आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जवळपास ३३ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर गाजलेली रामायण ही मालिका पुन्हा दूरदर्शनवरून प्रस्तुत होणार!
तिसेक वर्षांपूर्वी टिव्हीच्या कार्यक्रमांत इतिहास रचणाऱ्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे आज २८ मार्च २०१० पासून पुनःप्रसारित होणार.
निमित्त आहे कोरोना व्हायरसच्या निमित्ताने झालेले लॉकडाऊन आणि त्यासाठी लोकांना घरात बसवून ठेवणे.
१९८७ सालच्या जानेवारी महिन्यात रामानंद सागर यांना दूरदर्शनवरून ही मालिका बनवण्यासंबंधी विचारणा झाली होती.
रामानंद सागर यांच्या जन्मशताब्दीनंतर त्यांचा मुलगा प्रेमसागर याने त्यांच्या आठवणीत सांगितले होते, की बाबांना रामायणावर फार पूर्वीपासून चित्रपट किंवा मालिका बनवण्याचे स्वप्न होते.
परंतु योग येत नव्हता. १९७५ पासून त्यांनी त्यावर विचार करायलाही सुरूवात केली होती. परंतु दुरदर्शनवरून काही ना काही कारणं सांगून ते लांबणीवर पडत गेले होते.
अखेर २५ जानेवारी १९८७ ला रामायण मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि या मालिकेने टिव्ही चॅनल्सचा इतिहासच बदलून टाकला.
पहिल्या काही भागानंतरच ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत गेली. फक्त भारतातच नव्हे, तर वेगवेगळ्या ५५ देशांतून ही मालिका टिव्हीवरून प्रसारित झाली.
जवळपास ६५,००,०००,०० प्रेक्षक ती मालिका बघत होते. परंतु या मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एकीकडे राजकीय चळवळींनी वेग धारण केलेला होता.
ही मालिका इतकी लोकप्रिय झाली, की दूरदर्शनवर चाहत्यांच्या पत्रांचा भडिमार सुरू झाला. लोक यातील कलाकारांनाच देव समजून त्यांच्याकडे बघू लागले.
मालिका सुरू झाली की त्यातील पात्रांना नमस्कार घालू लागले. जणू प्रत्यक्ष रामाचं दर्शन झाल्यासारखे भावनिक होऊ लागले.
रामानंद सागर यांचे सुपुत्र प्रेम सागर म्हणतात की रामायण मालिका सुरू करण्याचा बाबांचा हेतू साधा सरळ होता. ते त्यांच्या मनात अनेक वर्ष होतं. त्यांनी मालिका सादर करण्यापूर्वी रामायणाचा बराच अभ्यास केला.
अनेक रामायणे वाचून काढली. त्यातील तुलसीदासचं रामायण प्रामुख्याने नजरेसमोर ठेवून त्यांनी मालिका दिग्दर्शित केली.
रामायण मालिकेच्या लोकप्रियतेनंतर अशा पौराणिक मालिकांचा रतीब सुरू झाला. परंतु त्यांच्या दिग्दर्शकांना केवळ तांत्रिक दर्जात रस होता. त्यांनी त्या पुराणांचा अभ्यास केला नाही.
त्यामुळे त्यांच्या तुलनेत रामायण ही आमची मालिका दर्जेदार आणि अधिक लोकप्रिय झाली होती.
रामानंद सागर हे मूळचे काश्मिरी. त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९१७ रोजी एका श्रीमंत घरात झाला. ते लेखक होते आणि वेगवेगळ्या टोपणनावाने सुरूवातीला ते लिहीत असत.
सिनेमाक्षेत्रात नशीब आजमावायला ते मुंबईत आले. सुरूवातीच्या काळात पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर त्यांनी सहाय्यकाचे काम केले!
त्यानंतर सागर आर्ट्स या नावाने आपली कंपनी सुरू करून बरेच छोटे मोठे सिनेमे तयार केले. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती रामायण या मालिकेमुळेच.
प्रेम सागर म्हणतात, की दूरदर्शनवरून परवानगी मिळताच आम्ही रामायण मालिकेचे भाग जलदगतीने बनवण्यास सुरूवात केली. त्यात लागणारे कलाकारही फार आधी विचार करून असे निवडलेले नव्हते.
अनेक कलाकार आठवडा आधी निवडले जात. त्यात रामाची प्रमुख भुमिका करून पुढे खूप प्रसिद्ध झालेल्या अरुण गोविलला आधी नाकारण्यात आले होते. पण नंतर पुन्हा त्याची निवड केली गेली होती.
सुरुवातीला राम रावणाचा वध करून अयोध्येत परत येतो आणि आपले राज्य सांभाळतो इथवरच मालिका पूर्ण करून समाप्त केली होती.
रामानंद सागर यांचा तिथपर्यंतच्या रामायणावरच विश्वास होता. पुढे उत्तर रामायण आणि त्यातील सीता त्याग प्रकरणांवर त्यांचा विश्वास नव्हता.
माझा राम असा नाही, तो अशा तऱ्हेने सीतेचा त्याग करणार नाही अशी त्यांची श्रद्धा होती. प्रेम सागर पुढे म्हणतात, की तरी देखील आम्हाला लोकांच्या दबावामुळे पुढील लव-कुशांच्या संदर्भाचे भाग बनवावे लागले.
चेन्नईच्या एका आजारी आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या चाहत्याच्या आग्रहामुळे असे भाग बनवून आम्ही खास त्याला पाहण्यासाठी ते पाठवले होते. इतका त्या मालिकेचा लोकांवर प्रभाव होता.
या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर सागर प्रॉडक्शनने अशा आणखी पौराणिक मालिका बनवल्या. त्यात श्रीकृष्ण, लव-कुश, अलिफ-लैला इत्यादी मालिकांचा समावेश होता.
पुढे जागतिकीकरण आणि पाश्चात्य सिनेमे यांच्या प्रभावामुळे इथल्या माध्यमांमध्ये बदल होत गेले. आणि पौराणिक मालिकांचं युग संपलं.
सीतेची भुमिका करणारी दिपिका चिखलिया आणि रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांना तर निवडणुकीची तिकीटे देण्यात आली आणि ते दोघेही खासदार म्हणून निवडूनही आले.
मात्र तेव्हा या मालिकेत लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारे अरुण गोविल, दिपिका चिखलिया, लक्ष्मणाची भूमिका करणारा सुनिल लहरी इत्यादी कलाकार पुढे तितक्या ताकदीच्या भूमिका मिळवू शकले नाही!
आणि आपली ती लोकप्रियता टिकवू शकले नाही.
यात सीतेची भूमिका करणारी दिपिका चिखलिया टिप्स ऍन्ड टोज या सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाशी लग्न करून गेली!
आणि बऱ्याच वर्षांनी तिने नुकत्याच आलेल्या ‘बाला’ या आयुष्मान खुराणाच्या भूमिकेत आईची भूमिका केली आहे.
प्रसिद्ध कलाकार आणि कुस्ती खेळाडू दारा सिंग यांनी या मालिकेत हनुमानाची भूमिका केली होती आणि त्यांची ती भूमिका देखील बरीच लोकप्रिय झाली होती.
थोडक्यात या मालिकेने इतिहास रचला. लोकांच्या धार्मिक भावनांना एक दिशा दिली.
अशा वेळी ही मालिका कोरोना लॉकडाऊनच्या निमित्ताने पुन्हा आजपासून प्रसारित करण्यात येत आहे तेव्हा प्रत्येकाने घरीच रहा आणि या उत्कृष्ट मालिकेचा पुन्हाआनंद घ्या!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.