आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
आपलं आयुष्य खूपदा (बहुतेक वेळा नेहमीच किंवा रोजच) सरळमार्गी चाललेलं असतं. रोजची दिनचर्या ठरलेली असते.
सकाळी उठून ऑफिसचा प्रवास, मग ऑफिसचं काम, मग घाई घाईत दुपारचं जेवण, परत ऑफिसचं काम, परत कंटाळवाणा आणि अजून थकवा आणणारा प्रवास, मग घरी जाऊन रात्रीचं जेवण मग गजर लावून झोपणं!
थोड्या-फार फरकाने सगळीकडे हेच दृश्य असते. रविवार सुट्टीचा पण तोही कसा, कुठे जातो कळत नाही. नोकरदार पुरुष-महिला सगळ्यांचाच हा दिनक्रम असतो.
जर महिला गृहिणी, नोकरी करणारी नसेल तर संपूर्ण दिवस घरकामात जातो आणि तिला तर रविवारी देखील सुट्टी नाही.
शाळा किंवा कॉलेज मधील विद्यार्थ्यांची देखील अशीच कथा! शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवण्या ह्यातून वेळ काढून स्वतःचा अभ्यास आणि काही कल्चरल अॅक्टिविटीज्! संपूर्ण दिवस सगळेच व्यस्त!
आपल्याला ह्या व्यस्त जीवनातून वेळ काढायचा असतो, स्वतः साठी काहीतरी करायचं असतं. “रुटिन लाइफ” चा सगळ्यांनाच कंटाळा आला असतो.
आयुष्यात काही “थ्रिल” च नाही किंवा काही तरी थ्रिलिंग घडावं असं सारखंच प्रत्येकाला वाटत असतं.
ऑफिसच्या मिटिंग्ज नकोत, शाळा किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाटतं, सुटी मिळावी, परीक्षा नकोत काही नको.
नुसता आराम करावा, टि.व्ही बघावा किंवा मोबाइलवर गेम्स खेळावेत, वेब् सिरीज् बघाव्यात असं खूप जणांना खूप काही वाटत असतं.
पण प्रत्यक्षात मात्र असं काही घडत नाही. ते घडणार नाही हे सगळ्यांनाच माहित असतं.
पण, मार्च २०२० च्या मध्यात काही वेगळेच घडले. आक्रितच जणू काही! नोव्हेंबर, डिसेंबर च्या सुमारास चीनमधील वूहान येथे कोविड-१९ अर्थात कोरोना व्हायरस पसरत होता.
हा हा म्हणता फेब्रुवारी मार्च मध्ये भारतातही हा जीवघेणा व्हायरस पसरू लागला. अकस्मात आलेल्या संकटावर उपाय काहीच नाही! ह्या व्हायरसचे औषध, लस काहीच उपलब्ध नाही.
मग करायचं काय? सरकारने पटापट निर्णय घेऊन १५ मार्च पासून शाळा, महाविद्यालयांना तात्पुरती सुटी जाहिर केली आणि सगळे विद्यार्थी खूश झाले कारण, त्यांना जे वाटत होतं ते अनपेक्षितरित्या मिळालं.
हळू हळू परिस्थितीनी गंभीर रूप धारण केलं. २२ मार्च ला एक दिवसाचा टोटल लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. हा रोग संसर्गजन्य असल्याने झपाट्याने सगळीकडे पसरला आणि निदान व्हायच्या आत माणसं मृत्युमुखी पडू लागली.
हा व्हायरस सगळीकडे पसरायच्या आत सरकारने टोटल लॉकडाऊन जाहिर केला. शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या.
सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु असली तरी काही शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
हे सगळं अत्यंत जलद गतीने, कोणाला काही कळायच्या आत घडलं! अनपेक्षित सुट्टी मिळाली, तेव्हा सगळे खुशीत होते, पण परिस्थितीचं गांभीर्य कळल्यानंतर सगळेच घाबरून गेले.
घरातल्या घरात सगळे जणू काही नजरकैदेत असल्यासारखे! सगळेच गोंधळून गेले. कोणालाच पुढे काय होणार ह्याची काहीच माहिती नाही.
हळू हळू लोकांच्या निष्काळजी पणाने म्हणा किंवा आणखी काही कारणांनी म्हणा हा जीवघेणा विषाणू अजूनच पसरत चालला आहे. परिणाम काय? तर हे लॉकडाऊन अजून वाढवले.
सरकारी यंत्रणा, पोलिस ह्यांनी शिस्तीचा बडगा उगारला!
आपल्या तर एकाच महामारीला तोंड देताना नाकी नऊ आले आहेत. काही जणं तर अशी आहेत की, बऱ्याच आजारांवर, गंभीर आजारांवर त्यांनी मात केली आहे.
खूप उदाहरणं आहेत अशी की जे मरणोन्मुख होऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यातील काही प्रसिद्ध खेळाडू आहेत, काही सिने जगतातले तर काही राजकारणाशी संबधित, काही उद्योगपती. एकूण काय तर ह्या सगळ्या आहेत प्रसिद्ध व्यक्ती!
हे सगळे सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्या आजाराला आणि आजारातून बरं व्हायला देखील प्रसिद्धी मिळाली.
पण आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत जी प्रसिद्ध नाही, सेलिब्रिटी नाही, पण त्या व्यक्तीने चक्क २ महामारींना तोंड दिले आहे आणि तिचे वय आहे १०१ वर्षे!
ह्या गोष्टींमुळे नक्कीच सेलिब्रिटी बनेल ही व्यक्ती! चला तर मग जाणून घेऊया त्या व्यक्ती विषयी!
आपल्याला हे माहिती आहेच की, १०८ देशांमध्ये संक्रमित झालेला ह्या व्हायरस ने सगळ्यात जास्त बळी इटली ह्या देशात घेतले. त्याच इटलीमधील ह्या १०१ वर्षांच्या आजोबांची ही कहाणी, ज्यांना Mr. P. म्हणून ओळखले जाते!
ई शान्य इटली मधल्या ह्या आजोबांना मार्चच्या तिसऱ्याआठवड्यात रिमिनी ह्या शहरातील एका रूग्णालयात दाखल केले होते. तिकडे त्यांची कोविद-१९ संदर्भात चाचणी घेण्यात आली जिचा अहवाल सकारात्मक आला.
आता त्यांच्यावर डॉक्टरांनी त्यांच्या परीने इलाज करायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की Mr. P. उपचारांना योग्य तो प्रतिसाद देऊ लागले.
डॉक्टरांनी देखील एक आशा वाटून त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेरीस डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. Mr. P. ह्या व्हायरसला हरवून ठणठणीत बरे झाले आणि घरी देखील परतले.
इथे ही गोष्ट संपत नाही. हे Mr. P. १०१ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म इ.स. १९१९ सालचा! त्या वर्षी स्पॅनिश फ्लु ह्या विषाणूने सगळीकडे थैमान घातले होते (आत्ता कोविद -१९ ने जो हाहाकार माजवलाय) तसाच हाहाकार तेव्हा ह्या स्पॅनिश फ्लु ने माजवला होता.
U.S. Centers for Disease Control and Prevention ने केलेल्या नोंदीनुसार सुमारे ५ कोटी लोकं ह्या स्पॅनिश फ्लु मुळे मृत्युमुखी पडली होती. त्यातूनही हे नवजात Mr. P. तावून सुलाखून निघाले.
रिमिनीच्या उपमहापौर ग्लोरिया लिसी ह्यांनी Mr. P. ह्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
त्यांनी असेही म्हंटले आहे की त्यांनी (Mr. P. ह्यांनी) भूक, उपासमारी, महामारी, प्रगती, संकट, उभारी सगळं सगळं बघितल आहे. हे वृत्त ANSA ह्या इटालियन वृत्तसंस्थेने दिले आहे.
ह्या अशाच लोकांनी जगण्याचा आणि संकटांशी लढण्याचा दृष्टीकोन दिला आहे. आपणही सकारात्मक विचार करून ह्या कोरोना व्हायरसला हरवूया, सरकारच्या आदेशांचे पालन करूया आणि लॉकडाऊन पाळून ह्या व्हायरसची साखळी तोडूया!
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.