भारतातील ही “७” अद्भुत ठिकाणं बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नाही बसला तर नवल…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारत. विविधतेने नटलेला देश. वेगळे प्रांत, वेगळ्या भाषा, संस्कृती. असा देश पूर्ण जगात नाहीये.
आपण कायमच ऐकतो की आपला देश पर्यटनाचं एक महत्त्वाचं केंद्र आहे, पण आपल्याला काही ठराविक जागाच माहिती असतात. भारतातील अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला फारशी माहित पण नाहीयेत.
गोवा, सिमला, मनाली, राजस्थान, काश्मीर ही अशी काही मोजकीच ठिकाणं आपल्या बकेट लिस्ट मध्ये असतात. पण अशीही काही लोकं आहेत ज्यांना भारतातील फारश्या लोकप्रिय नसलेल्या जागांना भेट द्यायची असते.
प्रत्येक राज्यात अशा काही जागा आहेत ज्यांना अगदी “लिम्का बुक” मध्ये स्थान मिळालं आहे. या प्रत्येक जागेचं स्वतः चं वेगळं वैशिष्ट्य आहे.
पण तरीही आपण भारतीयांना फिरण्यासाठी इतर देशात जाण्याचं आकर्षण का असावं?
कारण आपल्यापैकी फार कमी जणांनी आतापर्यंत पूर्ण भारत भ्रमण केलेलं असावं. या लेखात आम्ही अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत ज्यांची तुम्ही नावं सुद्धा ऐकली नसतील.
सीट बेल्ट लावून घ्या…कारण आता आपण भारतातील काही अद्भुत जागांची सफर करणार आहोत….
१. कोदीन्ही:
हे गाव केरळ राज्यात आहे. केरळ राज्याला ‘देवभूमी’ असं देखील संबोधलं जातं. हे एक छोटं गाव आहे. इथे साधारण २००० परिवार राहतात.
पण, या छोट्या गावाने आणि इथल्या लोकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. ते विशिष्ट कारण म्हणजे हे की, तिथल्या बहुतांश घरात जन्मलेली बाळं ही जुळी आहेत.
जगाच्या तुलनेत पाहिलं तर भारतात जुळे जन्माला येण्याचं प्रमाण हे फारच कमी आहे. पण, या गावातील जुळे जन्माला येण्याचं कारण आजपर्यंत कुणालाही उलगडलेलं नाहीये.
२. हजो:
दुसरं ठिकाण आहे उत्तर भारतातील आसाम राज्यातील. गुवाहाटी च्या जवळ हे गाव वसलेलं आहे ब्रम्हपुत्राच्या तीरावर.
या जागेचं वैशिष्ट्य हे आहे की, हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे जिथे की तीन धर्मातील लोक दर्शनासाठी येत असतात. हिंदू, बौद्ध आणि इस्लाम.
हे जगातील एकमेव ठिकाण आहे जे की अशा प्रकारे तीन धर्मांसाठी प्रसिद्ध आहे.
३. ‘धुर’ मुक्त गाव:
ह्या गावाचं नाव आहे ‘व्यचकूरहल्ली’. भारताच्या दक्षिणेला कर्नाटक राज्यातील ‘चिक्काबल्लापुर’ या जिल्ह्यात हे गाव आहे. या गावाने पहिलं ‘धूर’ विरहित गाव असल्याचा बहुमान मिळवला आहे.
हे देशातील पहिलं असं गाव आहे. त्यांनी हे साध्य केलं ते गावातील प्रत्येक घरात सिलेंडर पोहोचवून. गावातील कोणत्याही घरात आता चुलीचा धूर उरलेला नाहीये.
गावाने केलेल्या ह्या कामाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ने दखल घेतली आहे. यामुळे पर्यावरण वाचवण्यास खूप मदत होत आहे ही सर्वात समाधानाची बाब आहे.
४. हिक्कीम:
हिमालय पर्वतामुळे भारत जगभर प्रसिद्ध आहे. हे गाव आहे हिमाचल प्रदेश मध्ये उंचीवर स्थित आहे. या जागेचं वैशिष्ट्य आहे की इथे सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत.
हिक्कीम मध्येच सर्वात जास्त पोलिंग स्टेशन्स सुद्धा सर्वात जास्त आहेत. ह्या दोन्ही कारणांसाठी ह्या गावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये केलेली आहे.
५. शेटपल:
हे गाव महाराष्ट्रात आहे. या गावाचं वैशिष्ट्य आहे की इथल्या प्रत्येक घर, घरातील प्रत्येक माणूस हा सर्प मित्र आहे. इतकंच नव्हे तर, प्रत्येक घरात एक जागा आहे कोब्रा घरात येऊन मुक्काम करण्यासाठी.
ही या गावातील परंपरा आहे आणि अशी मान्यता आहे की साप आपल्याला आल्यावर नक्की काही आशीर्वाद देऊन जाईल.
त्या गावात साप मुक्त विहार करत असतात. लोकांपैकी कोणालाही सापाची भीती वाटत नाही आणि ते सापासोबत खेळत असतात.
६. पालिताना:
गुजरात राज्यातील हे गाव जैन धर्मीयांचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येत असतात . या जागेचं हे वैशिष्ट्य आहे की २०१४ मध्ये हे गाव पूर्णपणे शाकाहारी म्हणून घोषित करण्यात आलं.
हे या प्रकारचं जगातील पहिलं गाव आहे. एखाद्या व्यक्तीने शाकाहारी होणं समजलं जाऊ शकतं पण पूर्ण गाव हे एकाच वेळी शाकाहारी घोषित करण्यात आलं ही गोष्ट अद्भुत आहे.
७. यगांती मंदिर:
हे मंदिर आंध्र प्रदेशात आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की या महादेवाच्या मंदिरातील ‘नंदी’ ची उंची ही सतत वाढत आहे. ह्या नंदीच्या मूर्तीवर बरंच संशोधन सुद्धा झालं.
Archeological survey of India ह्यांनी हे सांगितलं की, जो दगड नंदी च्या मूर्तीसाठी वापरण्यात आला आहे तो एका ठराविक वर्षांनी वाढणारा आहे.
या नंदी ची उंची मागील वीस वर्षांत एक इंच म्हणजे २.५४ सेंटीमीटर ने वाढली आहे.
इतकंच नव्हे तर, त्या मंदिरात एक तलाव आहे जो की जमिनीच्या खाली आहे. इतक्या वर्षात या तलावात पाणी कुठून येतं ह्याचा अजूनही कोणी शोध लावू शकलेलं नाहीये.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तलावाला वर्ष भर पाणी असतं. ज्याला की दर्शन देणं हे प्रत्येक भाविकांकडून श्रद्धेचं मानलं जातं.
तर मंडळी, कधी भेट देताय या अद्भुत स्थळांना?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.