आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोरोना मुळे सगळेजण धास्तावलेले आहेत. सरकार प्रत्येकाला काळजी घेण्यास सांगत आहे.
घरातील लहान मुले, वयोवृद्ध माणसे यांना तर घराबाहेरही जाऊ नका असं सांगत आहेत. त्याच वेळेस ज्या महिला गर्भवती आहेत, त्यांनी अशा कठीण प्रसंगात काय करायला हवे आहे.
कारण कोरोना हा एक संसर्गजन्य आजार आहे. म्हणून गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
वारंवार हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिशू पेपर धरणे टिशू लगचंच डस्टबिन मध्ये टाकणे, सर्दी खोकला झालेल्या व्यक्ती जवळ न थांबणे.
गर्दी टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळणे,जर ऑफिस मध्ये काम करत असाल तर वर्क फ्रॉम होम करणे.
मुख्य म्हणजे गर्भवती महिलांनी देखील सरकारने जी काळजी घ्यायला सांगितले आहे, तेच फॉलो करायचे आहे.
आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार ज्या प्रेग्नेंट महिला होत्या आणि ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली त्यांना साधारण नेहमीच्या लोकांना जो त्रास होतो तोच त्रास झालेला आहे.
म्हणजे साधारण फ्लू ची लक्षणे दिसून आलेली आहेत. गरोदर स्त्रीला जर फ्लूची लक्षणे आढळली तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे.
गर्भवती महिलांना भीती असते ती की जर मला कोरोना व्हायरस झाला तर गर्भपात होईल का?
जगभरात झालेल्या आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये असे दिसले आहे की, आतापर्यंत कोणत्याही कोरोना व्हायरस झालेल्या गर्भवती महिलेचा गर्भपात कोरोनामुळे झालेला नाही.
गर्भवती महिलांना तसंही विशेष काळजी घ्या असं सांगितलं जातं. म्हणूनच कोरोना व्हायरसच्या बाबतीत आहे ही काळजी घ्यावीच लागणार आहे. कारण गर्भावस्थेत एखादा आजार होणं पुढे गुंतागुंत निर्माण करू शकतं.
आत्ताच्या बाबतीत याबाबतचा अभ्यास खूप झालेला नाही, कारण हा आजार नवीन असल्यामुळे त्याच्या केसेस कमी आहेत. गर्भावस्थेत कुठलंही होणार व्हायरल इन्फेक्शन हे भयावह असू शकते.
त्यासाठी काळजी घेतली पाहिजे, गर्दीत जाणे टाळले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाणं तसेच सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणं योग्य नाही.
काही काही स्त्रिया या नोकरी करणाऱ्या असतात त्यांना कामावर जायचे असते मग अशा स्त्रियांनी काय करावं? असाही प्रश्न पडू शकतो, तर जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम ही फॅसिलिटी मिळत असेल तर घरूनच काम करा.
आणि जर गर्भ २८ आठवड्यांपेक्षा कमी दिवसांचा असेल तर धोका जास्त असतो म्हणून घरूनचं काम करणं योग्य असेल.
गर्भवती स्त्रीला जर आधीच हार्ट डिसीज हृदयरोग किंवा फुफ्फुसांचा काही आजार असेल त्यावेळेस तर नक्कीच घरी राहणे योग्य असेल. घरी राहून मन प्रसन्न ठेवण्यासाठी योग करावा.
जर गर्भवती स्त्री हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करत असेल तर, फ्लू झालेले रुग्ण त्यांच्याशी संपर्क ठेवू नये.
सध्या आजूबाजूला सगळीकडे कोरोनाची भीती असताना नेहमीच्या चेकअप साठी डॉक्टरांकडे जावं की नाही असाही प्रश्न गर्भवती स्त्रीला पडू शकतो.
अशा वेळेस जर सोनोग्राफी किंवा इतर काही स्कॅनिंग होणार नसेल तर फोनवरूनच डॉक्टरांशी बोलून घ्यावे आणि जाणं गरजेचं असेल तर संपूर्ण तयारी करून म्हणजे मास्क बांधून, सँनीटायझर जवळ ठेवून डॉक्टरांकडे जावं.
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे गर्भवती स्त्रियांना जर स्वतः ला कोरोना व्हायरस झाला आहे असं वाटत असेल तर काय करावे? जर गर्भवती स्त्रीला ताप येत असेल आणि खोकला येत असेल तर त्याची लक्षणे डॉक्टरांना सांगावीत.
ताप सतत राहत असेल आणि खोकला असेल तर लगेच दवाखान्यात जावे. कोरोना व्हायरसची चाचणी सध्या ठराविक लोकांचीच केली जाते. जर तुमची लक्षणे कॉमन फ्लू ची असतील तर अशा लोकांची चाचणी केली जात नाही.
केवळ गंभीर आजारी असणाऱ्या लोकांची चाचणी केली जाते मात्र तुमची लक्षणे बघून डॉक्टर तुम्हाला जो सल्ला देतील तो मात्र तंतोतंत पाळला पाहिजे.
कोरोना व्हायरसची जर गंभीर लक्षणे गर्भवती स्त्री मध्ये आढळली तर त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले जाते.
परंतु जर लक्षणे सौम्य असतील तर डॉक्टर तुम्हाला घरातच वेगळे राहण्याचा सल्ला देतील. अशावेळेस घरात स्वतंत्र एका हवेशीर खोलीमध्ये इतरांच्या संपर्कापासून दूर राहिला पाहिजे.
इतरांना कोणालाही त्या खोलीत प्रवेश देऊ नका स्वतःचे कपडे टॉवेल्स भांडी, ताट, वाट्या, ग्लास हे वेगळे असू देत.
आणि जर गर्भवती स्त्री कोरोना व्हायरस पासून मुक्त झाली तर तिची आणि तिच्या बाळाची प्रकृती कशी आहे हे डॉक्टर वारंवार चेक करतायत.
त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून येणे आणि गर्भाची वाढ कशी होते हे पाहणे गरजेचे असते.
जर गर्भवती स्त्रीला कोरोना झाला तर तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न येतो की या व्हायरस ची लागण माझ्या बाळाला झाली असेल का?
आत्तापर्यंतच्या अभ्यासानुसार, तरी गर्भवती स्त्रीला कोरोना व्हायरस होता. मात्र तिच्या होणाऱ्या बाळाला कोरोना व्हायरस चा त्रास झाला नाही. मात्र चीनमध्ये दोन केसेस अशा झाल्या की त्यांची प्रसूती ही वेळेच्या आधी करावी लागली.
त्याचं कारण बाळांना काही त्रास नव्हता, मात्र कोरोना व्हायरसचा त्रास त्या गर्भवती महिलांना होणार होता. त्यातून अजून कॉम्प्लिकेशन्स वाढू नयेत म्हणून डॉक्टरांनी प्रसूती आधी केली.
त्यातल्याच एका बाळाला कोरोनाची लागण झाली. पण ती बाळ आईच्या पोटात असताना झाली की प्रसूती करताना झाली हे समजले नाही. आतापर्यंतचा हा डेटा हा खुपच कमी असल्यामुळे याच्याविषयी जास्त सांगता येत नाही.
गर्भवती स्त्रीला कोरोनाची लागण असेल तर तिची प्रसूती ही नॉर्मल की सिझेरियन करावे असाही प्रश्न त्या स्त्रीला पडू शकतो.
या अवस्थेतही जर तुमची प्रकृती जर त्या स्त्रीची प्रकृती नॉर्मल असेल स्थिर असेल तर नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा सल्ला डॉक्टर देतील.
मात्र श्वसनाला त्रास होतोय आणि शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होते अशावेळेस सिझेरियन करण्याचा सल्ला डॉक्टर देतील त्यामुळे डॉक्टर जे सांगतील त्याच प्रकारे प्रसूती करावी.
जर कोरोना व्हायरस बाधित स्त्री प्रसूत झाली तर तर तिच्या बाळाची देखील कोरोना व्हायरसची चाचणी केली जाते. आणि त्या बाळांना आईपासून १४ दिवस दूर ठेवले जाते.
यामध्ये कदाचित आई बाळाच्या नात्यातील जवळीक कमी होऊ शकते आणि बाळाच्या आहारावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो. आईच्या दुधाने बाळाला कोणताही त्रास होणार नाही किंवा त्याला कोरोना व्हायरसची लागण होणार नाही.
आजपर्यंतच्या अभ्यासानुसार, कोरोना बाधित महिला प्रसूत झाली तर तिच्या बाळाला कोरोना व्हायरसचा त्रास होत नाही. आणि तिच्या दुधाने देखील त्याला त्रास होत नाही मात्र आईने बाळापासून सुरुवातीचे चौदा दिवस तरी लांब राहिले पाहिजे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
==
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.