आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आणि देशातील बहुतांश सगळेच घरी विसावले
सुरवातीला ही विश्रांती अनेकांना पसंत पडली असली, तरी अवघ्या दोन दिवसात घराघरात कंटाळवाणा सुर ऐकु येत आहे.
आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असली, तरी बाहेर कोरोनाचा विळखा कायम असल्याने घरी राहण्याचा पर्याय सर्वोत्तम.
घरात बसून नेमकं करायचं काय? या प्रश्नांनी अनेकांना मनस्ताप होत आहे. यामुळे होणारी चिडचिड आणि भांडणाचीही सुरुवात झाली आहे.
त्यातच टिव्हीवरच्या कोणत्याही न्युजचॅनलवर कोरोनाशी निगडित बातम्या प्रसारित होत आहे.
देशातच नव्हे जगभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, मृत्युचे तांडव, त्याचे फोटो पाहिले की होणारा त्रास आणि येणारी निराशा शरिरासाठीही हानीकारक ठरु शकते.
त्यामुळे मिळालेल्या या वेळाचं योग्य नियोजन केलंत तर ही सुट्टी तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
सध्या आपल्यापैकी बहुतेकांकडे दिवसभर घरात राहून वेळेचा सदुपयोग करण्याची उत्तम संधी आहे.
वाचन, व्यायाम, कुटुंबीयांसोबत गप्पा , स्वैयंपाक , साफसफाई , घरातील कामे हे सगळं करून मग थोडा वेळ मनोरंजनासाठी द्यायला काहीच हरकत नाही.
वारंवार त्याच त्याच बातम्या बघून मनावरचा ताण वाढवण्यापेक्षा दिवसातील काही तास मनोरंजनासाठी घालविलेत तर मुडही फ्रेश होईल.
मन पुन्हा एकदा ताजे तवाने करण्यासाठी उत्तम विनोदी मराठी चित्रपट तुम्ही बघू शकता.
अशी ही बनवाबनवी
१९८८ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
चार मित्र घराच्या शोधात असताना त्यांना अनेक आव्हानांना सामोर जावं लागत आणि त्यावर ते कशी मात करत जातात अशी ही गोष्ट आहे.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन ह्या दिग्गज कलाकारांचे उत्तम अभिनय आणि प्रासंगिक विनोद ह्यांच्या माध्यमातून हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो आणि हसवत राहतो.
या चित्रपटाचे संवाद हाच त्याचा आत्मा आहे. संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघा आणि पोटभर हसा.
धुमधडाका
सुप्रसिद्ध कलाकार महेश कोठारे यांनी दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण केलं ते धुमधडाका या चित्रपटातून.
तसंच लक्ष्मीकांत बेर्डे याना विनोदवीर म्हणून ओळख मिळवून दिली.
इथून पुढे लक्ष्या, महेश आणि आणि अशोक सराफ यांनी अनेक दर्जेदार चित्रपट केले. धूम धडाका हा मज्जेशीर चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल.
गुपचूप गुपचूप
मुंबई आणि गोवा अशा दोन शहरात घडणारी ही कथा.
अशोक सराफ आणि रंजना यांचा धमाल अभिनय आणि आशालता वाबगावकर, श्रीराम लागू आणि पद्मा चव्हाण ह्या फारशा विनोदी भूमिका न करणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने कथेला उत्कृष्ट साथ दिली आहे.
ह्या चित्रपटातील गाणी अतिशय श्रवणीय आहेत.
गम्मत जम्मत
दोन तरुणांना असलेली पैशाची गरज आणि त्यातून त्यांनी रचलेला किडनॅपिंगचा केलेला गंमतशीर प्रयत्न ह्या भोवती ही कथा गुंफलेली आहे.
खरोखरच नावाप्रमाणे ह्यात अनेक गमती जमती घडत जातात आणि आपली मात्र हसून पुरेवाट होते.
अशोक सराफ , सचिन , वर्षा उसगावकर ह्याच्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
शेजारी शेजारी
एक सुखवस्तू कुटुंब , भोळा नवरा आणि साधी बायको, आणि त्यांचे नवे शेजारी, ही कथा तुमची आमची कथा, चित्रपटात मोठ्या रंजकतेने साकारली आहे.
शेजारी राहायला येते त्याच कुटुंबातील बायकोची मैत्रीण. तिचा होणार घटस्फोट आणि त्यामुळे अडकलेली प्रॉपर्टी ह्या साऱ्यामुळे सगळेच जण एका विचित्र परिस्थितीत अडकून होणारे समज गैरसमज ह्यातून निर्माण होणारे विनोद.
वर्ष उजगावकर , निशिगंधा वाड आणि अशोक लक्ष्याची जोडी. हा चित्रपट म्हणजे विनोदाची मेजवानी आहे.
बिनकामाचा नवरा
कायम मेहनत न करता पैसे कमवायची संधी शोधणारे दोन आळशी मित्र (अशोक सराफ आणि निळू फुले) हे, गावातील एका नेत्याच्या नादाला लागतात आणि मग त्यांच्या बायकाच त्यांना धडा शिकवायचं ठरवतात अशी कथा आहे.
गावातील राहणी, तिथले राजकारण ह्याच्या पार्शवभूमीवर घडणार उत्कृष्ट विनोद आसलेला हा चित्रपट आवर्जून बघा.
एक डाव भुताचा
एक साधा शिक्षक जो मुळात स्वतः प्रॉब्लेम मध्ये अडकलेला असतो आणि त्यात त्याला मराठा सैन्यातील एका मावळ्यांचे भूत दिसू लागतं.
फॅन्टसी स्वरुपातली ही कथा असली, तरी सध्याच्या कंटाळवाण्या आणि टेन्शनच्या दिवसांमध्ये मात्र हा चित्रपट नक्की बघा.
यात अशोक सराफ यांनी वठवलेली भूताची भूमिका अजरामर आहे
मराठी विनोदी चित्रपट म्हटलं आणि दादा कोंडके चे चित्रपट येणार नाही हे शक्यच नाही.
दादा कोंडके हे मराठीतील एक दिग्गज कलाकार आणि निर्माते होते. मराठी चित्रसृष्टीतील एक अख्खा कालखंड त्यांच्या चित्रपटांनी गाजवला.
त्यांचा चित्रपटातील द्वयर्थी भाषा, गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि सतत ९ सिल्वर ज्युबिली देऊन त्यांची गिनीज बुकात नोंद झाली.
पांडू हवालदार
हा सगळ्यात लोकप्रिय ठरलेला चित्रपट ज्यात दादांनी स्वतः पांडू हवालदार साकारला होता.
एक प्रामाणिक पोलीस, त्याचा भ्रष्ट सहकारी आणि तस्कर ह्यांच्यात खूप गोंधळ होतो आणि सरते शेवटी तस्कर पकडले जातात.
दादांची खास शैली आणि द्वयर्थी विनोद ह्यातून भरपूर हसवणारा हा चित्रपट नक्की बघा.
राम राम गंगाराम
गंगाराम ह्या गावातल्या मुलाला अचानक त्याच्या काकांची संपत्ती मिळते , त्यातून त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि शेवटी तो त्याच्या गावाला त्याच्या कुटुंबाकडे परत जातो, अशी ही कहाणी आहे.
ह्यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.
याशिवाय दादांचे तेरे मेरे बीच मे, येऊ का घरात , एकटा जीव सदाशिव , पालव पालवी , बोट लावीन तिथे गुदगुल्या , आली अंगावर. इतर अनेक गाजलेले चित्रपट तुम्ही पाहू शकता.
मराठी चित्रपटसृष्टी ही विनोदी चित्रपट निर्मितीत कायम आघाडीवर राहिलेली आहे. वर दिलेल्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक दर्जेदार विनोदी चित्रपट तुम्ही पाहू शकता.
झपाटलेला,बाळाचे बाप ब्रह्मचारी,तीन फुल्या आणि तीन बदाम ,गाढवाचे लग्न ,आगा बाई अरेच्चा ,नारबाची वाडी ,वळू ,एलिझाबेथ एकादशी ,सवत माझी लाडकी ,भुताचा भाऊ हे चित्रपटही तुम्हाला नक्की हसवतील.
इंटरनेटवर हे सगळे चित्रपट उपलब्ध असल्याने घरच्या घरी मनोरंजनाचा हा खजिना पाहण्यास काहीच हरकत नाही.
दररोज एक याप्रमाणे या चित्रपटांचं नियोजन केलंत तरी संपुर्ण कुटुंबासह हा कठीण काळही आनंदात सरेल.
फावल्या वेळात हे धमाल चित्रपट बघा आणि हसत रहा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.