Site icon InMarathi

बॅकस्टेज कलाकारांना “कोरोना”मुळे होणाऱ्या नुकसान पासून वाचवणारा “नटसम्राट प्रशांत दामले”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाचं सावट आता भारतात देखील गडद होत आहे. भारतात, त्यातही महाराष्ट्रात त्याचा कहर भारतातल्या इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.

पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. भारतातला कोरोना मुळे तिसरा आणि महाराष्ट्रातला पहिला बळी गेला आहे.

म्हणूनच महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही नियमावली तयार केली आहे. कारण सध्याचा हा जो कोरोना आहे तो दुसऱ्या स्टेजचा आहे.

जर या कोरोनाने तिसरी स्टेज घेतली तर होणारे परिणाम भयंकर असतील. म्हणूनच सध्या महाराष्ट्रात तरी ऑफिसेस, शाळा-कॉलेज, मॉल्स, बागा, ग्राउंड, जलतरण तलाव, जिम अशा सगळ्या गोष्टींना बंदी आलेली आहे.

त्याचबरोबर चित्रपटगृह नाट्यगृह हेदेखील बंद ठेवण्यात आले आहेत. यामागचा उद्देश हा एकच की शक्यतो गर्दी टाळावी आणि कोरोनाचा प्रसार रोखला जावा.

 

loksatta

 

सरकारचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असला तरी, त्यामुळे काही काही लोकांच्या रोजच्या कमाईवर त्याचा परिणाम होत आहे. त्यातलाच असा एक वर्ग आहे जो कायमच दुर्लक्षित राहतो.

त्यांचं काम कोणाच्या खिजगणतीतही नसतं. आणि ते म्हणजे नाटकात बॅकस्टेजला काम करणारी मंडळी. कारण यांचं जगणंच होणाऱ्या प्रयोगावर अवलंबून असतं.

नाटकाचा खेळ झाला तरच पैसे मिळतात. नाटकाचा खेळ कँसल, तर पैसेही मिळत नाहीत.

सध्या आता ३१ मार्चपर्यंत सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद राहणार आहेत त्यामुळेच बॅकस्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आणि सध्या परिस्थितीदेखील इतकी अनिश्चित आहे की ३१ मार्चनंतर तरी सर्व जीवन पूर्वपदावर येईल याची शाश्वती नाही.

 

sangbad pratidin

 

म्हणूनच सगळे कलाकार चिंतेत आहेत. पण या सगळ्यांची हीच अडचण ओळखली ते मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांनी. सरकारच्या या निर्णयामुळे प्रशांत दामले यांच्या नाटकांचे प्रयोग देखील रद्द करावे लागले.

खरंतर त्यांचा आता परदेश दौरा होता आणि तिकडे त्यांच्या सध्याच्या गाजत असलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग होणार होते, पण तेही कॅन्सल करावे लागले आहेत.

यातल्या बहुतेक कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यांची हीच अडचण ओळखून प्रशांत दामले यांनी नाटकातील तेवीस बॅकस्टेज कलाकारांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत देण्याचे ठरविले आणि दिले आहेत.

 

times of india

 

मराठी नाट्यसृष्टीतील कलाकारांना जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा प्रशांत दामले यांच्या या दातृत्वाचा गौरव केला जात आहे. प्रशांत दामले यांनी याविषयी काहीही भाष्य केलं नव्हतं.

मराठी चित्र नाट्यसृष्टीतील कलाकार पुष्कर श्रोत्री यांनी ही बातमी मी ट्विटरवर दिली त्यात त्यांनी असं म्हटलं की,

“प्रशांत दामले, मानलं तुम्हाला!! कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता नाट्यगृह बंद केली असताना, हातावर पोट असणाऱ्या आपल्या नाट्य कुटुंबातील २३ जणांना तुम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले.

अशी दानत दाखवणाऱ्या एका आदर्श आणि काळजीवाहू निर्मात्याला सलाम!”

 

 

आणि त्यानंतरच प्रशांत दामले यांनी बॅकस्टेज कलाकारांना अशी मदत केली आहे हे सगळ्यांना माहीत झाले. त्यासाठीच समाजातल्या प्रत्येक स्तरावरून प्रशांत दामले यांच्या या कृतीचा कौतुक केले जात आहे.

याच्या आधी देखील प्रशांत दामले यांनी नाटकाचे प्रयोग कॅन्सल झाले, त्यावेळेस देखील प्रत्येक बॅकस्टेज कलाकाराला ठरलेलं वेतन दिलेला आहे.

प्रशांत दामले हे एक हरहुन्नरी नाट्य कलाकार आहेत त्यांची, ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक खूप गाजले होते. त्याशिवाय ‘गेला माधव कुणीकडे’ हे देखील नाटक गाजलेले होते.

 

IWMbuzz

 

आचार्य अत्रे लिखित ‘ मोरूची मावशी’ या नाटकांमध्ये देखील प्रशांत दामले यांनी आपला ठसा उमटवला होता.

रंगभूमीवर मनापासुन प्रेम करणारा आणि लोकांना निखळ आनंद देणारा कलाकार म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात.

चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये रमणारा हा कलाकार. त्यांनी एकाच दिवशी पाच नाटक प्रयोग करून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव नोंदवले आहे.

एकाच दिवशी पाच नाटकं करण्याचा विक्रम प्रशांत दामले यांनी केला आहे. सध्या त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक प्रचंड गाजत आहे. त्यांच्या या नाटकाचे सगळे प्रयोग हाउसफुल असतात.

त्यांच्या अनेक नाटकांचे हजार पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. देश-विदेशात त्यांची नाटके गर्दी खेचतात. आतादेखील ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांचे प्रयोग परदेशात होणार होते परंतु कोरोना मुळे ते आता कॅन्सल करण्यात आले आहेत.

 

marathi movie

 

झी मराठीवरील, ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमातील निवेदन देखील प्रचंड गाजलं होतं. त्याही कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या मनमिळावू आणि बोलक्या स्वभावामुळे रंगत आणली होती.

त्यांचा हाच स्वभाव त्यांनी त्यांच्या आयुष्यभर जपलेला आहे, लोकांना मदत केली आहे. सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. हा हरहुन्नरी कलाकार प्रेक्षकांचा आवडता नसता तरच नवल होतं.

आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावाने प्रेक्षकांनी ” प्रशांत दामले फॅन्स क्लब” नावाचा एक क्लब स्थापन केला आहे, ज्याच्या अंतर्गत अनेक सामाजिक कामे केली जातात.

प्रशांत दामले यांचा रंगभूमीवरचा वावर जितका प्रसन्न आणि आनंद देणारा असतो, तितकाच आनंद त्यांनी नाटकाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. त्या सगळ्यांना स्वतःचं कुटुंब समजून मदत केलेली आहे.

मराठी रंगभूमीला असे कलाकार मिळालेले आहेत म्हणूनच मराठी रंगभूमी ही अजूनही तग धरुन आहे. यातूनच नवीन नवीन कलाकार पुढे येत आहे आहेत.

 

 

प्रशांत दामले यांच्या नाटकातील एक गाणं जे त्यांना बरोबर लागू होतं आणि या गाण्याने त्यांना एक स्वतःची ओळख दिली ते म्हणजे,

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं

काय पुण्य असलं की, ते घरबसल्या मिळतं….

असाच आनंद ते प्रेक्षकांना यापुढेही देत राहोत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version