ह्या एका कारणामुळे भारत कोरोनाशी लढण्यास “अधिक” सक्षम? जगभरात चर्चा…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोरोनाने जग व्यापून टाकले आहे. अमेरिका युरोप सगळीकडेच कोरोनचा हाहाकार माजलेला आहे. भारतात देखील त्याचा शिरकाव झालेला आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला हीच भीती होती, की भारतात जर कोरोनाचा शिरकाव झाला तर तिथे किती गंभीर परिस्थिती उद्भवेल!!
कारण प्रचंड लोकसंख्या आणि लोकांचे एकूण राहणीमान आणि त्यांच्या सवयी पाहता कोरोनाचा समूह संसर्ग होण्याची भीती जास्त होती.
भारतात कोरोनाचे पेशंट सापडायला लागले. परंतु भारत सरकारने आधीपासूनच थोडी तयारी केलेली होती. योग्य त्या उपाययोजना केलेल्या होत्या आणि त्या राबविण्यात येत होत्या.

तरीही ज्या प्रचंड वेगाने कोरोना रुग्णांचा आकडा अमेरिकेत आणि युरोपमध्ये वाढला त्याप्रमाणात भारतात तो वाढला नाही, ही गोष्ट सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी होती.
कारण दुसर्या स्टेज नंतर जी वाढ कोरोना रुग्णांची होते तशी वाढ भारतात दिसली नाही. याचं कारण काय असावं,याच्यावर संशोधन सुरू होतं.
शास्त्रज्ञांच्या असं लक्षात येतंय की, आशियाई देशांमध्ये कोरोनाची इतकी भीती नाही जितकी युरोप-अमेरिकेत आहे. याचं कारण म्हणजे आशियाई खंडामध्ये राबवण्यात आलेली बीसीजी लस ही मोहीम.
भारतात देखील स्वातंत्र्यानंतर जन्मणाऱ्या सगळ्या बालकांना बीसीजी लस दिली जाते. ही लस देण्याचा उद्देश असा होता की भारतात टीबीचे रुग्ण वाढू नये. त्यासाठी ती लस दिली जाते.

भारतात आधीपासूनच क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही लस दिली जाते. आणि कदाचित आत्ता covid-19 ला देखील ही लस प्रभावी ठरत आहे.
कारण covid-19 वर अजून कोणतंही औषध नसलं, तरी आपल्या शरीरात जेव्हा हा विषाणू येतो तेव्हा आपल्या शरीरातील अँटीबॉडीज आधीच कामाला लागतात आणि covid-19 चा हल्ला परतवून लावतात.
त्याची लागण होते मात्र त्यातून रुग्ण बरेही होत आहेत. आणि जे मृत्यू होत आहेत त्यात त्यांचं वय साधारणतः ५० किंवा ६० च्या पुढचं आहे.
Covid-19 वर संशोधन करणारे शास्त्रज्ञ गोंझलो ओटाझू यांच्या म्हणण्यानुसार,
ज्या देशांची राष्ट्रीय आरोग्य पॉलिसी आहे की, ठराविक लसी या दिल्या गेल्या पाहिजेत. अशा देशांमध्ये covid-19 चा प्रसार इतका झालेला दिसून येत नाही आणि त्या देशांनी खूप आधीपासूनच अशा प्रकारचे लसीकरण सुरू ठेवलं आहे.
इटली, नेदरलँड, स्पेन, अमेरिका या देशात अशा प्रकारचं लसीकरण केलं जात नाही. त्यामुळे तिकडे जास्त कारोनाचा धोका जाणवतोय. अधिक लोकांना त्याची लागण झाली असून मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं दिसून येत आहे.

अमेरिकेत दोन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ६००० मृत्यू झालेले आहेत. तर इटलीमध्ये ११०००० लोकांना कोरोनाने ग्रासले असून १३००० मृत्यू झाले आहेत.
स्पेनमध्ये देखील आत्तापर्यंत आठ हजार मृत्यू झाले आहेत. तर नेदरलँड मध्ये बारा हजार लोकांना कोरोना झाला असून १००० मृत्यू झाले आहेत.
भारतात कोरोनाची लागण होणे आणि त्यापासून मृत्यू होणे याचा रेट इतर जगाच्या तुलनेत कमी आहे.
भारतातल्या आकडेवारीवरून असं दिसतंय, की कोरोनाचा प्रसार आणि होणारे मृत्यू हे कमी आहेत. मग यात बीसीजी ची लस हा महत्त्वाचा घटक असेल का?
Bacillus Calmette-Guerin (BCG) हे या लसीचं शास्त्रीय नाव. बीसीजी ची लस ही जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाला देण्यात यावी असं भारताच्या आरोग्य विषयक धोरणात स्पष्ट केलंय.
भारतातील नवजात बालकांच्या लसीकरणासाठी ज्या लसी दिल्या जातील त्यातील ही महत्त्वाची लस. ही लस भारतामध्ये १९४८ पासून दिली जाते.
कारण भारतात सगळ्यात जास्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत. ते प्रमाण कमी करण्याचं टार्गेट भारतासमोर होतं. म्हणून ही मोहीम तेव्हापासून राबवली जाते.
कोरोनाचे रुग्ण आणि बीसीजी लस यांचा संबंध लावणे इतक्यात योग्य नाही असं भारतातल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.
पंजाब युनिव्हर्सिटीच्या मोनिका गुलाटी यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या वातावरणात कुठलीही छोटीशी गोष्ट जी आशेचा किरण दाखवते, त्यामुळे धीर मिळतो. खरंतर बीसीजी लसीमुळे सार्स देखील खूप मोठ्या प्रमाणात भारतात पसरला नाही.
पण कोरोनाच्या बाबतीत इतक्यात काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
बीसीजी लसीमुळे कोरोना बरा होणार नाही हे नक्की आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव किंवा त्याची इन्टेन्सिटी ही नक्कीच कमी होईल.
म्हणूनच बीसीजी लस ज्या देशांमध्ये बालकांच्या लसीकरणात दिली जाते त्या देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली तरी तिचा खुप प्रभाव तिकडे पडलेला दिसत नाही.

चीनमध्ये बीसीजी लस ही १९६५ सालानंतर देण्यात येऊ लागली तर इराणमध्ये बीसीजी लस ही १९८३ नंतर देण्यात येऊ लागली.
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये ही लस आधीपासूनच देण्यात येते. तिकडेही कोरोनाचे रुग्ण वाढण्यावर कंट्रोल ठेवण्यात आला.
त्यामुळे लस देण्याच्या आधीचे पेशंट आणि नंतरचे पेशंट यांची तुलना केली, तर ज्यांना लस दिलेली आहे असे रुग्ण औषध उपचारांना लगेच प्रतिसाद देतात, तर ज्यांना लस मिळाली नाही त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असे दिसते.
आज पर्यंत covid-19 वर कुठलीही लस मिळालेली नसून बीसीजी लस देखील कितपत काम करते यावर संशोधन करणे गरजेचे आहे.
सध्यातरी covid-19 ला प्रतिबंध करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हात वारंवार अल्कोहल बेस्ड हँडवॉशने धुणे हेच उपाय आहेत.
तर गंगाराम हॉस्पिटलचे सर्जन अरविंद कुमार यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये इतक्या प्रकारचे व्हायरस, वेगवेगळे आजार येऊन गेले आहेत की त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही चांगली झाली आहे.
त्याचा अभाव युरोप अमेरिकेतल्या लोकांमध्ये आढळून येतो. भारताने संपूर्ण लॉक डाऊन देखील दुसऱ्या टप्प्यात लागू केले, त्यामुळे कदाचित सध्या कमी स्प्रेड दिसतोय.
कोरोना व्हायरसचा जर पॅटर्न पाहिला तर लक्षात येतं, की तो जिथून आला तो म्हणजे चीन. तिथल्या वुहान मध्ये त्याचा प्रभाव खूप मोठा होता.
तिथली लोकं ज्या देशांमध्ये गेली तिकडे पण तो व्हायरस पसरण्याचा आणि त्या व्हायरसचा धोका असण्याची शक्यता अधिक होती.
पण भारतात तो व्हायरस चीनमधून आला नाही. तो दुसऱ्याच देशातुन भारतातल्या लोकांना झाला आणि तो भारतात आला, त्यामुळे तो व्हायरस तसा क्षीण आहे.
ह्या कारणामुळे देखील भारतातले रुग्ण त्या पटीने वाढताना दिसत नाहीत.
फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टर झा यांच्या म्हणण्यानुसार सध्या लॉकडाऊन मुळे कोरोना व्हायरस पसरताना दिसत नाही. सध्या तो पसरण्याचा रेट कमी आहे.
मात्र तो जितक्या अधिक लोकांना होईल तितका तो जास्त धोकादायक बनत जाईल. त्यानंतर होणारे नुकसान हे इतर देशांमधल्या प्रमाणेच असेल. म्हणूनच बीसीजी आणि covid-19 यांचा सहसंबंध लावणे इतक्यात योग्य होणार नाही.
यावर खूप मोठ्या प्रमाणात रीसर्च होणं आवश्यक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.