याच्यावर हल्ला झाल्याची बातमी आली.

कोणी केला, का केला केला यामुळे अजून वेगळा वाद. थोडक्यात, अर्णब आणि वाद हे एक न तुटणारं समीकरण झालंय.

नवनवीन वादाला फोडणी देणारा हा अर्णब नेमका आहे तरी कोण?

अर्णब रंजन गोस्वामी! भारतीय पत्रकार आणि टेलिव्हिजन न्यूज अँकर अशी त्याची तोंड ओळख सगळ्यांनाच आहे.

 

 

त्याही पुढे गेलो तर, रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या वाहिन्यांचा को-फाऊंडर आणि कार्यकारी संचालक. २०१७ साली स्वतःचं हे स्वतंत्र चॅनेल त्याने चालू केलं.

यापूर्वी म्हणजे २००६ ते २०१६ अर्णब “टाइम्स नाऊ” या वृत्त वहिनीमध्ये न्यूज अँकर आणि डिबेट घेताना आपल्याला दिसलाच असेल. ‘फ्रँकली स्पिकिंग विथ अर्णब’ या प्रसिद्ध टीव्ही प्रोग्रामचे होस्ट म्हणून सुद्धा अर्णब गोस्वामी हे नाव प्रसिद्ध होतं.

अर्णबचा जन्म ७ मार्च १९७३ ला आसामची राजधानी गुवाहाटी येथे एका प्रतिष्ठित आसामी कुटुंबात झाला.

त्याचे आजोबा रंजनीकांत गोस्वामी हे तत्कालीन प्रसिद्ध वकील होते. तर त्याच्या आईचे वडील गौरीशंकर भट्टाचार्य हे आसाम विधानसभेत आमदार होते.

बरीच वर्षे आसाम विधानसभेत विरोधी पक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती. अर्णबचे वडील निवृत्त फौजी आहेत तर आई लेखिका. तर गुवाहाटी पुर्वेचे आमदार सिद्धार्थ भट्टाचार्य हे अर्णबचे मामा आहेत.

त्यामुळे, प्रसिद्धीचं वलय लहानपणापासूनचं अर्णबच्या भोवती आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता सेना जवानांचा मुलगा आहे म्हटल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण हे असलंच पाहिजे.

 

 

दहावी पर्यंतचं शिक्षण दिल्लीला, बारावी जबलपूरला आणि नंतर दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून समाजशास्त्रात त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून मानववंशशास्त्र विषयात मास्टर्सची पदवी.

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीशी संलग्नित असलेल्या सिडने ससेक्स कॉलेजमध्ये अर्णब डी सी पॅव्हेट फेलो म्हणून कार्यरत होता.

अर्णबने आपलं करियर कोलकातामध्ये “द टेलिग्राफ”मधून सुरू केलं. वर्षभरात टेलिग्राफ सोडून अर्णब एनडीटीव्हीमध्ये रुजू झाला.

एनडीटीव्हीमधून टेलिकास्ट होणारे न्यूजनाईट अर्णब होस्ट करायचा. त्याबद्दल २००४ साली त्याला एशियन टेलव्हिजन तर्फे दिल्या जाणाऱ्या बेस्ट न्यूज अँकर ऑफ एशिया या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

२००६ मध्ये एनडीटीव्ही सोडून अर्णब नव्याने सुरू झालेल्या टाइम्स नाऊ मध्ये ‘एडिटर इन चीफ’ म्हणून रुजू झाला. अर्णबने होस्ट केलेल्या ‘फ्रॅंकली स्पिकिंग विथ अर्णब’ या स्पेशल कार्यक्रमाची विशेष चर्चा केली गेली.

जगातल्या अनेक नामवंत व्यक्तींनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.

 

 

माजी पाकिस्तानी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ, पाकिस्तानी पंतप्रधान बेनझीर भुट्टो, ब्रिटीश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन, अफगाणी राष्ट्रपती हमीद करझाई, तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, तत्कालीन अमेरिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन आणि तेव्हा नव्याने देशाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी इत्यादी.

पत्रकारिता करताना दाबले जाणारे स्वातंत्र्य आणि न्यूजरूममधलं राजकारण या कारणामुळे अर्णबने टाइम्स नाऊ ला रामराम ठोकला.

‘यु आर रिपब्लिक, वि आर यॉर व्हॉइस’ या टॅग लाईनने अर्णबने आपलं स्वतःचं न्यूज चॅनेल चालू केलं आणि नामांतर केलं गेलं ‘रिपब्लिक टीव्ही!’

एआरजी आऊटलायर मीडिया आणि एशियानेट न्यूज या कंपन्यांच्या भागीदारी सोबत या चॅनेलची निर्मिती केली गेली.

अर्णब सोबत टाइम्स नाऊच्या एडिटोरियल ऍडव्हायजर चित्रा सुब्रमण्यम सुद्धा रिपब्लिक टीव्हीशी जोडल्या गेल्या. अर्णबची पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख आहे.

पुढे अनेक वाद झाले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अर्णब आणि त्याच्या रिपब्लिक टीव्ही चॅनेल वर दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला होता.

 

 

२०१४ साली झालेल्या थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्येशी थेट संबंध जोडल्याबद्दल थरूर यांनी हा दावा ठोकलेला. जस्टीस मनमोहन यांनी समन्स देऊन अर्णब आणि त्याच्या चॅनेलची यातून सुटका केली.

केरळ पुराच्या वेळी अरब राष्ट्रांकडून ७०० करोडची मदत जाहीर झाल्याची बातमी पसरवली गेली. त्यांना फैलावर घेऊन अर्णबने कमेंट केली ‘मोस्ट शेमलेस बंच ऑफ इंडियन्स आय हॅव एव्हर सिन!’

केरळ वासियांना टार्गेट करून अर्णब हे म्हणाला अशी पार्श्वभूमी ठेऊन यावर मोठा वाद निर्माण झाला.

नंतर काही न्यूज एजन्सी ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हे स्पष्ट झालं की, अर्णबने केलेलं वक्तव्य त्या फेक न्यूज पसरवणाऱ्या साठी होतं.

आपल्या बातम्या देताना रेफरन्सच्या बेसवर सरळ नावाचा उल्लेख करत बातम्या देण्याबद्दल तसेच ऑन एयर कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथोरिटी कडून कित्येकदा अर्णब आणि त्याच्या चॅनेलला समन्स बजावले गेले आहेत.

वाद विवाद या पलीकडे अर्णब हा उत्तम वक्ता आणि आजच्या घडीला सर्वाधिक रेटिंग असलेल्या चॅनेलचा तो प्रमुख आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

पत्रकारितेसाठी दिला जाणारा मानाचा ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलंस इन जर्नालिझम’ पुरस्कार अर्णब ने २००८ साली पटकावलेला.

एकूणच अर्णबचा प्रवास बघता अर्णब आणि वाद हे वेगळे विषय नाही हे स्पष्ट होतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version