आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
माणूस अमर झाला तर!! तर काय? जे साधा विचार करतील, ते म्हणतील काही काय? लोकसंख्या किती वाढेल? राहायचं कुठं? मारामाऱ्या होतील आणि शेवटी माणूसच माणसाचा जीव घेईल.
भारतीय तत्वज्ञानात असं म्हटलं जातं की आत्मा हा अमर आहे आणि माणसाचे शरीर हे नश्वर आहे. मरण येतं म्हणजे काय होतं, तर शरीरातील प्राण निघून जातो.
शरीर हालचाल करू शकत नाही. आणि त्यानंतर माणसाचं अस्तित्व संपतं. पण तरीही माणसाला एक सुप्त इच्छा असते, अमर होता आलं तर!!
म्हणजे जास्तीत जास्त दिवस जगावं ही इच्छा तर असतेच असते. सध्या आरोग्यावर जो खर्च सरकार करत आहे किंवा माणूस स्वतः करत आहे तो कमी होईल, याचा आनंद जास्त असेल.
आणि नाहीतरी सध्या सिलिकॉन व्हॅलीत आयुर्मान वाढण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. आणि ज्यातून दिसत आहे की प्राण्यांवरचे प्रयोग यशस्वी होत आहेत मग माणसांवरचे का नाही होणार?
अमर झालो तर आधी झालेल्या आपल्या चुका सुधारता येतील. माणसाचा आयुष्यातील बराचसा काळ हा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यात जातो.
त्यातून बऱ्याचदा चुकाही होतात नंतर कधी कधी असं वाटायला लागतं की, अरे हे तेव्हा हे करायला नको होतं, पण आता वेळ गेली..
पण अमर झाला तर आपल्याला झालेल्या चुका सुधारता येतील. माणसाच्या राहिलेल्या सुप्त इच्छा म्हणजे एखादं ॲडव्हेंचरस काम करता येईल.
म्हणजे उंच इमारतीवरून खाली उडी मारता येईल. कारण मरणाचं भय नाही. आणि तोपर्यंत वैद्यकीय क्षेत्र इतक पुढे गेलेलं असेल की काही लागलं किंवा हात पाय तूटले तरी बरे करता येतील.
सतत सतत तेच करून बोअर देखील होईल, इतक्या मोठ्या आयुष्याचं करायचं काय ? हा ही प्रश्न पडेल. स्वतःच आयुष्य स्वतः संपून टाकावे असंही वाटून जाईल.
मोठ्या आयुष्यात खूप सारा पैसा कमावता येईल. माणसाने जे काही ठरवले असेल ते त्याचे सगळे प्लान्स त्याला अमलात आणता येतील.
सध्या आपल्याकडे वेळ कमी असतो आणि करायच्या गोष्टी खूप असतात पण अमरत्वाचा पट्टा मिळाला तर भरपूर गोष्टी करता येतील आणि वेळही खूप असेल.
मरणाची भीती नसल्यामुळे आपण मोकळेपणाने विचार करू शकू. स्वच्छंदपणे जगता येईल.
सध्या वेळेच बंधन असल्यामुळे पैसे मिळवणे अवघड असतं पण वेळेच बंधन नसेल तर भरपूर पैसा कमावता येईल, पण शेवटी पैसा तरी किती मिळवणार?
सध्या आपण पाहतो की लोकांना पर्यटन करण्यात खूप आनंद मिळतो वेगवेगळे देश, प्रदेश, संस्कृती हे एकदातरी पाहून येऊ म्हणून लोक पर्यटन करतात.
कधी मित्रांबरोबर कधी कुटुंबाबरोबर तर कधी कधी एकटे देखील! शक्य तितक्या गोष्टी बघण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. पण हेच जर आपण अमर झालो तर काय होईल?
आपल्याला संपूर्ण पृथ्वी फिरून घेता येईल पृथ्वीवरचा कुठलाही प्रदेश असा नसेल की जिकडे आपण जाऊन आलो नाही. माणसाचं पृथ्वी बद्दलचे कुतुहल थोड्या प्रमाणात तरी शमेल.
आणि काय सांगावं केवळ पृथ्वीच नाही तर अवकाशात देखील माणूस पर्यटनाला जाईल. कधी चंद्रावर तर कधी मंगळावर.
आणि आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी माणसाला जाणं अशक्य आहे त्याठिकाणी तो जाऊ शकेल.
कारण एखाद्या दुसऱ्या आकाशगंगेत जाण्यासाठी काही प्रकाश वर्ष लागतात, सध्याचा माणूस एका जन्मात हे अंतर कापू शकत नाही. माणूस अजरामर झाला तर हे अंतर त्याला सहज कापता येईल.
जवळच्या एखाद्या ग्रहावर परसृष्टीवरील ग्रहावर जाता येईल. अवतार किंवा इंटरस्टेलर हे सिनेमे पाहिले असतील तर लक्षात येईल आपणही अशाच वेगळ्याच दुनियेत जाऊ शकतो.
जर आत्ता लोकांना विचारलं तर की तुम्हाला अमर होता आलं तर, चालेल का? तर जवळजवळ ९९ टक्के लोक, ” हो ” असं सांगतील.
अमर होण्याचे आहेत काही फायदे, पण त्याचे तोटे देखील भरपूर आहेत. आपण सध्या जसं राहतोय तसं आयुष्य कायमच काढायचं हे थोड्या दिवसांनी कंटाळवाणे होईल.
आयुष्यात एकसुरीपणा येईल, मग मानसिक संतुलन बिघडेल आणि त्याचा संपूर्ण समाजावर दुष्परिणाम होईल.
अमर होता आलं तर काय होईल, हे पाहिलं तर याचा थोडासा विचार केला तर तोटे किती असतील बघुयात,
म्हणजे एका माणसाशी तुमचं लग्न झालं तर तुम्ही एकमेकांच्या सहवासात हजार, २००० ,अगणित वर्ष एकत्र असाल, हे नक्कीच कंटाळवाणं होणार.
मग कंटाळून लोक वेगवेगळे लाइफ पार्टनर करत राहतील, पण हे देखील पुढेपुढे नकोसे वाटेल.
दुसरा एक तोटा यामध्ये आहे तो म्हणजे लोकसंख्या. जगाची लोकसंख्या प्रचंड वाढेल!
आणि आपण सध्या पाहत आहोत की शेतजमीन कमी होत आहे उत्पादन कमी होत आहे आणि त्याचा तोटा सगळ्यांनाच भोगावा लागतोय. शेती उत्पादक गोष्टी महाग होत जातील.
जशी लोकसंख्या वाढेल तसं राहण्यासाठी घरं देखील जास्त लागतील घरांच्या किमती अजूनच वाढतील हळूहळू पृथ्वीवरची जमीन माणसासाठी कमी पडायला लागेल.
त्यासाठी माणसाला मग परग्रहावर जागा मिळते काही पहावे लागेल आणि तिकडे वसाहत करावी लागेल. पण तिथे पृथ्वीसारखे वातावरण नक्कीच नसेल.
माणूस अमर झाला तर तो काम देखील करत राहील त्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होणे देखील अवघड होणे बनेल, येणाऱ्या पिढ्या बेरोजगार होतील!
सध्या माणसाला पेन्शन मिळते म्हणून वृद्ध पणे माणूस काम करत नाही.
परंतु पेन्शन ही पद्धतच माणूस अमर झाला की संपून जाईल, आणि मग स्वतःच्या उपजीविकेसाठी माणसाला काम करावंच लागेल म्हणूनच नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील.
अमरत्व मिळणं हे फायदेशीर आहे आणि काही प्रमाणात तोटे देखील आहेत. पण ह्या फॅन्टसीचा विचार माणूस कायम करत राहतो.
मरण आहे म्हणून आपण स्वतःला समजावूनही सांगतो आहेत या वेळेत दिलेलं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून एक शिस्त आपण स्वतःला लावून घेतो.
अमरत्व मिळालं तर माणूस कदाचित रानटी जनावरासारखा वागू शकतो किंवा तेच तेच आयुष्य जगून कंटाळून देखील जाऊ शकतो. मरण आहे म्हणूनच माणसाच्या आयुष्याला किंमत ही आहे.
माणसाचं अमरत्व यावरून महाभारतातल्या दोन व्यक्तिमत्वांची आठवण येते एक म्हणजे पितामह भीष्म आणि दुसरा द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा.
अर्थात पितामह भीष्मांना अमरत्व नव्हतं तर त्यांना होतं इच्छामरण. म्हणजे जेव्हा त्यांची इच्छा होईल तेव्हा ते मरण जवळ करू शकत होते!
म्हणूनच शरपंजरी पडल्यावर देखील त्यांनी मरण स्वीकारलं नव्हतं, त्यासाठी योग्य मुहूर्ताची ते वाट पाहत राहिले.
युद्ध संपल्यानंतर पांडव जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन भीष्मांनी प्राण सोडला.
आणि दुसरा म्हणजे अश्वत्थामा त्याला अमरत्वाचं वरदान होतं.
अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भातील बाळावर त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, म्हणून रागावलेल्या कृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला!
आणि त्याला कायम असाच भटकशील असा अमरत्वाचा शाप दिला. असं म्हणतात की अश्वत्थामा अजूनही स्वतःच्या कपाळावरची भळभळती जखम घेऊन फिरतोय.
मरणामुळेच जगण्याला किंमत आहे हेच खरं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.