आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
आयसिसच्या नावाने कंठशोष करत करत सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधकांना गेल्या आठवड्यात एक काव्यमय दणका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सात देशांतल्या मुस्लिमांना देशात पाऊल टाकायला बंदी केली आणि जगभरातल्या पुरोगाम्यांच्या डोक्यावर छप्पर उडून आभाळ कोसळले. त्यांच्या नावडत्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हे कठोर पाऊल उचलल्यावर तर ही जमात बिथरली नसती तर नवलच!
याच पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया देशाने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशातून हाकलून दिल्याची घटना समोर येतेय. जगभरच्या ट्रम्पविरोधी पुरोगामी लोकांना आता खऱ्या अर्थाने भूकंपाने पळापळीची वेळ आली आहे.
अमेरिकेने सात देशांमधल्या नागरिकांना देशात ना घेणे हा जणू काही मुस्लिमविरोधी डाव असल्याचाच आव या जमातीने घेतला. आयसिस, इस्लाम इस्लामिक दहशतवाद आणि जगभर पसरलेले मुस्लिम बांधव यांच्यात कायमच गल्लत करणं हा खास डावा पुरोगामी खेळ! त्यामुळे बदलत्या जगात काहीही घडलं की ते त्यांच्या पुस्तकी आणि भावनिक आकलनाच्या बाहेर असतं आणि मग दात घशात जायची वेळ येते.
त्या सौदी अरेबियाने – जिकडे मक्का मदिना आहेत त्या सौदी अरेबियाने – ज्या देशातल्या राजाला आज सुन्नी इस्लाममधला सर्वोच्च असल्याचा मान आहे – त्या सौदी अरेबियाने ज्यांचा इस्लामिक धर्मप्रसाराला अधिकृत आणि संपूर्ण पाठींबा आहे – त्या सौदी अरेबियाने ज्यांचा धर्मप्रसाराची चळवळ म्हणून दहशतवादाला अधिकृत पाठींबा आहे – त्या देशाने पाकिस्तानच्या लोकांना आपल्या देशातून हाकलून देणं ही फार फार महत्वाची घडामोड आहे. बदलत्या जगाच्या संदर्भात तिचा अभ्यास करायला हवा.
डोनाल्ड ट्रम्प अश्यावेळी सत्तेवर आलेले आहेत जिकडे सौदीच्या तेलावर अमेरिकेला अजिबात अवलंबून राहावं लागणार नाहीये. अमेरिका देश जर तेलाच्या बाबतीत स्वयंपपूर्ण झालेला आहे तर अमेरिकेला जागतिक दुखणी आपल्या डोक्यावर घेण्याची गरज काय असा अत्यंत सामान्य प्रश्न ट्रम्प विचारत असल्याने त्याच्या सत्तेवर येण्याचा सौदीने पाकिस्तानी लोकांना हाकलून देण्याशी संबंध शून्य!
सध्या सौदीची दुखीच वेगळी आहे. सौदी या देशाचा उदयकाल हा केमाल पाशा यांनी खिलाफत ही संस्थाच मोडीत काढल्यानंतरचा आहे. नेमकं काय घडलं त्या काळामध्ये? याचं कारण समजून घ्यायला हवं.
महम्मद पैगम्बरानंतर इस्लाममध्ये खलिफा म्हणजेच उत्तराधिकारी स्थापन केला गेला. महम्मद पैगंबरांची मोठी लेक फातिमा हिचे शौहर इमाम अली हे खलिफा मानणारे लोक पुढे शिया मानले जाऊ लागले तर दुसरीकडे ही निवड लोकाकडून व्हायला हवी असे मानणाऱ्यांनी अबू बक्र यांची खलिफा म्हणून निवड केली. म्हणजे स्थापनेनंतर शतकाच्या आतच एका इस्लामचे थेट दोन तुकडे झाले. पुढे हा दुसरा गट सुन्नी म्हणून ओळखला जाऊ लागला. मरणोन्मुखशय्येवर असताना अबू बक्र यांनी उमर इब्न खताब यांची पुढचे खलिफा म्हणून निवड केली. यांची हत्या पिरुझ नाहावंडी नावाच्या माथेफिरूने घडवून आणली. शिया आणि सुन्नी इस्लाम मध्ये दोन हात होऊ लागले ते तेव्हापासून.
हे प्रकरण इतकं गंभीर आहे की दोन्ही पंथ केवळ स्वत:ला मुस्लिम मानून एकमेकांना काफर समजतात. “ला इलाइल्लीलाह मुहम्मद उर रासुलील्लाह.” म्हणजेच जगात अल्लाह हे एकच देव असून महम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. अर्थातच त्यांच्या आज्ञा आणि त्यांचं संचित म्हणजे कुराण. त्यात उत्तर नाही सापडलं तर महम्मदांच्या जीवनप्रवासातल्या घटनांवरून, अर्थात हदीस वरून, याची उत्तरं सापडतील, इतका हा सरळ मामला आहे. जो या गोष्टींना मनात नाही तो काफर आणि काफराचं काय करायचं हे कुराणात सांगितलं आहेच.
आजच्या जगात सौदी हा सुन्नी देश आणि आयसिस सारखी संघटनाही सुन्नीच. परंतु १९२० नंतर केमाल पाशा यांनी खलिफा ही संस्थाच मोडीत काढली आणि त्यानंतर नव्वद वर्षांनी आयसिसच्या अबू बक्र बगदादीने खिलाफत स्थापन केली. ‘इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ हे नाव न लावता आयसिस थेट ‘इस्लामिक स्टेट’ हे नाव लावू लागली. या संघटनेचा आवाका प्रचंड मोठा आहे. आयसिस ही आता केवळ एक संघटना राहिली नसून आयसिस हा एक विचार झाला आहे. भारतीय पुरोगाम्यांच्या लाडक्या भाषेत सांगायचं झालं तर अल कायदा किंवा हिजबुल मुजाहिदीन जर विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल असतील तर आयसिस ही हिंदुत्ववाद आहे. (तुलना अप्रस्तुत किंवा टोकाची वाटू शकते – फक्त “विचार” आणि “परिणाम” ह्यातील साम्य दर्शवण्यासाठीची ही उदाहरणं आहेत.)
जगभरात आयसिसचे पाठीराखे तयार होतायत आणि ते आयसिसशी आपलं नाव जोडून घातपाती कृत्य करायला मागेपुढे पाहत नाहीयेत. आणि त्यांची पापं आयसिसही बिनधास्त आपल्या नावावर घेत आहे. अवघा इस्लाम एक आहे आणि याच इस्लमाचं राज्य जगभरात आणायचं आयसिसचं स्वप्न आहे.
ISIS च्या “ग्लोबल” प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी २ वर्ष जुनं, Dailymail चं पुढील इन्फोग्राफिक पुरेसं आहे.
ISIS चं हे रूप बघितल्यावर लक्षात येतं की हिलरी क्लिंटन छाप बोटचेपेपणा (इतका की हेच तर आयसिसच्या मागे नाहित ना असा संशय यावा) किंवा ट्रम्पछाप आततायीपणा आयसिसविरुद्ध लढताना कामाचा नाही. आयसिस ही प्रत्येकाची, अगदी प्रत्येक आयसिस सदस्य होऊ इच्छिणाऱ्या मुलामुलींच्या आईबापाची लढाई आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर आयसिसने सौदी अरेबियाला तीन प्रकारे धडकी भरवली आहे.
पहिली लौकिकदृष्ट्या. आयसिस हा जगभरातल्या सुन्नी मुस्लिमांच्या आदराचा विषय झाला तर सौदी अरेबियाची इभ्रत कमी होण्याचा धोका आहे. सौदीच्या राजाचं स्थान जर आयसिसच्या खलिफाने घेतलं तर सौदीच्या राजाला हे नाही आवडणार.
दुसरा मुद्दा व्यावसायिक तेलाचा. इराकमधील मोसुल प्रांतातल्या तेलविहरींवर कब्जा करत आयसिसने आपला आर्थिक प्रश्न केव्हाचाच सोडवला आहे.
आजच्या घडीला आयसिसने तिकडचं तेल विकायला काढलंय. त्यांना तय्यीप एर्दोगेन (टर्कीचे अध्यक्ष – मोदींची तुलना यांच्याशी व्हायची) हा महामूर्ख मनुष्य गिऱ्हाईक उघडपणे मिळाला आहे, अजून छुपा व्यापार किती देश करत असतील कोणास ठाऊक, दाम करी काम येड्या, दाम करी काम. इराणने आपलं तेल विकायला काढलंय, अमेरिकेसारखा ग्राहक स्वयंसंपूर्ण होऊन वर तेलाचा पुरवठादार बनतोय, रशिया केव्हापासून तेलाच्या बाजारात व्यापाराला उतरलाय या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती अजून पडणं सौदीला परवडणारं नाही.
तिसरी घटना म्हणजे इराणच्या कारवाया.
जगभरामध्ये फक्त दोन देश आयसिसबद्दल कोणताही गोंधळ मनात न ठेवता या संघटनेला नेस्तनाबूत करू शकतात. एक रशिया आणि दुसरा, रशियाच्या मदतीने इराण.
यापैकी इराण हा शिया देश असल्यामुळे आयसिस जगभरात डोईजड होणं इराणच्या अस्तित्वावर घाला घालू शकतं. रशियाच्या व्लादिमिर पुतीनकडे बोटचेपेपणा नाही त्यामुळे आयसिसला दयामाया न दाखवता पुतीन थांबवू शकतात. अमेरिका याबाबतीत गद्दार वाटावी इतपत गोंधळली आहे. “जागतिक शांततेसाठी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर आलं असाद संपणं महत्वाचं आहे” हे तुणतुणं वाजवताना असाद आयसिसच्या विरुद्ध असूनही अमेरिका त्यांच्या मागे हात धुवून लागली होती. (डोनाल्ड ट्रम्पनी हे बंद करावं). परिणामी इराण आणि सीरिया तसंच लेबेनॉनची हिजबुल्ला हा शिया गट रशियाच्या मदतीने जर आयसिसला नेस्तनाबूत करू शकला तर सौदी अरेबिया लौकिकदृष्ट्या बाराच्या भावात जाणार हे नक्की. त्यामुळे काहीही करून आपलं दहशतवादाला अधिकृत पाठींबा द्यायचं अधिकृत धोरण सौदीला गुंडाळून ठेवावं लागत आहे.
पाकिस्तानच्या लोकांना वेगवेगळ्या कारणांनी हाकलून लावणं आणि त्यात आयसिस समर्थन हा मुद्दा असणं हे या अनुषंगाने महत्वाचं आहे.
डोनाल्ड ट्रम्पनी सातच देशातल्या नागरिकांना प्रवेशबंदी लादली. सात देश मिळून इस्लामची दहा टक्केपण लोकसंख्या होत नाही. वर त्या देशात पाकिस्तान नव्हता. तरीही हे धोरण इस्लामविरोधी असल्याची ओरड विरोधकांनी केली.
आज उघड उघड दहशतवाद हे कारण दाखवून सौदी सारखा मुस्लिम देश पाकिस्तान्यांना देशाबाहेर घालवतोय आणि मानवाधिकार समर्थक आणि इतर अभ्यासक तोंडावर पडतायत. प्रामाणिकपणे परिस्थिती समजून न घेता डोळ्यावर कायम झापड लावली की अशीच झापड बसणार.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi