लॉकडाउन च्या काळात केलेल्या ‘या’ ट्विट मुळे ऋषी कपूर ठरले ट्रोलिंगचा विषय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पंतप्रधान यांनी ‘लॉकडाउन’ ची घोषणा करून आजचा हा पाचवा दिवस! या ५ दिवसांत या देशाने बरंच काही बघितलं, पोलिसांशी हुज्जत घालणारी लोकं बघितली!
तसेच पोलिसांना जेवणाची पॅकेट वाटप करणारी लोकं सुद्धा बघितली, बऱ्याच लोकांनी सरकारने घालून दिलेली बंधने ढाब्यावर बसवली तर काही लोकं आजही त्यांचं काटेकोर पालन करताना आपल्याला दिसतात!
लॉकडाउन घोषित केल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानंच चालू आहेत, म्हणजेच दूध, किराणा, भाजीपाला, औषध यांनाच फक्त त्यांची दुकानं चालू ठेवण्याची मुभा आहे!
बाकी हॉटेल्स, वाईन शॉप, वेगवेगळी कपड्याची दुकानं, इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं इत्यादि सेवा या बंद झालेल्या आपण बघत आहोत!
अशा अवस्थेत मद्यपी लोकांचे ब्लॅक मध्ये दारू मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील!
पण या दारूच्या विषयावरून बॉलिवूडचे जेष्ठ कलाकार आणि सगळ्यांचे लाडके चिंटूजी म्हणजेच ऋषी कपूर हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत!
होय, तर तुम्ही म्हणाल की ऋषी कपूर आणि दारूचा काय संबंध? पण तसं नाहीये, ऋषी कपूर यांनी त्यांच मदिराप्रेम हे सोशल मीडिया वरून तसेच अनेक मुलाखतीतून व्यक्त केले आहे!
फिल्म इंडस्ट्री मध्ये तर असंही म्हंटल जातं की कपूर खानदानाला मदिरा आणि जाडेपणा हे दोन शाप आहेत! आता ते कितपत खरं आणि खोटं हे ती लोकंच जाणे!
पण हो ऋषी कपूर यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचे मदिरा प्रेम आणि व्हिस्की प्रेम व्यक्त केले आहे, ज्याच्यामुळे ते बऱ्याच वेळेला ट्रोल चा विषय सुद्धा झालेत!
शिवाय त्यांचं ट्विटर वर बिनधास्तपणे बोलणं, त्यांचे फटकारे आपण सगळ्यांनीच अनुभवले आहेत, ज्यामुळे ते स्वतः बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत!
पण तरीही हा माणूस स्पष्ट बोलतो, आणि मनात जे येईल ते बोलतो त्यामुळे होणाऱ्या परिणामांना सुद्धा तो स्वतः सामोरा जातो, ही एक कौतुकाचीच बाब!
पण सध्या ट्विटरवर त्यांचे फॅन्स हे त्यांना एका वेगळ्याच पद्धतीने ट्रोल करत सुटलेत, ज्या दिवशी लॉकडाउन झाले त्यानंतरच लोकं लगेच ऋषी कपूर यांना ट्विट करून विचारू लागले!
एका फॅन तर सरळ सरळ ऋषी यांना टॅग करून विचारले “मग ऋषी सर व्हिस्की चा स्टॉक केलात की नाही?”
यावर त्यांनी चिडून त्या फॅन ला एक शिवी हासडली आणि आपण हे ट्विट डिलिट करत आहोत असेही नमूद केले!
त्यानंतर आणखीन एका फॅन ने असाच अत्यंत खोचक प्रश्न विचारून ऋषी कपूर यांना टॅग केले!
“दारूचा कोटा फूल आहे ना चिंटू काका?”
यावर ऋषी यांनी हा बघा आणखीन एक मूर्ख असं म्हणून ती गोष्ट टाळली, पण या अशा ट्वीट मुळे त्यांनी एक फायनल ट्विट आणि एक वॉर्निंगच त्यांच्या फॅन्स ना दिली!
ती अशी “जी व्यक्ति माझ्या देशाबद्दल किंवा माझ्या जीवनशैलीबद्दल विनोद करेल ते ट्विट डिलिट करण्यात येईल, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि यातून आपल्याला बाहेर पडायच आहे, सांभाळून ट्वीट करा!”
अशा टिपिकल ऋषी कपूर स्टाइल मध्ये त्यांनी या सगळ्या ट्रोल करणाऱ्या लोकांची चांगलीच कान उघडणी केली!
खरंतर हे सगळं चालू झालं जेंव्हा लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर ऋषी कपूर यांनी ट्वीट करून पंतप्रधानांना संबोधित केलं आणि “तुम्ही काळजी करू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत!”
असं ट्वीट करून आपला सपोर्ट दाखवला तेंव्हापासून त्यांना हे असं ट्रोल केलं जात आहे! आता अर्थात या सगळ्याला ऋषी कपूर यांचा स्वभाव देखील तितकाच कारणीभूत आहे!
गरजेपेक्षा जास्त स्पष्टवक्ता असणं हे सुद्धा बऱ्याच वेळेला अंगाशी येतं आणि त्यामुळेच ते बऱ्याच वेळेला अशा ट्रोलचा विषय बनतात किंवा काही वादाच्या भोवऱ्यात सापडतात!
ऋषी कपूर हे नुकतेच न्यू यॉर्क वरुन ११ महिन्यांची कॅन्सर ची ट्रीटमेंट घेऊन भारतात परतले आहेत, आणि लॉकडाउन होऊन स्वतः ते घरात राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत!
त्यांची पत्नी नितू सिंग यांनी सुद्धा त्यांचे योगसाधना करतानाचे व्हीडियो सोशल मीडिया वर शेयर केले आहेत!
जेंव्हा अभिनेत्री कनिका कपूर हिची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी बाहेर आली तेंव्हा सुद्धा ऋषी कपूर यांनी त्यांच्या वेगळ्याच शैलीत ट्वीट केले होते! त्या ट्वीट मध्ये ते म्हणाले –
“सध्या कपूर आडनाव असलेल्या लोकांचे दिवस फार वाईट चालले आहेत, हे भगवंता इतर कपूरां-कडे सुद्धा लक्ष दे, त्यांच्या हातून काही अघटित घडू नये हीच प्रार्थना!”
शिवाय या लॉकडाउन च्या काळात त्यांनी एक आगळी वेगळी विनंतीच सरकारला केली आहे, आणि ते ट्वीट पाहून तुम्हाला तुम्ही सुद्धा चक्रावून जाल! ती ट्वीट असं आहे –
“सरकारने संध्याकाळी काही वेळ तरी लायसन्स असलेली दारूची दुकानं उघडी ठेवावी, याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, पण तसंही ब्लॅक मध्ये बऱ्याच ठिकाणी दारू विकली जात आहेच.
शिवाय जे फ्रस्ट्रेटेड आहेत, किंवा डॉक्टर पोलिस यांना सुद्धा त्यांच्या कामातून थोडी विश्रांती मिळेल, त्यांना सुद्धा याची गरज भासतेच!”
अशाप्रकारे त्यांनी ट्वीट करून या वादाला नवीन वाटच फोडून दिली आहे, अर्थात यात काय बरोबर किंवा काय चूक हे आपण ठरवू शकत नाही, कारण सोशल मीडिया वर प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा हक्क असतो.
तसाच तो अधिकार या सेलिब्रिटीजना सुद्धा आहे, पण ऋषी कपूर यांचे अशाप्रकारचे ट्वीट बऱ्याच लोकांना गोंधळात टाकणारे आहे!
संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देतोय, पण तरीही बऱ्याच ठिकाणी दारू आणि तत्सम पदार्थ हे ब्लॅक मध्ये म्हणजेच जास्त दर आकारून विकले जात आहेत!
ऋषी कपूर यांचा हा मुद्दा जरी योग्य वाटत असला तरी या युद्धसमान परिस्थितीत दारूची दुकानं उघडणे म्हणजे कोरोनाला रान मोकळं करून देण्यासारखे आहे!
त्यामुळे आपण सगळेच हे नियम पाळूया आणि हा आजार लवकरात लवकर कसा जाईल यासाठी सरकारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करूया!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.