आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
साधारण १९८७ मध्ये दूरदर्शनवर रामायण ही मालिका सुरू झाली जी वाल्मिकी रामायणावर आधारित होती. तेव्हा दर रविवारी सकाळी ९:३० वाजता ह्या मालिकेचे प्रसारण व्हायचे.
तेव्हा त्या काळी ती इतकी लोकप्रिय झाली होती की ह्या मालिकेचे जवळपास १० करोड प्रेक्षक होते. रविवारी सकाळी ९:३० च्या आत सगळी कामं आटोपून किंवा सगळी कामं बाजूला ठेवून लोकं ती मालिका बघायला जमायचे.
असं म्हंटलं जातं की तेव्हा रेल्वे, बसेस इत्यादी सर्व वाहने, दळण वळण सगळंचं थांबायचं!
इण्डिया टूडे ने ह्याला “रामायण फ़िवर” असे नाव दिले. त्या काळी भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासात ही मालिका सर्वाधिक बघितली जाणारी म्हणून नोंद आहे.
इतकेच नाही तर लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे ह्या मालिकेची “सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक धारावाहिक” अशी नोंद झाली होती.
ह्या मालिकेतील सर्व पात्रांनी समरसून काम केले होते इतके समरसून की लोकांना ती पात्रे खरोखरच राम, लक्ष्मण, सीता आणि रामायणातील इतर पात्रे जसे रावण, भरत, शतृघ्न इत्यादी सर्व सर्व पात्रे खरी वाटू लागली होती.
ते कोणी वेगळे कलाकार आहेत हेच त्यांना वाटत नव्हते, पटत नव्हते.
आता सध्याच्या परिस्थितीत कोरोना व्हायरस ने सर्वत्र धुमाकुळ घातलाय. संसर्गजन्य असल्याने ह्याचा फैलाव सर्वत्र जलद गतीने झाला आणि परिणामी माणसे मृत्युमुखी पडू लागली.
बरं हे इतक्या झपाट्याने घडले की जेव्हा लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता आणि लाखोंना संसर्ग झाला आणि जवळ जवळ तेवढेच मृत्युमुखी पडले. संपूर्ण जगात ह्याने धुमाकुळ घातला आणि लोकं भयभीत झाली.
भारतात ह्या व्हायरसला दुसऱ्या स्टेजवरच थांबवायचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी सरकारने टोटल लॉकडाऊन जाहिर केला.
सुरुवातीला सगळ्यांना ह्या अनपेक्षित सुट्टीमुळे मजा वाटत होती पण नंतर परिस्थितीचं गांभीर्य कळालं. पुढे काय होईल कोणालाच माहित नाही, अर्थव्यवस्था कोलमडली आणि लोकं निराश, हताश होऊ लागली.
लोकांना बाहेर पडता येत नाही, मग टाइमपास काय तर टि.व्ही.! त्यात मालिकांचे नवीन चित्रीकरण देखील थांबले. मग काय त्याच त्याच मालिकांचे पुनःप्रक्षेपण व्हायला लागले.
ज्या अत्यंत रटाळ, मानवी मनावर विपरित परिणाम करणाऱ्या, कट कारस्थानांनी भरलेल्या, सासू सुनांची भांडणे, कुटुंबात फूट पाडणाऱ्या अशाच आहेत.
आधीच हे असं वातावरण त्यात ह्या नकारात्मक परिणाम करणाऱ्या मालिका!
मग सरकारने लोकांमध्ये सकारात्मकता यावी, त्यांना धीर मिळावा, त्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून रामायण ही मालिका पुनःप्रक्षेपित करण्याचे आदेश दिले.
आता रोज सकाळी ९:०० वाजता १९८७ चा काळ परत आला. सर्व जण एकत्र येऊन पुन्हा रामायण बघू लागले. त्यामुळे लोकांना जरासा दिलासा मिळाला.
त्यांचे नैराश्य कमी झाले. सकारात्मकता वाढू लागली. एकत्रित बघण्यासारखी मालिका त्यातून महत्त्वाचे उपदेश, संदेश देणारी म्हणून पुन्हा ह्या मालिकेची लोकप्रियता वाढली.
आधी सांगितले त्याप्रमाणे त्यातील भूमिका करणाऱ्या नट, नट्यांना लोकांनी नुसते डोक्यावरचे घेतले नाही तर त्यांना ते खरोखरच तीच पात्रे आहेत असे वाटू लागले होते.
ह्यातील मुख्य म्हणजे रामाची भूमिका करणारे अरूण गोविल ह्यांच्याविषयी आज आपण थोडेसे जाणून घेऊया.
लोकप्रियतेच्या कळसावर असताना ह्या कलाकारांच्या अनेक ठिकाणी मुलाखती व्हायच्या, अगदी आता मध्यंतरी, अलीकडे सुद्धा हे कलाकार एका प्रसिद्ध वाहिनीच्या प्रसिद्ध शो मध्ये आले होते.
त्यामध्ये स्वतः अरूण गोविल ह्यांनी काही किस्से सांगितले आहेत, त्यांचे काही अनुभव सांगितले आहेत, की राम म्हणून त्यांना लोकांनी अक्षरशः देवपण दिले होते.
म्हणजे अरूण गोविल ह्यांचे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे हेच लोकं मान्य करत नसत. तेच प्रभु रामचंद्र आहेत अशी भावना, अशी श्रद्धा लोकांना वाटे.
एक असाच किस्सा त्यांनी सांगितला की परदेशात ते एकदा सहकुटुंब फिरायला गेले होते आणि अचानक एक गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि त्यातून दोन व्यक्ती त्यांच्याकडे धावत आल्या.
क्षणभर अरूण गोविल आणि त्यांच्या पत्नीला काही कळलेच नाही असे काय झाले आहे, तर जवळ येऊन त्या व्यक्तींनी अरूण गोविल ह्यांना साष्टांग दंडवत घातला.
त्यांच्याकडे दुसरे हिरोचे रोल येईनासे झाले कारण, राम कोणत्या दुसऱ्या भूमिकेत भलत्याच कोणत्या तरी नटी बरोबर बघणे प्रेक्षकांना रुचले नसते आणि परिणामी निर्मात्यांना पण आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते.
प्रेक्षकांची श्रद्धा परम सीमेला पोचली होती तेव्हा.
असाच एक किस्सा आहे मॅगेझिनच्या कव्हर फोटोचा! त्यामध्ये अरूण गोविल ह्यांना बरेच मानधन देण्याचे कबूल झाले होते पण, हातात पेला घेऊन उभे राहण्याची त्यांची पोझ होती, वास्तविक त्या पेल्यात पाणीच असणार होते.
पण प्रेक्षकांना ते मद्य वाटेल आणि त्याचा वाईट परिणाम होईल म्हणून अरूण गोविल ह्यांनी ते नाकारले.
रामायणाचे शूटिंग उंबरगावला होत होते, जे महाराष्ट्र, गुजरात सीमेवर आहे. त्यावेळी फोन, मोबाइल अशी साधने नव्हती की ज्यामुळे ह्या कलाकारांना मालिकेची, त्यांची स्वतःची लोकप्रियता समजेल.
त्यांना माहितच नव्हते मालिका इतकी लोकप्रिय झाली आहे. नंतर तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी स्वतः ह्या सर्व कलाकारांना दिल्लीला बोलावून त्यांचा सत्कार केला.
प्रेक्षक तर अक्षरशः त्यांची पूजा करत, त्यांना हार वगैरे घालत. त्यांना खरोखरच देवत्व बहाल केल होतं प्रेक्षकांनी!
एक असाच किस्सा अरूण यांनी सांगितला होता कोणत्यातरी मुलाखतीतच. त्यांच्या ओळखीत कोणत्या तरी माणसाचे निधन झाले होते. त्याच्या अंत्य दर्शनाला अरून गोविल पण गेले होते.
त्या माणसाची लहान मुलगी होती. तर ती ह्यांना सोडेचना, म्हणाली तुम्ही राम आहात, देव आहात काहीही करू शकता माझ्या बाबांना जिवंत करा. त्यावेळी त्यांना खूप गलबलून आले होते.
कशीबशी त्या मुलीची समजूत काढली त्यांनी पण, आपण काहीच करू शकत नाही ह्या भावनेने त्यांना वाईट वाटले पण लोकं त्यांना ह्या लेव्हलला जाऊन देव मानू लागली होती!
आणखी एक किस्सा रामायणानंतरचाच! दक्षिण भारतात त्यांचे एक शूटिंग सुरू होते. तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणावर सिगरेट ओढत असत. सेटच्या मागे जाऊन त्यांनी सिगरेट ओढायला सुरुवात केली.
तिकडून काही माणसे जात होती. त्यांनी गोविल ह्यांना सिगरेट ओढताना पाहिले आणि त्यांच्याजवळ येऊन रागात हातवारे करून काही तरी बोलू लागली.
अरूण गोविल ह्यांना काहीच समजले नाही कारण त्यांना ती भाषा येत नव्हती, फक्त ती लोकं चिडलीत एवढेच कळले.
त्यांनी सेटवरच्या एका स्थानिक माणसाला विचारले की ती लोकं काय बोलतायत तर त्याने सांगितले की, ती लोकं अरूण गोविल ह्यांन साक्षात प्रभु रामचंद्र मानत होती आणि देव कधी सिगरेट ओढतो का?
सिगरेट ओढू नका असं बरंच काही बोलत होती, तेव्हापासून अरूण गोविल ह्यांनी कायमची सिगरेट सोडली.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.