आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना संक्रमणाने जगभरातल्या मानवाची परीक्षा घेतली आहे. प्रगत इतिहासाची देखील. या परीक्षेत कोण पास होतंय आणि कोण नापास याकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असताना काही देशांतील नेत्यांची खूप कौतुकंही होत आहेत.
ती त्यांनी तातडीने उचललेल्या पावलांसाठी. त्या नेत्यांमध्ये सात महिला आहेत. त्यांची सध्या खूप प्रशंसा होत आहे.
कोण आहेत या महिला नेत्या? आणि त्यांनी असं काय केलंय ज्यामुळे त्यांची प्रशंसा होत आहे?
चला तर बघू या.
देश – जर्मनी
लीडर –चांन्सेलर एंजेला मर्केल
फोर्ब्सच्या यादीनुसार इतर मोठ्या देशांच्या तुलनेत जर्मनीने एप्रिलमहिन्यापर्यंत सर्वाधिक लोकांची कोरोनो टेस्ट केलेली आहे. या देशातील कोरोनामुळे होणारा मृत्युदर देखील खूप कमी आहे.
याचं कारण की कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळातच जर्मनीने कडक पावलं उचलली होती.
बाकीच्या देशातले लोक जेव्हा कोरोनासंबंधी अशास्त्रीय गोष्टी करत होते, तेव्हा या देशाच्या चान्सेलर मर्केल यांनी लोकांपुढे येऊन या संसर्गाची शास्त्रीय दृष्ट्या माहिती दिली होती.
मर्केलनी तेव्हाच लोकांना सावध केले होते, की जर्मनीच्या ६० ते ७० टक्के नागरिकांना हा विषाणू संसर्ग करू शकतो, तेव्हा लोकांना वाटत होते की ही उगाच लोकांना घाबरवत आहे.
परंतु मर्केल यांनी जे आकडे दिले ते शास्त्रज्ञांनी केलेल्या पूर्वानुमानानुसार होते. पुढच्याच आठवड्यात जर्मनीमधील लॉकडाऊन उठवण्यात येण्याची शक्यता आहे.
तिथल्या परिस्थितीत बरीच सुधारणा झालेली आहे. या प्रगतीचे श्रेय तिथल्या महिला लीडर मर्केल, तिथले प्रशासकीय अधिकारी, त्यांची तयारी आणि सुयोग्य इन्फ्रास्ट्रक्चर यांना जाते.
देश – तैवान
लीडर – त्साई इंग-वेन
कोरोना संसर्गाच्या या काळात तैवान तर सगळ्यात आदर्श उदाहरण ठरेल. कोरोनाप्रमाणेच सन २००३-२००४ मध्ये चीनमधूनच पसरलेल्या सार्स नावाच्या संसर्गाला तैवान बळी पडलं होतं.
त्यातूनच तैवान शहाणं झालेलं राष्ट्र आहे. कोरोनाच्या सुरुवातीलाच त्यांनी सावध राहून पावलं उचलली होती. डिसेंबर २०१९ मध्येच ते सावध झाले होते.
तेव्हा कोरोनाचं अजून नामकरणही झालेलं नव्हतं, फक्त वुहानमध्ये न्युमोनियासदृश्य काही रहस्यमय संसर्ग पसरतोय इतकंच कळलं आणि तैवान सावध झालं.
त्यांनी चीनहून येणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी सुरू केली. चीनच्याही आधी तैवानने WHOला या आजाराची माहिती कळवली होती. परंतु त्यांनी तैवानचे सांगणे मनावर घेतले नाही.
सुरुवातीलाच अशारीतीने सावध राहिल्यामुळे तैवानला लॉकडाऊन करण्याची गरजच पडली नाही. चीनच्या राजकारणामुळे अजून डब्ल्यू. एच. ओ. ने तैवानला सदस्यत्वही दिलेलं नाही.
त्यामुळे तैवानला WHOकडून काही मदतही मिळाली नाही. तरी देखील तैवान इतर मोठ्या देशांपेक्षाही चांगल्या स्थितीत आहे. इतकंच नव्हे तर तो दुसऱ्या देशांनाही मदत करत आहे.
अमेरिका, युरोप सारख्या देशांना तैवान मास्कचा पुरवठा करत आहे. तैवानमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या फक्त ६ आहे. कोरोनाशी यशस्वी सामना करण्यात तैवान हा देश आघाडीवर आहे असं म्हणतात.
देश – न्यूजीलॅंड
लीडर – जसिंडा ऍडर्न
२३ मार्चला जेव्हा न्यूजीलॅंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १०२ वर पोचली तेव्हा जेसिंडाच्या नेतृत्वाखालील सरकारने नक्की केलं, की कठोर पावलं उचलण्यासाठी परिस्थिती अजून चिघळण्याची वाट पाहण्याची काय गरज आहे?
तिने तेव्हाच २८ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली. लोकांना त्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला.
या लहानश्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटन विभागावरच अवलंबून आहे. तरी देखील या देशाने आपल्या सीमा बंद करण्यास मागेपुढे पाहिले नाही. देशात पूर्ण सावधानता बाळगली जाईल याकडे लक्ष दिले.
बाहेरून परतलेल्या आपल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटीन ठेवले. परदेशी पर्यटकांना पूर्ण मनाई केली. आता न्यूझीलंडमध्य कोरोना पूर्णपणे संपण्याकडे वाटचाल चालू आहे.
जेसिंडा ऍडर्न यासाठी नवीन नवीन उपाय योजनाच राबवत नाही तर, लॉकडाऊन काळात सोशल मिडियावरून आपल्या नागरिकांशी संपर्कही साधून आहे.
त्यांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं देत आहे. त्यामुळे लोक आश्वस्त आहेत.
देश – नॉर्वे
लीडर – एर्ना सोलबर्ग
एर्ना सोलबर्ग यांनी टिवीवरून आपल्या देशातल्या लहान मुलांशी संवाद साधला. या काळात घरात राहणं कसं अनिवार्य आहे ते त्यांना समजावून सांगितलं.
मुलांनी विचारलेल्या शंकाना, प्रश्नांना उत्तरं दिली. मुलं त्यांना विचारत होती, मी माझा वाढदिवस साजरा करू शकत नाही का? मी माझ्या मैत्रिणीकडे का जाऊ शकत नाही? यावर त्यांनी संयमपुर्वक योग्य उत्तरं दिली.
देशात आणीबाणीच्या कायद्याची मदत घेऊन सार्वजनिक आणि खाजगी सेवासंस्था बंद करून टाकल्या. पुढ्च्या आठवड्यात तिथला लॉकडाऊन देखील संपण्याच्या मार्गावर आहे.
देश – फिनलंड
लीडर – सना मरीन
सना मरीन ही जगातील वयाने सर्वात लहान राष्ट्राध्यक्ष आहे. तिने कोरोनाच्या संदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी देशातील प्रसिद्ध, लोकप्रिय, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची आणि सोशल मिडियाची मदत घेतली.
देशातील प्रत्येक नागरीक वर्तमानपत्र वाचतोच असं नाही म्हणून त्यांनी सोशल माध्यमांची मदत घेतली. शिवाय सोशल मिडियावरून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीलाही लगेच माहिती फॉरवर्ड करू शकते.
अशाने अधिकाधिक लोकांपर्यंत ही जागरुकता पोहचवता येईल. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या सांगण्यानुसार आजुबाजूच्या अनेक देशांपेक्षा फिनलंडची परिस्थिती आणि त्यांची तयारी खूप चांगली आहे.
देश – आईसलॅंड
लीडर – कात्रिन जेकब्सदोत्तिर
आईसलॅंडने आपल्या देशाच्या सर्व नागरिकांना फुकट कोरोनाव्हायरस चाचणी उपलब्ध करून दिली आहे. ही चाचणी कोरोनाची लक्षणे नसलेल्या लोकांसाठीही आहे.
कारण फक्त लक्षणं दिसणाऱ्या लोकांची चाचणीच करणं महत्त्वाचं नाही. अनेक लोक कोरोनाचे वाहक असतात मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत.
साउथ कोरिया आणि सिंगापूरप्रमाणे आईसलॅंड देखील आपल्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याच्या मागे लागलेलं आहे. शिवाय टेक्नोलॉजीचा वापरही तिथे चांगल्या प्रकारे केला जातोय.
ट्रॅकींग सिस्टमद्वारे रुग्णांची, त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांची छाननी करून त्यांना आयसोलेट करण्यात येतंय.
देश – डेनमार्क
लीडर – मेटे फ्रेडरिक्सन
इथल्या सरकारने मार्चच्या मध्यावरच लॉकडाऊन जाहीर केलं होतं. सतत प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन लोकांना सतर्क करत राहिले होते. फ्रेडरिक्सन आणि त्यांची टिम सतत लोकांच्या संपर्कात आहे.
योग्यवेळी उचललेल्या योग्य पावलांमुळे तिथली परिस्थिती आटोक्यात आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. हे पाहून हळू हळू तिथला लॉकडाऊनही उठण्याच्या प्रतीक्षेत आहे.
सरकारने तिथल्या लोकांना आणि कंपन्यांना आर्थिक मदत द्यायलाही सुरूवात केली आहे.
शेवटी –
हार्वर्ड बिजनेस रिव्यूच्या अनुसार, एका रिसर्चमध्ये असे अधोरेखित झालेले आहे, की जगातल्या अनेक देशांत पुरुष नेते असण्याचे कारण पुरुषांची बुद्धिमत्ता नसून त्यांची सत्ता, सत्तेत येण्याची शक्ती कारणीभूत आहे.
रिसर्च किती खरा किती खोटा ते माहीत नाही. परंतु आपल्याला एवढं तर नक्की माहीत आहे की राजकारण हे पुरुषांसाठी महिलांपेक्षा सोपं क्षेत्र आहे. या क्षेत्रात टिकून राहणं, स्वतःला सिद्ध करून दाखवणं हे स्त्रियांसाठी फारच कठीण आहे.
अशा वेळी या सात राष्ट्रांतील महिला प्रमुखांनी कोरोनाच्या या आणीबाणीच्या काळात खंबीरपणे योग्य पावले उचलून आपल्या देशाला संकटातून वाचवले आहे.
स्त्रिया हे अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकतात हे सिद्ध केले आहे. आणि त्याचवेळी जगभरातल्या लहान मुलींसाठी या स्त्रिया आदर्शही ठरल्या आहेत. स्त्रिया देशच नाही, तर जगही चालवू शकतात हे दाखवून देऊन.
===
मूळ रिपोर्ट स्त्रोत : Lallantop.com
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.