' लॉकडाऊनमुळे सकाळी लवकर उठण्याची सवय मोडतेय? हा अफलातून फॉर्म्युला एकदा ट्राय कराच – InMarathi

लॉकडाऊनमुळे सकाळी लवकर उठण्याची सवय मोडतेय? हा अफलातून फॉर्म्युला एकदा ट्राय कराच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कल्पना करा, की तुम्ही तुमचं दिवसभरातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम सकाळी लवकर उठून सकाळीच पूर्ण केलं, तर तुमचा उरलेला दिवस किती तणावमुक्त असेल?

तुम्हाला किती हलकं हलकं वाटेल? त्या दिवशी रात्री तुम्हाला झोपही शांत लागेल कारण उशीरापर्यंत जागून काही करण्याचे काम तुम्ही शिल्लकच ठेवलं नसेल.

त्यासाठी सुप्रसिद्ध पाश्चात्य लेखक जेसन गुटीरेझचा हा ५०/३०/१०/१० चा फॉर्म्युला एकदा नक्की ट्राय करून बघा – निश्चय/तयारी/अंमलबजावणी/दैव

 

jason inmarathi

 

पाहूया हा फॉर्म्युला नक्की कसा आहे तो –

 

५० टक्के निश्चय –

जेसन हा एक इंजिनियर होता. परंतु त्याला लेखनाचा छंद होता. त्याची ऑफिसची ड्यूटी सकाळी सात ते संध्याकाळी ५ पर्यंत असायची.

ऑफिसच्या कामामुळे त्याला लेखनाकडे वेळ द्यायला वेळच मिळायचा नाही. त्यासाठी सकाळी लवकर उठून लिहायला बसणे हा एकच मार्ग त्याच्याजवळ होता.

त्यासाठी त्याने वरील फॉर्म्युला वापरला.

तो म्हणतो, की सर्वात आधी कोणतेही काम करण्याची तुमची इच्छा किती आहे? तुम्ही त्या कामाला किती महत्त्व देता? ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे यावर तुमचा ते काम पूर्ण करण्याचा निश्चय ठरतो.

जर तुमचे एखादे स्वप्न असेल, तर तुम्ही त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी या पद्धतीने कोणाचेच स्वप्न पूर्ण होत नाही.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्टाला पर्याय नसतो.

जर तुम्हाला तुमचे स्वप्न महत्त्वाचे वाटत असेल, तर ते पूर्ण करण्याचा आधी मनाशी निश्चय करा. निश्चयाने तुमचे ५० टक्के काम आधीच पूर्ण होते.

 

jason 2 inmarathi
medium

 

एकदा निश्चय केला की रोज पहाटे उठणं ही फार कठीण गोष्ट राहात नाही. तो म्हणतो की त्याला लेखक व्हायची इच्छा जबरदस्त होती. ती त्याची आवड होती, त्याचा छंद होता.

जेव्हा त्याला कळलं की आपल्याला लेखक व्हायचं असेल, तर आपल्याजवळ सकाळी लवकर उठून लिहिण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा त्याने स्वतःला भल्या पहाटे उठून लिहीत बसण्याची सवय लावून घेतली.

आणि ती सवय त्याच्या नंतर अंगवळणी पडली. आणि तो आपले लेखनाचे काम व्यवस्थित करू लागला. त्याला इंजिनिअरींगची आवड होती, परंतु तो त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय होता.

त्याला लेखक बनायचे तर त्यासाठी जास्तीचा वेळ काढणे आवश्यक होते. ते त्याने केले.

 

writer inmarathi
admission check up

 

थोडक्यात, एखादे काम पूर्ण करण्याची तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे त्यावर तुमच्या कामाचा निश्चय ठरतो. एकदा का तुम्ही आपल्याच मनाशी निश्चय केला, की निम्मे काम तिथेच पूर्ण झाले असे समजा.

त्यासाठी मग आपोआपच पहाटे उठायची सवय तुम्ही लावून घ्याल. ते महत्त्वाचे आहे.

 

३० टक्के तयारी –

तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा केलेला निश्चय म्हणजे तुम्ही अर्धी लढाई जिंकलात असे समजायला हरकत नाही. आता पुढचा टप्पा म्हणजे ३० टक्के तयारीचा..

एकदा काम करायचे आहे आणि त्यासाठी लवकर उठायचे आहे, हे मनाशी निश्चय करून ठरवले की पुढचा टप्पा आहे तो तयारीचा. कामाची पूर्वतयारी.

त्यासाठी पुढील पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत –

• लवकर झोपणे –

जर तुम्हाला लवकर उठायचं असेल, तर लवकर झोपणंही गरजेचं आहे. प्रत्येकाची झोपण्याच्या वेळेची गरज ही वेगवेगळी असू शकते.

कुणाला सहा तासांची झोप पुरेशी ठरते, तर कुणाला सात ते आठ तास झोप लागते. तुमची झोप किती वेळाने पूर्ण होते, आणि तुम्हाला ताजतवानं वाटतं त्यावर तुम्ही आपल्या झोपण्याची वेळ ठरवा.

 

guy sleeping inmarathi
daily bangladesh

 

जर तुम्हाला सकाळी पाच वाजता उठायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही त्या आधी तुमच्या झोपेच्या गरजेप्रमाणे सहा ते आठ तास आधी झोपणे गरजेचे आहे.

ती वेळ नक्की करा. आणि त्याप्रमाणे रोज त्याच वेळेला झोपायची सवय स्वतःला लावून घ्या.

• झोपेची तयारी –

लवकर उठायचं असेल, तर लवकर वेळेवर झोपण्याची सवय हवी. जोपर्यंत शरीर पूर्ण थकत नाही तोपर्यंत ते स्वतःहून झोपत नाही.

यासाठी तुम्हाला शरीराला वेळेवर झोपायची सवय लावावी लागते.  त्यासाठी झोपण्याच्या एक तास पूर्वीच तुम्ही शरीराला झोपण्याच्या सुचना देत चला.

सर्वात आधी आपला मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही इत्यादी साधने बंद करून टाका. अत्यावश्यक असल्याशिवाय ती वापरू नका.

त्यानंतर चहा किंवा कॉफी सोडून एखादं हलकं गरम पेय घ्या. दहा मिनिटे ध्यान धारणा करा. मेडीटेशन करा.

 

meditation inmarathi

 

त्यानंतर बिछान्यात पडल्यानंतर मंद प्रकाशात एखादं पुस्तक वाचायला घ्या. ते वाचता वाचताच डोळे मिटू लागले की पुस्तक बंद करून झोपेच्या आधीन व्हा.

• दुसऱ्या दिवशी लवकरू उठून करावयाच्या कामाची आखणी –

सकाळी उठल्या उठल्या लोकांना व्हाट्सएप, फेसबूक इत्यादी चेक करण्याची सवय असते. जर तुम्ही लवकर उठून तुमचे काम पूर्ण करण्याचे ठरवले असेल, तर उठल्या उठल्या मोबाईल बघू नका.

कारण एकदा का आपण व्हाट्सएप इत्यादी उघडले, की आपला बराच वेळ आपल्याही नकळत त्यातच निघून जातो. आणि आपल्या कामाजा बोजवारा उडतो.

त्यामुळे रात्री झोपतानाच उठल्यावर लगेच करावयाच्या कामाची आखणी मनाशी करून ठेवा.

 

fb whastapp inmarathi
the new york times

 

मनाशी अशी आखणी केल्याने उठल्यावर तुम्हाला मोबाईलपेक्षा आपली आखणी महत्त्वाची वाटेल आणि तुम्ही वेळ न दवडता आपल्या कामाला लागाल.

• दुपारी दोन वाजल्यानंतर चहा कॉफी इत्यादी उत्तेजक पेये टाळा –

साधारणपणे चहा-कॉफी ही पेये उत्तेजक स्वरुपाची असतात. ती आपल्या झोपेवर परीणाम करतात. त्यामुळे दुपारनंतर शक्यतो अशी पेये टाळणे हे फायद्याचे ठरते.

त्यामुळे वेळेवर लवकर झोप लागण्यास मदत होते.

• व्यायाम –

व्यायामाचे अनेक फायदे आहेत, त्यातच बिछान्यात पडल्यावर लगेच झोप लागणे हा देखील व्यायामाचा एक फायदा आहे. शरीर जर दमलेलं असेल, तर ते लवकर झोपतं.

त्यामुळे दिवसभरातून तुम्हाला शक्य असेल, ती वेळ ठरवून त्या वेळेत तुम्हाला झेपेल इतका व्यायाम जरूर करा.

तो केल्याने तुम्हाला त्याचे बाकीचे फायदे तर मिळतीलच, शिवाय तुम्ही ठरवलेल्या वेळेला तुम्हाला झोप लागण्यासाठीही हा तुमचा व्यायाम तुम्हाला मदत करेल.

 

Morning-Walk-inmarathi
patrika

 

वरील पाचही गोष्टी तुम्ही कराच असं जेसनचं म्हणणं नाही. पण तो म्हणतो, की वरील पाच गोष्टींमुळे ठरलेल्या वेळेला झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही देखील या पाच गोष्टी नक्की करून बघा.

इथपर्यंत निश्चय आणि त्याप्रमाणे लवकर उठण्याची तयारी यात तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर ८० टक्के यशस्वी झालेले असता.

आता फक्त राहिले वीस टक्के- तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे जाण्यासाठी.

 

१० टक्के अंमलबजावणी –

तिसरा टप्पा दहा टक्क्यांचा. तो आहे अंमलबजावणीचा. ठरलेल्या कामावर फोकस ठेवा. लवकर उठण्यासाठी अलार्म लावा.

शिवाय झोपण्यापूर्वी मनाशीच म्हणा, की सकाळी पाच वाजता मला उठायचे आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मनाला दिलेला आदेश काम करत असतो.

आपले मन त्याच्यावर अंमलबजावणी करत असते. ते तुम्हाला बरोबर पाच वाचता एकदा तरी उठवतेच. ट्राय करून बघा. घड्याळाचा आणि मनाचाही अलार्म वाजला, की तो बंद करून पुन्हा झोपू नका.

सर्वासाधारणपणे आपल्या सर्वांना अशी सवय असते. आणि मग दहा मिनिटं झोपू म्हणता म्हणता अर्धा ते एक तासाची झोप कधी लागून जाते हे कळतही नाही.

त्यामुळे अलार्म वाजला की लगेच उठून बसा. उठल्यावर लगेच व्हाट्सप, ईमेल इत्यादी चेक करायला घेऊ नका. मोबाईल उघडू नका.

 

alarm inmarathi
ewellness magazine

 

वाटल्यास झोपतानाच घड्याळाचा अलार्म बंद करता येणार नाही अशा रीतीने घड्याळ आपल्या हातांपासून दूर ठेवा. परंतु ठरवलेल्या वेळेला उठायचेच नक्की करा.

बेडरूमच्या बाहेर या आणि एक कप चहा किंवा कॉफी प्या. त्या गरम उत्तेजक पेयाने तुमची झोप उडेल, तुम्हाला ताजंतवानं वाटेल. त्यानंतर लगेच आपल्या ठरवलेल्या कामाला लागा.

 

१० टक्के तुमचं नशीब –

तुमच्या कामासाठी, तुमच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत तुम्ही नव्वद टक्के तयारी केली आहे. परंतु उरलेले दहा टक्के हा भाग तुमच्या नशीबाचाही असतो बरं का.

म्हणजे तुम्ही वरीलप्रमाणे सर्व काही ठरवून तुमचा दिनक्रम आखून घेतलात, आणि रात्री लवकर झोपून लवकर उठूही लागलात, तरी ही परिस्थिती नेहमीसाठी तशीच राहील असं सांगता येत नाही.

 

luck inmarathi
Vox

 

माणसाचं सगळंच आयुष्य असं काही घड्याळावर चालू शकत नाही. त्यात अनेक अडचणीही येऊ शकता. माणसाच्या आयुष्यात बदल घडतात, समस्या येतात, अडचणी येतात.

त्यावेळी तुमचा हा दिनक्रम तसाच सुरळीत सुरू राहील असं होऊ शकत नाही.

कधी कधी उलटही होऊ शकतं, तुमचं दैव तुम्हाला तुमच्या निश्चयात साथ देतं, असंही होऊ शकतं.

जेसन म्हणतो, मी आणि माझ्या बायकोने एक कुत्र्याचं पिल्लू पाळलं होतं. ते पिल्लू सकाळी साडेचार ते साडेपाचलाच उठून बसायचं. ती त्याच्या प्रातःर्विधीची वेळ असायची.

 

jason pet inmarathi
medium.com

 

त्या वेळेला उठून त्याला त्यासाठी बाहेर नेलं नाही, तर तो घरातच घाण करून ठेवणार. त्यामुळे मला ते उठलं की उठावंच लागायचं. ते माझ्या पथ्यावरच पडलं.

आपोआपच माझी उठण्याची वेळ सांभाळली गेली. आणि मी वेळेवर उठत गेलो. 

त्यामुळे तुमच्या निश्चयात बाधा आणणाऱ्या गोष्टीही घडू शकतात, किंवा त्यात सहाय्य करणाऱ्याही. त्यातून मार्ग काढत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी वरील फॉर्म्युला वापरत राहा आणि आपले ध्येय पूर्ण करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?