रामायण मालिकेतील “लव-कुश” सध्या काय करतायत हे पाहून तुम्हालाही सुखद धक्का बसेल!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
साधारण १९८७ मध्ये दूरदर्शनवर रामायण ही मालिका सुरू झाली; जी वाल्मिकी रामायणावर आधारित होती. तेव्हा दर रविवारी सकाळी ९:३० वाजता ह्या मालिकेचे प्रसारण व्हायचे.
त्या काळी ती इतकी लोकप्रिय झाली होती की ह्या मालिकेचे जवळपास १० करोड प्रेक्षक होते. रविवारी सकाळी ९:३० च्या आत सगळी कामं आटोपून किंवा सगळी कामं बाजूला ठेवून लोकं ती मालिका बघायला जमायचे.
जेव्हा ही मालिका दूरदर्शनवरून प्रसारीत होत होती तेव्हा त्या वेळेपुरता रस्त्यावर शुकशुकाट होत असे. असं म्हटलं जातं की; तेव्हा रेल्वे, बसेस इत्यादी सर्व वाहने, दळण वळण थांबायचं, सगळ्यांना ही मालिका बघता यावी म्हणून!
इण्डिया टूडे ने ह्याला “रामायण फ़िवर” असे नाव दिले. त्या काळी भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासात ही मालिका सर्वाधिक बघितली जाणारी म्हणून नोंद आहे.
इतकेच नाही तर लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे ह्या मालिकेची “सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक धारावाहिक” अशी नोंद झाली होती.
ह्या मालिकेतील सर्व पात्रांनी समरसून काम केले होते; इतके समरसून की लोकांना ती पात्रे खरोखरच राम, लक्ष्मण, सीता आहेत असं वाटतं असे.
ते कोणी वेगळे कलाकार आहेत हेच त्यांना पटत नव्हते.
लॉकडाऊनच्या काळात रामानंद सागर यांच्या नव्वदच्या दशकातील रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणाने पुन्हा तितकीच लोकप्रियता मिळवली आहे. दिवसांतून दोन वेळा प्रसारीत होणाऱ्या या मालिकेचे चाहते भरपूर आहेत.
आताही ही मालिका लोकांना तितकीच आवडते आहे.
रामानंद सागर यांनी रामायण ही मालिका संपल्यावर ‘उत्तर-रामायण’ ही मालिका सुरू केली होती. आणि ती मालिका देखील तितकीच लोकप्रिय झाली होती.
रावणाच्या वधानंतर मुख्य रामायण संपते. परंतु त्यानंतर सीतेची आख्यायिका आणि लव-कुश यांचा जन्म, त्यांचं रामाला भेटणं, रामाला रामकथा ऐकवणं हे सगळ उत्तर-रामायणात येत असतं.
आताही रामायण संपल्यानंतर त्यानंतर लगेच ‘उत्तर-रामायण’ सुरू करण्याचा मानस दुरदर्शनने दाखवला. आणि ते सुरूही झालं.
उत्तर रामायणात रामाची भेट आपल्या मुलांशी होते. त्याला ही आपलीच मुलं आहेत हे ठाऊक नसतं. सीतेला अग्नीपरीक्षेनंतरही एका धोब्याच्या टिप्पणीवरून वनवासात पाठवलं जातं.
वनवासात जाताना ती गरोदर असते. आणि वनवासात ऋषींच्या आश्रमात बाळंतपण होऊन तिला लव-कुश ही जुळी मुलं होतात. ती त्यांना गीतांतून रामकथा शिकवते.
आणि जरा मोठे झाल्यावर म्हणजे साधारण ८-९ वर्षांचे झाल्यावर ही दोन्ही मुलं अयोध्येत येऊन रामालाच त्याची कथा ऐकवतात. आणि नंतर त्याला कळते की ही आपलीच मुलं आहेत.
पिता-पुत्रांची ही भेट म्हणजेच उत्तर-रामायण होय.
या उत्तर रामायणातील लव-कुश या दोन भुमिका कोणी साकार केल्या होत्या?
या उत्तर रामायणात कुशाची भूमिका कुणी सादर केली होती हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मराठी चित्रपट आणि मालिकेतला आजचा आघाडीचा हिरो, कलाकार स्वप्नील जोशी याने या मालिकेतील कुशाची भूमिका साकार केली होती. तर मयुरेश क्षेत्रमाडे याने लवाची भूमिका साकार केली होती.
हे दोघे बालकलाकार तेव्हा अतिशय गोड आणि निरागस दिसत होते. आपल्या या निरागस हावभावांनी त्यांनी भारतातीलच नव्हे, तर परदेशांतील प्रेक्षकांचीही मने जिंकून घेतली होती.
आता दूरदर्शनवरून उत्तर रामायणही नव्याने पुन्हा सादर केले जाणार आहे ही बातमी कळल्यावर या दोघांनाही आनंद झालेला आहे. दोघांनीही ट्विटरवरून ट्विट करून हा आनंद व्यक्त केला आहे.
ट्विटमध्ये स्वप्निल लिहितो, की कुशाची भूमिका ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली भूमिका. रामायणच्या यशस्वी पुनःप्रसारणानंतर आता उत्तर-रामायण’ही पुनःप्रसारीत होत आहे. याचा आनंद आहे. जय श्रीराम.
ही भूमिका साकार केली तेव्हा स्वप्निल अवघ्या नऊ वर्षांचा होता. त्याची ही पहिलीच भूमिका होती जी टिव्हीवरून सादर होणार होती. त्यानंतर स्वप्निलने पुढे जाऊन अनेक टिव्ही मालिका केल्या.
कृष्णावरच्या मालिकेत त्याने साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेने त्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर स्वप्निलने मागे वळून पाहिले नाही.
अनेक भूमिका त्याने साकार केल्या. यात टिव्ही मालिका आहेत तसेच अनेक चित्रपटही आहेत. स्वप्निल हा आजचा मराठी अभिनय क्षेत्रातील एक आघाडीचा सुपरस्टार आहे.
याचवेळी या मालिकेत लवची भूमिका साकार करणाऱ्या मयुरेश क्षेत्रमाडेनेही ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्याने या ट्विटमध्ये स्वप्निलला देखील टॅग केले आहे.
तो आपल्या या ट्विटमध्ये म्हणतो, की आता दूरदर्शनवरील रामायण मालिका संपेल आणि त्यानंतर उत्तर रामायण दाखवले जाईल. यात मी लवाची भूमिका केली होती.
आज सगळ्या जुन्या आठवणी नव्याने ताज्या झाल्या आहेत.
अशाप्रकारे दोन्ही कलाकार आज खुश आहेत. ज्या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला होता, ती मालिका आज नव्याने प्रसारीत होत आहे आणि त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.