कोरोनासह आता ‘हा’ आजार तुमच्या अगदी जवळ येऊ पाहतोय, घाबरून न जाता वेळीच सावध व्हा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोरोनाने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला असून आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात ही त्याचा विळखा वाढलेला आहे. Covid-19 या नावाने ओळखला जाणारा हा आजार जग ठप्प करू पाहतोय.
Covid-19 चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, तरीदेखील दररोज रुग्णांच्या संख्येत आणि कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे.
त्यात एका नवीनच आजाराची भर पडली आहे आणि तो म्हणजे सारी(SARI).

महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये २९ मार्च ते ७ एप्रिल या दहा दिवसात सारी आजारामुळे ११ जण मृत्यू पावले. त्यामुळेच या आजाराकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.
मुख्यतः सारी आणि कोरोना यांची लक्षणे सारखीच असतात, त्यामुळे त्या दोन्हींमधला फरक फारसा कळत नाही. त्या दोन्हीच्या चाचण्या केल्यानंतर रुग्णाला नक्की कोणता आजार आहे हे समजते.
सारी(SARI)म्हणजे काय, तर ‘सिव्हीयर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस’. सारी आणि covid-19 या दोन्ही आजारांची लक्षणे सारखी असतात. हे दोन्ही आजार आपल्या श्वसनसंस्थेचे संबंधित आहेत.
लक्षणं सारखी असल्यामुळे काळजीत भर पडली आहे. औरंगाबाद मध्ये कोरोनापेक्षा सारी आजाराने मृत्यू जास्त झालेले आहेत. म्हणजे सारी आजारांनी दगावलेल्या रुग्णांना कोरोना झालेला नव्हता.
११पैकी फक्त एक जण कोरोना पॉझिटिव्ह होता, बाकी १० होते ते कोरोना निगेटिव्ह होते.

थोडक्यात सारी म्हणजे श्वसन संस्थेला झालेलं इन्फेक्शन. श्वसन संस्थेचा कुठलाही आजार जरी झाला तरीही श्वासोश्वासाला त्रास होतो.
शरीरात ऑक्सीजन घेण्याचे प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो.
आणि रुग्ण रेस्पिरेटरी फेल्युअर कडे जातो. सारी झालेल्या रुग्णाला कोरोना असेल असे नाही कारण कोरोनाव्हायरस हा फुफ्फुसांमध्ये वाढतो.
शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, आणि रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते.
सारी मध्ये रुग्णाला फुप्फुसांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा निमोनिया झाला तर फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते आणि फुफ्फुसाला सूज येते.
श्वास घ्यायला त्रास होतो यालाच सारी म्हणजे सिव्हियर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस म्हणतात.
Covid-19 आणि सारी यामधील साम्य

दोन्ही अाजारात श्वास घ्यायला त्रास होतो.
दोन्ही आजारात ताप खोकला येतो.
मधुमेह उच्च रक्तदाब अस्थमा असणाऱ्या रुग्णांना या दोन्ही आजारांचा धोका जास्त असतो. असे आजार असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होण्याचा दरही जास्त आहे.
Covid-19 आणि सारी मधील फरक
Covid-19 हा विषाणूजन्य आजार आहे तर सारी हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. निमोनिया covid-19 असणाऱ्या रुग्णांना सारी होण्याची शक्यता अधिक असते.
Covid-19 हा संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे covid-19 पॉझिटिव्ह असणारा एखादा रुग्ण इतर माणसांच्या संपर्कात आला तर त्या इतर लोकांनाही covid-19 ची लागण होऊ शकते.
मात्र सारी हा संसर्गजन्य नाही, रुग्णाला जर आधीच कोणताही श्वसन संस्थेचा त्रास असेल तरच सारी होऊ शकतो.
मधुमेह उच्च रक्तदाब इत्यादी आजार असणाऱ्या रुग्णांना आणि साठ वर्षांवरील व्यक्तींना covid-19 पासून अधिक धोका आहे, तर वृद्ध नागरिक आणि लहान बालके यांना सारी आजारामुळे धोका पोहोचू शकतो.
Covid-19 आणि सारी मध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. मात्र सारी या आजारात रुग्ण अक्षरशः धापा टाकत घेत असतो. रुग्णाचा रेस्पिरेटरी रेट ४५ प्रति मिनिट इतका असतो.
Covid-19 ची लक्षणं म्हणजे ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि घसा खवखवणे.
सारीची लक्षणं म्हणजे अचानक सर्दी होणे, ताप येणे, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे, दम लागणे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, श्वसनास संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींची प्रतिकारक्षमता आधीच कमी झालेली असते त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक असते.

सारीमुळे जगभरात दरवर्षी चाळीस लाख मृत्यू होत असतात. त्यातले ९८ टक्के मृत्यू हे श्वसनसंस्थेचे झालेल्या इन्फेक्शन मुळे होतात आणि त्यामध्ये लहान बालके आणि वृद्धांचा समावेश जास्त असतो.
त्यातही वृद्धांना अति उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्यामुळे त्यांना सारी आजार होऊ शकतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जी ॲडव्हायझर दिलेली आहे, त्यानुसार लहान मुलं आणि प्रेग्नेंट महिला यांच्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी सुचवले आहे.
सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसणार्या मुलं आणि महिला यांना उपचारांमध्ये प्राधान्य देण्यात यावे असं सांगितलं आहे.

याचा अभ्यास करण्यासाठी २०१५ आणि २०१६ मध्ये जो डेटा ठेवण्यात आला आहे. २०१५ मधील नोंदीनुसार ३८४५ रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण आहे दोन वर्षाच्या खालील लहान मुले होती.
तर सगळ्या रुग्णांच्या ७५ टक्के रुग्ण आहे १८ वर्षांखालील मुले होती. एकूण रुग्णांच्या नऊ टक्के व्यक्ती हा व्यक्ती या ६५ वर्षांखालील होत्या तर एकूण रुग्णांच्या दहा टक्के व्यक्ती ६५ वर्षांवरच्या होत्या.
२०१६ मध्ये ३५०० व्यक्तींच्या नोंदी ठेवण्यात आल्या, त्यानुसार ५१% रुग्ण हे दोन वर्षांच्या आतील होते.
एकूण रुग्णांच्या ६५ टक्के रुग्ण हे 1१८ वर्षांखालील, एकूण रुग्णांच्या नऊ टक्के रुग्ण हे ६५ वर्षांखालील तर एकूण रुग्णांच्या ११ टक्के रुग्ण आहे ६५ वर्षांवरील व्यक्ती होत्या.
म्हणजेच सारी मध्ये लहान मुले आणि ६५ वर्षांवरील व्यक्तींना धोका अधिक आहे.
सारी हा काही नवीन प्रकारचा आजार नाही. डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू या आजाराप्रमाणे सारी हा आजार देखील आधीपासूनच आहे. फक्त आता कोरोना मुळे या आजाराकडे लक्ष गेले आहे.
कारण दोघांचीही लक्षणे सारखीच दिसतात. फरक इतकाच आहे की सारी मध्ये रुग्ण लगेच अतिगंभीर अवस्थेत पोहोचू शकतो आणि त्याचा मृत्यू ओढवू शकतो.

म्हणूनच सध्या डॉक्टर आणि आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे की सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे जर तुम्हाला दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुठलंही दुखणं अंगावर काढू नका, मनानेच कोणतीही औषधे घेऊ नका, अगदी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार जरी करायचे असतील तरी ते तज्ञांच्या सल्ल्यानेच करा.
कारण हे असे काही करण्यात वेळ जाईल आणि जोपर्यंत डॉक्टरांकडे जाल तोपर्यंत उशीर झालेला असेल. म्हणूनच लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे कारण सध्या कोरोनाआणि सारी आजार बळावत जाताना दिसत आहे.
सारी आजारांमध्ये पेशंट खूप कमी काळात अचानक सिरीयस होतो आणि त्याचा मृत्यु घडून येतो आणि हे औरंगाबाद मधील घडलेल्या घटनांवरून लक्षात येते.
रुग्णाला ऍडमिट केल्यानंतर अक्षरशः दोन-तीन दिवसातच त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणूनच सारी आजाराबद्दल आता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.