आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
एखाद्या देशात एका ब्रेड ची किंमत जर ३५ मिलियन डॉलर असेल तर ती नक्कीच बातमी असते. पण असं कोणते संकट त्या देशावर आला असेल? असा कोणता देश असेल आणि त्या देशातील लोकांना ही किंमत देऊन ब्रेड घेणे परवडत असेल का?
किंमत वाचूनच आपल्याला धडकी भरते. पण हे भयावह वास्तव झालंय झिंबाब्वे या देशासोबत, तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
बेरोजगारी, महागाई, चलनाचा तुटवडा आणि देशभर माजलेली अंदाधुंदी या सगळ्या कारणांमुळे झिंबाब्वे मध्ये एका ब्रेड ची किंमत ३५ मिलियन डॉलर झाली आहे.
लोक अक्षरशः एक ब्रेड घेण्यासाठी पोत्याने पैसे घेऊन जात होते किंवा नोटांच्या थप्प्या घेऊन जात होते.
आर्थिक डबघाईला आलेल्या झिम्बाब्वेच्या चलनाचे मूल्य इतकं घसरले की, ज्या नवीन नोटा आल्या त्या अक्षरश: 1000000 लाख डॉलरच्या होत्या. पण तरीही अर्थव्यवस्थेत काहीच सुधारणा झाली नाही.
–
- समाजवादाच्या हट्टापायी लॅटिन अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला! वाचा
- ब्रिटिशांनी अवलंबलेली ‘ही’ अत्याचाराची पद्धत आजही प्रचंड संताप आणते!
–
आणि मग वीस लाख डॉलरच्या नोटा चलनात आणल्या जातील असं झिम्बाब्वेचे अर्थमंत्री सॅम्युअल मुंबेनगेवि यांनी जाहीर केलं होतं. त्या नोटा चलनात आणून देखील अर्थव्यवस्थेत काडीचाही फरक पडला नाही.
पूर्ण देश संकटात सापडला आणि एका ब्रेड ची किंमत ३५ लाख डॉलर झाली. अर्थातच इतकी किंमत देऊन ब्रेड घेणेदेखील जनतेला परवडत नव्हतं.
लोकांना बँकेतून पैसे मिळत नव्हते. बँकेच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. लोक HIV ची औषध घेत नव्हते कारण त्याच्याबरोबर खावा लागणारा ब्रेड घेण्याचे पैसे त्यांच्याकडे नव्हते.
निम्म्यापेक्षा जास्त लोकांना एक वेळच्या जेवणाची देखील भ्रांत होती. वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, झिंबाब्वे मधील एक तृतीयांश लोक हे भूकबळी जातील अशा परिस्थितीत होते.
झिम्बाब्वे हा सर्वच बाजूने संकटाच्या खाईत गेलेला देश बनलाय. चाळीस वर्षांपेक्षा वर्षातला भयानक दुष्काळ तिकडे पडलेला आहे, लोकांना अन्न आणि पाणी मिळत नाही. आरोग्य सुविधा बंद पडल्या आहेत,औषध मिळत नाही.
अगदी कॉलरा सारख्या साथी परत तिकडे येत होत्या. वीज तयार होत नाही, सगळीकडे अंधकारमय वातावरण आहे. बँका बुडाल्या होत्या लोक बँकांच्या बाहेर रात्रीपासूनच रांगा लावून बसत होते.
तरी दुसऱ्या दिवशी बँक काढल्यावर पैसे मिळतील याची खात्री नसायची. पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले त्यामुळे तिकडे दंगली उसळल्या.
महागाई इतकी वाढली आहे की तिथल्या बाजारातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या दिवशी दुप्पट किंमतीने मिळते. लोकांच्या पैशांच्या मागण्या वाढल्या मात्र त्यांना पैसे मिळत नव्हते.
त्यातच राजकीय स्थैर्य तिकडे नव्हतं. लष्करातल्या सैनिकांना देखील पैसे मिळत नव्हते मग त्या सैनिकांनी तिकडे लुटमार सुरू केली. थोडक्यात झिंबाब्वे मध्ये जिकडेतिकडे अंदाधुंदीची परिस्थिती आहे.
झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनांगाग्वा हे २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले पण तरीही परिस्थिती सुधारली नाही, उलट त्यात अजूनच भयानक वाईट स्थिती आली.
ही परिस्थिती आली खरंतर झिम्बाब्वेचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे रॉबर्ट मुगांब्वे यांच्यामुळे. खरंतर त्यांनीच झिम्बाब्वेला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
ब्रिटिशांची वसाहत असलेल्या झिंबाब्वेला रॉबर्ट मुगांब्वे यांनी गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलं. त्यामुळे ते तिथले नायक ठरले. लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.
परंतु त्यांची राजकीय महत्वकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना झिम्बाब्वेचा सर्वेसर्वा व्हायचे होते. १९८० साली त्यांच्या हातात देशाची सत्ता आली आणि ते देशाचे पंतप्रधान बनले.
परंतु सगळी सूत्र आपल्याच हाती राहाव्यात या हव्यासापोटी, १९८७ साली त्यांनी तिथल्या संविधानात बदल करून पंतप्रधानपद बाद ठरवलं, आणि ते देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
पुढे तीन दशकं सत्ता त्यांच्याकडेच होती. त्यांची एकाधिकारशाही तिकडे सुरू झाली. आणि एका लोकप्रिय नेत्याचं हुकूमशहा मध्ये रूपांतर झालं. एकतर्फी निर्णय घेतले जाऊ लागले.
लोकांच्या सुविधांपेक्षा आपला फायदा कशात होईल हे पाहिलं जाऊ लागलं. त्यांचं वर्चस्व वाढू लागलं तसं त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला. त्यांच्याविरोधात विरोधक रस्त्यावर उतरले परंतु रॉबर्ट मुगांब्वे यांनी आपल्या विरोधकांना ठार मारुन संपवलं.
असं म्हटलं जातं की, त्याकाळात त्यांनी वीस हजार लोकांना मारलं. राजकीय विरोधकांना देशातून हद्दपार करण्यात आले. २००२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रामीण मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले.
–
- मनमोहन सिंग यांच्या बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली!
- ५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार अन पाकिस्तान अस्तित्वासाठी झगडेल: अमेरिकन अभ्यास
–
म्हणून अमेरिका आणि ब्रिटन यांनी ती निवडणूक ग्राह्य धरली नाही, त्यांची मान्यता नाकारली आणि त्यानंतरच राष्ट्रकुला मध्ये झिंबाब्वे वेगळा पडत गेला.
झिम्बाब्वेला मिळणारी मदत कमी होत गेली त्याचाच खूप मोठा परिणाम झिम्बाब्वे वर झाला असं मानलं जातं.आणि तिथूनच झिम्बाब्वेचं अर्थकारण बदलत गेलं.
झिंबाब्वे मधून क्रीडा प्रकारही संपवले जाऊ लागले अगदी तिथले क्रिकेट देखील लयाला गेले. उद्योगधंदे संपले. जवळ जवळ तीस वर्ष रॉबर्ट मुगाबे यांनी झिंबाब्वे सत्ता गाजवली.
त्यांचं वय वाढत होतं तसं त्यांना आपला वारसदार हवा होता. त्यांनी त्यांच्या पत्नीला सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ३७ वर्ष साथ केलेल्या लष्कराने आणि त्यांच्या जुन्या-जाणत्या साथीदारांनी त्यांची साथ सोडली.
रॉबर्ट मुगांब्वे यांनी ज्या पद्धतीने सत्ता मिळवली होती तशाच पद्धतीने झिम्बाब्वेचे लष्कर प्रमुख कॉन्स्टँटिनो चिविंगा, यांनी बंड करून रॉबर्ट मुगाबे यांना स्थानबद्ध केलं, आणि सत्ता ताब्यात घेतली.
परंतु परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की संपूर्ण देशच संकटाच्या खाईत आहे. तिथल्या बँका भ्रष्ट झाल्या आहेत. बँक ऑफ झिंबाब्वे कडे कोणताही पैसा आता शिल्लक नाही.
रोजगार, उद्योग धंदे पूर्ण बंद पडलेले आहेत, ब्रेडच्या एका तुकड्यासाठी मारामारीची वेळ आलेली आहे. रॉबर्ट मुगांब्वे यांच्या चुकीच्या धोरणामुळेच झिम्बाब्वे या देशाला डबघाईची अवस्था आली आहे.
आणि तिथले लोक देशोधडीला लागले आहेत. तरुणांना आणि लहान मुलांना कोणतही भविष्य तिकडे नाही, म्हणूनच देशाचं नेतृत्व हे दूरदृष्टी असलेलं असावं लागतं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.