लॉकडाऊनमध्ये घरी न बसल्यास होऊ शकतो भयावह परिणाम; बिहारमधील या घटनेतून धडा घ्यायला हवा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
स्वतःला क्वारंटाईन न केल्यास किती भयावह परिणाम होऊ शकतो यासाठी बिहारमधील हा धडा महत्त्वाचा आहे
सध्या जिकडे तिकडे एकच विषय आहे तो म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव!!
बिहारच्या सिवान जिल्ह्यात कोरोनाचा कम्युनल स्प्रेड झालेला आहे. वारंवार प्रशासन सुचना करत असूनही अनेक जण त्या सुचना धुडकावून लावताना दिसत आहेत.
असाच एक प्रकार बिहारच्या सिवान जिल्ह्यात घडलाय आणि आज हा जिल्हा बिहारमधील कोरोना स्प्रेडच्या बाबतीत सर्वात अधिक रुग्णवाला जिल्हा ठरलाय.
बिहारमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या साठ असताना एकट्या सिवान जिल्ह्यात ही संख्या २९ आहे.
या जिल्ह्यातील रघुनाथपुर प्रखंड येथे एकाच कुटुंबात २१ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तेव्हा तिथे लोकांमध्ये भीतीचं वातावरण साहजिकच वाढलेलं आहे.
सिवान हा २५ लाख लोकसंख्येचा, मुस्लिमबहुल जिल्हा असून येथील किमान ५०,००० लोक अरबस्तानातल्या विविध देशांत नोकरीला असतात.
रघुनाथपुर येथे तीन किलोमीटरच्या क्षेत्रात लॉकडाऊनचं सक्तीने पालन करवण्यासाठी तिथल्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी कामाला लागले आहेत.
मागच्या महिन्यात, २१ मार्चला एक तरुण अरबस्तानातील ओमान या देशातून बिहारच्या सिवान जिल्ह्यातील रघुनाथ प्रखंडच्या पंजवार या गावी परत आला होता.
परदेशांतून आलेल्या लोकांना १५ दिवस क्वारंटीन राहायला सांगितले जाते.
परदेशातून आलेल्या लोकांची बातमी प्रशासनाला ताबडतोब कळवण्याविषयीही नागरीकांना वारंवार सूचना केल्या जात असूनही अनेक लोक या सूचनेकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. त्याचे हे उदाहरण आहे.
या तरुणाने स्वतःला वेगळं ठेवलं नाही आणि त्याच्या घरातल्या लोकांनीही तो परदेशांतून आल्याची बातमी प्रशासनापासून लपवून ठेवली होती.
हा तरुण स्वतःला विलग न ठेवता आपल्या मोठ्या कुटुंबात एकत्रच राहत होता. तसेच तो नातेवाईकांकडे आणि गावातही हिंडत होता.
त्याचे व्हायचे ते भयानक परीणाम झाले.
आज त्याच्यासह त्याच्या घरातील एकवीस सदस्य कोरोनाबाधित निघाले आहेत, तसेच त्याच्या शेजारच्या दोन व्यक्तीही पॉझिटीव्ह आढळल्या आहेत.
एकीकडे देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन आणि सरकार सर्व पातळ्यांवर या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे.
नागरीक मात्र प्रशासनाला सहकार्य न करता बेपर्वा वृत्तीने वागताना आढळत आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती लपवणे, त्यांना विलग न ठेवणे इत्यादी बेजबाबदार वर्तनातून कोरोनाचा कम्युनल स्प्रेड वाढण्याची भीती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
आता या युवकाच्या घरचेच २१ सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत. यात घरातील महिला, पुरुष आणि लहान मुले या सर्वांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर तो ज्यांना भेटला त्यात अजून दोन त्याचे शेजारी देखील बाधित आढळले आहेत.
यात एक १० वर्षांची मुलगी, तर दुसरा २८ वर्षांचा तरुणही आहे.
आता भीती अशीही आहे की हा तरुण आणि त्याच्या घरचे हे सारे सदस्य अजून ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांचीही तपासणी करून त्यांना कोणाला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही ते बघावं लागणार आहे.
आणि अशारीतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
प्रशासनाने त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या एकूण ९६ लोकांची चाचणी घेऊन त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवले.
या पूर्ण गावाला सॅनिटाईज करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पटण्याहून टिम बोलावली आहे. ही सर्व माहीती तेथील आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजीव कुमार यांनी दिली आहे.
अजूनही या गावातील आणि जिल्ह्यातील लोकांनी जर स्वतःला शंभर टक्के लॉकडाऊन ठेवले नाही आणि प्रशासनाने त्याकरता कठोर पावलं उचलली नाही, तर येथे कोरोनाचा कम्युनल स्प्रेड वाढण्याची दाट शक्यता आहे.
सिवानमधील या घटनेला तिथला आरोग्य विभाग आणि प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहेत. या युवकाला जेव्हा क्वारंटीन राहायला सांगितले गेले होते, तेव्हाच त्याच्यावर लक्ष ठेवणे भाग होते.
तेव्हाच जर हे केले असते तर हा पुढचा धोका टळला असता.
आता सिवानमध्ये दयानंद आयुर्वेदिक कॉलेजच्या आरोग्य विभागात १०० बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तिथे रघुनाथपुर प्रखंड येथील पंजवारच्या या २१ रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
पटण्याहून गावाच्या सॅनिटायझिंगसाठी टीम मागवण्यात आली आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी उपकरणे आणि औषधे उपलब्ध केली गेली आहेत.
आयुर्वेद मेडीकल कॉलेजच्या आयुष डॉक्टरांच्या तिथे उपचारासाठी पाळ्या लावण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्याही चार टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
तेथील प्रशासन काय उपाय करते आहे?
सिवानमध्ये १०० बेडचा आयसोलेशन (विलगीकरण) कक्ष तयार केला गेला आहे.
आपल्याकडील लोक खूप बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. वारंवार सूचना, आदेश देऊनही लोक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत.
कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र येतात. अनेक ठिकाणी गर्दी करतात. एकत्रपणे हिंडतात. अशा गोष्टी देशांतल्या अनेक ठिकाणी होतानाच्या बातम्या येतात.
लोक जर असे बेजबाबदार आणि बेपर्वाईना वागले, तर समाजात कोरोनाच्या प्रसाराला रोखणे पुढे कठीण होऊन बसणार आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या आदेशांचे पालन करा आणि घरातच राहा. परदेशांतून आपल्या घरी किंवा आजुबाजूला कोणी व्यक्ती आली असेल, तर तिची माहिती वेळेवर स्थानिक प्रशासनाला कळवा.
ती स्वतःला क्वारंटीन ठेवते की नाही यावर लक्ष ठेवा. घरातच रहा आणि काळजी घ्या.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.