Site icon InMarathi

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग १)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : शरदमणी मराठे

===

रामायण – महाभारत ह्या दोन कथानाकांनी आपल्या देशाला कायमच भुरळ घातली आहे. अनुक्रमे श्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे.

भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.

गम्मत म्हणजे ही चित्रे स्वाभाविकपणे रामाचे राज्य असलेल्या अयोध्या परिसरात वा उत्तर प्रदेश परिसरात मिळतात असे नाही.

हिमालयाच्या कुशीतील पहाडी, राजस्थानी, दख्खनी, मध्य भारतातील, मुघल पद्धतीची अशा विविध प्रकारच्या चित्रांत रामायणाचे रेखाटन झाले आहे असे लक्षात येते.

 

 

वरील चित्र हे १८व्या शतकातील पहाडी शैली मधले रामाचे चित्र आहे. पहाडी शैली मध्ये माणसांचे चेहरे व त्यांचे वर्ण सामान्यपणे गौरवर्णीय व गव्हाळ असेच बघायला मिळतात. पुढेही ह्या शैली मधील चित्रे बघितल्यावर हे लक्षात येईल. पण रामाच्या रंग मात्र तो विष्णूंचा अवतार असल्यामुळे निळसर काळी झाक असलेला चितारला असावा.

कमलासनावर बसलेला, धनुष्यबाण घेतलेला पण सालंकृत असा राम अत्यंत रेखीवपणे चितारलेला दिसतो आहे.

हे बासोली ह्या गावातील शैलीतील चित्र आहे. जम्मू जवळ कठुआ जिल्ह्यातील हे गाव.

स्थानिक राजा कृपाल पाल ह्याने दिलेल्या राजाश्रयामुळे हे छोटेसे गाव मिनिएचर पेंटिंग्जच्या नकाशावर आले. ह्या शैलीतील अजूनही भरपूर चित्रे आज उपलब्ध आहेत.

आता हे चित्र बघा

 

 

हे पहाडी प्रकारातीलच पण कांगरा शैली मधील चित्र. १९ व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील. ऋषी वाल्मिकी नारदमुनींना (लेखनिक बनवून!) रामायणाची गोष्ट लिहून घेण्याची विनंती करत आहेत.

जुन्या मराठी संगीत नाटकांत दिसणाऱ्या नारदमुनी पेक्षा हे जरा वेगळे दिसतात. मुनींची पर्णकुटी, वाळत घातलेली वस्त्रे, गाडगी-मडकी, हाताच्या अंतरावर ठेवलेला शिष्य वगैरे चित्रण एकदम खास आहे.

बाकी चित्रातील वनश्री, फुलझाडे कांगरा परिसराला साजेशी देखणी आहेतच. कांगरा हे हिमाचल प्रदेशातील एक शहर आहे. पूर्वी ते एक संस्थान होते. तेथील राजा संसार चंद यांच्या राजाश्रयाने ही चित्रकला ह्या परिसरात विकसित झाली.

आता हे चित्र बघा.

 

 

जे सामान्यपणे रामायणाच्या कथेत येत नाही. पण असे मानले जाते की क्रौंच पक्षाच्या प्रणयमग्न जोडीची हत्या एका शिकाऱ्याने केली. ते दृश्य बघताना वाल्मिकींच्या तोंडून दु:ख व्यक्त करणारा एक श्लोक बाहेर पडला. मग त्याच श्लोकाच्या वृत्तात पूर्ण रामायण रचण्याचे वाल्मिकी ऋषींनी ठरवले. हे देखील वरती उल्लेखलेल्या पहाडी प्रकारातील कांगरा शैलीतील चित्र आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात रेखाटलेले.

तमसा नदीच्या काठी मृगाजीनावर बसलेले ऋषी, सोबत नदीत दैनंदिन नित्यकर्मे करणारे ऋषिकुमार असे मस्त चित्रण आहे. तमसा नदी शांत नाही. तेही चित्रण लाटांच्या रेखाटनातून केले आहे.

बाय द वे, क्रौंच म्हणजे सारस पक्षी किंवा इंग्रजीत ‘क्रेन’ म्हणतात तो पक्षी.

 

 

रामायणाची खरी सुरुवात होते रामजन्मापासून. अयोध्या नगरीत राम व त्याच्या भावांचा जन्म झाल्यानंतर अयोध्या नगरीने तो आनंद कसा साजरा केला हे (हल्लीच्या भाषेत) कोलाज मध्ये साकारलेले चित्र.

सन १६५०-६० इतके म्हणजे सुमारे ३५० वर्ष जुने चित्र. मध्य भारतातील माळवा शैली मधील हे चित्र.

इथेही बाकी भावांपेक्षा राम हा श्यामल रंगात रेखाटलेला दिसतो आहे. बाकी महालांतील पाळणे, पाळण्यात बाळाच्या रंजनासाठी टांगलेले चिमणाळे, नगरात चाललेला आनंदोत्सव वाद्य वाजवणारे, नृत्य करणारे नागरिक, नवजात बालकांच्या कुंडल्या बनवणारे ज्योतिषी वगैरे ‘समग्र’ चित्रण आहे.

तसे जुने चित्र असल्यामुळे आधीच्या चित्रांपेक्षा रेखीवपणा कमी आहे.

 

 

हे राजस्थान मधील बिकानेरी व दख्खनी अशा मिश्र शैलीतील चित्र. अठराव्या शतकातील.

ऋषी वशिष्ठ यांच्या गुरुकुलात राम आणि त्याचे तीन भाऊ शिक्षणासाठी आले आहेत. ह्या शैलीतही रामाचे चित्रण श्यामल वर्णात केलेले दिसते.

आता रामायणात वाचेलेल्या वर्णनानुसार राजपुत्र असले तरी अन्य विद्यार्थ्यांसारखेच राहायचे. पण लोकांच्या मनातील राजपुत्रांचे चित्रण इथे मात्र राजपुत्रांच्या सारखेच झाले आहे. चौघांच्या डोक्यावर मुकुट आहे! बिकानेर हे एक संस्थान होते. तेथील राजा करण सिंग यांच्या राजाश्रयाने बिकानेरी शैली विकसित झाली.

मुघल सत्तेशी जमवून घेतलेले हे संस्थान असल्यामुळे असेल पण हैदराबाद व दख्खनच्या मुलुखाशी त्याचा संबंध येत असे.

करण सिंग यांचा मुलगा अनुप सिंग हा तर हैदराबाद येथे तेथील मुघल सैन्याचा सेनापती होता. त्यामुळे मुघल व दख्खनी अशी मिश्र शैली असणारी ही चित्रे आहेत.

 

 

हे कोटा, राजस्थान येथील एक चित्र. अयोध्या येथील राजप्रासादात राम व भावंडे दशरथ राजा व त्त्याच्या तीन राण्यांच्या समवेत भोजन करत आहेत.

हे चित्र १८व्या शतकाच्या अखेरीचे आहे पण कोटा शैलीची सुरुवात १६५० च्या सुमारास झाली असे मानण्यात येते.

आधीच्या एका चित्रातील बिकानेरी शैली प्रमाणे ह्या शैलीमध्येही मुघल/ दख्खनी शैलींचा प्रभाव आहे. राजाचे शिरस्त्राण, राण्यांची वस्त्रे राजस्थानी पद्धतीची वाटतात.

रामाच्या बरोबरीने लक्ष्मण देखील श्यामल रंगात दर्शवला आहे हे विशेष!

 

 

रामाने त्राटिका राक्षसिणीचा वध केला त्याचे चित्र. पुन्हा एकदा बिकानेर – दख्खन शैलीमधले. १८ व्या शतकाच्या सुरुवातीचे. ह्या शैली बद्दल वर लिहिले आहेच.

एकंदर राजस्थान मधील सर्व शैली मध्ये व्यक्तींची प्रोफाईल दिसेल, म्हणजे डाव्या वा उजव्या बाजूने एकच कान दिसणारा चेहरा दिसेल असे चित्रण करण्याची पद्धत आहे.

ह्या चित्रात मात्र फक्त रामच श्यामल रंगात रंगवला आहे. राक्षसिणीला अक्राळविक्राळ पद्धतीने चितारणे मंजूर नसावे!

 

 

ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञकार्यात विघ्न आणणाऱ्या सुबाहु राक्षसाचा वध केला आणि मारिच राक्षसाला समुद्रात फेकून दिला त्याचे चित्र. पहाडी पद्धतीच्या व गुलेर शैली मधील हे चित्र. राजस्थानी शैली मधील काळा, लाल, पिवळा, तपकिरी ह्या रंग-पटला पेक्षा वेगळ्या रंगसंगतीचे चित्र.

सध्याच्या हिमाचल प्रदेश येथील कांगरा जिल्ह्यात येणारे गुलेर हे नगर. राजा हरी चंद यांच्या कांगरा संस्थानचा भाग असलेले. तेथे ही शैली विकसित झाली.

ह्या चित्रातही श्रीरामाचे चित्रण श्यामल रंगात आहे. बाकी चित्रण, तपशील आधीच्या चित्रांच्या पेक्षा अधिक सुबक आहे.

 

 

१८ व्या शतकातील पहाडी प्रकारातील पण मंडी शैली मधील चित्र. असे मानतात की बासोली येथील कलावंत राजाश्रयामुळे मंडी येथे आले. मुख्यत: रामायणाची चित्रे काढण्यासाठी.

स्थानिक राजघराण्याचे दैवत राम असल्यामुळे ह्या विशिष्ट कामासाठी हे कलावंत आले आणि मंडी येथील शैली विकसित झाली. राजा जनकाला शेत नगरात असताना सीता सापडली त्याचे चित्र. शेत असल्यामुळे मोजकीच मोठी झाडे, काळ्या-पांढऱ्या बैलांची बैलजोडी आणि आकाशातून पुष्पवृष्टी करणारे देव वगैरे चित्रण आहे.

===

या लेखाचा उत्तरार्थ : रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग २)

===

सर्व चित्रे ‘राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली’ यांच्या संग्रहातून साभार.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version