या सिनेमांतली पात्र सुद्धा आपल्यासारखी लॉकडाऊनच्या विळख्यात अडकली होती, हे ८ सिनेमे बघाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आज लॉकडाऊन मुळे घरात बसून १८ दिवस होऊन गेलेत. लोक खरोखरच या काळामध्ये कंटाळलेले आहेत आणि आता लॉक डाऊन अजुन १५ दिवस वाढलेला आहे!
म्हणजे अजून किमान एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत लॉक डाऊन राहणार आहे. लोकांच्या चिंतेत भर टाकणारी ही गोष्ट आहे.
कारण इतके इतके दिवस घरातच बसायचं आणि बाहेर जायचं नाही, ही कल्पनाच बऱ्याच जणांना मानवत नाहीये. पण त्याशिवाय पर्याय देखील नाहीये.

तरी आपल्या सोबत आपल्या घरातली मंडळी आहेत आपल्याला मन रमवण्याकरिता टेलिव्हिजन आणि मोबाइल आहेत.
जरी आपण एकमेकांना भेटत नसलो तरीही सोशल मीडियाच्या म्हणजेच व्हाट्सअप, ट्विटर, फेसबूक याद्वारे आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी संवाद साधून आहोत.
जगातल्या कुठल्याही ठिकाणावरून आपण सध्या संवाद घेऊ शकतो.
पण खरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?
बापरे, कल्पनाही करवत नाही!!

परंतु असे काही सिनेमे हॉलीवूड आणि बॉलीवूड मध्ये बनलेले आहेत ज्यानुसार एखादी व्यक्ती काही दिवस, काही महिने, काही वर्ष एकटीच राहते.
आणि तो सगळा काळ ती व्यक्ती कसा व्यतीत करते, जगण्यासाठी कोणत्या संकटांना सामोरी जाते आणि त्यांचा मुकाबला कसा करते याचे चित्रण या सिनेमांमध्ये आहे.
असे बरेच सिनेमे आहेत परंतु आज आपण त्यापैकी आठ सिनेमे कोणते आहेत ते पाहू आणि शक्य झाल्यास आताच्या लॉक डाऊन पिरेड मध्येच ते आपण घर बसल्या पाहू शकतो.
१. ट्रॅप्ड :

एक माणूस मुंबईच्या एका उंच इमारतीत स्वतःच्या फ्लॅटमध्ये अडकतो. त्याला आता बाहेर यायचे आहे, पण तो कुणाला सांगू शकत नाही, कारण त्याचा फोन देखील फुटलाय.
तो ओरडून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय पण कोणाही पर्यंत त्याचा आवाज जात नाही. अशा परिस्थितीत तो माणूस वाचेल? का तहान भुकेने त्याचा जीव जाईल?
२०१६ मध्ये हा सिनेमा आलेला होता, यातील मुख्य भूमिका ही राजकुमार रावनी केले होती.
राजकुमार राव याचे बरेच सिनेमे हे वेगळ्या धाटणीचे आहेत त्यात ‘बरेली की बर्फी’,’ न्यूटन ‘,’शाहिद’ अशा काही सिनेमांचा समावेश होतो.
तर सिनेमाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे. ज्यांनी आधीही ‘उडान’ आणि ‘लुटेरा’ सारखे चित्रपट बनवले.
ट्रॅपड हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम वर तुम्ही पाहू शकता.
२. कास्ट अवे :

२००० या साली आलेल्या या सिनेमामध्ये टॉम हँक्स या कलाकाराने मध्यवर्ती भूमिका केलेली आहे. तो फेडेक्स या कंपनीसाठी काम करतोय.
फेडेक्स ची पाकीट घेऊन तो आता मलेशियाला विमानातून निघालेला आहे. मध्येच त्याचं विमान क्रॅश होतं, तो समुद्रात पडतो.
सकाळी जाग येते तेव्हा तो एका बेटावर असतो आणि त्या ठिकाणी इतर कुणीही माणूस नसतो. त्याच्यासोबत त्याच्याजवळ असतात ते फेडेक्सचे बॉक्सेस.
अक्षरशः आदिमानवा सारखी राहायची वेळ त्याच्यावर येते. काही कंदमुळे खाऊन तो जगायचा प्रयत्न करतोय. कोणता दिवस सुरू आहे? कोणतं वर्ष सुरू आहे?
याचा काहीही पत्ता त्याला नाही त्याला माहित असलेल्या जगाशी संपर्क कसा करावा हे ही त्याला कळत नाहीये.
हा सिनेमा बेतलेला आहे तो एका खऱ्या घटनेवर.जेव्हा तो माणूस परत आला तेव्हा तो बोलणंच विसरून गेला होता. त्याला त्याची भाषा बोलायला देखील जड जात होती.
टॉम हँक्स यांनी अक्षरशः आहे भूमिका जगली आहे. सध्या हा सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे.
३. १२७ अवर्स
१२७ तास म्हणजे पाच दिवस. यामध्ये एक मुलगा दोन खडकांमध्ये अडककेला आहे. जिवंत राहण्यासाठी तो काय काय प्रयत्न करतो हे पाहण्यासारखा आहे, त्यापासून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे.
हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे स्लमडॉग मिलेनियरच्या दिग्दर्शकाने, डॅनी बोयल यांनी. हा सिनेमा युट्युब वर उपलब्ध आहे.
४. धिस इज नॉट फिल्म :
हा एक इराणी सिनेमा आहे. इराणी फिल्म मेकर जफर पनाही यांनी एक सिनेमा बनवला होता,’ऑफसाईड’. ज्यामध्ये त्यांनी इराणमध्ये मुलींना फुटबॉल बघायला का बंदी आहे असा प्रश्न उपस्थित केला होता.
आता सगळ्यांनाच माहीत आहे की इराणमध्ये इस्लामिक शासन असल्यामुळे तिथल्या सत्ताधाऱ्यांना हा सिनेमा काही रुचला नाही. तिथल्या सरकारने जफर पनाही यांना सहा महिने घरात कोंडून ठेवले.
शिवाय वीस वर्ष कुठलाही सिनेमा बनवण्यावर बंदी घातली. त्या सहा महिन्याच्या काळात त्यांनी आपला कॅमेरा चालू केला, आणि खिडकी बाहेरचं जग चित्रित केलं.
ते घरात एकटे आहेत बाहेरच्या परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण नाही बाहेर घडणाऱ्या घटनांकडे ते कसे पाहतात, ज्यात त्यांनी बाहेरचं जगं कस आहे, परिस्थिती किती बिघडत आहे याचं चित्रण केलं आहे.
त्यानंतर वीस वर्षानंतर त्यांनी जे काही चित्रीत केलं होतं ते २०११ मध्ये जगासमोर आणलं तोच हा सिनेमा.
सध्या हा सिनेमा हॉटस्टार वर उपलब्ध आहे.
५. द शायनिंग :
या सिनेमाची गोष्ट म्हणजे लेखकाला काहीतरी लिहायचं आहे. पण त्यासाठी त्याला एकांत हवा आहे, गर्दीत कामाच्या गडबडीत त्याचं लिखाण होत नाहीये.
त्यासाठी तो आपल्या कुटुंबासहित एका रिकाम्या असलेल्या हॉटेलमध्ये राहायला जातो. पण तिथली शांतता इतकी भयावह असते की त्या शांततेचा त्याला त्रास व्हायला लागतो.
त्यात त्याचा मुलगा चित्रविचित्र मित्र बनवतो. हा एक हॉरर सिनेमा आहे त्याचे चित्रणही त्याच पद्धतीने केलेलं आहे. प्रख्यात लेखक स्टीफन किंग यांच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतलेला आहे.
१९८६ मध्ये हा प्रदर्शित करण्यात आला भूमिकेत होते जॅक निकल्सन…सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
६. लाइफ ऑफ पाय :
२०१२ मध्ये आलेला हा सिनेमा बऱ्याच जणांच्या लक्षातही असेल. एका प्राणिसंग्रहालयाचा मालक आपलं घर शिफ्ट करतोय, पण सगळ्या प्राण्यांसहित, तेही समुद्रमार्गे.
वाटेत समुद्रात प्रचंड वादळ उठतं. सगळे त्यात बुडून जातात पण एका छोट्या नावेत एक मुलगा आणि एक वाघ वाचतात. भरकटलेल्या त्या नावेतून ते कसा प्रवास करतात हे पाहण्यासारखा आहे.
हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे तो ऐंग ली यांनी. हा सिनेमा हॉटस्टार आणि युट्युब वर उपलब्ध आहे.
७. बरिड :

रायन रेनॉल्ट या अभिनेत्याने या चित्रपटात पॉल या अमेरिकन कॉन्ट्रॅक्टरची भूमिका वठवली आहे.
या सिनेमाची सुरुवात अशी दाखवली आहे की पॉल बेशुद्ध आहे , तो शुद्धीवर येतो तेव्हा चहूबाजूला अंधार असतो. आणि आपण कुठे आहोत याचा तो विचार करायला लागतो.
उठायचा प्रयत्न करतो पण त्याला उठता येत नाही. मग तो आपल्या बरोबर काय झालंय हे आठवतो. मग त्याच्या लक्षात येतं की आतंकवाद्यांबरोबर त्याचा सामना झालाय, त्याच्या डोक्याला दगड लागला आहे.
तेवढ्यात त्याचा फोन वाजतो तो फोन उचलतो पलीकडून आवाज येतो, ” रात्रीच्या नऊ पर्यंत पन्नास लाख डॉलर्स तयार ठेव नाहीतर आहे तिथेच तुला सोडण्यात येईल.”
तो नीट पाहतो तर तो एका कॉफीन मध्ये बंद आहे त्याच्याजवळ फक्त एक टॉर्च आणि बॅटरी संपत असलेला फोन आहे, आता तो काय करेल? तो वाचेल का?
असा उत्कंठावर्धक सिनेमा नक्की पहा. हा सिनेमा हुलुवर उपलब्ध आहे.
८. कौन :
१९९९ मध्ये आलेला राम गोपाल वर्मा यांचा हा सिनेमा. बाहेर पाऊस पडतोय शहरांमध्ये एक सायको किलर फिरतोय, त्याची दहशत त्या शहरावर आहे.
एका घरामध्ये एकटीच मुलगी आहे आणि तितक्यात दारावर टक टक ऐकू येते. मुलगी घाबरते, ती दार उघडेल का? नक्की पहा हा सिनेमा.
यात प्रमुख भूमिकेत आहेत उर्मिला मातोंडकर, मनोज वाजपेयी, सुशांत सिंह.
हा सिनेमा युट्युब वर उपलब्ध आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.