आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना व्हायरसमुळे देशातच नव्हे तर संपुर्ण जगभरात थैमान घातलं आहे. अनेकांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. अनेकांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व मेडिकल स्टोर्स सोडलीत तर लहान मोठ्या अश्या सगळ्या प्रकारच्या दुकानांना कुलूप लागले आहे.
एकीकडे, किरकोळ सामान, भाज्या, दूध, अंडी इ. वस्तू ज्या दिवसभरात कुठल्याही वेळी सहज उपलब्ध व्हायच्या, त्या मिळणे आता जवळपास दुरापास्त झालेले आहे!
त्यामुळे लोकांसमोर ‘असे कसे जगायचे?’ हा प्रश्न उद्भवला आहे.
आणि दुसरीकडे, समाजातला एक विशिष्ट वर्ग जो व्यसनाधीन आहे, त्याला एक वेगळाच त्रास भेडसावत आहे.
ज्या व्यक्तीला दररोज मद्यपान करण्याची किंवा धूम्रपान करण्याची सवय आहे, त्या व्यक्तीला आता या व्यसनाशिवाय जगावे लागणार आहे.
कारण आता टोटल लॉकडाऊनमुळे व्यसनाधीन लोकांच्या ‘आवडीची’ सामग्री मिळविणे अशक्य झाले आहे. कुठल्याही गोष्टीचे व्यसन लागणे वाईट, आणि त्याहीपेक्षा वाईट ते व्यसन सोडणे!
डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की अचानक दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा इ. गोष्टींचे व्यसन सोडणे फार फार अवघड असते, फक्त व्यसनाधीन व्यक्तीसाठीच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांसाठीही!
अश्या प्रकरणात, शरीरात अचानक विदड्रॉल सिम्पटम्स दिसणे सामान्य आहे.
विदड्रॉल सिम्पटम्समध्ये अचानक खूप घाम येणे, अंगावर काटा येणे, उलट्या, चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, डोकेदुखी, थकवा, सुस्तपणा, स्नायू दुखणे इ. लक्षणे दिसून येतात.
अचानक बंद झालेल्या व्यसनी पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनी व्यक्ती अधिक चिडचिड करते, मानसिकदृष्टीने हतबल होते, काही केसेसमध्ये आत्महत्येचे देखील विचार येऊ शकतात.
अश्याप्रकारे विदड्रॉल सिमप्टम्स धोकादायक पातळीवर जाऊ शकतात. अशा लोकांना औषधांची व समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते.
डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, औषध व समुपदेशनासोबतच अश्या व्यसनी व्यक्तींना कुटुंबातील सदस्यांनीदेखील समजून घेणे आवश्यक असते.
काही काळासाठी राग, तिरस्कार, टीका बाजूला सारून मदतीच्या एका हाताची व काळजीने भरलेल्या काळजाचीही अत्यंत गरज असते.
दारू, सिगरेट इ. व्यसन असलेल्या व्यक्तींना बऱ्याच काळापासून ते नाही मिळाले तर त्यांच्यासाठी काय गरजेचे आहे त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात हे बघूया.
१. परिस्थिती गंभीर असेल तर पूर्ण वैद्यकीय सहाय्य मिळावे हे सुनिश्चित केले पाहिजे.
२. विदड्रॉल सिमप्टम्सचा समूळ नाश करण्यासाठी उपाययोजना, औषधे उपलब्ध असली पाहिजेत.
३. समुपदेशन करणारे तज्ज्ञ तसेच मानसोपचार चिकित्सक उपलब्ध करून दिले पाहिजेत.
४. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे परिपूर्ण सकारात्मक सहकार्य मिळाले पाहिजे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत.
अशा परिस्थितीत एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे.
यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे.
आणि जर ही परिस्थिती अजून काही काळासाठी विलंबित झाली तर व्यसनी व्यक्तींचे जगणे दुरापास्त होऊ नये व त्यांच्या कुटुंबाला याची किंमत मोजावी लागू नये म्हणून डॉक्टर सांगतात की –
व्यसन अचानक थांबल्यानंतर व्यसनी व्यक्तीला येणाऱ्या विदड्रॉल सिमप्टम्समुळे चिडू नका, घाबरू नका, उलट त्यांचे मनोधैर्य वाढवा.
या परिस्थितीत, मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यास व्यसनाधीन व्यक्तींसाठी खालील सल्ले उपयुक्त ठरू शकतात –
१. भरपूर पाणी प्या.
२. व्हिटॅमिन सी परिपूर्ण पेय, आहार समाविष्ट करा.
३. आहारात सात्विक पदार्थांचाच समावेश करा.
४. काही काळासाठी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळा.
५. आवडीच्या कामात आपले लक्ष केंद्रित करा.
६. मन विचलित होईल असे कार्यक्रम बघू नका, त्याउलट हलके फुलके विनोदी चित्रपट बघा.
७. भांडण, तंटे टाळा.
८. व्यसनाचा उल्लेख असलेली गाणी ऐकणे टाळा.
९. घरकामात मदत करा.
१०. पोराबाळांचा अभ्यास घ्या. त्यांच्यासोबत मन रमवा.
११. थोडा का होईना पण नियमित व्यायाम करा.
वरील उपाय वरकरणी जरी साधे सोपे वाटत असतील तरी त्यांचा बऱ्यापैकी सकारात्मक परिणाम अनुभवता येतो.
हे घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका व्यसनी लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तींचीदेखील असते. अशा व्यक्तींनी देखील व्यसनी व्यक्तीचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.
परंतु, जर व्यसनी व्यक्तीची परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे वाटत असेल तर त्वरित वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे हितावह.
आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की कुठलीच व्यक्ती वाईट नसते.
आपल्या देशात ही देखील अशी अनेक उदाहरणे आहेत की मोठे मोठे गुन्हेगार वाईट मार्ग सोडून सर्वसामान्य माणसाप्रमाणे प्रामाणिक, सरळमार्गी जीवन जगू लागतात.
मग एक व्यसनी व्यक्तीसुद्धा हाडामासाचा जीव आहे. त्याला उपहासाची, तिरस्काराची नाही तर तुमच्या सहकार्याची, समजून घेण्याची गरज आहे.
कदाचित या लॉकडाऊनमुळे तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला निर्व्यसनी होऊन परत मिळेल, गरज आहे फक्त एक विश्वासाचा, मदतीचा हात पुढे करण्याची, कराल ना?
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.