विचित्रपणाची परिसीमा : लॉकडाउनच्या काळात हा माणूस ड्रोनचा वापर करून विकायचा “पान मसाला”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना व्हायरस भारतात आला आणि त्याचा प्रभाव इथल्या जनजीवनावर पडायला लागला.
भारतात आरोग्यसुविधा तशाही कमीच असल्यामुळे आणि आहेत त्या आरोग्य सुविधांवर आणखीन भार येऊ नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला.
जो आता ३ मे पर्यंत वाढवला आहे.
या काळात आरोग्यसेवेसहित अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या. परंतु इतर अनावश्यक गोष्टी सगळीकडेच देशभरात बंद झाल्या.
त्यातलीच बंद झालेली एक गोष्ट म्हणजे पान मसाला. सगळ्यांनाच माहीत आहे की, भारतात गुटखा, पान मसाला यांच्या सवयी लोकांना खूप प्रमाणात आहेत.
आता त्यावर लॉकडाऊन मुळे बंधन देखील आलेलं आहे. गुटखा आणि पान मसाला यांचे व्यसन काय किंवा सिगरेट, दारू यांची व्यसनं आता लोकांना करायला मिळत नाहीयेत.
तरीही काही महाभाग असतात की कोणत्याही परिस्थितीत त्या वस्तू मिळवायच्या आणि आपलं व्यसन पूर्ण करायचे यासाठी आग्रही असतात.
त्यासाठी लागणारा पैसा देखील ही मंडळी खर्च करायला तयार असतात आणि त्यामुळेच मग अशा वस्तूंचा काळाबाजार सुरू होतो.
गिर्हाईक आहे म्हणून बाजार सुरू होतो, की बाजारात वस्तू मिळतात म्हणून गिऱ्हाईक जातात.. हा वादाचा विषय ठरू शकतो. तरीही असा पान मसाला विकण्याचा प्रयत्न गुजरात मधील एका व्यापाऱ्याने केला.
आता सगळी वाहने देखील बंद असल्यामुळे आणि जिकडे तिकडे पोलीस असल्यामुळे असे पान मसाला, तंबाखू विकणे अशक्य आहे.
मग आता या गोष्टी विकायच्या कशा? भारतात नको तो जुगाड करणारी लोकं खूप आहेत, मग त्याला पान मसाला विकणारा व्यापारी तरी कसा अपवाद असेल!!
गुजरात मधल्या या व्यापाराने असंच एक जुगाड पान मसाला विकण्यासाठी केला. त्यासाठी अगदी आधुनिक साधनांचा वापर त्याने केला, म्हणजे ड्रोनच्या मदतीने त्याने पान मसाल्याची पाकीट विक्री केली.
यासंबंधीची हकीकत अशी आहे की, गुजरात मधील मोराबी या शहरामध्ये ड्रोन वापरून पान मसाले विकले गेले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि ही गोष्ट जगाला समजली.
सध्या लोक विनाकारण बाहेर फिरू नयेत म्हणून पोलीस ड्रोनचा वापर करीत आहेत, आणि लोकांवर नजर ठेवत आहेत. त्यामुळे कोणालाही संशय येणार नाही असं त्या व्यापाराला वाटलं असण्याची शक्यता आहे.
पण हे करताना तो हे विसरला भारतातील बाकीचे लोक हे असेच ‘उद्योगी’ आहेत. एकाने या ड्रोनच शूटिंग केलं आणि आणि सोशल मीडियावर ते टाकलं.
पहिल्यांदा हा व्हिडिओ टिकटॉक वर दिसला आणि नंतर तो अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर झाला.
इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि त्याला कॅप्शन दिलं की, “बघा गुजराती पान मसाल्यासाठी काहीही करतील”.
कोरोनाच्या साथीच्या काळातही असे पान मसाले मोराबी मध्ये विकले गेले आणि विकत घेतले गेले.
या व्हिडिओमध्ये ड्रोनला मसाल्यांची पाकीट लटकलेली दिसतात आणि एक व्यक्ती टेरेसवर उभा राहून ही पाकिटे घेतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली.
दोषी व्यक्तींना पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे. आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे. सध्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.
या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की, व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीकरीता कुठल्याही थराला जाऊ शकतात. दारूच्या आहारी गेलेले लोक देखील सध्या मिळेल त्या मार्गाने दारू मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशा बातम्या येत आहेत. दारू विक्रीचेही सध्या ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे. अधिक पैसे देऊन देखील लोक आपली व्यसनं पूर्ण करीत आहेत. म्हणूनच दारूची दुकाने उघडी करा अशी मागणी समाजामधून होताना दिसते आहे.
अगदी ऋषी कपूरने देखील याबाबत आपलं मत मांडले आहे त्यानेदेखील दारू पिणाऱ्या लोकांची सोय सरकारने केली पाहिजे, त्यासाठी दारूचे दुकानं उघडी ठेवली पाहिजे असे म्हटले आहे.
आता अशाही बातम्या येत आहे की दारू प्यायला मिळत नाही किंवा इतर व्यसन करायला मिळत नाही म्हणून काहीकाही ठिकाणी आत्महत्यांची प्रकरण समोर येत आहेत.
दारू मिळवण्याकरिता किंवा इतर कोणत्याही व्यसन करण्याकरिता लागणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी व्यसनाधीन लोक कोणत्याही थराला जात आहेत.
याबाबत बोलताना मुक्तांगणच्या, मुक्ता पुणतांबेकर यांच्या म्हणण्यानुसार, सध्या खरंतर लोकांना व्यसनांमधून मुक्त होण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
कारण काहीकाही लोकांना ही व्यसन सोडायचे असते, मात्र त्या गोष्टी मिळाल्या नाही तर अस्वस्थ होऊन परत लोक व्यसनं करतात. पण जर आता अशा मादक वस्तू मिळत नसतील तर त्याचा फायदा व्यसनाधीन लोकांनी उठवला पाहिजे.
स्वतःला व्यसनमुक्त केले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या घरातील लोकांनी अशा व्यक्तींना मदत केली पाहिजे. व्यसन करता येत नसल्याने या लोकांची चिडचिड होते आणि घरातल्या लोकांवर हा राग निघतो.
अशा वेळेस घरातल्या लोकांनी शांत बसले पाहिजे आणि कुठलाही वाद टाळला पाहिजे असे मुक्ता पुणतांबेकर यांचे म्हणणे आहे.
गुजरात मधील घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की, जे व्यसनांच्या खूप आहारी गेलेली लोक आहेत. त्यांना व्यसन सोडणे अवघड जात आहे. अवैध दारूविक्री सुरू आहे, अनेक हातभट्टीच्या ठिकाणांवर सध्या पोलीस छापा टाकत आहेत.
लॉक डाउनमुळे बरेचसे लोक लॉकडाऊन च्या नियमांचं पालन करीत आहेत. घरी राहणे, सोशल डीस्टनसिंग पाळणे केवळ आवश्यक असल्यासच बाहेर जाणे इत्यादी गोष्टी सांभाळत आहेत.
पंतप्रधानांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाऊन आणखी तीन मेपर्यंत वाढवलेला आहे. त्याविषयी सांगताना पंतप्रधानांनी देखील लोकांनी लॉकडाउनच्या नियमांचं पालन करावं असे म्हटले आहे.
गुजरात मधल्या घटने सारखी एखादी घटना घडते तेव्हा त्याबद्दल मनात खेद निर्माण होतो. कारण पान मसाला खाऊन लोक रस्त्यावर थुंकतात त्यामुळे कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा प्रसार वाढू शकतो.
नियम पाळून घरी बसलेले जे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांनीदेखील अशा अवैध गोष्टी करताना केवळ पैशाचा विचार करू नये, कारण धोका सगळ्यांनाच आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.