Site icon InMarathi

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी १४०० किमी स्कूटी चालवणाऱ्या या हिरकणीला सलाम

begum inmarathi

scroll.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

असं म्हणतात की आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करताही ती आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते.

म्हणूनच आजही आईच्या प्रेमाला तोड नाही. पर्याय नाही. तिचे प्रेम हेच या जगात निस्वार्थ, निरपेक्ष आणि खरे प्रेम असते.

अशाच एका आईच्या प्रेमाचे उदाहरण या कोरोना लॉकडाऊनच्या काळात सध्या चर्चेत आहे.

या आईने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न हे आईच्या आपल्या मुलावरच्या प्रेमाचे उदाहरण आहे. ही आई एक आधुनिक हिरकणी आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या अनेक लोकांच्या बातम्या- कहाण्या आपल्याला वाचायला मिळतात.

 

 

अचानक जाहीर केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक आपल्या घरापासून लांब कुठेतरी अनोळखी जागीही अडकले गेलेले आहेत. ते आपल्या घरी जाऊ शकत नाहीत.

अशा या आणीबाणीच्या काळात त्यांना आणि त्यांच्या प्रियजनांना एकमेकांपासून नाईलाजाने लांब राहावं लागतंय.

त्यातले काही गोरगरीब मजूर तर हातात काम नसल्याने पायी चालत आपल्या गावी, आपल्या कुटुंबाकडे परत जायला निघाल्याच्या बातम्याही आपण वाचतो.

काही तर आपल्या कुटुंबासोबतच ही पदयात्रा करत निघालेत. सोबत बायका आणि लहान लहान मुलांना देखील घेऊन.

अर्थात हे संकट आसमानी म्हणजेच नैसर्गिक असल्याने कुणाचच काही यात चालत नाही. लोक आलेल्या संकटातून जो तो आपल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Al jazeera

 

अशा वेळी जवळपास ६५० किमी दूरच्या गावात अडकलेल्या आपल्या १७ वर्षांच्या मुलाला तिथून परत आणण्यासाठी स्कूटीचा प्रवास करणारी एक आई निश्चितच सगळ्यांच्या आश्चर्यमिश्रित कौतुकाला पात्र ठरलेली आहे.

ही एक आधुनिक हिरकणीच आहे म्हणायला हरकत नाही.

कोण आहे ही धाडसी आई?

या आईचं नाव आहे रजिया बेगम. ती शिक्षिका आहे आणि तिचे वय आहे ५० वर्षे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर बोधान नावाच्या शहरात ती आपल्या मुलांसोबत राहते.

तिथल्या निजामाबाद जिल्ह्यात हे शहर आहे. ती सिंगल मदर असून तिला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी.

 

arab news

 

तिचा मुलगा निजामुद्दीन हा हैदराबादला राहून मेडीकल परीक्षेची तयारी करत होता. तिथून तो आपल्या एका मित्राचे वडील आजारी होते म्हणून त्याच्या मदतीसाठी नेल्लोर येथे गेला होता.

पण तो तिथे असतानाच अचानक लॉकडाऊन जाहीर केल्याने तो तिथेच अडकला.

कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन उठण्याची काहीच निश्चिती नसल्याने रजिया बेगम आपल्या मुलाच्या काळजीने चिंतित झाली. ती बोधानच्या एसीपी जयपाल रेड्डी यांना जाऊन भेटली.

त्यांना सगळी परिस्थिती कथन केली आणि त्यांना विनंती करून त्यांच्याकडून कर्फ्यू पास बनवून घेतला. आणि ६ एप्रिलला रजिया बेगम सकाळी स्कूटी घेऊन निघाली.

कसा केला तिने हा प्रवास?

सोबत तिने पिशवीतच आपल्या खाण्यापिण्याचे सामान बांधून घेतले. मध्ये मध्ये लागणाऱ्या गावात तिला पोलिस चौक्यांनी अडवलं.

त्या सगळ्यांना आपला पास दाखवून आणि आपण ज्या कामासाठी निघालोय त्याबद्दल सांगून तिने पोलिसांचीही सहानुभूती तसेच मदत मिळवली. या ठिकठिकाणच्या पोलिसांनीही तिला सहकार्य केले.

 

india today

 

अशा रीतीने मजल दरमजल करत ती सात एप्रिलला नेल्लोर येथे पोचली. तिथून आपल्या मुलाला स्कूटीवर बसवून ती पुन्हा तोच प्रवास करत परत यायला निघाली आणि ८ एप्रिलच्या संध्याकाळी ती सुखरूप आपल्या बोधान येथील घरात मुलासह परत पोचली.

रजिया सिंगल मदर आहे. ती आपल्या दोन मुलांसह एकटी राहते.

मात्र आपल्या मुलाच्या सुटकेसाठी आणि त्याला परत आपल्यासोबत आणण्यासाठी पन्नाशीच्या वयात,अडचणीच्या काळातही या आईने जाऊन येऊन जवळपास १४०० किमीचं अंतर छोट्या स्कूटीवरून केवळ तीन दिवसांत पार केलं.

हा मार्ग अडचणींचा होता. मध्ये विचारणा होत होत्या. त्यामुळे तिची ही जिद्द वाखाणण्यासारखी आहे. तिच्या या कृतीचे सगळीकडे कौतुक होतंय. आणि तिच्या नावाची चर्चा सध्या तेलंगणा येथे चालू आहे.

 

 

तिची ही कहाणी ऐकली की शिवाजी महाराजांच्या गडावर अडकलेली हिरकणीच आठवते.

ज्याप्रमाणे हिरकणी आपल्या झोपडीत ठेवून आलेल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने गडाचे दरवाजे बंद झाल्यावर तेथील अभेद्य अशा कड्यावरून आपला जीव धोक्यात घालून उतरते आणि आपल्या बाळाजवळ पोचते.

त्याचप्रमाणे रजिया बेगमने आपल्या मुलासाठी आपला जीव धोक्यात आणि अडचणीत टाकून १४०० किमीचा प्रवास एका छोट्या स्कूटीवरून, तोही अवघ्या तीन दिवसांत केल्याचे उदाहरण आहे.

या आधुनिक हिरकणीला दिल से सलाम. काळ कोणताही असो, शिवाजी महाराजांचा की आताचा. आई अजूनही तीच आई आहे, आणि तिचं प्रेम अजूनही तेच प्रेम आहे. निस्वार्थ. आपल्या बाळासाठी प्राणाचीही पर्वा न करणारं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version