आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
===
डिस्कवरी चैनल वरील एक सीन
“त्या दिवशी रात्री मला अचानक जाग आली, मी खिडकीच्या बाहेर पाहिलं तर खूप प्रकाश दिसला. ऊठून पाहिलं तर बाहेर वेगळ्या प्रकारचं हेलिकॉप्टर सारखं काहीतरी दिसत होतं, आणि आत हालचाल जाणवत होती.
क्षणार्धात काही कळायच्या आत ते वरती आकाशाकडे झेपावलं आणि दिसेनासं झालं.”
डिस्कवरी वरीलच दुसरा सीन
“त्यादिवशी ऑफिस वरून यायला मला उशीर झाला, मी कारनं मी येत होते. आणि अचानक थोड्या दूर अंतरावर मी उडती तबकडी पाहिली, मी कारचा वेग हळू केला.
ती तबकडी माझ्यासमोरच जमिनीवर आली. मी माझी कार थांबवली आणि पाहू लागले. ज्यामधून वेगळीच माणसे बाहेर आली जी उंचीने छोटी होती. त्यांचे डोळे नव्हते, खोबण्या दिसत होत्या.
त्यांनी बाहेर येऊन काहीतरी केलं, जे दिसू शकलं नाही आणि नंतर दोन मिनिटांच्या आतच त्यांचं यान आकाशात गेलं आणि दिसेनासं झालं.
मी घाबरून सुसाट कार चालवत घरी आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिकडून जाताना पाहिलं तर तिथली सगळी झाडं जळालेली होती.”
असे किस्से आपण पाहतो, ऐकतो, वाचतो आणि परग्रहावर मानव आहे का किंवा जीवसृष्टी आहे का? याचं कुतूहल आणखीनच चाळवलं जातं.
==
हे ही वाचा : एलीयन्सच्या शोधासाठी नासाला मदत करणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट…..!
==
काहींच्या मते, ब्रह्मांडामध्ये आपणच केवळ एकटे नसून आणखीन कुठेतरी जीवसृष्टी असेल जी आपल्यापेक्षा प्रगत असेल.
या सगळ्या घटना शक्यतो अमेरिकेत होतात. तिथले लोकच अशा घटनांना जास्त प्रसिद्धी देतात. त्यानंतर इतरही देशांमध्ये थोड्याफार फरकाने अशा घटना घडल्या आणि त्याच्या बातम्या झाल्या.
काहीकाही ठिकाणी त्या उडत्या तबकड्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते फोटो देखील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. नासाच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत सजीव सृष्टीचा पुरावा आपल्याला मिळालेला नाही.
यातूनच असं म्हटलं गेलं की, परग्रहवासीयांचं यान अमेरिकेने पकडलं, आणि त्यातल्या एलियन्सना स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर प्रयोग सुरू आहेत.
त्यांच्याकडून त्यांचं प्रगत तंत्र, तंत्रज्ञान घेण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. आणि हे काम इतकं गुप्तपणे चालतं की याच्याविषयी बाहेर कोणालाही काहीही कळणार नाही याची दक्षता घेतली जाते.
अशा बातम्या जेव्हा येतात तेव्हा अमेरिकन अधिकारी यावर मौन बाळगतात किंवा ही एक नैसर्गिक घटना आहे असं सांगतात. त्यामुळेच याबाबतचा सस्पेन्स आणखीन वाढतोय.
अमेरिका आणि नासा खोटं बोलते असा लोकांचा समज होतो, तिकडे अमेरिकेत काहीतरी सिक्रेट मिशन सुरू आहे हे बोललं जातं. हे प्रकरण नक्की काय आहे हे पाहू.
याला कारण म्हणजे अमेरिकेतील एक ठिकाण ज्याचं नाव Area 51 असं आहे. अमेरिकन सैन्याच्या ताब्यात असलेली ही जागा. अमेरिकन सैन्याचा तळ तिकडे आहे.
==
हे ही वाचा : मनुष्याच्या कल्पनाशक्तीला चक्रावून टाकणारे “UFO” चित्रपटात नव्हे तर खर्याखुर्या स्वरूपातही दिसलेत!
==
तिकडे अत्यंत कडक बंदोबस्त असतो. त्या भागात कायमची गस्त घातली जाते. कोणत्याही सामान्य नागरिकांना तिकडे जायला बंदी आहे. सहजासहजी माणसांना ती जागा पाहत पाहता येत नाही.
गुगल मॅप वरून पाहिलं तर Area 51 कुठे आहे हे कळतं. गुगल मॅप वर फक्त एक इमारत दिसते आणि रनवे दिसतो.
दूरपर्यंत वस्ती नसून देखील तिकडून निरनिराळे आवाज येतात क्वचित प्रसंगी अत्यंत वेगळ्या प्रकारची विमान तिकडे दिसतात. याच्या बातम्या कोणीतरी पेपर मध्ये देतं.
त्यावर तिथले अधिकारी काही बोलत नाहीत. किंवा बोलले तरी इथलं काहीच नाही, हवामानामुळे बदलामुळे वातावरणातच अशी परिस्थिती आली आहे असे सांगतात.
Area 51 हा अमेरिकेच्या नेवाडा वाळवंटातील एक भाग आहे तिकडे अमेरिकन सैन्याचा तळ आहे. आणि असंही म्हटलं जातं की तिकडे एलियन्सचा वावर आहे. ही जागा प्रसिद्ध झाली १९५० नंतर.
१९५० मध्ये दुसरं महायुद्ध संपून थोडे दिवस झाले होते. त्याच काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया त्यामध्ये शीतयुद्धाचे वारे वाहू लागले होते. दोन्ही राष्ट्र एकमेकांची ताकत आजमावून पहात होते.
कोणीही आपल्यावर आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये यासाठी धडपडत होते. त्यासाठी आपली शस्त्रास्त्रं किती आधुनिक करता येतील त्यासाठी प्रयत्न करत होते.
त्याचबरोबर दुसरे राष्ट्र आपल्यापेक्षा किती प्रगत झाले, त्यांच्याकडे आणखीन नवीन टेक्नॉलॉजी काही आलीये का? हे पाहण्यासाठी हेरगिरी देखील करीत होते.
आता रशियात जाऊन हेरगिरी करणं अवघडच. मग रशिया वरून विमानातून काही दिसते का हे पाहिलं जायचं, परंतु त्या काळातल्या तंत्रज्ञानानुसार ही विमान फारच कमी उंचीवरून उडायची.
सर्वसाधारण विमान ही दहा हजार ते वीस हजार फूट उंचीवरून उडतात. अशी विमान रशियाच्या रडारच्या कक्षेत आली तर ती पाडली जायची.
हेच टाळण्यासाठी अमेरिकेला अशी काहीतरी टेक्नॉलॉजी आणायची होती की, विमान 60000 फुटांपेक्षा अधिक उंचीवरून उडाली पाहिजे.
पण याच्या विषयी संशोधन कुठे करायचं आणि कसं करायचं, याच्यावर अमेरिकेत खल झाला. आणि १९५१ साली नेवाडातली ही जागा त्यासाठी निवडण्यात आली.
१९५१ साली सुरू झालं म्हणून कदाचित त्या जागेला Area 51 असं नाव देण्यात आलं. तिकडे अमेरिकेने अणूचाचण्या देखील केल्या आहेत. ८० मैलांचा हा परिसर आहे वाळवंटी भाग असून अत्यंत रिमोट एरिया आहे ज्याच्याकडे इतर लोकांचे लक्ष फारसं जाणार नाही.
१९५४ साली राष्ट्रपती आयासेनहोव्हारनी त्याजागी नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांचे टेस्टिंग करण्यासाठी परवानगी दिली. मग CIA या मिशनमध्ये सहभागी झालं.
आठ महिन्यांच्या टेस्टिंग नंतर आणि सरावानंतर U-2 हे आधुनिक लष्करी विमान तयार झालं. १९५५ साली त्या भागातील एका नागरिकाने मी उडती तबकडी पाहिली असा दावा केला.
खरंतर अमेरिकेचं त्याठिकाणी U-2 या आधुनिक एयरक्राफ्टचं टेस्टिंग चालू होतं. आणि ते एअरक्राफ्ट ७0000 फुटांपेक्षा उंच उडू शकत होतं. आणि अगदी जमिनीपासून चे पाच फुटापर्यंत चे फोटो ते घेऊ शकत होते.
हे त्या काळातलं सगळ्यात उंच उडणारे लष्करी विमान होतं. तेच एका माणसाने पाहिलं आणि त्याला वाटलं की, ते एक एलियन असलेलं एअरक्राफ्ट आहे.
पण अर्थातच अमेरिकन अधिकारी उडत्या तबकडीच्या शक्यतेला मान्यता देऊ शकत नव्हते तसंच नवीन टेक्नॉलॉजी आम्ही शोधत आहोत हेही सांगू शकत नव्हते.
म्हणून मग त्यांनी तो एक ढगांचा फुगा होता आणि आम्ही तो फोडला असं सांगितलं.
आता U-2 विमान रशियाची हेरगिरी करू शकत होतं. कारण आता ते रशियाच्या रडारच्या क्षेत्रात येत नव्हतं. तरीदेखील१९६० मध्ये रशियाला हे कळलं की अशी विमान अमेरिका हेरगिरीसाठी वापरत आहे.
आणि१९६० मध्ये इतक्या उंच उडणाऱ्या विमानाला देखील रशियाने पाडलं. मग CIA ला आता याच्यापेक्षा जास्त सक्षम असलेली विमान बनवणे भाग होतं.
त्यातूनच तयार झालं संपूर्ण टिटॅनियम वापरून तयार झालेलं विमान A-12. जे ९०००० फूट उंचीवरून उडू शकत होतं , 2200 किलोमीटर अंतर 70 मिनिटात कापू शकत होतं.
आणि जमिनीवरील एक फुटापर्यंतचे फोटो काढू शकत होतं. A-12 ने एकूण 2850 takeoff घेतले.
A-12 हे टिटॅनियम नी बनलेलं असल्यामुळे आणि प्रचंड वेगाने जात असल्यामुळे कोणी त्याला पाहिलं तर आगीचा एक गोळा गेलाय असं वाटायचं, म्हणूनच लोकांना ती उडती तबकडी वाटायची.
आता याविषयी सीआयए किंवा अमेरिकन लष्कर काहीही सांगू शकायचे नाहीत कारण हे सिक्रेट मिशन होतं.
==
हे ही वाचा : भारतीय भूमीवर अश्मयुगीन काळात परग्रहवासीयांचं अस्तित्व?!
==
Area 51 परत चर्चेत आला तो १९८९ मध्ये, रॉबर्ट लझार नावाच्या एका माणसाने असा दावा केला की अमेरिकेच्या एलियन्स आणि एलियन्स स्पेस क्राफ्ट च्या सिक्रेट मिशन मध्ये मी होतो, आणि तिथलं कार्य कसं चालतं हे त्यांनं अगदी रसभरीत वर्णन करून सांगितलं.
त्याचे शिक्षण कुठे झाले आहे हेदेखील त्यांन सांगितलं. परंतु त्याच्या या म्हणण्याला CIA आणि अमेरिकन लष्कराने दुजोरा दिला नाही, आणि त्याचे शिक्षण देखील त्याने सांगितलेल्या ठिकाणी झालेलं नव्हतं.
2013 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा त्यांची U-2 आणि A-12 ही विमान Area 51 मध्ये तयार केली जात होती हे मान्य केलं आणि सगळ्यांना सांगितलं.
ही जागा आजही लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जगभरातून लोक, आजही एखादं टुरिस्ट पॉईंट असल्यासारखं तिकडे जातात.
आजही एखादं एलियन स्पेसक्राफ्ट किंवा उडती तबकडी किंवा एखादा खराखुरा एलियन दिसतो का?!! किंवा त्याची झलक तरी पहायला मिळेल का या अपेक्षेने शोध घेतात.
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.