झुम ॲपच्या असुरक्षिततेनंतर या ५ चीनी ॲप्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय; तुम्ही वापरताय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना व्हायरस आला आणि संपूर्ण जगातच लॉक डाऊन सुरू झालं. भारतात ३ मे पर्यंत लॉकडाउन आहे असं सांगण्यात आलं आहे.
आता हे लॉकडाऊन किती दिवस चालेल आणि लॉक डाऊन मध्ये थोडीशी शिथिलता आली तरी ती कितपत असेल हे माहीत नसल्यामुळे सगळ्यांच्याच चिंता वाढल्या.
मोठ-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजना घरातून काम करण्याची सवलत दिली.
ऑफिसला जाता येत नसेल तर काम कसं करायचं असा प्रश्न अनेक कंपन्यासमोर, शाळा कॉलेजसमोर पडला आणि सर्वांच्या मदतीला धावून आलं ते झूम ॲप.
ज्याद्वारे एकाच वेळेस शंभर लोक देखील एकत्र मिटिंग करायला लागले. ऑनलाइन शिकवता यायला लागलं. सगळ्याच कंपन्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त असल्यामुळे भारतात सुद्धा २५ मार्चपासून झूम ॲप प्रचंड प्रमाणात डाऊनलोड करण्यात आलं.
परंतु अगदी अलीकडेच १०, एप्रिलला भारतीय गृहमंत्रालयाकडून झूम ॲप वापरण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली.
मुळातच सरकारने झूम ॲप सुरक्षित नसून त्याद्वारे डेटा चोरीला जाऊ शकतो त्यासाठी याचा वापर लोकांनी करू नये असं सांगितलं आणि जर करणार असाल तर काही गोष्टींचं पालन करून काळजी घेऊन ते ॲप वापरावं हे सांगितलं.
झूम ॲपला विरोध फक्त भारतातच नाही तर अमेरिका, सिंगापूर, जर्मनी अशा अनेक देशांमधून देखील झालेला आहे.
याचं कारण म्हणजे झूम ॲप वरील डेटा त्याच्या चीनमधील कार्यालयाकडे डायव्हर्ट होतो, असं लक्षात आले आहे. ज्या माणसाने हे अॅप काढलं तो एक चायनीज असून एरिक युआंग असं त्याचं नाव आहे.
झूम ॲपचे हेड क्वार्टर अमेरिकेत असून त्याच्या तीन शाखा चीनमध्ये आहेत.
चीन मधल्या शाखांमध्ये सगळा डेटा डायव्हर्ट होतो असा आरोप झूम वापरणाऱ्या लोकांनी केला आहे आणि ही गोष्ट कंपनीने देखील कबूल केली असून यावर योग्य ती काळजी घेण्यात येईल असं सांगितलं आहे.
भारतात अजुनपर्यंत डेटा प्रायव्हसी बिल अजून लोकसभेत मंजूर झालेलं नाही त्यामुळेच भारताने झूम ॲपवर बंदी घातली नाही. पण कोणत्याही सरकारी मिटींग्स झूम ॲप द्वारे केल्या जाणार नाहीत हे स्पष्ट केलं आहे.
तसंच लोकांनी देखील झूम ॲपचा वापर करू नये आणि केल्यास काळजी घ्यावी हे सांगितलं आहे.
झूम ॲप बरोबरच आणखीन काही ॲप्स हे सरकारच्या रडारवर आता आलेले आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर सध्या वाढलेला आहे.
परंतु डेटा प्रायव्हसी नसल्यामुळे बिल पास झालेलं नसल्यामुळे भारतातला डेटा हा चायनीज कंपन्यांकडे जाऊ शकतोय ही भीती सरकारला आता वाटत आहे.
म्हणूनच आता काही ॲप्सवर सरकारची नजर आहे. चीन बद्दल एकूणच विश्वासार्हता आता कमी होत आहे. जगभरातच चीनच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने पाहिले जाते.
त्याला भारत देखील अपवाद नाही कारण भारतात वापरले जाणारे शंभर ॲप्स पैकी ४४ ॲप्स हे चायनीज आहेत. म्हणूनच असे ५ चायनीज ॲप्स सरकारच्या रडारवर आहेत.
टिक टॉक
भारतात सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेला टिक टॉक हे ॲप आहे. शॉर्ट व्हिडिओज बनवण्यासाठी याचा वापर होतो. बारा-पंधरा सेकंदांपासून दोन मिनिटं पर्यंत यामध्ये व्हिडिओ तयार करता येतात.
म्हणूनच युवा वर्गात या ॲपची चलती आहे. लोक आपली कला दाखवण्यासाठी अनेक स्टंट करताना दिसतात, आणि असे व्हिडिओज टिक टॉकवर अपलोड केले जातात.
२०१९ मध्ये या ॲप वर बंदी घालावी का? याविषयी बरीच चर्चा झाली, कारण लोक त्याचा चुकीचा वापर करीत आहेत,असा आरोप त्यावर झाला.
टिक टॉक ॲप हा चीनच्या बाईट डान्स या कंपनीचा ॲप असून या कंपनीचे अनेक सोशल नेटवर्किंग ॲप्स आहेत.
हॅलो
हॅलो हा ॲप देखील बाईट डान्स या कंपनीचा असून भारतात चौदा भाषांमध्ये उपलब्ध आहे.
जून २०१८ मध्ये हे बाजारात आलं. त्या ॲप द्वारे बातम्या, कोट्स, जोक्स, मिम्स, ट्रेंड्स सोशल नेटवर्किंग वर शेअर केले जातात. भारतात याचे चार कोटींपेक्षा जास्त युजर आहेत.
Likee
हे देखील एक शॉर्ट व्हिडीओ बनवण्याचं ॲप आहे. पण यात एडिटिंग टूल्स सहित काही इफेक्ट देण्यात आले असून व्हिडिओ शेअर करायच्या आधी यांचा वापर केला जातो.
सध्या या अॅपचे भारतात आठ कोटी पेक्षा जास्त युजर आहेत. लहान मुलांकडून देखील याचा वापर जेव्हा व्हायला लागला तेव्हा त्यामध्ये पॅरेंटिंग कंट्रोल सेटिंग देण्यात आले आहे.
UC News
UCWEB Inc चा UC न्यूज हा भाग असून चीन मधल्या प्रसिद्ध अलीबाबा या कंपनीचे हे प्रॉडक्ट आहे. हे ॲप स्वतंत्रपणे वापरता येते किंवा UC ब्राउजर बरोबर देखील क्लब करता येते.
यामध्ये बातम्या, राजकारण, खेळ, सिनेमे ,टेक्नॉलॉजी, लाईफस्टाईल यासंबंधीच्या बातम्या असतात. परंतु या ॲपच्या वापरामुळे देखील डेटा चोरीची शक्यता वर्तवली जाते.
भारतात येत हिंदी इंग्रजी व्यतिरिक्त पंधरा भाषांमध्ये हे ॲप वापरलं जातं.
ब्युटी प्लस
हे एक सेल्फी काढण्याचे ॲप असून त्यात सेल्फी कॅमेरा बरोबर फोटो एडिटिंग ही फॅसिलिटी देखील आहे. ज्यानुसार चेहऱ्यामध्ये बदल दाखवता येऊ शकतो.
यात काही मजेशीर इमोजी देखील आहेत. संपूर्ण जगभरात याचे ३० कोटींपेक्षा जास्त युजर आहेत.
याशिवाय देखील व्हायरस क्लीनर, ३६० सिक्युरिटी , DU बॅटरी सेव्हर, Mi स्टोअर असे अनेक चायनीज ॲप भारतामध्ये लोकप्रिय आहेत.
भारतातल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच भारतातला डेटा सहजच चीनला मिळू शकेल अशी भीती भारत सरकारला वाटते. म्हणूनच हे ॲप्स वापरताना काळजी घेतली पाहिजे असं भारत सरकारचे म्हणणं आहे.
बऱ्याच देशांनी देखील याबाबत आता पावले उचलायला सुरुवात केली आहे त्यांचं म्हणणं देखील हेच आहे की ॲप मध्ये येणारा डेटा हा त्या देशांमधल्या सर्व्हर मध्येच सेव्ह केला जावा, बाहेरच्या देशात तो जाऊ नये.
याचा अर्थ असाही होऊ शकतो की प्रत्येक देशातील सरकार आपल्या नागरिकांच्या माहितीवर नजर ठेवू शकेल म्हणजे सरकारी यंत्रणेकडे नागरिकांचा डेटा जाईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.