आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
दिल्लीमधल्या निजामुद्दीन भागामुळे आता भारतात कोरोनाचं संकट वाढेल का याची भीती वाटत आहे. कारण अतिशय चिंता वाढवणारी घटना या भागात घडली आहे.
या भागात असणाऱ्या बांगलेवाली मस्जिद मध्ये १० मार्चला तबलिकी जमातची मरकज भरली होती. आणि त्यासाठी भारत आणि जगभरातून साधारणपणे ३५०० पर्यंत लोक एकत्र आले होते.
त्यानंतर यातील काहीजण देशाच्या विविध भागांमध्ये गेले. तिकडे त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली, आणि चाचण्या केल्यावर त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.
तसेच तेलंगणामध्ये यामध्ये सहभागी असलेले सहा जण कोरोनामुळे मृत्यू पावले. जम्मूमध्ये कोरोनाव्हायरसचा पहिला बळी गेला तो इसम देखील या मरकजमध्ये सामील होता.
मुंबईमध्ये फिलिपिन्स वरून आलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला तो ही या मरकज मध्ये सहभागी होता. अंदमान निकोबार मध्ये सापडलेले कोरोनाचे रुग्ण देखील तिथे सहभागी होते.
त्यानंतर या घटनेबद्दल हळूहळू माहिती बाहेर यायला लागली.आणि त्या घटनेचं गांभीर्य लक्षात यायला लागलं.
त्यानंतर या मरकज मध्ये सामील झालेले किती लोक, कुठे कुठे गेले याचा तपास सुरू झाला. भारतातल्या प्रत्येक राज्यात या मरकज मध्ये सामील झालेला माणूस पोहोचला आहे.
त्यातील काहीजण आता कोरोनाची लक्षणं दाखवित आहेत.
महाराष्ट्रात देखील हे लोक पुणे, पिंपरी- चिंचवड कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद इत्यादी विविध जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत हे आता तपास करताना लक्षात येत आहे.
आत्तापर्यंत सरकारच्या अनेक प्रयत्नांमुळे भारत अजूनही कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात आलेला नाही.
हा व्हायरस पसरण्यापासून रोखण्यात बऱ्यापैकी कंट्रोल ठेवला गेला होता. मात्र या घटनेनंतर आता कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
काल अचानक हा आकडा वाढून पंधराशेच्या घरात गेला. महाराष्ट्रात देखील एका दिवसात २३० वरून हा आकडा ३०२ पर्यंत आला आहे.
याचाच अर्थ आता भारतात कम्युनिटी स्प्रेडला अर्थात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे का? याबद्दल प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.
ही संपूर्ण घटना पाहिली तर याबद्दलचं गांभीर्य लक्षात येईल.
आता या लोकांच्या संपर्कात किती जण आले होते, याचा तपासही करण्यात येत असून त्या सगळ्यांना ही आता क्वॉरंटाईन केलं जात आहे.
मुळात कोरोनाची लक्षणे ही साधारणतः दहा ते पंधरा दिवसात दिसायला लागतात, त्यामुळे आता याची लागण किती प्रमाणात पसरली आहे हे सांगू शकत नाही.
मग प्रश्न असा येतो की जर कोरोनाचं सावट दिसत असतानाही अशी घटना कशी घडली? इतके लोक एकत्र कसे आले?
भारतात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना पेशंट वाढताना दिसून येत आहे.
बरेच सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत, शाळा कॉलेजेस ऑफिसेस कार्यालय बंद आहेत, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन करून सांगितलं होतं की शक्यतो गर्दी करू नका. २२ मार्च हा दिवस ‘जनता कर्फ्यू’ म्हणून जाहीर झाला होता.
आणि त्यानंतरही घराबाहेर गर्दीत जाणं टाळावं असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं. तरीही दिल्लीमध्ये लोक एकत्र येत होते.
त्या भागापासून दिल्ली निजामुद्दीन पोलीस स्टेशन हे फक्त पन्नास मीटर अंतरावर आहे, पोलिसांना इकडे लोक जमा होत आहेत हे दिसत नव्हतं का?
आता दिल्ली सरकारने त्या आयोजकांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे परंतु झालेलं नुकसान भरून येईल का?
पण मुळात ही तबलिकी जमात आणि मरकज म्हणजे काय?
तबलिकी जमात:
तबलिकी जमात म्हणजे अल्लाचा गोष्टींचा प्रचार प्रसार करणारी लोकं. जगभरात इस्लामला मानणारे लोक याचे सदस्य आहेत. असं मानलं जातं की जगभरात एकूण १५ कोटी लोक याचे सदस्य आहेत.
याची सुरुवात १९२७ मध्ये मोहम्मद इलियास अल कांधलवी याने सुरू केली. भारतातल्या हरियाणातील नूंह पासून याची सुरुवात झाली असे समजले जाते.
इस्लाम मध्ये जे ६ उसूल आहेत,
कलिमा (अल्लावरचा विश्वास), सलात (रोजची प्रार्थना), इल्म (अल्लाची संगत आणि आठवण), इकराम-ए-मुस्लिम (इस्लामचे पालन करणाऱ्याला प्रोत्साहन देणे),
इख्लास-ए-निय्यत (इस्लामी तत्त्वांसाठी जीवन व्यतीत करणे) आणि दावत-ओ-तबलीग (अल्लाचा संदेश पोहोचवणे) यांचं पालन याचे समर्थक करतात.
मरकज:
मरकज म्हणजे एकत्र येणे, मीटिंग करणे. दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातली ती बांगलेवाली मस्जिद ही तबलिकी जमातचे हेड क्वार्टर आहे.
आणि त्याच ठिकाणी हे सगळे लोक एकत्र आले होते. पाकिस्तान बांगलादेशात देखील यांच्या मिटींग होत असतात.
मूळ इस्लाम प्रमाणे राहणे तसा पोशाख करणे आणि इस्लाम मध्ये सांगितल्याप्रमाणेच वागणे हा त्यांचा हेतू असतो.
मुळात त्यांचा उद्देश हा फक्त इस्लामचा प्रचार करण्याचा असला तरी भारतातल्या हिंदूं बद्दल विखारी प्रचार करणे प्रसार करणे हा देखील आहे.
हिंदूंचं आव्हान रोखण्यासाठी ही चळवळ सुरू झाली असं समजलं जातं. तस यांचं काम अजून तरी शांततामय मार्गाने चाललं होतं, त्यामुळेच मध्यपूर्व उत्तर आफ्रिकेत यांचे सदस्य वाढले होते.
त्यांचं राहणीमान देखील इस्लाम मध्ये सांगितलेल्या प्रमाणेच आहे, पुरुषांसाठी दाढी वाढवणे कुर्ता पायजमा घालणे. तर स्त्रियांनी बुरखा घालणे, घराच्या बाहेर जाताना संपूर्ण शरीर झाकून घेणे.
टीव्ही पाहणे संगीत ऐकणे या गोष्टी वर्ज आहेत. सोफा वगैरेवर न बसतात जमिनीवरचं चटई टाकून बसणे.
पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल जावेद नसिर जे आयएसआयचे प्रमुख होते तेदेखील याचे सदस्य आहेत. पाकिस्तानी सैन्यातील मोहम्मद अहमद हे देखील याचे सदस्य आहेत.
पाकिस्तानातील क्रिकेटपटू इंजमाम उल हक, सईद अन्वर, शाहिद आफ्रिदी, मुस्ताक अहमद तर गायक जुनेद जमशेद हे याचे फॉलोअर आहेत.
९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर अशा गटांकडे गांभीर्याने पाहण्यात येऊ लागले.
कारण यांचा मूळ उद्देश जरी फक्त इस्लामचा प्रचार करणे असलं तरी तालिबानचे काही सदस्य देखील पब्लिक जमात से सदस्य आहेत हे लक्षात यायला लागले.
ग्लासगो विमानतळावर एक अयशस्वी दहशतवादी हल्ला झाला तो दहशतवादी देखील तबलिकी जमातचा सदस्य होता. लंडनमध्ये जे हल्ले झाले ते देखील याचे सदस्य होते.
त्यामुळेच जगभर आता त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सौदी अरेबिया मध्ये देखील त्यांच्यावर बंधन घालण्यात येत आहे. त्यांचे कोणतेही लिखित साहित्य तिकडे न्यायला बंदी आहे.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुसार दिल्लीतील त्या मशिदीमध्ये मौलवीने असे म्हटले आहे की,
“कोरोना आजाराची भिती दाखवून आपल्याला एकत्र येऊ दिले जाणार नाही. परंतु आपण मुस्लिम असल्याने आणि इस्लामचे पालन करत असल्याने आपल्याला काही होणार नाही.
आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहिलं पाहिजे. मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, तो आपण हाणून पाडला पाहिजे. म्हणून शक्यतो जास्तीत जास्त लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे.”
जर ही गोष्ट खरी असेल तर नक्कीच खूप गंभीर आहे. अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे तर आहेच, पण सामान्य लोकांनी अधिक काळजी घेणेही तितकेच जरुरीचे आहे.
कारण आता कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेड ची भीती वाढलेली आहे.
अमेरिका,इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये जेव्हा कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड वाढला तेव्हाच तिथल्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्यादेखील वाढली!
म्हणूनच भारतातली ही घटना अनावधानाने घडली की मुद्दाम घडवून आणली असा संशय येत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.