कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी संशोधन होत असलेली ‘ही’ पद्धत यशस्वी ठरली, तर आपण जिंकू हे नक्की
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतामध्ये कोरोनाचे संकट झपाट्याने वाढत आहे. दररोज मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. मात्र आता भारतासमोर एक आशेचा किरण दिसू लागला आहे.
प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी भारतामध्ये प्रयत्न सुरू आहेत. यासाठी परवानगी मिळाली असून या माध्यमातून उपचाराला गती मिळाली तर नक्कीच कोरोनाचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल.
इतर देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. अमेरिकेमध्ये कमी रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला होता. याचबरोबर चीन तसेच इतर देशांमध्येही हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झालेला आहे.
त्यामुळे आता भारतामध्ये यासाठी यंत्रणांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे जर हे संशोधन भारतात यशस्वी ठरले तर निश्चितच त्याचा फायदा भारताला होईल.
जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी अद्यापही लस तयार झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर या उपचारकडे पाहिले जात आहे.
नेमकी काय आहे ही उपचार पद्धती, याचा भारतात वापर कसा केला जाईल याबद्दल जाणून घेऊया.
भारतीय वैद्यक परिषदेने आता प्लाझ्मा चाचणीसाठी परवानगी दिली आहे. मात्र यासाठी नियमांची आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे.
याचबरोबर इतर देशात कशाप्रकारे ही थेरपी वापरली जाते याचाही अभ्यास सुरू आहे. सध्याच्या घडीला केवळ गंभीर स्थितीत असणाऱ्या लोकांवरच उपचारासाठी ही पद्धत वापरली जाणार आहे.
त्याचे परिणाम आणि त्याला येणारा प्रतिसाद बघून त्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी आधी क्लिनिकल ट्रायल पार पाडली जाईल.
याचबरोबर व्हायरसचे स्वरूप आणि त्याबाबतीत अधिक माहितीसाठी सीएसआयआयच्या हैद्राबाद आणि दिल्ली येथील प्रयोगशाळांमध्ये संशोधन केले जात आहे.
सध्याच्या घडीला कोरोनाबद्दलच्या वेगवेगळ्या संशोधनाला त्वरित मंजुरी मिळत असल्याने या प्लाझ्मा थेरपीलासुद्धा मंजुरी त्वरित मिळेल त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पार पडेल.
काय आहे ही थेरपी?
या उपचार पद्धतीत कोरोनामुळे झालेल्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील काही प्लाझ्मा काढून हाच आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तात सोडला जातो.
यामुळे प्रतिकार करण्याची शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्ण ३ ते ७ दिवसांत बरा होऊ शकतो असं तज्ञांच मत आहे.
ही उपचार पद्धती सुमारे शंभर वर्षे जुनी असून १९१८ ला फ्लू ची साथ आली होती, त्यावेळीही तिचा प्रयोग झाला होता. इतर देशांमध्येही याचा प्रयोग याआधी करण्यात आलेला आहे.
अलीकडेच इबोलाच्या भयंकर साथीवर मात करण्यासाठीसुद्धा याचा वापर करण्यात आला होता.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधील तज्ञांनीसुद्धा या पद्धतीला महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून सांगितले आहे.
मात्र या पद्धतीसाठी योग्य वेळ आणि टायमिंग साधण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टर सांगतात. त्याचबरोबर प्रत्येकवेळी ही थेरपी यशस्वी होईलच याची खात्री देता येत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
जगभरात सध्याच्या घडीला कोरोनाला रोखण्यासाठी अद्यापही लस उपलब्ध नाही. याबद्दल संशोधन सुरू असले तरीही त्याला यश मिळताना दिसत नाही.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर उपचारासाठी पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे.
शांघाय, चीन, अमेरिका तसेच इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर याला परवानगी नसल्यामुळे त्याचे स्वरूप मर्यादित आहे.
त्याचबरोबर अधिकृतरित्या याला यश आल्याचे कोणीही ठोसपणे जाहिर केलेले नाही. त्यामुळे अद्याप हवे तसे परिमाण न मिळाल्याने याबाबत सखोल संशोधन आवश्यक असल्याचे संशोधक आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवरच प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास परवानगी आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो.
आजारातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून एकदाच काढलेल्या प्लाझ्माचा वापर दोन रुग्णांवर उपचार करण्यासाठी करता येतो.
म्हणूनच या थेरपीचा वापर करण्याची परवानगी मिळालेल्या संशोधन संस्था आजारातून बरे झालेल्यांना प्लाझ्मा देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र केवळ या पद्धतीनेच उपचार करून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही.
या पद्धतीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोनाचा सामना करण्यास मदत होते. इतर उपचारपद्धती आणि औषधांची जोड देऊन ही पद्धत फायदेशीर आहे मात्र त्यासाठी त्याचा प्रयोग करणे आवश्यक आहे.
उपचार कसा होतो?
विषाणू किंवा जिवाणूमुळे झालेल्या आजारातून एखादी व्यक्ती बरी झाल्यावर तिच्या शरीरात त्या विषाणू अथवा जिवाणूला विरोध करणारी प्रतिजैविके तयार होतात.
ही प्रतिजैविके शरीरात अल्पकाळ किंवा कायमस्वरूपी राहतात. याचप्रमाणे, कोविड १९ विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा आजारी व्यक्तीच्या रक्तात सोडल्यास ही प्रतिजैविके विषाणूविरोधात काम करतील.
ही प्रतिजैविके कोरोना विषाणूच्या बाह्य आवरणावर हल्ला करत त्यांना मानवी पेशींमध्ये घुसण्यापासून रोखतात. यामुळे विषाणू नष्ट होऊन प्रतिकार शक्ती वाढते, असे तज्ञ सांगतात.
मात्र सध्याच्या घडीला मर्यादित लोकांवरच याचा प्रयोग करणे शक्य आहे. एकदम सर्व पेशंट्सवर हा प्रयोग करणे शक्य नाही चीनमध्ये १० रुग्णांवर याचा प्रयोग सुरुवातीला करण्यात आला होता त्यांना चांगले परिणाम त्यावर दिसून आले.
जगातील काही मोजके तज्ञ डॉक्टर याबाबत संपर्कात असून त्यावर काम करत आहेत. त्यामुळे नक्कीच याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
थोडक्यात सांगायचं तर प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाच्या संकटामध्ये एक आशेचा किरण दिसून येत आहे.
मात्र त्यासाठी संशोधन आणि एकंदर टेस्टची प्रक्रिया व्यवस्थित पार पडणे आवश्यक आहे तरच कोरोनाच्या संकटावर मात होणे शक्य आहे.
यासाठी सर्व देश आणि वैद्यकीय यंत्रणा एकमेकांना चांगले सहकार्य करत आहेत. त्यामुळे नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू शकतात अशी आपण आशा करूया.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.