मुख्यमंत्री म्हणताहेत – “MSG आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता”
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तसे चांगले शिकलेले, सवरलेले, चांगल्या-वाईटाची जाण असलेले. त्यामुळे त्यांच्या हातून चुकूनही एखादी चुकीची गोष्ट घडणं म्हणजे दूरची गोष्ट..असं आपल्यातील अनेकांचं मत होतं. पण बहुधा आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडून त्यांनी जरा जास्तच अपेक्षा केल्या होत्या की काय असं म्हणायची वेळ आलीये.
तुम्हाला MSG (मेसेंजर ऑफ गॉड) असं स्वत:च स्वत:ला म्हणवून घेणारा तो डॅशिंग (जीवावर येतं, पण म्हणायला लागतंय) बाबा आठवतोय ना? अहो, संत डॉ. गुरमित राम रहीम सिंगजी इन्सान असं भलं मोठं ज्याचं नाव आहे तोच तो! त्याने MSG याच नावाने दोन पिक्चर काढून काही काळापूर्वी प्रेक्षकांच्या डोळ्यावर, कानावर अगणित अत्याचार केले होते.
अहो त्याला चक्क आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते – सर्वोत्कृष्ट अभिनेता (उचल रे देवा आता!) आणि गेल्या वर्षातील सर्वात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (अष्टपैलू आहेच, कारण ज्या गोष्टी करायला इतरांना लाज वाटते तो हा माणूस सहज करून मोकळा होतो) म्हणून नुकताच Bright Award प्रदान करण्यात आला. (मुख्य म्हणजे ही काही पहिलीच वेळ नाही या आधीही दादासाहेब फिल्म फौंडेशनचा सर्वात प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही याला पुरस्कार मिळाला आहे.)
त्या बाबाला अवॉर्ड मिळाल्याचं तेवढ दु:ख नाही. पण आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी यात भागीदार व्हावे याचा विषाद वाटतो. याच अनपेक्षित गोष्टीमुळे अंगाचा तिळपापड झालाय. एवढा कोणता नाईलाज होता, देवेंद्रजी, की या टुक्कार माणसाला पुरस्कार देण्याची वेळ तुमच्यावर यावी?
इतरत्र तुम्ही पारदर्शक कारभाराचे गुणगान गाताय मग इथेही तुम्ही हा मुद्दा उचलून याला पुरस्कार देण्यास विरोध करायला हवा होता. तुम्ही विचारायला हवं होतं की कोणत्या आधारावर कोणत्या ज्युरी टीमने या माणसाची पुरस्कारासाठी निवड केली? तसेच पारदर्शकतेच्या अनुषंगाने पाहिल्यास हा माणूस कोणत्या अँगलने पुरस्कारासाठी पात्र आहे असा सवाल एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर देशाचा एक जबाबदार रसिक म्हणून विचारायला पाहिजे होता. (नक्कीच तुम्हाला निवडणुकीत याचा फायदा झाला असता!)
क्षणभर हे मान्य करू की हा खाजगी पुरस्कार आहे. सरकारी नाही. यामुळे आयोजकांना वाटेल त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. ते ठीकच. पण मग मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सोहळ्यास अनुपस्थित राहायला हवं होतं. स्वतःला देवाचा “मेसेंजर” म्हणवणाऱ्या व्यक्तीला “सर्वोत्कृष्ट कलाकार” असल्याचा पुरस्कार अभिरुची संपन्न फडणवीसांनी द्यायला नको होता.
पण नाही…तुम्ही तुमच्या हातात दिलेला तो पुरस्कार एका अपात्र माणसाच्या हातात देणं, आम्हा अस्सल रसिकांच्या दृष्टीने दुःखद आहे.
एका सुजाण आणि विचारी व्यक्तीकडून अशी चूक होणे आम्हास अपेक्षित नव्हते. अश्याने होतकरू कलाकारावर काय परिणाम होईल याचा तुम्ही पुरस्कार देण्याआधी विचार करायला हवा होता.
परत एकदा नमूद करावंसं वाटतं की ह्या इन्सान बाबा ना कोणता पुरस्कार मिळतो ह्याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी हा पुरस्कार द्यायला नको होता.
ही बातमी खोटी वाटत असेल तर – ही बघा इंडिया टाईम्स ची बातमी – नाहीतर बरेच जण म्हणतील निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री साहेबांना बदनाम करण्याचं विरोधकांच षड्यंत्र आहे म्हणून…!
ही गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हातून घडली असती तर कदाचित हसण्यावारी नेऊन विषय संपला असता. पण आता मात्र नाईलाजाने आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय, “देवेंद्रजी, तुम्ही कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र माझा?”
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi