आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना संकट सुरू झाल्यापासून कोणत्याही देशातून विमानांचे उड्डाण होत नाहीये, पण अशा भीषण परिस्थितीत भारताने मालदिव्जला मदतीचा हात पुढे केलाय. कसा? वाचूया…
ऑपरेशन संजीवनीः
भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन संजीवनी’ या उपक्रमातून ६.२ टनाइतकी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय सामान आपल्या C-130 या मालवाहू विमानातून अठरा तासात मालदिव्जला पोहोचवले आहे.
कोरोना संसर्गाच्या या काळात आपल्या देशांतही पंतप्रधानांच्या आदेशानुसार आवश्यक असलेला लॉकडाऊन काळ चालू असल्याने मालदिव्जला ही अत्यावश्यक औषधे नेहमीच्या इतर वाहतुकीने पोचवणे शक्य नव्हते.
त्यामुळे भारतीय हवाई दलाला हे काम सोपवण्यात आले होते.
मालदिवच्या सरकारने भारतीय सरकारकडे कोरोनाशी लढण्यासाठी लागणारी औषधे आणि इतर वैद्यकीय साधनांची मागणी केली होती. हे काम भारत सरकारने भारतीय वायू सेनेकडे सोपवले.
त्यांनी हे ‘ऑपरेशन संजीवनी’ या कोडनेम अंतर्गत पार पाडले. त्यासाठी त्यांनी आधी भारतीय सैन्याच्या मदतीने दिल्ली, मुंबई चेन्नाई आणि मदुराई येथून औषधे गोळा केली.
आणि नंतर C-130 या नौदलातील मालवाहू विमानातून मालदिव्जला पोचवली. हे सगळं काम केवळ १८ तासांत पार पाडलं गेलं.
भारताची नीती ही नेहमीच आपल्या शेजारील राष्ट्रांना मदत करण्याची राहिलेली आहे. भारताशेजारी अनेक छोटी छोटी राष्ट्रे आहेत. त्यातील बरीच राष्ट्रे ही भारतातून आयात होणाऱ्या वस्तुंवरच अनेकदा अवलंबून असतात.
विशेषतः आणीबाणीच्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात या छोट्या राष्ट्रांना प्रामुख्याने भारत हाच एकमेव मदतकर्ता देश असतो. भारताबद्दल या छोट्या राष्ट्रांना विश्वास असतो.
कारण भारताने कधीच त्यांचा गैरफायदा घेतलेला नाही. किंवा त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना हडपण्याचा प्रयत्न केलेला नाही.
भारतासारख्या महाकाय देशाच्या शेजारी राहूनही ही छोटी छोटी राष्ट्रे आपले स्वतंत्र अस्तित्व सुखेनैव जपून राहू शकतात.
त्यांच्या अंतर्गत व्यवस्थेत भारत कधीही ढवळाढवळ करत नाही. भूतान, ब्रम्हदेश, मालदिव्ज सारखी राष्ट्रे हे त्याचे उदाहरण आहेत.
ऑपरेशन संजीवनी अंतर्गत मालदिव्जला काय काय सामान पाठवलं गेलं?
कोविद-१९ या संसर्गात इतर देशांत इन्फ्ल्युएन्झाची लस आणि ऍन्टी-व्हायरल औषधे Lopinavir and Ritonavir ) पोहोचवण्यात आली.
वैद्यकीय उपचारांत लागणारे कॅथेटर्स, नेब्युलायझर्स, युरीन बॅग्स, लहान बाळांना भरवायला लागणाऱ्या ट्युब्स, किडनी एलिमेन्ट्स, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, ऍलर्जी, कॅन्सर आदि विविध आजारात लागणारी औषधे आणि साधने पोचवण्यात आली.
कोविद-१९च्या या काळात भारताने मालदिव्जला या आधी देखील मदत केलेली आहे.
भारत सरकारने या आधी देखील मालदिव्जला मदत केलेली आहे. चीनमधील वुहान आदि ठिकाणी अडकलेल्या ९ मालदिव्ज नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना पुन्हा मालदिव्जला आणून देण्याचे काम भारताने केले.
त्याचप्रमाणे या आधी देखील जवळपास ५.५ टन औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे आपण मालदिव्जला पाठवलेली आहेत.
याशिवाय महत्त्वाचे म्हणजे एक १४ लोकांची रॅपिड टीम देखील आपण मालदिव्जला पाठवली होती. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता.
मालदिव्जमधील आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय वायूसेनेची मदत
भारताने मालदिव्जला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारतीय वायूसेनेने मालदिव्जमध्ये जेव्हा कधी आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा मालदिव्जला तातडीने मदत पोचवलेली आहे.
१९९८ मध्ये मालदिव्जमध्ये जेव्हा नागरिकांचा उठाव झाला होता, तेव्हा भारतीय वायूसेनेने मालदिव्ज सरकारची मदत केली होती. २००४ मध्ये त्सुनामी आली तेव्हा मालदिव्जला त्या त्सुनामीचा बराच फटका बसला होता.
तेव्हा देखील मदतीचे सामान घेऊन भारतीय वायूसेना तिथे तातडीने पोचली होती. २०१४ मध्ये ऑपरेशन नीर’ अंतर्गत मालदिव्जला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा भारतीय वायूसेनेच्या मदतीनेच केला गेला होता.
आणि आता २०२० मध्ये देखील कोविद-१९ च्या या महामारीच्या काळात आपल्या या शेजारील राष्ट्राला भारत मदत करत आहे. अर्थात ही मदत भारताचे शेजारील राष्ट्रांना प्रथम मदतीचे जे धोरण आहे त्या धोरणानुसारच केली जाते.
आणि सध्याच्या कोविद-१९ च्या काळात शेजारच्या राष्ट्राला मदत पोचवण्यात मालदिव्ज हे पहिले उदाहरण आहे.
भारताच्या शेजारची अनेक छोटी छोटी राष्ट्रे ही बऱ्याच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून असतात. तिथे लागणारी बरीच जीवनावश्यक सामग्री ते लोक भारतातूनच आयात करत असतात.
मालदिव्जप्रमाणे भूतान हे राष्ट्र देखील असेच भारताच्या मदतीवर अवलंबून असते.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात भारताने अंतर्गत आणि देशाबाहेरील वाहतूकव्यवस्था पूर्णपण बंद ठेवलेली असूनही भारताने आपल्या वायूसेनेच्या मदतीने मालदिव्जला ही मदत तातडीने पोचवली.
याबद्दल मालदिव्ज सरकारने भारताचे पंतप्रधान श्री. मोदी आणि परराष्ट्रमंत्री श्री. जयशंकर यांचे कौतुक करून मनापासून आभार मानले आहेत.
अर्थात सुदैवाने मालदिव्जमध्ये कोविद-१९ चा प्रादुर्भाव अजून इतका गंभीर नाही. तिथे सापडलेल्या १८ कोरोना रुग्णांपैकी १३ बरे झालेले असून दोन बाहेरच्या देशातून आलेले आहेत. तेथे आता फक्त तीन कोरोनारुग्णांची नोंद आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.