Site icon InMarathi

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग २)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : शरदमणी मराठे

===

या लेखाचा पूर्वार्ध : रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग १)

===

पहिल्या भागात जनकाला सीता शेत नांगरताना सापडली तिथपर्यंतची गोष्ट चित्रांमधून उलगडली आहे. आज सीता स्वयंवराच्या चित्रापासून ह्या भागाला सुरुवात करूया. सीता स्वयंवर हा रामायणाच्या बालकांडाचा शेवटचा टप्पा आहे.

ह्या पुढे खरे तर अयोध्या कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड आणि उत्तर कांड असे रामायणाचे पाच भाग आहेत. त्या भागांत बालकांडापेक्षा अधिक नाट्यमय प्रसंग आहेत, विविध स्थानी ते घडत असल्याने चित्रकाराला खरे तर अधिक आव्हान देणारे आहेत. असे असले तरी मिनिएचर चित्र ह्या प्रकारातील चित्रे पहिल्या भागावर आधारलेलीच अधिक मिळतात.

त्याचे एक कारण असे असावे की अवतार पुरुषाचा जन्म, बालपण आदि विषय भावनिक दृष्ट्या अधिक परिणामकारक वाटले असावेत. अर्थात हे निरीक्षण म्हणजे निष्कर्ष नाही. कदाचित अशीही शक्यता आहे की काळाच्या ओघात पुढली चित्रे हरवली वा नाश पावली असतील तर काही चित्रे ब्रिटीश राजवटीत पुरातन कलेची ‘किंमत’ कळणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी पळवलीही असू शकतात.

 

 

हे १७व्या शतकाच्या सुरुवातीचे (१६१०-१५ च्या आसपासचे) मुघल शैलीतील चित्र. सुमारे ४०० वर्ष जुने असूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. ओरछा हे सध्याच्या मध्यप्रदेश मध्ये बुंदेलखंड परिसरात आहे. तत्कालीन कलाप्रेमी राजांच्या काळात इथे ह्या कलेचा विकास झाला. श्यामल वर्णाच्या श्रीरामाने शिवधनुष्याचा भंग केल्याचे दृश्य आहे.

सीता मात्र ह्या दृश्यात दिसत नाहीत. का दाखवली नसेल?

 

हे राम-सीता विवाहाचे चित्र. पहाडी प्रकारातील मंडी शैलीतील. मंडी हे सध्याच्या हिमाचल प्रदेशातील गाव. तेथील स्थानिक राजघराण्याचे दैवत राम असल्यामुळे ह्या विशिष्ट कामासाठी हे कलावंत आले आणि मंडी येथील शैली विकसित झाली. हे १८व्या शतकातील चित्र आहे.

लग्नवेदी, श्यामल रंगातील व उजव्या हातात खड्ग धरलेला राम, सोबत सीता. मंडपात चार कोपऱ्यात उभे केलेले केळीचे खांब वगैरे तपशीलवार दिसत आहे. हे शांगरी रामायणातील एक पृष्ठ आहे. कुलू-मंडी प्रदेशातील शांगरी येथील राजघराण्यातील राजा रघुवीर सिंग यांच्या संग्रहात हे सचित्र रामायण होते.

तसे २५०+ वर्षे जुने असूनही रेखाटने सुस्पष्ट व रंग टवटवीत आहेत.

 

 

हे १७व्या शतकातील मध्यावरचे चित्र. मध्य भारतातील माळवा शैलीमधले. शूर्पणखेच्या नाकावर बाण मारून तिला विद्रूप करताना लक्ष्मण. श्यामल वर्णात रेखाटलेला धनुर्धारी राम व सीता देखील दिसत आहेत. ३००+ वर्षे जुने चित्र असूनही चांगल्या स्थितीतील चित्र आहे.

अर्थात रामायणात ही घटना घडली तेव्हा राम, लक्ष्मण, सीता हे वनवासात होते. पण चित्रकाराला आपला देव साध्या पर्णकुटीत दाखवावा असे वाटले नसावे. त्यामुळे कळस, वेलबुट्टीच्या भिंती अशा पक्क्या घरात ही मंडळी दाखवली आहेत!

 

 

हे १८व्या शतकातील पहाडी प्रकारातील मंडी शैलीतील चित्र. ह्या शैली विषयी आधी लिहिलेच आहे. मगाशी उल्लेखलेल्या सचित्र शांगरी रामायणातील हे एक पृष्ठ आहे. सुवर्णमृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा पाठलाग करताना श्यामल वर्णात चितारलेला राम.

मुख्यत: पिवळ्या रंगात असलेल्या ह्या चित्रात सुवर्ण-मृगाचे सोनेरी इफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न विशेष लक्षात येतो.

 

 

पहाडी प्रकारातील चंबा शैलीतील हे चित्र. सध्याच्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्याचे मुख्य गाव. चंबा संस्थानचा राजा उमेद सिंग यांच्या आश्रयाने ही कला विकसित झाली. हे चित्र १८व्या शतकातील आहे. चित्रातील रेखांकन, रंग आकर्षक आहेत. मला वाटतं की हे सर्वच पहाडी प्रकारच्या शैलींचे वैशिष्ट्य ठरावे.

“सीता हरण – जटायू मरण” असे सर्व प्रसंग एका चित्रात रेखाटले आहेत.

मुनी वेशातील रावण, रथातील दशानन रावण, रावणाशी लढून घायाळ झालेला जटायू, रेखीव पर्णकुटी, तिथे जमिनीवर असलेले किडूक-मिडूक, सरपणाची मोळी, पर्णकुटी बाहेरील छोटे झाड ते शेजारील मोठे झाड अशी बांधलेली दोरी किंवा वेल असे सर्व तपशील बघताना मजा येते.

 

 

हे वालीच्या वधाचे चित्र. काल १७व्या शतकाच्या मध्यावरचा. मध्यभारतातील माळवा शैली मधले चित्र. नेहमीप्रमाणे श्यामल वर्ण असलेला राम व सोबत लक्ष्मण दिसत आहेत. वालीचा धाकटा भाऊ सुग्रीव व (बहुदा) त्याची पत्नी समोर उभे आहेत.

बाकी राम लक्ष्मण वनवासात असले तरी त्यांचे चित्रण करताना दागिने, मुकुट वगैरे दाखवले आहे. हे कलाकाराने घेतलेले स्वातंत्र्य!

 

 

हे पहाडी प्रकारातील कांगरा शैलीतील चित्र. मागे म्हटल्या प्रमाणे पहाडी शैली मध्ये आढळणारे रंगांचे वैविध्य आणि रेखाटनातील सुबकपणा इथेही दिसतो आहे. चित्र १९ व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील. प्रसंग अशोकवनातील.

रावण सीतेचे मन वळवण्याच्या प्रयत्नात आहे की तिने रावणाचा पती म्हणून स्वीकार करावा. सीताही त्याला नकार देत गंभीर परिणामांची कल्पना देते. राक्षसकुलातील पहारेकरी स्त्रिया वेगळ्या रेखाटल्या आहेत. समोर दशानन रावण देखील सुबक रेखाटला आहे.

 

 

हे देखील पहाडी प्रकारचे बिलासपूर शैलीमधले चित्र. काळ १७७० च्या सुमाराचा. आधीच्या चित्रात वर्णन केलेली पहाडी प्रकारातील सर्व वैशिष्ट्ये इथेही दिसत आहेत. प्रसंग अशोक वनात हनुमान भेटायला आलेला आहे. स्वत:चा नेहमीपेक्षा छोटा आकार करून. पहारेकरी स्त्रिया हनुमानाच्या जादूने सुस्तावलेल्या आहेत, (त्यांचे पोशाखही विविधरंगी आहेत!)

अशोकवनातील झाडांचे चित्रण, रावणाच्या प्रासादाचे चित्रण, सीता – हनुमान संवादाचे चित्रण अत्यंत रेखीव आहे.

 

मध्य भारतातील माळवा शैलीतील हे चित्र. सतराव्या शतकातील आहे. ठसठशीत मानवाकृती हे माळवा शैलीचे वैशिष्ट्य इथे दिसते आहे.

लंकादहना संबंधी विविध प्रसंगांचे चित्रण ह्या एका चित्रात केले आहे. शेपटी पेटलेला हनुमान दिसतो आहे, विवध प्रासादांत लागलेल्या आगींमुळे महिला वर्ग भयभीत आहे. खुद्द रावणाच्या महालात भयाचे वातावरण दिसते आहे तर दुसरीकडे कुंभकर्ण त्याच्या खास झोपेत आहे आणि त्याला उठवण्याचे विविध प्रयत्न सुरु आहेत.

३००+ वर्ष जुने चित्र असून बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.

 

 

मध्य भारतातील राघोगढ शैलीतील हे चित्र. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. मध्य प्रदेशातील सध्याच्या ‘गुणा’ लोकसभा निर्वाचन क्षेत्रापासून (जिथून ज्योतिरादित्य सिंदिया २०१९ मध्ये हरले!) ३०-३५ किलोमीटरवर हे राघोगढ नावाचे ठिकाण आहे. एके काळी ते संस्थान होते व तिथे लोक-चित्रकलेचे मोठे केंद्र होते.

पोर्ट्रेट चित्रे, कथानक उलगडून दाखवणारी मालिका चित्रे ही ह्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. चित्रात द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारा हनुमान दिसत आहे. संजीवनी नावाच्या औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण पर्वत उचलून आणल्याची ही कथा प्रसिद्ध आहे.

चित्रात हनुमानाचा आवेश, शरीर सौष्ठव वगैरे गोष्टी विशेष आहेत.

 

हनुमानाने द्रोण पर्वत उचलून आणला ह्या प्रसंगानंतर येते ते राम-रावण युद्धाचे चित्र. पहाडी पद्धतीच्या व गुलेर शैली मधील हे चित्र.

सध्याच्या हिमाचल प्रदेश येथील कांगरा जिल्ह्यात येणारे गुलेर हे नगर. राजा हरी चंद यांच्या कांगरा संस्थानचा भाग असलेले. तेथे ही शैली विकसित झाली हे आधी सांगितले आहेच.

राम – रावण ह्यांच्यात झालेल्या घनघोर लढाईचे चित्रण आहे. निकराने लढणारे राक्षस, वानरसेना, दशाननाचा वध झाल्यानंतर स्वर्गातून झालेली पुष्पवृष्टी वगैरे नेटके चित्रण आहे. कालावधी १७८०च्या आसपास.

रामाचे चित्रण श्यामल रंगात आहे, पण राम घोड्यावर स्वार झालेला दाखवला आहे. रामाच्या पूर्ण वनवासाच्या चित्रणात न दिसलेला घोडा ह्या चित्रात दिसतो. रामायणात – महाभारतात वेळोवेळी येणारे घोड्यांचे उल्लेख मोठ्या वादाचे विषय बनले आहेत. पण त्या बद्दल नंतर कधीतरी.

 

 

आणि हे शेवटचे चित्र. शेवट गोड करणारे. १७व्या शतकातील. मध्य भारतातील माळवा शैली मधले.

रावणाच्या वधानंतर रावणाच्या पुष्पक विमानातून अयोध्येला परतण्याच्या प्रसंगाचे चित्रण. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि मंडळी दिसत आहेत. विमानाच्या दोन्ही टोकांवर असणाऱ्या ध्वज-पताका वाऱ्यामुळे एकाच दिशेने फडकत आहेत. खाली ढग आहेत. आकाशात विहार करणारे (बहुदा) हंस पक्षी आहेत.

सगळ्यात विशेष म्हणजे विमानाला चाके आहेत! सेफ लँडिंग साठी!! कलाकाराने कल्पिलेले हे विमान मात्र खासच आहे.

सुमारे दोन डझन मिनिएचर पेंटिंग मधून उलगडलेली रामकथा आपल्यासमोर मंडळी आहे. आपण सर्वांनी हल्ली नाटक सिनेमाच्या जाहिराती बघितल्या असतील. विशेषत: रहस्यमय कथानक असणाऱ्या नाटक/ सिनेमाच्या जाहिरातीत “सुरुवात चुकवू नका/ शेवट सांगू नका” अशा सूचना प्रेक्षकांना दिलेल्या आढळतात.

तर दुसऱ्या बाजूने सुरुवात मध्य शेवट असे सर्व काही वर्षानुवर्षे ज्ञात आहे, पिढ्यानपिढ्या जे कथानक ऐकले/ सांगितले गेले आहे त्या रामायण – महाभारत ह्या मालिकांना आजही उदंड प्रेक्षक वर्ग मिळतो आहे.

ह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.

===

सर्व चित्रे ‘राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली’ यांच्या संग्रहातून साभार.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version