Site icon InMarathi

रेनकोट, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि दुटप्पी राजकारण

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

राजकारणात मुडदे गाडले जात नाहीत तर आपल्या फायद्यासाठी वेळोवेळी जिवंत केले जात असतात. परवा संसदेत रेनकोट घालून अंघोळ करण्याचे उदाहरण देऊन पंतप्रधान यांनी असाच एक मुडदा बाहेर काढला आहे. याबाबतीत त्यांना विरोधात असलेल्या लोकांनकडून बरेचसे क्रिटिसाईजही करण्यात आलेले आहे. संसदीय परंपरेचे हवालेही देण्यात येऊन पंतप्रधान यांनी पदाची आब राखायला हवी होती वगैरे वगैरे बरीचशी पोपटपंची यानिमित्ताने करण्यात आली. पण मनमोहन सिंग यांच्या पदावर असताना त्यांच्या नाकाच्या खाली जे घोटाळे झालेले आहेत आणि ते होऊनही त्यांनी आपली जपलेली स्वच्छ प्रतिमा यास मोदीनी थेट लक्ष्य केल्यानंतर सध्या काँग्रेस जवळ असलेल्या या एकमेव भांडवलावर हल्ला झाल्यानंतर काँग्रेसला राग येणे अगदीच स्वाभाविक नाही काय ?


मोदींनी वापरलेला बाथरूम मे रेनकोट पहनकर नहाना कोई मनमोहन सिंह से सिखे या वाक्यात मोदींना अपेक्षित बाथरूम – घोटाळे, रेनकोट –  स्वच्छ प्रतिमा, नहाना – पंतप्रधान पदी राहणे हा अर्थ अभिप्रेत होतायात चुकीचे काय आहे ?

शब्दांना शब्दार्थ, भावार्थ व लक्ष्यार्थ असतो. फेसबूकवर, जीवनात आपण रूपके, म्हणी, वाक्यप्रचार नेहमीच वापरत असतोच की. मोदीजींनी काय केले? हेच तर वापरले ना? का पंतप्रधान पदावरील व्यक्तीला हे वापरण्यास बंदी आहे?

आता रेनकोट घालून कुणी अंघोळ करत नसते हे मोदींनाही माहिती आहे. त्यांना जो भावार्थ अपेक्षित होता तो या गदारोळामुळे लोकांच्या लक्षात येऊ नये यासाठीही याचे भांडवल केले असण्याची शक्यता आहेच. मनमोहन यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांना एक त्यांचा विरोधी म्हणून ते लोकांना आठवूनच देणार. यासाठी त्यांनी कुठले शब्द वापरले पाहिजे यासाठी मनमोहन सिंग यांची परवानगी घेणे अपेक्षित होते काय? बरं हिंदीतील एका वाक्यप्रचाराचा जो की काँमन आहे त्याचा वापर गलीच्छ कसा?

ए राजा कुणाचे मंत्री होते? त्यांनी काय केले? कोळसा घोटाळा झाला तेव्हा त्या विभागाचे मंत्री कोण होते? कलमाडी, कनिमोझी, ए राजा तुरूंगात का गेले? टु जी, कोळसा आणि काँमनवेल्थ, आँगस्टा वेस्टलँड हे घोटाळे झालेत की नाही?

घोटाळे झाले नसतील तर मोदी चूक. पण हे घोटाळे झालेत हे सत्य आहे. शिवाय या वर कोर्ट केसेस सुरू आहेत. याचबरोबर मोदी हे दिल्लीत आऊडसायडर आहेत. पारंपरिक लुटियन्स नाहीत. त्यांना त्यांच्या दिसण्याचा, बोलण्याचा न्युनंगड नाही आणि याच आपल्या भांडवलावर ते अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहेत.

आणखी एक मुद्दा.

मोदीनी काँग्रेस वर घोटाळा केल्याचे आरोप करू नयेत घोटाळेबाजांना थेट आत टाकावे असा तर्क मोदीनी काँग्रेसवर आरोप केले की मोदीविरोधी नेहमीच समोरून देतात. अर्थात भारत एक functional democracy आहे आणि इथे एक सुव्यव्यस्थित व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे आले मोदीच्या मना हे पंतप्रधान म्हणून त्यांना असलेल्या अधिकारक्षेत्राबाबतीत तरी एकवेळ चालेल पण त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेरील कृती बाबतीत चालणार नाही. हे वरील मत व्यक्त करणारे यांना माहिती नसते असे नाही पण वादविवादात आपलं घोडे पुढे दामटायचे तर मग काहीतरी हवे म्हणून हे.

तर हा तर्क वाचून एक प्रश्न पडला. गुजरात दंगलीला मोदी जबाबदार हा आरोप मोदी पंतप्रधान होईपर्यंत काँग्रेस ने सतत केला होता. 2004 ते 2014 या काळात केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. मग काँग्रेसने नुसते आरोप करण्याऐवजी मोदीजींना आतंच का नाही टाकले?आरोप करण्याऐवजी द्यायचे ना आतंच टाकून. तेव्हाच आत टाकले असते तर ते पंतप्रधान झाले नसते आणि संसदेत त्यांनी तो सो काँल्ड खालच्या दर्जाचा वाक्यप्रचारही वापरला नसता नाही?

खुद्द काँग्रेस ने काय केले? 2002 पासून ते 2014 पर्यत गुजरात दंगलीचे राजकीय दोहन केले नाही काय? तिने यावरून मोदींना सतत दुषणे दिलेली आहेत. याकाळात मोदी एका राज्याचे घटनात्मक प्रमूख होते. यामुळे आता मनमोहन यांना काँग्रेस वेगळा न्याय लावू व मागू पाहत असेल तर तो तिचा दांभिकपणा आहे. कुठलाही राजकीय पक्ष आपल्या राजकीय विरोधी यांनी केलेल्या चुकांचे दोहन जोपर्यंत त्यातून राजकीय फायदा मिळणार असतो तोपर्यंत करतच असतो. मोदींही हेच करणार त्यामुळे मनमोहन सिंह यांच्या वर काँग्रेस ला अजूनही बरेचसे बराच काळ ऐकून घ्यावे लागेलच.

थोडक्यात देशात सत्ता मिळाली म्हणजे आपल्याला हवे ते करता येत नसते. पंतप्रधान झालो म्हणून भारतात कुणी कुणाला उचलून आत टाकू शकत नाही.

तिसरा मुद्दा म्हणजे मोदी सरकारच्या विविध आघाडीवरील अपयशाचा. तर यात तथ्य आहेच. ब-याच आघाडीवर हे सरकार अपयशी ठरत आहे. आता ते हे स्वतः कबूल तर करणार नाहीत किंवा लोकांना हे कळू नये म्हणून प्रयत्न करणारच. यासाठी मग ते काहीतरी झुणझुणा आपल्याला देतात. आपण तोच वाजवत बसतो. त्यांनी काय सांगावे हा त्यांचा अधिकार तसाच आपल्याला निवड करण्याचा अधिकार आहेच की. मोदी असोत नाहीतर मनमोहन यांच्यात फार फरक करता येत नाही. फक्त एकास दोषी म्हणून म्हणून दुसर्याचे दोषीपण झाकता येत नाही. कुणी झाकू नाही हे तार्किक नाही पण अंधसमर्थक यांना हे पटत नाही त्यांना वाटते आमचा नेता पक्ष म्हणजे पवित्र गायच आहे, तो चूक करूच शकत नाही.

राजकीय नेते पक्षाच्या, संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या फायद्याचेच आपल्याला आपल्या फायद्याचे वाटावे अशा स्वरूपाची मांडणी करून सांगतात यालाच राजकीय तत्वज्ञान किंवा विचारसरणी म्हणतात. विचारसरणी ही समाजातील एखाद्या विशिष्ट समूहाच्या हितसंबधाचेच दुसरे रूप असते हे आपण समजून घेत नाहीत. ते आपल्याला समजू नये यासाठी मग ते कधी आपल्या जातीचा, कधी धर्माचा तर कधी आपल्यातील भेदाभेदाचा व भावनिकतेचा वापर करून घेतात.

हे असे करून करून ते आपला मेंदू अशा पद्धतीने घडवतात की यांचे नाव आले की आपला मेंदू सारासार विचार करायचं बंदच करतो. यासाठी यांची खास नेमलेली माणसे, यंत्रणा असतात. त्यांच्या द्वारे असलेल्या नसलेल्या दंतकथा सांगून, प्रसारित करून नेत्यांची larger than life प्रतिमा निर्माण केली जाते. आपण त्याला भूलतो आणि यांच्यासाठी इकडे भांडत बसतो. त्यामुळे जोपर्यंत आपण व्यक्ती ,पक्ष सोडून मुद्द्यांना समर्थन देणार नाहीत तोपर्यंत आपण नेहमी मूर्खच बनत राहू.

मुद्यावर आलो तर त्यात आपला फायदा आहे यांच्यासाठी गुद्द्यावर गेलो तर त्यांचा!

Choice is ours!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Exit mobile version