आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच दक्षता घेतली जाऊ लागलीये. देशातल्या कानाकोपऱ्यातून ह्या कोरोना विरोधी युद्धाला साथ दिली जातेय.
अगदी सामान्य नागरिकांपासून ते अगदी आपल्या लाडक्या बी टाऊन मधली मंडळीही सतर्कतेचा इशारा देऊ करत स्वतः तो पाळतायत.
महाराष्ट्रातही सरकारकडून योग्य ती कारवाई केली जात असून फक्त अत्यावश्यक गोष्टीं वगळता इतर सर्व दुकानं वगैरे बंद ठेवण्यात येत असून सर्वांनी सहकार्य करावं याकरिता आवाहन केलं गेलंय.
नुकताच सरकारी कचेरीतील ५०% उपस्थिती सुरक्षिततेच्या कारणांमुळे २५% इतकी कमी करण्यात आली आहे. विमानतळ तसेच इतर सर्व इस्पितळात आपले डॉक्टर्स व इतर कर्मचारी कंबर कसून ह्या रोगाशी दोन हात करतायत.
फक्त आपलाच देश नव्हे तर संपूर्ण जगभरात ह्या फोफावलेल्या रोगाशी जोरदार लढाई सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने जमेल तशी उपाययोजना करत आहे.
मात्र एखाद्या आजारावर जसा रामबाण उपाय असतो तसा ह्या कोरोनावर अजून ठोस उपाय सापडला नाहीए. विविध देशांतील प्रयोगशाळांमध्ये कोरोनावर मात करता येईल अशाप्रकारच्या लसी शोधण्याचं कामही सुरूच आहे.
एखादी लस शोधली की त्याचा प्रयोग हा आधी प्राण्यांवर केला जातो हे तर आपल्याला माहित आहे. त्या लसीचं प्राण्यांवर होणाऱ्या परिणामाचं निरीक्षण केलं जातं.
अनेक चाचण्या पार पाडून नंतर जर ती सुरक्षित असेल तरच उपाय म्हणून तिचा वापर करण्यात येतो. मात्र तत्पूर्वी माणसावरही एक चाचणी केली जाते.
ह्या चाचण्यांसाठी बऱ्याचदा विविध स्वयंसेवक पुढाकार घेतात. ह्यातला धोका पाहता स्वतःहून इतकं मोठं पाऊल उचलून इतरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्याचा निर्णय घेणं काही ऐऱ्या – गैऱ्याचं काम नव्हे!
आणि म्हणूनच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो कोरोना पीडितांना मदत व्हावी, ह्या नि:स्वार्थी हेतूने ज्या महिलेने पुढाकार घेत स्वतः पहिली लस टोचून घेतली ती महिला आज आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरते.
कोण आहे ही धैर्यवान स्त्री?
अमेरिकेतील वय वर्ष ४३ असणाऱ्या जेनिफर हॉलर ह्या COVID -१९ ह्या विषाणूची लस टोचून घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत. Permanente Washington Research Institute ह्या ठिकाणी सोमवारी त्यांनी लस टोचून घेतली.
फेसबुक मार्फत अशा प्रयोगाची त्यांना माहिती मिळाली व कोणत्याही फायद्याच्या अपेक्षेशिवाय तसेच कोणत्याही भीतीशिवाय त्या ह्यासाठी स्वतःहून तयार झाल्या.
त्यांनी फेसबुकवर हे वाचल्यानंतर एका सर्वे ला उत्तरं दिली व दुसऱ्याच दिवशी ह्या चाचणीसाठी त्यांची निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं. $११०० इतकी रक्कम ह्यात सहभागी होणाऱ्यांना मिळणार आहे मात्र असं असूनही त्या ह्या रकमेच्या आशेने अजिबात आलेल्या नाहीत.
त्यांचा निर्णय हा अतिशय प्रमाणिकपणे त्यांनी घेतला. स्वतः दोन मुलांची आई असूनही इतक्या पटकन आपल्या जीवाची बाजी लावणारी जेनिफर नक्कीच धडाडीची आहे.
मात्र जरी ही चाचणी यशस्वी झाली तरीही ही लस सर्वसामान्यांकरिता तसेच संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हायला किमान १२-१८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
याचं कारण असं की ही लस अजूनही त्याच्या प्राथमिक टप्पयातच आहे, असं डॉ. Anthony Fauci यांनी सांगितलंय.
ही लस NIH आणि Massachusetts मधील biotechnology company Moderna Inc द्वारे तयार करण्यात आली आहे. ह्या लसीचे mRNA-1273 असे शास्त्रोक्त सांकेतिक नामकरण करण्यात आले आहे.
ही लस टोचून घेण्यापूर्वी जेनिफर ह्यांच्याकडून ४५ पानी waiver सही करून घेतल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. एक महिना आड २ अशाप्रकारे त्यांना लसी टोचण्यात येणार असून प्रत्येक वेळी $१०० इतकी रक्कम देऊ करण्यात येणार आहे.
डॉक्टरांच्या मते, कोणत्याही व्यक्तीला लसीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाहीये कारण ह्या लसीत कोरोनाचा जंतू वापरलाच गेला नाहीये.
माणसांवर ही अशाप्रकारची लस पहिल्यांदाच वापरली गेली असल्यामुळे ह्याचे संभाव्य धोके व परिणाम अजून ज्ञात नाहीत असंही त्या सांगतात.
एका लहानश्या टेक्नोलोजी कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या जेनिफर ह्या अतिशय सकारात्मक असून त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही तसाच आहे.
ह्या प्रयोगासाठी नाव देण्याच्या बाबतीत त्या अतिशय ठाम व बिनधास्त होत्या परंतु त्यांच्या मित्रवर्गात चिंतेचा सूर होता. त्यांनी ह्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं त्यांचं म्हणणं होतं जे अर्थातच त्यांच्या दृष्टीने चुकीचं नव्हतंच.
जेनिफरच्या मते,
आज ह्या संकटामुळे अनेक गोष्टी, अनेकांची घरं कठीण परिथितीतून जात आहेत. रोजच्या लागणाऱ्या वस्तू जेनिफर यांना घेणं शक्य असलं तरी अनेक वंचितांना ते शक्य नाही.
मग अशा सगळ्यांसाठी एक चांगलं पाऊल उचलायला नक्कीच हरकत नाही. आणि म्हणून पैशांसाठीच करायचं असतं तर ह्या धाडसायोग्य मूल्य मला देऊ करणं त्यांना शक्य झालं नसतं कारण हे अमूल्य धाडस आहे असंही त्या सांगतात.
हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा मोठ्याप्रमाणावर होणारा फायदा हा माझ्यावर होणाऱ्या एखाद्या दुष्परिणामापेक्षा कितीतरी परीने मोठा असणारे; म्हणूनच त्यात सहभागी होणं मला महत्वाचं वाटतं असं जेनिफर म्हणतात.
Seattle येथील Kaiser Permanente Washington Research Institute मध्ये ह्या ४५ जणांवर होणाऱ्या प्रयोगातील व्यक्तींची जणू एक टीमच झाली असल्याचं त्यांचं मत आहे.
खरोखर धन्य ही विचारसरणी आणि धन्य हे व्यक्तिमत्व. संपूर्ण जगाला एक आदर्श म्हणून द्यावं असं एक चालतं बोलतं असं हे उदाहरण आहे.
आजकालच्या ह्या मतलबी विश्वात अशी नि:स्वार्थी माणसं पहिली की नक्कीच नवी उमेद व प्रेरणा मिळते.
फक्त आत्मकेंद्री विचार न करता समाजातील एक घटक म्हणून एखाद्या सैनिकाप्रमाणेच आपल्या जीवाची फिकीर न करता जेनिफर उभ्या ठाकल्या हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
मंडळी स्त्रीला जननी, माता असं म्हटलं जातं ते काय उगीच? आपली अपत्य संकटात असली की जी कणखरपणे उभी राहते ती एक जननीच असते.
जेनिफर ह्यांनी सुद्धा ह्या सहभागातून जणू संपूर्ण जगाचं मातृत्व स्वीकारून सर्वांच्या रक्षणार्थ एक महत्वाचं पाऊल टाकलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
ह्या धैर्यवान मातेस सलाम!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.