कोरोनाचं संकट अधिक भीषण झालंय का? “या” घटना काळजीत टाकणाऱ्या आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना व्हायरस भारतात आला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातही आता त्याचे पडसाद दिसू लागलेत.
कोरोनाचे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त रुग्ण सध्या मुंबई आणि परिसरात आहेत. मुंबईचा विचार करता तिथे सगळ्या प्रकारचे लोक राहतात, म्हणजे श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत लोक तिथे आहेत आणि प्रत्येकाचा कोणत्याही कारणाने तिथे एकमेकांशी संपर्क होतोच.
त्यामुळे तिथे कोरोनाचा जास्त प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच COVID 19 शी दोन हात करताना आरोग्य यंत्रणेवर जास्त ताण येणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईतली बरीच लोकं ही चाळीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहतात.
आता जे मुंबईतील कोरोनाचे रुग्ण मिळताहेत ते ह्या स्लम एरिया मधले आहेत. परदेशातून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीच्या घरात काम करणाऱ्या ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली.
जी मुंबईच्या परळ भागातल्या चाळीत राहणारी महिला आहे. दुसरी जी व्यक्ती आहे ती ३७ वर्षांची कलिना येथील जांभळी पाडा येथील झोपडपट्टीत राहणारी आहे.
घाटकोपर येथील झोपडपट्टीमधील पंचवीस वर्षांचा तरुण आणि ६८ वर्षांची महिला यांना कोरोनाची लागण झालेली आहे.
त्यामुळे या महिला कुठे कुठे काम करत होत्या, ती सगळी लोकं त्याच बरोबर त्या महिलांचे कुटुंबीय या सगळ्यांचे आरोग्य तपासणी होणार आहे. परंतु हीच गोष्ट आरोग्य व्यवस्थेला जरा काळजीत पाडणार आहे.
कारण कोरोना म्हणजे शक्यतो गर्दी टाळणे, आणि आता सरकार सांगत आहे की, सोशल डिस्टन्सिंग हे प्रत्येकाने पाळायचे आहे. परंतु मुंबईतल्या झोपड्यांमध्ये हे सोशल डिस्टन्सिंग किंवा एकमेकांपासून अंतर ठेवून राहणार शक्य होईल का?
कारण तिथे दहा बाय दहाच्या खोलीत दहा लोक राहतात. संपूर्ण वस्तीसाठी सार्वजनिक शौचालय आणि बाथरूम असतात. आणि वस्तीतील सगळेच लोक त्या शौचालयांचा आणि वापर करतात.
आता इतक्या लोकांचं विलगीकरण करणे हेच आरोग्यव्यवस्थेपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
परळमधील ६५ वर्षांची महिला आहे, जिला करोना ची लागण झाली आहे. ती एक मेस चालवते. तिच्या मेसमधून अनेक काम करणाऱ्या लोकांना डबे जातात.
तिथून जवळच असणाऱ्या बिझनेस सेंटर मध्येही तिचे डबे जातात. तिच्या घरच्यांबरोबरच या सगळ्या लोकांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
आणि प्रत्येकाची लक्षणं काय आहेत हे तपासावे लागणार आहे. ती राहत होती त्या चाळीचे सध्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या असून तिच्या संपर्कात किती लोक आले हे आता पोलिस तिथे विचारत आहेत.
कलिनातील जांभुळपाडा येथे जो ३७ वर्षांचा रुग्ण मिळाला आहे तो इटलीमध्ये एका हॉटेलात वेटर म्हणून काम करायचा. जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा विमानतळावर त्याचं स्क्रिनिंग करण्यात आलं.
त्यावेळेस त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. आणि आता तो कोरोना पॉझिटिव आहे आणि त्या जांभुळपाडा त्या वस्तीत आठशे लोक राहतात.
त्याला जेव्हा त्रास झाला तेव्हा त्याने जवळच्या डॉक्टर कडे तपासणी करून घेत तपासणी करून घेतली. नंतर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्याची टेस्ट करण्यात आली, पण तीही निगेटिव आली.
तरीही त्याला त्रास झाल्यावर परत त्याची टेस्ट कस्तुरबा मध्ये केली तर ती पॉझिटिव्ह आली. या सगळ्या कालावधीत तो किमान १०० लोकांना तरी भेटलेला आहे.
त्याच्या बायको आणि मुलांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. तो आधीच्या डॉक्टरांकडे गेला होता त्या डॉक्टरांचा दवाखाना सध्या बंद करण्यात आला आहे.
तिथल्या डॉक्टरांसहित इतर पाच जणांची टेस्ट ही करण्यात आली असून त्यांचेही रिपोर्ट यायचे आहेत. हीच गोष्ट सध्या आरोग्य यंत्रणेला अवघड वाटते कारण त्यांच्या म्हणण्यानुसार,
जेव्हा माणूस सार्वजनिक शौचालय वापरतो त्यावेळेस किमान वीस लोकांच्या तरी संपर्कात येतो. जांभळी पाडा इथल्या वस्तीतल्या ८०० लोकांची टेस्ट करणं शक्य आहे का किंवा त्यांना वेगळं ठेवणे शक्य आहे का असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.
घाटकोपर मधल्या ज्या ६८ वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. त्यानंतर तिच्या घरातील नऊ सदस्यांची चाचणी करण्यात आली परंतु कोणीही कोरोना पॉझिटिव्ह नाही, आता ती महिलादेखील कोरोना निगेटिव आहे.
या गोष्टीचं समाधान आरोग्य व्यवस्थेला घेण्याआधीच त्याच वस्तीतील एका २५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. घाटकोपरच्या ह्या झोपडपट्टीत जवळ-जवळ २३ हजार लोकांची वस्ती आहे.
त्यामुळे आता त्या तरुणाच्या सान्निध्यात किती जण आले त्यांचा शोध घेणे, त्यांना १४ दिवसांसाठी अलग ठेवणे इत्यादी गोष्टी आता आरोग्य व्यवस्थेला करणाऱ्या लागणार आहेत.
म्हणजेच येणाऱ्या पुढील काळात आरोग्य व्यवस्थेपुढचं आव्हान खूप मोठं असणार आहे.
ह्या कोरोनाव्हायरसने जगभरातल्या जवळजवळ सगळ्या देशांवरती आक्रमण केले आहे. जरी एखाद्या देशात नसेल तरी तो तिकडे जाणार हे आता अपरिहार्य आहे.
हा विषाणू अत्यंत हुशार असल्यासारखा वागत आहे. कोरोना विषयामध्ये तज्ञ असलेले हॉंगकॉंग मधील प्रोफेसर गॅब्रियल लेऊंग यांच्या म्हणण्यानुसार,
तुम्हाला जर कोरोना नाही असं वाटत असेल किंवा तुम्ही त्याची टेस्ट केलेली नाही. परंतु तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल किंवा होणार असेल.
ते असं म्हणत आहेत याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतः चीनमधल्या बीजिंग, गंगडॉंग, वुहान इत्यादी भागांचा WHO मधील सदस्यांबरोबर दौरा केला.
तिकडे सरकारने कोरोनाव्हायरस वर नियंत्रण आणण्या बाबत कोणत्या गोष्टी केल्या याची पाहणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार चीनने ज्या उपाययोजना केल्या त्या प्रत्येक देशाला करणे शक्य आहे का?
उर्वरित जगाला आत्ता आत्ता कोरोनाची ओळख होत आहे. त्यामुळे प्रत्येक देशातल्या देशातील परिस्थिती वेगळी असेल. शास्त्रज्ञांना अजूनही माहित नाही की, कोरोनाव्हायरस झालेल्या माणसाला परत तो होतो का?
कारण आत्तापर्यंतचे जे कोरोनाव्हायरस आलेले आहेत ते दरवर्षी माणसांना होत राहतात, पण अर्थातच ते सौम्य असतात. मात्र आता आलेला covid-19 हा जो व्हायरस आहे हा पूर्णतः नवीन असून अत्यंत हुशारीने आपलं काम करीत आहे.
आपण जसं म्हणतो की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे हळूहळू शिकत जातं तसे ह्या कोरोनाव्हायरस बद्दल झालेलं आहे. आता जो COVID 19, आला आहे तो लगेच त्याचा प्रभाव दाखवत नाही.
पण तो माणसाच्या शरीरात असतो आणि तो दुसऱ्याला होऊ शकतो. हा काळच माणसाला कळत नाही. हेच मुंबईमध्ये इटली वरून आलेल्या तरुणाबाबत झाले आहे.
म्हणूनच हा व्हायरस जास्त गुंतागुंतीचा आहे असं म्हटलं जातं.
जगभरातल्या दीड लाख लोकांना आत्तापर्यंत हा व्हायरसची लागण झाली असून जवळपास २० हजार मृत्यू ह्या व्हायरस मुळे झालेले आहेत म्हणूनच या व्हायरसला हुशार आणि कावेबाज म्हटलं जात आहे.
‘हा आता आपल्या आयुष्यभर कायम राहील आता हा परत जाईल असे वाटत नाही’, असं गेब्रियल लेऊंग यांचं म्हणणं आहे.
तर प्रोफेसर मेकी असं म्हणतात की, ‘जर आपल्याला इतर कोरोनाव्हायरस होत असतील तर हा देखील होईलच’.
म्हणूनच संपूर्ण पृथ्वीवर आलेला त्यातही मानव जातीवर आलेलं हे मोठं संकट आहे असं म्हणावं लागेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.