लॉकडाऊन मुळे खरंच देशातले गुन्हे कमी होतायत का? हे आहे गुन्हेगारीचं नेमकं चित्र
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.आत्ताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे ही जाहिर केले आहे.
एकीकडे कोरोनाचे हे संकट वाढत असताना कोरोनाच्या काळात कमी झालेली गुन्हेगारी हा लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम म्हटला पाहिजे.
देशभरात गुन्हेगारीच्या केसेसवरून बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होते. एकंदरच चोऱ्या आणि इतर गुन्हे नियंत्रणात आले असून सर्वच राज्यात ही परिस्थिती दिसून येते.
देशातील गुन्हे खरंच कमी होतायत का, गुन्हेगारीबद्दल सर्व राज्यात काय परिस्थिती आहे, कोणत्या स्वरूपाचे गुन्हे आजही दिसून येतायत या सर्व घडामोडींचा घेतला एक आढावा…
लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर जाण्यास मुभा आहे. केवळ जीवनावश्यक प्रकारात मोडणाऱ्या गोष्टीच सध्या सुरू आहेत.
त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. अन्नधान्य, भाजीपाला व मेडिकल्स वगळता सर्व अन्य बाजारपेठा पुर्णपणे बंद असल्याने त्याठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसला आहे.
महिला, तरुणीवर रस्त्यात होणारे अत्याचार तसेच दागिने, पर्स पळविणे, खिसे कापणे , मोबाईल चोरी यासारखे प्रकार थांबले असल्याचे दिसून येते.
सध्या ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर व्हायरल करणे, त्यातून बदनामी करणे आदीबाबतच्या गुन्ह्यामध्ये मात्र घडत आहेत.
एरवी दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ५ ते ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण पूर्णपणे थांबले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाटावरण आहे. मात्र तेथेही लॉकडाऊन काळात गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात आले आहे.
पोलिसांची मोठ्या प्रमाणावर असणारी सुरक्षाव्यवस्था आणि व्हायरसबाबत भीती यामुळे हे गुन्हे कमी झाल्याचे सांगितले जाते. मुलांचे अपहरण , खंडणी, वसुली याच्या एकही गुन्ह्याची नोंद दिल्ली पोलिसांकडे लॉकडाऊन काळात झालेली नाही.
घरफोडीच्याही घटना तुरळक आढळल्याचे दिसून येते दहा पंधरा वर्षात पहिल्यांदा गुन्हेगारीमध्ये इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. किडनपिंग , वाहनचोरी घरफोडी सर्वांच्याच केसेसमध्ये घट झाल्याचे दिसून येते.
असं असतानाही नवीन नवीन शक्कल लढवून गुन्हे होत असल्याचेही काही ठिकाणी दिसत आहे. दिल्लीमध्ये एका दुधवाल्याला दुधाच्या किटलीतुन दारूचा पुरवठा करण्याबद्दल अटक करण्यात आली होती.
त्याचप्रमाण एटीएमच्या बाहेर काळोखात राहून मोबाईल, पैसे चोरणारेही सक्रिय असल्याचे दिसून येते.
याबद्दल बोलताना पोलिस सांगतात की एकंदरच चोरीचे प्रमाण घेतले असून चोरांनाही कोरोनाच्या भितीमुळे घरात रहावे लागत आहे. त्यामुळेच हे प्रमाण कमी झाले असावे.
या काळात पोलिसांकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात आहे.
सुरक्षाव्यवस्थेबरोबरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, गरिबांसाठी अन्न धान्य व्यवस्था करणे, गरोदर बायकांना इस्पितळात पोचवून त्यांना सहकार्य करणे अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पोलिस सध्या हाताळत आहेत.
महिला आणि कौटुंबिक हिंसाचार मात्र सुरूच
एकीकडे कोरोनामुळे गुन्हे कमी होत असले तरीही घराघरातील वाद विकोपाला जाऊन कौटुंबिक हिंसाचार आणि महिला अत्याचाराचे गुन्हे मात्र समोर येत आहेत.
चाइल्ड इंडिया हेल्पलाईनच्या सर्वेक्षणानुसार आणि महिला आयोगाकडे तक्रारींनुसार या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे ११ दिवसांच्या काळात तब्बल ९२००० तक्रारी आल्या आहेत.
त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे.याव्यतिरिक्त इतर तक्रारींसंर्दभातही हेल्पलाईनकडे कॉल आले. यात शारीरिक आरोग्यासंर्दभात ११ टक्के, बाल कामगार ८ टक्के, बेपत्ता आणि घरातून पळून गेलेल्या मुलांसंदर्भात ८ टक्के तक्रारी दाखल झाल्या आहेत.
घरात राहा, तरच सुरक्षित राहाल असाच संदेश सगळीकडून दिला जातोय, पण घरात असणाऱ्या महिलाच सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
महिला शोषणाच्या २५७ केसेस या काळात नोंद केल्या गेल्याचे दिसून येते. यातील ५९ महिलांना मारहाण, अत्याचार याला कंटाळून तक्रार केल्याचे माहितीनुसार स्पष्ट होत आहे.
तर बलात्कार, लैंगिक अत्याचार याच्या १३ केसेसची नोंद करण्यात आली आहे. सामान्य दिवसांमध्ये हा आकडा सरासरी १-२ अशा स्वरूपात असतो, त्यामुळे निश्चितच यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
एकीकडे या तक्रारी नोंदविल्या जात असल्या तरीही अनेक महिलांना तक्रार करणेसुद्धा कठीण होत असल्याचे चित्र दिसून येते. महिलांना लॉकडाऊनमुळे घरांमधून बाहेर पडता येत नाही.
त्यामुळे अत्याचार सहन करून घरातच राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न स्वयंसेवी संघटना, पोलिस करत आहेत.दररोज महिला आयोगाच्या इमेल्सवर या तक्रारी येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एकंदरच हा प्रश्न गंभीर आहे. महिलांचे अत्याचार आणि त्यांचे होणारे शोषण रोखले गेले पाहिजे. या प्रश्नाची जागतिक संघटना यूएन ने याची दखल घेऊन याबद्दल ट्वीट केले आहे.
युनायटेड नेशन्सनी याबद्दल ट्वीट करून म्हटलं आहे की, ‘या क्वारंटिनच्या दिवसात कदाचित घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना मदतीची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.’
यूएनने हेही म्हटलंय की घरगुती हिंसाचाराविरूद्ध मदत मागण्यासाठी जितक्या हेल्पलाईन आहेत, त्या सुरूच राहतील आणि त्याची गणना ‘अत्यावश्यक सेवांमध्ये’ होईल.
महाराष्ट्र सरकारनेही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना कडक शासन केले जाईल असा इशारा सरकारतर्फे देण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये तेथील प्रशासनाने याबद्दल कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लॉकडाउन काळात महिलांचे शोषण झाल्यास त्यांना हॉटेल्समध्ये राहण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय तेथे घेण्यात आला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.