या मराठमोळ्या डॉक्टरचा चीनमधील पुतळा चिनी बांधवांसाठी आहे आदराचं ठिकाण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चीन गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. कोरोना आणि त्यात आताची परिस्थिती, चीनने केलेला त्याचा सामना या सगळ्याबद्दल बोलले जात आहे.
चीनने आपल्या देशातील कोरोना रुग्णांना लवकर बरे व्हावे म्हणून कमी वेळात हॉस्पिटल उभारलं, अत्यंत शिस्तीने काळजी घेऊन कित्येक रुग्णांचा जीव वाचवला आणि त्यांना बरं केलं.
ह्या बातम्या आपल्याला माहीत झाल्या आहेत, परंतु साधारण ऐंशी वर्षांपूर्वी भारतातल्या एका डॉक्टरने चीनमध्ये जाऊन तिथल्या रुग्णांना बरं करण्याचे जे काही काम केलं ते कदाचित कोणाला माहित नसेल.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
त्या डॉक्टरांचे नाव म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस.
मूळचे सोलापुरचे असलेले डॉक्टर कोटणीस यांनी चीनमध्ये जाऊन तिथल्या रुग्णांची काळजी घेतली, त्यांना बरं केलं. त्यामुळे चीन मध्ये त्यांचा खूप आदर केला जातो.
डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस त्यांचा जन्म १९१० साली सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांची एकूण सात भावंड होती.
सोलापुरात शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत, शेठ जी. एस मेडिकल कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी, येथे वैद्यकीय शिक्षण घेतलं. त्यातली पुढची मास्टर डिग्री त्यांना करायची होती.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोलापुरात येऊन एक दवाखाना काढण्याचा त्यांचा विचार होता. परंतु त्याच वेळेस दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले होते.
१९३० ते १९४० हा कालखंड जगभरातच अनेक उलथापालथी करणारा ठरला. भारतात स्वातंत्र्य लढा सुरू होता. त्याच वेळेस चीन आणि जपान यांचे एकमेकांशी पटत नव्हतं.
१९३७ -३८ मध्ये तिकडे चीन मध्ये देखील युद्ध सुरू झाले होते. त्यांच्या सैनिकांना वैद्यकीय सेवा कमी मिळत होत्या. त्यासाठी चीनला डॉक्टरांची गरज होती.
त्यावेळेस भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं. परंतु काँग्रेस देखील त्यावेळेस सबळ होती.
चीनचा क्रांतिकारी जनरल माओ झेदोग याने पंडित जवाहरलाल नेहरू यांना, वैद्यकीय मदत देण्यासाठी आणि आमच्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत द्या अशी पत्र पाठवून विनंती केली होती.
त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते सुभाष चंद्र बोस. त्यांनी लगेचच ही मदत देण्याचं कबूल केलं आणि आणि काही डॉक्टरांना देखील तुमच्या मदतीसाठी पाठवू असं सांगितलं.
तो काळ होता १९३८, डॉक्टर कोटणीस यांचं डिग्रीचे शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांना त्याच्यातली पदविका घ्यायची होती पण तितक्यात त्यांना या संधीबद्दल समजलं.
तसंही त्यांना जगभरातल्या जगभरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा होतीच. त्यांनी लगेचच आपल्या घरच्यांना याविषयी सांगितलं आणि आपल्या इच्छेबद्दल ही सांगितलं.
खरंतर त्या वेळेस चीन बद्दल फारशी माहिती भारतात नव्हती. अगदी डॉक्टरांना देखील त्या देशाबद्दल फारसं काही माहीत नव्हतं, फक्त चीन मधून सिल्कचा व्यापार होतो इतकीच कल्पना होती.
परंतु त्यांची इच्छा असेल तर त्यांनी जावं असं त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं. मग डॉक्टरनी, ‘मी जाण्यास तयार आहे’ असं कॉलेजमध्ये कळवलं.
आणि त्या टीम मध्ये डॉक्टर कोटणीस यांची निवड केली गेली. डॉक्टरांनी ही बातमी आपल्या घरच्यांना सांगितली. आणि सहा सात महिन्यात मी परत येईन असंही सांगितलं.
त्यामुळे घरच्यांनीही त्यांना जाण्यास विरोध केला नाही. आईला थोडे वाईट वाटले परंतु वडिलांनी त्यांची समजूत काढली. चांगल्या कामासाठी ते जात आहेत असं समजावलं.
डॉक्टरांबरोबर आणखीन चार डॉक्टर होते. त्यात नागपूरचे एम. चोळकर, कलकत्त्याचे बि.के. बासू ,आणि देवेश मुखर्जी तर अलाहाबादचे एम.अटल या डॉक्टरांचा समावेश होता.
डॉक्टर चीनला निघाले परंतु मध्येच हॉंगकॉंगमध्ये ३-४ महिने राहिले. नंतर त्यांनी चीन कडे प्रस्थान केलं. तोपर्यंत त्यांचा घरच्यांशी नित्य पत्रव्यवहार होत होता, या प्रवासाच्या काळात त्यांनी थोडीफार चिनी भाषाही शिकून घेतली होती.
जेव्हा ते चीनला पोहोचले तेव्हा जनरल माओ झूडे यांनी त्यांचे स्वतः स्वागत केलं. एशियन देशांमधून ही पहिलीच मदत चीनला मिळत होती.
यांना अगदी दवाखाना घालून बसणं शक्य नव्हतं म्हणून मग त्यांनी एका गाडीतून आपला फिरता दवाखाना सुरू केला.
कुठल्या भागात युद्ध होत आहे तिकडे जाऊन तिथे जखमी झालेल्या सैनिकांना औषधोपचार करणे इत्यादी कामे हे लोक करू लागले. एका एका दिवसात ८०० सैनिकांवरती उपचार ही टीम करत होती.
कितीही कठीण प्रसंग असला तरी त्या सर्व सैनिकांची सेवा सुश्रुषा या टीमने केली. डॉक्टर कोटणीस यांनी तर एकदा सलग ७२ तास जराही झोप न घेता ऑपरेशन्स केली.
या सैनिकांना तपासलं, औषध दिलं, जखमी सैनिकांच्या जखमांना मलमपट्टी केली. कामाचा कितीही प्रचंड ताण असला, त्यांची शारीरिक आणि मानसिक दमणूक होत होती. पण हे सर्वजण त्याला सामोरे जात होते.
शेवटी युद्ध थांबलं आता त्यांची भारतात येण्याची वेळ झाली त्या पाच जणांच्या टीम भारतात यायला परत निघाली, फक्त एकाला सोडून आणि ते म्हणजे डॉक्टर कोटणीस.
चिनी सैनिकांवर इलाज करता करता डॉक्टर चीनच्या प्रेमातच पडले आणि त्यांनी पुढचं आयुष्य चीनमध्ये घालवायचं ठरवलं. ते तेथे खूप आनंदी होते. त्यांनी आपल्या घरच्यांना जी पत्र लिहिली आहेत त्यात ते तेथे रमले आहेत हे कळत होतं.
त्यांच्या बहिणीने मनोरमा कोटणीस यांनी त्यांच्या आठवणी सांगताना म्हटलं आहे की, तिथल्या वेगळ्या गोष्टी द्वारकानाथ पत्रात लिहायचे. अगदी तिथले लोक जेवण देखील बांबू स्टिकने करतात हेही सांगितलं होतं.
तसंच तिथे चहा, ग्रीन टी पिला जातो हेही सांगितलं होतं. आम्हाला ते वाचून हसायला यायचं अशीही आठवण मनोरमा कोटणीस यांनी सांगितले.
डॉक्टरांना शेंगादाण्याचे लाडू खूप आवडायचे. सोलापुरात असे लाडू फार प्रसिद्ध आहेत परंतु त्यांना ते तिकडे मिळाले नाहीत पण डॉक्टरांनी कधीही तिथल्या जेवणाविषयी तक्रार केली नाही.
उलट तिथं डॉक्टरांसाठी एक जेवण यायचं आणि पेशंटसाठी वेगळं परंतु डॉक्टर नेहमी आपल्या पेशंट बरोबर आपले जेवण शेअर करून जेवायचे.
दुसरं महायुद्ध सुरू झालं तसं तसा डॉक्टरांचा घरच्यांशी संबंध कमी होत गेला. पत्र येण्याचे प्रमाण कमी होत गेलं, ते तिकडे कसे आहेत याच्याविषयी कळत नव्हतं.
शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी पंडित नेहरू यांना पत्र लिहून डॉक्टर कोटणीस यांच्याबद्दल विचारलं.
पंडित नेहरूंनी कोटणीस कुटुंबाला डॉक्टर कोटणीस व्यवस्थित असून खूप छान काम करत आहेत, असं उलट टपाली कळवलं. पंडित जवाहरलाल नेहरू कायम कोटणीस कुटुंबीयांच्या संपर्कात होते.
शेवटी डॉक्टरांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. ते लोकांबरोबर गाणे म्हणायचे, विनोद करायचे. तिथेच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी चिनी भाषा शिकली.
आपलं नाव देखील ते चिनी भाषेमधून लिहायचे. डॉक्टरांच्या याच प्रयत्नांमुळे चिनी लोक त्यांच्यावर प्रेम करू लागले.
भारतातला एक डॉक्टर केवळ आपल्यासाठी इथे राहतोय, हीच गोष्ट चिनी लोकांनाही आवडायला लागली.
उत्तर चीनमध्ये सेवा दिल्यानंतर त्यांची बदली माओच्या नेतृत्वाखालील असलेल्या सैन्यात झाली.
तिकडेही त्यांचे रुग्णांना बरे करण्याचे प्रयत्न पाहून, डॉक्टर कोटणीस यांचा सेवाभाव पाहून त्यांची, ‘बेथूने इंटरनॅशनल पिस हॉस्पिटल’, याठिकाणी संचालक म्हणून नेमणूक झाली.
आणि तिकडेच त्यांना त्यांची जीवनसाथी मिळाली, तिचं नाव क्विंगलान ती तिथली मुख्य नर्स होती. ती त्यांची खूप काळजी घ्यायची. डिसेंबर १९४१ मध्ये दोघांचा विवाह झाला.
नंतर त्यांना ऑगस्टमध्ये एक मुलगाही झाला. त्यांनी त्याचं नाव यिनहुवा असं ठेवलं. यिन म्हणजे इंडिया हुवा म्हणजे चीन. परंतु ही गोष्ट ते आपल्या या भारतातल्या घरी कळवू शकले नाहीत.
पण त्यांचा सुखी संसार फार दिवस टिकला नाही. डॉक्टर कोटणीस यांनी दिवस-रात्र स्वतःला रुग्णसेवेला वाहून घेतलं होतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांना तपासत राहिले, त्यांच्यावर औषधोपचार करत राहिले.
परंतु त्यातच त्यांची प्रकृती खालावली, त्यांना मेंदूचा अपस्मार झाला त्यातच त्यांचा अंत झाला. १९४२ साली वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी डॉक्टर कोटणीस यांचा अंत झाला.
चीनमधल्या नानक्वान मध्ये त्यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मृत्यूनंतर माओ झेडॉग यांनी, “सैन्याने त्यांचा एक खूप चांगला मदतनीस गमावला आहे तर राष्ट्राने चांगला मित्र गमावला, ते कायमच त्यांच्या कार्याने आणि सेवाभावाने जगभरात ओळखले जातील.
त्यांच्या स्मृति या फक्त चीनमध्येच राहणार असून संपूर्ण जगभर मानवजातीसाठी त्यांनी केलेल्या कामामुळे कायम राहतील.
एका सुखी भविष्याचे स्वप्न त्यांनी सगळ्यांसाठी पाहिलं म्हणून भविष्यात त्यांच्या कामाचा जास्त सन्मान केला जाईल”. असे गौरवोद्गार काढले.
पुढे त्यांच्या मुलाने डॉक्टरांच्या सारखंच डॉक्टर बनून लोकांची सेवा करायचे ठरवले होते, तो डॉक्टर देखील झाला मात्र त्याचाही स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अंत झाला.
पुढे त्यांच्या पत्नीला भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संयुक्त कार्यक्रमात नेहमीच बोलावले जायचे.
त्यांची पत्नी नेहमी मुंबईला मनोरमा कोटणीस यांच्याकडे भेटायला यायची. त्यांच्या पत्नीचे २०१२ मध्ये निधन झाले.
चीन मधले डेलीगेट्स जर भारतात आले तर ते सोलापूर आणि मुंबईमध्ये डॉक्टर कोटणीस यांच्या आठवणींसाठी नेहमी त्यांच्या कुटुंबियांना भेट देतात.
डॉक्टर कोटणीस यांनी अत्यंत नि:स्वार्थी भावनेने आणि रुग्णांची सेवा केली. त्यांच्या याच कृतीचा सन्मान म्हणून चीन आणि भारत सरकारने पोस्ट ऑफिस स्टॅम्प काढले आहेत.
शांताराम बापू ने त्यांच्या कार्याचा त्यांच्या कार्याने भारावून जाऊन एक सिनेमा काढला ज्याचं नाव आहे, ‘डॉक्टर कोटणीस की अमर कहानी’. त्यांचा सिनेमा चीन १९८२ साली ‘के डी हुवा दाय फु’ नावानेदेखील आला होता.
चीनमध्ये हुबई प्रांतात शिजियाझुआंग या शहरात त्यांच्या नावाने एक मेमोरियल पार्क उभारले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून एक पुतळा देखील उभारण्यात आला आहे.
डॉक्टर कोटणीस यांना चिनी लोकांनी दिलेली ही मानवंदनाच आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.