' कोरोनाच्या भयावह परिस्थितीत विचलित होणाऱ्या मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे उपाय महत्त्वाचे आहेत – InMarathi

कोरोनाच्या भयावह परिस्थितीत विचलित होणाऱ्या मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे उपाय महत्त्वाचे आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

टिव्ही असो वा इंटरनेट, सध्या करोनाशिवाय दुसरा विषयच दिसत नाही.

अर्थात जागतिक महामारीचं हे संकट लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहेच.

मात्र कोरोनाचा घट्ट होणारा विळखा, दररोज शेकडो निरपराधी लोकांचा जाणारा बळी, झगडणारे डॉक्टर्स यांसारख्या अशा अनेक प्रसंगांमुळे घरात बसून टिव्हीवर बातम्या पाहणा-यांचेही चित्त विचलित होणं स्वाभाविक आहे.

सर्वत्र नकारात्मकता पसरलेली असताना आपण मनावर संयम कायम ठेवणं गरजेचं आहे.

 

home quarantine inmarathi 1
CNBC.com

 

नकारात्मक परिस्थितीतही आपलं मन, बुद्धी निरोगी ठेवत आपलतेही लक्ष्य साध्य करायचे असते, तेव्हा सर्वात महत्त्वाची असते ती मनाची एकाग्रता.

परंतु ती साध्य करणे सोपे काम नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात तर ही एकाग्रता त्वरीत भंग करणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत की विचारू नका.

उदा. फेसबूकवर एक क्लिक करताच आपण आपले मूळ काम विसरून कधी त्यात तल्लीन होऊन जातो हे आपलं आपल्याही लक्षात येत नाही.

या लक्ष विचलित करणाऱ्या काळात जर आपण आपले लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित करू शकलो नाही, तर आपण आपले ध्येय साध्य करण्यातच अपयशी ठरतो.

अनेक आकर्षण आपल्याला काही नवीन शिकण्यापासून, विविध उपयोगी गोष्टी करण्यापासून, काहीतरी समाजोपयोगी गोष्टी करण्यापासूनही आपल्याला दूर ठेवतात.

 

using Mobile while eating InMarathi

 

ऑफिसचं काम असो की एखादी मॅरेथॉन असो, आपण जर आपलं लक्ष आपल्या ध्येयावर ठेवण्यात अपयशी ठरलो, तर आपल्या हातात घेतलेल्या कामातही अपयश येणार हे नक्की.

 सुदैवाने ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराचे स्नायू योग किंवा व्यायामाद्वारे मजबूत बनवू शकतो त्याचप्रमाणे एकाग्रता ही मानसिक व्यायामाने किंवा सरावाने साध्य करता येणारी गोष्ट आहे.

पण अर्थात ही गोष्ट साध्य असली, तर ती साध्य करणं सोपी गोष्ट नाही. हे साध्य करायचं असेल, तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या रोजच्या आयुष्यातील सवयींमध्ये काही बदलही करावे लागतील.

मानसशास्त्रानुसार असलेल्या पुढील ७ युक्त्या तुम्हाला आपल्या मनाची एकाग्रता एखाद्या क्ष-किरणाप्रमाणे टोकदार बनवण्यास मदत करतील.
सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता पडताळून पाहा. 

 

concentration inmarathi 1

 

आम्ही सुचवलेल्या युक्त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी आधी आपल्या मनाची एकाग्रता सध्या कितपत आहे हे तपासून पाहा.
तुमची एकाग्रता चांगली आहे असे समजा, जर..

तुम्ही नेहमी सतर्क राहू शकत असाल तर..
जर, तुम्ही आपले काम छोट्या छोट्या भागांत विभागून ते करण्याचा प्रयत्न करत असाल तर..
आणि जर तुम्ही आपल्या कामाच्या मध्ये मध्ये थोडी विश्रांती घेऊन पुन्हा वेळेवर कामाला लागत असाल तर..

तुमची एकाग्रता चांगली नाही आणि ती वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे असे समजा, जर..
जर तुम्हाला दिवास्वप्नं पाहण्याची सवय असेल तर..
जर तुम्ही लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळू शकत नसाल तर..
आणि जर तुम्ही आपल्या प्रगतीचा अधूनमधून आढावा घेत नसाल तर..

वरीलपैकी पहिल्या भागात जर तुम्ही बसत असाल, तर तुमच्या मनाची एकाग्रता चांगली आहे असे समजायला हरकत नाही. तरी देखील थोड्या अजून सरावाने तुम्ही आपली ही एकाग्रता अजून वाढवू शकता.

आणि जर तुम्ही दुसऱ्या भागात बसत असाल, तर तुमच्या मनाची एकाग्रता असायला हवी तितकी चांगली नाही. तुम्हाला आपली एकाग्रता वाढवायला प्रयत्न करावे लागतील. सरावाने हे साध्य करू शकाल.

 

येणारे विक्षेप दूर करण्याचा प्रयत्न करा

 

social media platforms inmarathi
ad week

 

येणारे विक्षेप आधी ओळखायला शिका. त्यानंतर ते मान्य करायला शिका. आपल्या कामात अनेक लोक, अनेक गोष्टी अडथळे आणू शकतात आणि तुमच्या कामावरचे तुमचे लक्ष विचलित करू शकतात.

यात तुमच्याशी सतत बोलायला येणारा एखादा कलिग असू शकतो, वा रेडिओचे सूर देखील असू शकतात.

वरवर पाहता हे अडथळे दूर करणं सोपी गोष्ट वाटते. पण ती तितकीशी सोपी गोष्ट नाही हे तुमच्या लक्षात येईल. फारतर रेडिओ, टिव्ही सारख्या गोष्टी तुम्ही उठून झटकन बंद करू शकाल

पण तुमच्याशी बोलायला येणारा तुमचा सहकारी, तुमच्या आसपास खेळणारं लहान मूल, तुमचा जोडीदार किंवा तुमचा रुम पार्टनर, यांना टाळणं प्रत्येकवेळी सोपं काम नसतं.

याकरता तुम्ही या लोकांसाठी वेगळा वेळ राखीव ठेवू शकता किंवा त्यांना, ‘मला माझं काम करू द्या आणि त्यासाठी मला एकटं सोडा’ हे स्पष्टपणे सांगू शकता.

किंवा अजून एक पर्याय म्हणजे या सगळ्यांपासून लांब राहून आपलं काम करण्याचा प्रयत्न करू शकता.

उदा. लायब्ररी, तुमच्या घरातील एखादी स्वतंत्र खोली, किंवा एखाद्या शांत ठिकाणी बसून तुमचं काम तुम्ही करू शकता.

 

work from home inmarathi 1
business insider india

 

अर्थात आपल्या एकाग्रतेत येणारे अडथळे हे नेहमी अशाप्रकारचे बाह्य अडथळेच असतात असं नाही.

अनेकदा कंटाळा येणे, तणाव असणे, आपल्या उद्दीष्टांप्रती फारसे गंभीर नसणे, काळजीत असणे इत्यादी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी देखील आपल्या कामातले अडथळे ठरतात आणि त्यांच्यावर मात करणे देखील कठीण जाते.

असे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला सतर्क राहून काही गोष्टींचा अवलंब करावा लागेल.

उदा. कामाला सुरूवात करण्यापूर्वीच आवश्यक तो आराम करून घेणं, जेणेकरून काम करत असताना कंटाळा येणार नाही. मनात सकारात्मक भाव ठेवणं, आपल्या कामासंबंधी गंभीर असणं, काळजी-तणाव यांच्याशी सामना करण्याची तयारी ठेवणं इत्यादी.

एवढं करूनही वारंवार लक्ष विचलित होत असेल, तर मनाला प्रयत्नपुर्वक पुन्हा पुन्हा आपल्या कामाच्या ठायी आणून ठेवणं ही गोष्ट करायला हवी.

 

एकावेळी एकच काम करा –

एकाचवेळी हातात वेगवेगळी अनेक कामं घेणं हे जरी सगळी कामं एकाचवेळी पटापट उरकण्यासाठी आकर्षक वाटत असलं, तरी प्रत्यक्षात अशा प्रकारात एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे यातील एकही काम नीट न होण्याची शक्यताच वाढत असते.

 

confused girl inmarathi
women planet

 

किंवा जे काम महत्त्वाचं असेल, तेच मागे राहण्याचीही शक्यता निर्माण होते.

माणूस एकाचवेळी सर्व कामांकडे सारखंच लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामाला वेगळा वेळ द्या. ते अधिक फायदेशीर ठरेल.

त्यामुळे तुमचं लक्ष एखाद्या स्पॉटलाईटप्रमाणे एका ठराविक कामावरच केंद्रित करा. तर तुम्हाला ते काम अधिक ठळकपणे तुमच्या दृष्टिक्षेपात राहील आणि तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

 

goals inmarathi
Inc.com

 

याउलट सर्वच कामांवर एकाच वेळी दृष्टी टाकू म्हणाल, तर गोंधळ वाढेल आणि त्यातलं एकही काम उरकलं जाणार नाही.

लक्षात ठेवा, की एकाग्रता साधण्यासाठी तुमच्याकडे असलेली साधनं कमी आहेत. त्यामुळे एकाच वेळी सगळी कामं हातात न घेता एकेका कामावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करून ते काम उरकण्याचा आधी प्रयत्न करा.

 

वर्तमानात जगा –

काम करत असताना तुमचं मन जर भूतकाळातल्या गोष्टींत हरवलं असेल, किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत अडकलं असेल, तर तुमचं लक्ष विचलित होऊन तुमच्या कामाकडे तुमचं लक्ष राहणार नाही.

 

ranbir kapoor 2 inmarathi
bhmpics.com

 

“वर्तमानात जगा” हा वाक्प्रचार तुम्हाला ठाऊकच असेल. वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचं मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात भरकटणार नाही.

वर्तमानकाळात जगण्याची सवय लावून घेतलीत की तुमचं लक्ष तुम्ही त्या क्षणी करण्यासाठी निवडलेल्या तुमच्या कामाच्या विशिष्ट भागाकडेच लागून राहील.

 

live in present inmarathi

 

सुरुवातीला हे तुम्हाला जड जाईल. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवलीत तर तुम्हाला हे सोपंही जाईल. आणि ती गोष्ट म्हणजे भूतकाळ आता बदलता येणार नाही, आणि भविष्यकाळ आपल्या हातात नाही.

भविष्यकाळ घडवायचाच असेल तर तो आता वर्तमानकाळातच घडवता येऊ शकेल. त्यासाठी आत्ता, वर्तमानकाळात हातात घेतलेलं काम व्यवस्थित पूर्ण करणं आधी गरजेचं आहे.

थोडक्यात, वर्तमानकाळात कामाकडे लक्ष देऊन भूतकाळातील चुका सुधारता येतील आणि भविष्यकाळ उज्ज्वल बनवणं शक्य होईल.

 

मनाची सावधानता –

योग, मेडिटेशन, ध्यान इत्यादींच्या सहाय्याने मनाला शांतचित्त आणि अखंड सावध बनवता येते. आपल्या भारतीय संस्कृतीत यावर हजारो वर्षांपासून विचार केला गेलेला आहे.

योग आणि ध्यान-धारणा, श्वसनाचा अभ्यास, प्राणायाम यांच्या नित्य सरावाने मनाची एकाग्रता वाढते.

 

malaika arora khan inmarathi

 

अभ्यासांमधून देखील हे सिद्ध झालेलं आहे. योग-प्राणायाम इत्यादींचे प्रशिक्षण दिले गेलेले लोक असे प्रशिक्षण नसलेल्या लोकांपेक्षा जलद गतीने आपली कामे निपटू शकतात.

यासाठी योगतज्ज्ञ होण्याची गरज नाही. तुम्ही साध्या दीर्घ-श्वसनाच्या, ओमकार-जपाच्या अभ्यासाने देखील हे साध्य करू शकता. त्यासाठी आजच अशा अभ्यासाचा सराव सुरू करा.

आपले मन थाऱ्यावर आणण्याची एक जलद आणि सोपी युक्ती

 

jaqueline-yoga-inmarathi
pinterest.co.uk

 

दीर्घ आणि खोल श्वास घ्यायला सुरूवात करा. ते करत असताना लक्ष आपल्या प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे राहू द्या. सात-आठ श्वासांतच तुमच्या लक्षात येईल, की तुमचे भटकणारे मन अलगदपणे तुमच्या श्वासांवर येऊन केंद्रित झाले आहे.

अर्थात ही युक्ती वरवर वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. मनाला अगदी आपल्याच श्वासांवर आणून ठेवणे ही गोष्ट फार कठीण आहे.

त्यातल्या त्यात एकच गोष्ट चांगली आहे, आणि ती म्हणजे हा श्वसनाचा अभ्यास तुम्ही कोणत्याही वेळी आणि कुठेही करू शकता.सरावाने दीर्घ श्वसनाचा अभ्यास जमत जातो आणि मनाला नियंत्रणात आणणेही.

एकदा का मनाला आपल्या श्वासांवर आणून ठेवता आले की आपोआपच ते मन आपल्या कामावरही आणून केंद्रित करता येते.

मध्ये थोडी विश्रांती घ्या

आपल्याला ठाऊक आहे, की एकच काम खूप वेळ करत बसल्यावर आपल्याला कंटाळा येतो. तसा कंटाळा येत असतानाही आपण जर ते काम तसंच पुढे रेटत राहिलो, तर त्या कामाचा दर्जा खालावू शकतो.

ते काम दर्जेदार होणार नाही. एकच एक काम करताना आपलं मन कंटाळून विचलित होत राहतं.

काही संशोधनातून असेही निष्पन्न झालेले आहे, की एकच एक काम करून मनच नव्हे, तर आपला मेंदू देखील कंटाळतो आणि चालू कामाकडे दुर्लक्ष करू लागतो.

संशोधनातून असे आढळून आलेले आहे, की आपल्या कामातून अधुनमधून अगदी थोड्या वेळाचीही घेतलेली विश्रांती आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत करते.

 

guy sleeping inmarathi
shutterstock

 

अशा विश्रांतीने आपला मेंदू ताजातवाना होऊन पुन्हा उत्साहाने कामाला लागतो.

त्यामुळे यापुढे दीर्घकालीन कामं करताना, उदा. परीक्षेची तयारी, किंवा एखाद्या प्रोजेक्टची तयारी करताना अधुनमधून आपल्या मेंदूला थोडी थोडी विश्रांती द्यायला विसरू नका.

थोड्या वेळाकरता आपल्या कामाव्यतिरिक्त इतरत्र गोष्टींकडे लक्ष वळवा. अशारीतीने मेंदूला दिलेल्या विश्रांतीमुळे देखील आपल्या मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि आपली उद्दीष्टे साध्य करण्यास मदत होते.

 

आपले हे ध्येय साध्य करण्यासाठी सरावाची सवय ठेवा

 

concentration-inmarathi
easyshiksha.com

 

मनाची एकाग्रता वाढवण्याकरता हा सातवा आणि शेवटचा सल्ला आहे. मनाची एकाग्रता ही काही एका रात्रीत वाढणारी गोष्ट नाही. किंवा वरील सहा मुद्दे एक दिवस अंमलात आणले की मनाची एकाग्रता वाढली असे होत नाही.

त्यासाठी तुम्हाला नेहमीच सतर्क राहून या गोष्टी नित्य सरावाने अंगी मुरवून घ्याव्या लागतील. नित्य सरावाची आवश्यकता लागेल.

पहिल्या मुद्द्यात तुम्ही आपल्या मनाची एकाग्रता कितपत आहे ते तपासून पाहिलं होतं. शेवटच्या मुद्द्यात ती एकाग्रता वाढवायची आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहायचं आहे.

वरील सर्व सवयी लावून घेतल्यात तर सरावाने तुमच्या मनाची एकाग्रताही चांगली विकसित होऊन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत होईल.

तुमचा निरर्थक वाया जाणारा वेळ वाचेल आणि तुम्ही तुमची उर्जा सर्जनशील कामात वापरू शकाल आणि तुमचे आयुष्य समाधानी, सार्थक, यशस्वी आणि आनंदी होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?