आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
फळं-भाज्या या शरीराला आवश्यक असतात. भाज्यांमधून जीवनसत्वे, फायबर, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम मिळत असतं. परंतु अनेक लोक भाज्या खायचा कंटाळा करतात.
विशेषतः लहान मुलं तर बहुतेक भाज्यांना नाक मुरडतात. खायला नकार देतात.
मात्र भाज्या शरीराला अत्यावश्यक असल्याने दिवसांतून सकाळ-संध्याकाळ मिळून निदान चार कप भाजी पोटात जाणे गरजेचे असते. यात फळ भाज्या आणि पालेभाज्या या दोन्हींचा समावेश आहे.
सध्या लॉकडाऊनच्या आणि कोरोना प्रादुर्भावाच्या काळात तर हेल्दी फूड खाणं अधिक गरजेचं आहे. त्यात कुटुंबातील माणसे दिवसभर घरातच असल्याने सगळ्यांना सतत काही तरी खायला लागतंय.
अशावेळी त्यांना काय खायला द्यायचं हा प्रश्नही सुटेल आणि सगळ्यांच्या पोटात भाज्याही जातील अशा रीतीने काही बनवलं तर दोन्ही उद्देश एकसाथ साध्य होतील.
यासाठी पुढील काही टिप्स तुम्ही उपयोगात आणू शकता
भाज्यांचा उपयोग कुठे कुठे आणि कसा करू शकाल?
१. विविध भाज्यांचे सूप बनवणे –
अनेक भाज्यांचे स्वतंत्रपणे किंवा अनेक भाज्यांचे एकत्रित रित्या खूप छान सूप होऊ शकते.
उदा. गाजर, कोबी, मटार, टॉमेटो, बीट, एवढेच नव्हे, तर लाल भोपळा, दूधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची पाने, फरसबी, कोथिंबीर इत्यादी अनेक भाज्यांचे सूप खूप छान होते.
यातील काही भाज्या एकत्रित उकडून त्यात जिरे, मिरे पावडर आणि मीठ, थोडेसे तूप किंवा बटर टाकून गरम गरम सूप लहान मुलंही आवडीने पितील असे टेस्टी बनते.
याच सूप मध्ये सजावटीसाठी म्हणून पुदिन्याची पाने, तुळशीची पाने, लिंबाची फोड इत्यादीही लावू शकतो. तेही पोटात जाईल. ही विविध सूप्स दिसतातही छान, रंगीत.
ती घरातील लहान-थोर सगळ्यांना नक्की आवडतील. मुख्य जेवण्याच्या आधी, जेवणासोबत किंवा संध्याकाळच्या भुकेलाही ही सूप्स बनवता येतील.
२. नुडल्स विथ भाज्या –
सध्याच्या काळात मॅगी, हक्का नुडल्स इत्यादी शेवयांचे प्रकार घरातील लहान-थोरांपासून सगळ्यांच्याच आवडीच्या बनलेल्या आहेत.
अशावेळी या नुडल्स नुसत्याच प्लेन न करता या मॅगीत किंवा हक्का नुडल्समध्ये जर गाजर, सिमला मिर्ची, मटार, टॉमेटो, कांद्याची पात, फरसबी, कोबी इत्यादीसारख्या भाज्या थोड्या थोड्या लांबट चिरून टाकाव्यात.
म्हणजे नुसत्याच मैद्याच्या नूडल्स पोटात न जाता त्याबरोबर भाज्याही आल्यामुळे ती एक हेल्दी न्यूट्रीशिअस डीश होऊ शकेल.
३. पदार्थ भाज्यांमध्ये गुंडाळून देणे –
ही एक अभिनव कल्पना आहे. कोबीची मोठी पाने, लेट्युसची पाने, मुळ्याची पाने, पालकची मोठी पाने इत्यादी सारख्या भाज्यांच्या पानात जर काही पदार्थ रॅप करून खायला दिले तर वाढतानाही छान वाटते.
खाणाऱ्यालाही आकर्षक वाटून त्या भाज्याही पोटात जातात. उदा. सँडविच, फ्रॅंकी, कटलेट्स इत्यादीसारखे पदार्थ असे रॅप करून देता येतील.
४. डाळींमध्ये भाज्या टाकणे –
आपल्या भारतात डाळींचे महत्त्व फार आहे. अगदी कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या अन्नात प्रामुख्याने डाळ खाल्ली जाते. या डाळीत जर काही भाज्या टाकून दिल्या बारीक चिरून तर डाळीलाही चव येते आणि त्यानिमित्ताने भाज्याही पोटात जातात.
दाक्षिणात्य सांबार हा प्रकार याचा उत्तम नमूना आहे. आपण रोजच्या डाळीत कोणतीही एक किंवा मिक्स भाज्या टाकून डाळ उकळून घेतली तर डाळ चविष्ट होते आणि भाज्या खाल्ल्या जातात.
तुरीच्या डाळीत सांबारप्रमाणे, वांगी, भोपळा, सूरण, शेवगा, कांदा, टॉमेटो, गाजर, बीट, दूधी अशा अनेक प्रकारच्या भाज्या बारीक चिरून घालू शकता.
मुगाच्या डाळीत मुळा किसून आणि मुळ्याची पाने बारीक चिरून आधी ती फोडणीवर वाफवून मग त्यात शिजलेली डाळ घालावी. ही डाळ अतिशय चविष्ट लागते.
तुरीच्या डाळीत पालक, मेथी, आंबट चुका इत्यादीसारख्या भाज्या आधी फोडणीवर वाफवून मग त्यात डाळ घालून बाकीचा मसाला केला तर उत्तम डाळ-भाजी होते.
ही डाळ-भाजी पोळी-भाकरी-भात या तिन्हीबरोबर खूप छान खाता येते.
५. सॉस बनवणे –
टॉमेटो, कांदा, दूधी भोपळा, गाजर इत्यादी सारख्या भाज्यांचे घरच्या घरी ताजे सॉस बनवता येऊ शकतात.
सँडविच, पोळी, ब्रेड, पाव यांच्याबरोबर नाश्त्यात असे सॉस बनवून देता येतील.
६. कोशिंबीर –
हा तर भारतीय जेवणातील एक अनिवार्य प्रकार. अनेक फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या रोज नित्यनव्या कोशिंबीरी बनवून त्या सर्व्ह केल्या तर लहान थोर सर्वजण थोडीतरी ती खातातच.
यात गाजर, टॉमेटो, काकडी, बीट, मुळा ह्या नेहमीच्या भाज्या तर घेऊच शकतो, परंतु कधी कोबीची हलकी परतून, कधी कच्च्या पपईची हलकी परतून, कधी मेथी, पालक, कांदा पात इत्यादींची पचडीटाईप कोशिंबीर बनवता येते.
यात नावीन्य आणून थोडी सजावट केली तर लोक आवडीने खातात. सॅलड, सेलरी, लेट्यूसची पानं देखील यात खाऊ शकतो.
याच कोशिंबीरींमध्ये डाळींबाचे दाणे, ओल्या मक्याचे कणसाचे दाणे, मटारचे दाणे जर वरून पेरून टाकले तर कोशिंबीर दिसतेही छान आणि लागतेही छान.
एकाच वेळी भाज्या आणि फळं दोन्ही पोटात जातात.
७. भाज्यांचे पराठे –
विविध भाज्यांचे पराठे कोणाला आवडणार नाहीत? लहान थोरांपासून सगळे अगदी पोटभर खातात. आलु-पराठे, कोबी-पराठे, मुळ्याचे आणि त्याच्या पानांचे पराठे, कोथिंबिरीचे पराठे हे झाले स्टफ पराठ्यांचे प्रकार.
त्याचप्रमाणे सर्व पालेभाज्या पीठात मिसळून केलेले पराठे उदा. मुळा, मेथी, पालक यांचे पराठे तर सर्वांनाच आवडतात.
शिवाय काकडी, दूधी, भोपळा, कलिंगडाच्या साली, हे किसून कणकेत मिक्स करून त्याचे पराठेही फार रुचकर होतात. आणि हेल्दी डायेटही होते.
८. सँडविच-
विविध भाज्यांची सॅंडवीच हे तर लहान मुलांच्या आवडीचे खाणे. बटाटा, बीट, काकडी, कोबी, गाजर, मटर, कांदा, पुदीना, अशा अनेक भाज्या कच्च्या किंवा उकडून सॅंडविच बनवा.
त्यात मस्त चाट मसाला घाला. पुदिना चटणी लावा, बटर-चीज लावा. सगळ्यांच्या आवडीचे, म्हटलं तर नाश्त्यातही चालेल, म्हटलं तर जेवणातही असा पदार्थ म्हणजे अशी विविध हेल्दी सॅंडविचेस.
बरोबर भाज्यांपासूनच बनवलेले घरगुती सॉस द्या. चटणी द्या.
९. स्नॅक्स स्वरुपात भाज्या-
ब्रोकोली, फ्लॉवर, सिमला मिर्ची, कांदा अशा काही भाज्यांचे तुकडे एका लांब सळीत खोचून गॅसवर भाजून काढून त्यावर चाट मसाला, लिंबू, मीठ, तिखट टाकून खायला अधल्या मधल्या वेळांत स्नॅक्सप्रमाणे उपयोगात येऊ शकतात.
९. पिझ्झा –
पिझ्झावर टॉपिंग म्हणून अनेक प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात टाकू शकतो.
टॉमेटो, सिमला, कोबी, कांदा, मशरूम्स, ऑलिव्ह इत्यादी भाज्या पिझ्झावर टाकून मुलांना दिल्यास ते आवडीने खातील.
१०. स्मूदी –
वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून त्या मिक्सरमध्ये फिरवून त्याची स्मूदी करून देखील ती चांगली लागते. ज्या भाज्या कच्च्या स्वरुपात खाऊ शकतो, अशा भाज्यांची साधारणपणे स्मूदी करून पिता येते.
११. घावन, धिरडी, थालीपीठ इत्यादी –
धिरडी किंवा घावन प्लेन न बनवता त्यात विविध भाज्या ऍड करून बनवू शकतो.
गाजर, टॉमेटो, पालक, कांदा पात, मेथीची भाजी, कोथिंबीर, कोबी इत्यादी अनेक भाज्या घावन, धिरडी, थालीपीठ इत्यादी बनवताना त्यात ऍड करू शकतो.
१२. बिर्याणी, व्हेज पुलाव, खिचडी इत्यादी
ज्यांना राईस प्रकार आवडतो ते बिर्याणी, व्हेज फ्राईड राईस, व्हेज पुलाव इत्यादी बनवून त्यात भरपूर भाज्या उदा. मटार, गाजर, फरसबी, कांदा, फ्लॉवर इत्यादी टाकू शकतात.
साध्या फोडणीच्या खिचडीतही या भाज्या टाकून थोडी मऊ खिचडी बनवली तर त्यावर तूप टाकून अगदी लहान मुलंही ती आवडीने खातात.
१३ व्हेज उपमा, पोहे –
उपम्यामध्ये गाजर, मटार, कांदा, फरसबी इत्यादी अगदी बारीक चिरून टाकल्यास उपम्याला चवही छान येते आणि असा उपमा दिसतोही छान कलरफूल.
तसंच हे नुसते कांदे पोहे न करता अधुनमधून कोबी पोहे, वांगी पोहे, बटाटे पोहे असे स्वतंत्र किंवा एकत्रित भाज्या टाकून वर सजावटीला थोडे मटार दाणे टाकले तर पोहे उत्तम लागतात आणि दिसतातही छान.
१४. कटलेट पॅटीस, कबाब इत्यादी –
सुरण, कच्ची केळी, बटाटे इत्यादींचे उकडून पॅटीस खूप छान होतात. एरव्ही अशा भाज्यांना हातही न लावणारी मुलं हे पॅटीस पटापट संपवतात असा अनुभव आहे.
नाश्त्याला मधल्या वेळात हे बनवता येतील. मिक्स भाज्यांचे कटलेट्स तर सगळ्यांनाच आवडतात. हिरवे सोलाणे, पालक, मटार इत्यादी क्रश करून हराभरा कबाब बनवता येतील.
१५. पिठलं –
बेसन पीठाचं पीठलं, कुळीथाच्या पिठाचं पिठलं हे प्लेन साधं न करता त्यातही अनेक भाज्या आपण ऍड करू शकतो. टॉमेटो, शेवग्याच्या शेंगा, मेथीची भाजी, कांदा, कांद्याची पात इत्यादी टाकून पिठलं अतिशय चविष्ट बनतं.
थोडक्यात काय, तर आमच्या घरात कोणी भाज्या खायलाच मागत नाहीत. मुलं तर भाज्यांना हातच लावत नाहीत अशी तक्रार करायला आता तुम्हाला कारण उरणार नाही.
भाजी ही नेहमी पोळीसोबतच खाल्ली गेली पाहिजे असे नसून ती कोणत्याही प्रकारे पोटात जाणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही वर सुचवल्याप्रमाणे अनेक पदार्थ बनवताना रोजच्या सैपाकातही शिताफीने अनेक भाज्या वापरून त्या घरच्यांना खायला घालू शकता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.